घरCORONA UPDATEBlog: आजी-आजोबा मॉर्निंग वॉक करताय? पण त्यासाठी आधी जिवंत राहावे लागेल

Blog: आजी-आजोबा मॉर्निंग वॉक करताय? पण त्यासाठी आधी जिवंत राहावे लागेल

Subscribe

सतत ग्लोव्हज घालून हाताचा रंग बदलत आहे. दोन अडीच महिने झाले जगण्याची पद्धतच बदलून गेली आहे. हॉस्पिटलमध्ये, राहण्याच्या ठिकाणी, फोनवर… फक्त एकच शब्द कानावर पडतोय… कोरोना! एक वर्तुळ बनले आहे. त्याच्याबाहेरचं जग विसरूनच गेलं आहे. बरं हे काम करण्यासाठी अंगावर काही कवचकुंडले नाहीत. एका सेकंदाची गफलत महागात पडू शकते. चुकून जरी अंग गरम वाटले तरी भीती वाटतेय. मी एकटाच नाही… कोविड ड्युटी करणारा प्रत्येक डॉक्टर याच अवस्थेतून जात आहे.

बरं हे करुन आम्ही काही करोडो लाखो कमावत आहोत, असेही नाही. अर्थात हे कोणी पैशासाठी करतच नाही. प्रत्यक्ष रुग्णाला हात लावून काम करणाऱ्या एकाही डॉक्टरच्या मनात चुकूनही येत नाही की आपण हे कशासाठी करतोय… पण जेव्हा सुशिक्षित, सुसंस्कृत समजले जाणारे लोक जेव्हा असे जथ्थ्याने बाहेर पडतात तेव्हा प्रश्न पडतोच… कशासाठी करायचं?

- Advertisement -

भारतात दिवसाला दहा हजारांहून अधिक लोक पॉझिटिव्ह येत आहेत. मृत्यूदर दिवसाला तीनशेकडे जातोय. ३० जून नंतर मुंबईत एकाही नवीन रुग्णाला बेड मिळणार नाही अशी अवस्था तयार होत असताना या उच्चभ्रू लोकांना अक्कल का येत नसावी. मुंबईत मॉर्निंग वॉक साठी बाहेर पडलेल्या या लोकांचा फोटो लक्षपूर्वक पाहिला तर दिसेल की यात अर्ध्याहून अधिक लोक साठच्या पुढचे आहेत. आत्तापर्यंत झालेल्या सात हजार मृत्यूंपैकी सहा हजारांहून अधिक लोक साठच्या पुढचे होते हे एवढ्या लवकर विसरले लोक. कामासाठी बाहेर पडणे, आर्थिक अडचण म्हणून रस्त्यावर यावे लागणे ही गोष्ट समजू शकते. पण आजघडीला मॉर्निंग वॉकसाठी आजोबा लोकांनी बाहेर पडणं हे निराशाजनक आणि अतिशय बेजबाबदार वागणं आहे. डायबिटीस आणि हायपरटेंशन असणारे कोरोनाच्या हिटलिस्टवर आहेत. मग मुद्दामहून या आजाराला का आमंत्रण द्यायचं? आमच्या आजोबा आज्जीच्या वयाच्या लोकांचा मृतदेह प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळून देताना काय यातना होतात ते शब्दात कसं सांगायचं?

कुठलातरी नेता येतो, पत्रकार येतो आणि हॉस्पिटल मधील फोटो, व्हिडिओ काढून व्यवस्थेच्या नावे खडे फोडतो. पण आम्हाला असे फोटो काढायची परवानगी नाही, अन्यथा दाखवलं असतं कोरोनाचा रूग्ण कसा मरतो ते! तेंव्हाच या लोकांना जाणीव झाली असती. गेल्या तीन महिन्यांत सर्वात जास्त चुका आजवर मुंबईतील लोकांनी केलेल्या आहेत आणि त्याचा रिझल्ट स्पष्ट दिसतोय. अजूनही त्याच चुका करणे हे संतापजनक आहे!

- Advertisement -

एक सत्य गोष्ट सांगतोय की आजघडीला मुंबई आणि पुण्यातील एकाही कोविड हॉस्पिटलच्या आयसीयु मधील एकही बेड रिकामा नाही‌ किंवा हॉस्पिटल मधील एकही व्हेंटिलेटर रिकामे नाही. कधी कधी व्हेंटिलेटर लवकर ‘रिकामे व्हावे’ म्हणून वाट पहावी लागते कारण ते दुसऱ्या थोड्या चांगल्या पेशंटला लावणे आवश्यक असते जेणे करून तो तरी वाचला पाहिजे ही अपेक्षा असते.

एकाबाजूला ही क्षणोक्षणीची धडपड सुरू असताना तुम्ही काय करताय? मॉर्निंग वॉक शरीरासाठी, आरोग्यासाठी चांगलेच असते पण त्यासाठी आधी जिवंत राहणे आवश्यक आहे. तुमच्या आरोग्यासाठीच तर सुरू आहे सर्व. बऱ्याच जणांना असं वाटतं असेल की, आम्ही मास्क घालून आहोत तर तो गैरसमज आहे… उघडे असणारे हात सर्वात जास्त घातक आहेत. मुंबईचं स्पिरीट असं मोक्याच्या वेळी मरीन ड्राईव्हवर फिरताना चांगलं वाटेल का?

लॉकडावून नकळत उठले असले तरी कोरोना मात्र ठाण मांडून बसला आहे. दररोज क्षणोक्षणी त्याची तीव्रता वाढत आहे. ‘मृतदेह स्मशानभूमीत घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका वेटिंगवर आहेत’ मला वाटत नाही की सत्य परिस्थिती समजून सांगण्यासाठी यापेक्षा अजून काही वर्णन करण्याची गरज आहे.

आजपासून बहुतांश मोकळीक शासनाकडूनच मिळणार आहे, याला सुदैव म्हणावं की दुर्दैव. हे आपण स्वत:च ठरवायचं आहे. आपली वैद्यकीय व्यवस्था लोकांच्या अशा बेजबाबदार वागण्याने क्षणोक्षणी थकत चालली आहे. आयसीयुमधील एक रूग्ण चालत घरी जावा म्हणून केवळ एक व्यक्ती नाही तर अख्खी सिस्टीम झटत असते. तो जाते वेळी ‘धन्यवाद’ म्हणतो तेव्हा सगळा थकवा निघून जातो. पण थकवतात हे गर्दी करणारे लोक. औषधे मुबलक आहेत, डॉक्टर, कर्मचारी भरपूर नसले तरी पुरेसे आहेत. ते कितीही काम करायला तयार आहेत. आवश्यकता आहे ती त्यांचा आत्मविश्वास वाढविण्याची!
तुमचं एक थांबलेलं पाऊल या काम करणाऱ्यांच्या मनात ‘कशासाठी’ हा प्रश्न उभा न राहू देण्याचं काम करणार आहे.


लेखक डॉ. प्रकाश कोयडे – वायसीएम हॉस्पिटल पुणे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -