अजिंक्यकडून नववर्षाची भेट!

Ajinkya Rahane

2020 हे वर्ष संपायला अजून दोन दिवस शिल्लक आहेत. या वर्षाकडे एक नजर टाकली असता कोरोनाशिवाय दुसरे काही दिसत नाही. माणसाला जगण्यासाठी एक नवी उमेद लागते. ती मिळते साहित्य, संस्कृती, खेळ आणि भोवतालच्या जिवंत जगण्यातून. तेच या वर्षात माणसांकडून कोरोनाच्या विषाणूने काढून घेतले होते. सकाळी उठल्यापासून ते रात्री डोळा लागेपर्यंत फक्त तोच विषय. जग थांबले आहे, असे सांगणारा. फक्त जग थांबवून कोरोना थांबला नाही तर त्याने ज्यावर हे जग चालले आहे ती माणुसकी हद्दपार करायला घेतली होती. जीवाभावाची माणसे मनाने आणि शरीराने एकमेकांपासून दूर जाण्याचा क्लेश मानवी मूल्यांवर घाव घालणारा होता.

माणूस जगतो म्हणजे काय करतो. झोपतो, सकाळी उठतो, खातो, पितो, जगण्यासाठी काम करतो, शरीरधर्म पाळतो इतकेच नाही, तर त्या पलीकडे त्याला एक मेंदू आणि मन आहे आणि शरीरासारखी ती एक गरजेची भूक आहे. ती त्याला भोवतालच्या जिंवत जगण्यातूनच मिळत असते. क्रिस्तीयानो रोनाल्डोच्या पायातून सुटलेला चेंडू भिंगरीसारखा गोलपोस्टकडे जातो तेव्हा तहानभूक विसरली जाते. ऑस्कर विजेता सिनेमा पॅरासाईट बघितल्यावर तो तनामनावर गारुड करून जातो. सत्तेचे ताम्रपट घेऊन आल्यासारखे वागत जनतेला कस्पटासमान लेखणार्‍या ट्रम्प यांना पायउतार करण्याची हिंमत लोकांमध्ये दिसते तेव्हा ठोकशाही म्हणजे हे जग नाही, याची खात्री पटते आणि हे सारे कोरोनाच्या पलीकडे एका मानवी मूल्यांची जपणूक करणारे जग असल्याची खात्री पटते. असाच एक सकारात्मक योग भारतीयांच्या जीवनात आला आहे. ज्या देशात राजकारण, सिनेमा आणि क्रिकेट हे नेहमीच्या जगण्याचे विषय आहेत, त्यापैकी एकाने तो आणून दिला आहे. अर्थातच तो क्रिकेटने आणलाय.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसर्‍या कसोटी सामन्यात मंगळवारी भारताने 8 विकेटनी शानदार विजय मिळवला. गोलंदाज आणि फलंदाजांनी केलेल्या धमाकेदार कामगिरीच्या जोरावर भारताने हा विजय साकारला आणि चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. बॉक्सिंग डे (ऑस्ट्रलियात नाताळच्या दुसर्‍या दिवशी होणारा सामना) कसोटीत विजय मिळवण्याची भारताची ही सलग दुसरी वेळ आहे. याआधी 2018 साली भारताने प्रथम बॉक्सिंग डे कसोटीत विजय मिळवला होता. या विजयासह भारताने 2020 मधील लढत जिंकली आणि चाहत्यांना 31 डिसेंबरची भेट दिली. मुंबईकर अजिंक्य रहाणे याने भारतीयांना दिलेली ही अनमोल भेट आहे. पहिल्या कसोटीत 36 अशा नीचांकी धावांमध्ये गुंडाळण्याची नामुष्की येऊन पराभवाला सामोरे जावे लागते तेव्हा तो संघच नाही तर त्या संघावर आणि त्या संघातील खेळाडूंवर जीवापाड प्रेम करणार्‍या करोडो क्रिकेटप्रेमींचा कडेलोट असतो.

कोरोनाचा काळ आणि या पराभवाची ही एक सारखी गोष्ट वाटू लागते. पण, अजिंक्यने पराभवाच्या खाईतून भारताला आणि क्रिकेटप्रेमींना बाहेर काढले. त्याने जणू ‘अजिंक्य रहाणे’चा मंत्र दिला. अजिंक्यच्या नेतृत्वाने यावेळी कमाल केली. पहिल्या सामन्यातील मानहानीकारक पराभव पचवल्यानंतर रहाणेने चांगली संघ बांधणी केली. खेळाडूंना विश्वास दिला आणि त्यामुळेच या सामन्यात भारतीय संघाकडून चांगली कामगिरी पाहायला मिळाली. अजिंक्यने यावेळी संघात निर्णायक बदल केले आणि तेच भारतासाठी महत्वाचे ठरले. अजिंक्यने पृथ्वी शॉला बाहेर करत शुभमन गिलला संधी दिली आणि त्याने चांगली सलामी दिली. त्याचबरोबर रवींद्र जडेजासारख्या अष्टपैलू खेळाडूला संधी दिली आणि त्याची कामगिरी संघासाठी महत्वाची ठरली. त्याचबरोबर वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला पदार्पणाची संधी देत संघात चांगला बदल केला. मुख्य म्हणजे सिराजने विश्वास सार्थ ठरवत प्रभावी मारा केला.

भारताने ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय मिळवला, पण यावेळी रहाणेबाबतचा एक योगायोग आता पुढे आला आहे. यापूर्वी जेव्हा रहाणेने ऑस्ट्रेलियाविरुद्ध धरमशाला येथील सामन्यात भारताचे नेतृत्व केले होते, तेव्हादेखील काही गोष्टी अशाच घडल्याचे पाहायला मिळाले होते. धरमशाला येथे झालेल्या सामन्यात कोहली खेळणार नव्हता आणि मालिका 1-1 अशी बरोबरीत होती. या सामन्यातील दोन्ही डावांत रहाणेने दमदार फलंदाजी केली होती. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे रहाणेने या सामन्यातही मैदानावर येऊन विजय साकारला होता. आजच्या सामन्यात रहाणे फलंदाजीला येईल की नाही, माहिती नव्हते. पण भारताचे दोन फलंदाज बाद झाले आणि रहाणे फलंदाजीला आला. हा या दोन्ही सामन्यांतील योगायोग म्हणाला लागेल. अजिंक्यने या सामन्यात विजयी धावही घेतली. त्यामुळे अजिंक्य आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दोन सामन्यांमध्ये नेतृत्व करताना दोन्ही वेळेला पास झालेला पाहायला मिळाले. रहाणे खूप चतूर कर्णधार आहे, त्याला सामन्याचे पारडे कुठे झुकते याचा अंदाज येतो. माझ्या मते त्याचा शांत स्वभाव नवोदीत खेळाडूंसाठीही फायदेशीर ठरला.

उमेश दुखापतीमुळे बाहेर गेल्यानंतरही मैदानावर एका प्रकारे आत्मविश्वास दिसत होता हे बघा, दोघेही चांगले खेळाडू आहेत, दोघांनाही सामन्यात काय घडू शकेल याचा अंदाज येतो. विराट मैदानात आक्रमक असतो, तर अजिंक्य शांत असतो हा त्यांचा स्वभाव आहे. विराटच्या मनात असते ते लगेच चेहर्‍यावर येत पण अजिंक्य शांत राहून रणनीती आखतो. त्याला काय साध्य करायचं आहे हे त्याला माहिती असतं म्हणूनच तो शांत राहून नेतृत्व करतो. त्याचे या कसोटीतील पहिल्या डावातले शतक हा सामन्यातला टर्निंग पॉईंट होता. या शतकी खेळीमुळे अजिंक्यला सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

आता मालिकेतील उरलेल्या दोन सामन्यात अजिंक्यच्या टीम इंडियाने अशीच बहारदार कामगिरी करून कांगारूंना त्यांच्या देशात सलग दुसर्‍यांदा नामवण्याची करामत करावी, अशी अपेक्षा भारतीय क्रिकेटप्रेमी करत आहेत. पहिल्या कसोटीतील लाजिरवाण्या पराभवानंतर अनेक माजी दिग्गज खेळाडूंनी भारताचा मालिकेत 4-0 असा पराभव होईल अशी भविष्यवाणी केली होती. ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू शेन वॉर्नने भारतीय संघाचे आता काही खरे आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ त्यांचा मोठा पराभव करेल असे वक्तव्य केले होते. फक्त शेन वॉर्न नाही तर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने देखील अशाच पद्धतीचे वक्तव्य केले होते. त्याने तर भारताचा मालिकेत 4-0 असा पराभव होईल असे म्हटले होते. ऑस्ट्रेलियन आजी माजी खेळाडू प्रतिस्पर्धी संघाचे मानसिक खच्चीकरण करण्यात पटाईत असतात. आजी खेळाडू मैदानावर शेरेबाजी करत दबाव आणत असतात आणि माजी खेळाडू परदेशी संघ किती कमजोर आहे, हे सतत बाहेरून सांगत असतात. हा एक मानसिक दडपणाचा भाग असतो.

समोरच्या संघाचे हे दडपण झुगारून देत भारतीय संघाने विजय मिळवला, हे विशेष. भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादव दुसर्‍या कसोटी सामन्याच्या दुसर्‍या डावात उमेश यादवला दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले होते. उमेश तिसर्‍या कसोटी सामन्यात खेळणार नसून त्याच्या जागी टी. नटराजनला संघात स्थान द्यायला हवे, असे बर्‍याच जणांना वाटत आहे. नटराजनला नेटमध्ये सराव देण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यावर नेण्यात आले होते. पण त्यानंतर ट्वेन्टी-20 मालिकेत नटराजनला खेळवण्यात आले. नटराजनने या मालिकेत नेत्रदीपक कामगिरी करत 6 विकेट्स मिळवले होते. याशिवाय भरवशाचा फलंदाज रोहित शर्मा या तिसर्‍या कसोटीत खेळण्याची शक्यता आहे. तसेच पहिल्या दोन सामन्यात अपयशी ठरलेल्या सलामीवीर मयांक अग्रवालच्या जागी के.एल.राहुलला संधी दिल्यास भारतीय संघाची ताकद नक्की वाढेल. उरलेल्या दोन कसोटींसाठी भारतीय संघाला शुभेच्छा!