…खरंच काही वेगळं घडलंय का भाजपमध्ये?

Eknath Khadse, Pankaja Munde, Vinod Tawde, Chandrasekhar Bavankule, Devendra Fadnavis

विधान परिषदेच्या नऊ जागांपैकी भारतीय जनता पक्ष तीन जागा सहज निवडून येणार आहे. त्यासाठीचे उमेदवार पक्षाने काल निश्चित केले. इच्छुक उमेदवारांमध्ये एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे विदर्भातील चंद्रशेखर बावनकुळे यांचा समावेश होता. यातील पहिले तिघे तर पाच वर्षांपूर्वी थेट मुख्यमंत्री पदाचेच दावेदार होते. परंतु, त्यामुळेच विधानसभा निवडणुकीत कावेबाज फडणवीस यांनी खडसे, तावडे यांच्याबरोबर बावनकुळे यांनाही तिकीट नाकारून तर पंकजा मुंडे यांना निवडणुकीत कात्रजचा घाट दाखवून त्यांना थेट राजकारणाबाहेरचा रस्ता दाखविला. विशेषतः खडसे आणि पंकजा मुंडे यांनी थोडा आरडाओरडा केला असला तरी पुनर्वसन होईल म्हणून तर तावडे यांनी याच भावनेने सुरुवातीपासूनच शांत रहाण्याची भूमिका घेतली होती. किंबहुना काही घडलेच नाही, असे दाखवत तावडे यांनी अलिकडे फडणवीस यांच्याशी जवळीक दाखवायला सुरुवात केली होती. पण, या सगळ्याचा काहीही उपयोग न होता, शेवटी विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने या चारही नेत्यांची कारकीर्द संपविण्यावर पक्षाने एकप्रकारे शिक्कामोर्तब केले आहे.

काल या निमित्ताने बरीच भवती न भवती झाली! खडसे यांनी पुन्हा आगपाखड केली, पक्षाच्या बांधणीसाठी आपण खस्ता खाल्ल्या असताना आपल्यावर अन्याय का, असा त्यांचा सवाल आहे. पण, खरंच काही वेगळे घडलंय का भाजपमध्ये? ही तर चालत आलेली परंपरा आहे! पक्षाच्या वाढीच्या काळात बहुजन समाजातील नेत्यांचा वापर करायचा, किंबहुना विरोधकांवर हल्ले करण्यासाठी अगदी आघाडीवर ठेवायचे, त्यासाठी महत्त्व दिल्याचे दाखवायचे आणि यांनीही कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ ठरत तुटून पडायचे, हेच घडत आले आहे. मात्र, यातील कुणालाच राज्याचे नेतृत्व करण्याइतके खरे म्हणजे स्थानिक ब्राह्मणी वा उच्चवर्णीय नेतृत्वाला स्पर्धक ठरेल इतकं मोठं होऊ द्यायचे नाही, हे धोरण ठरलेले असतं. अशी असंख्य उदाहरणे राज्याच्या पातळीवर पाहता येतील. मग ते मधू देवळेकर, सूर्यभान वहाडणे पाटील असोत वामनराव परब असोत की आताचे खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे असोत! गोपीनाथ मुंडे यांच्यासारखा ‘मास लीडरशिप’ असलेला नेताही यातून सुटला नाही. अर्थात, हे केवळ राज्याच्या वा त्यावरील पातळीवर घडते असे समजण्याचे कारण नाही. अगदी पंचायत समिती, जिल्हा परिषद पातळीवरही असेच अनुभव येत असतात. बहुजन कार्यकर्त्यांना त्या त्या पातळीवर असे अनुभव येत असतात.

याचं एक सूत्रच ठरलेलं असतं, बहुजन समाजातील एखाद्या नेत्याचे पाय कापायचे असतील तर अशा वेळी त्याच्या खालच्या पातळीवरील (राजकीय दृष्ट्या) नेत्याला पुढे करायचे! म्हणजे हा नेता आधीच्या नेत्याविरोधात जातो त्यामुळे जातीयवादाचा आरोप लपवणेही सोपे जाते. आताही तेच घडलेय. तिकिटे देताना, गोपीचंद पडळकर, रणजितसिंह मोहिते पाटील, प्रविण दटके, अजित गोपछेडे अशा तुलनेने दुय्यम स्थानावरील नेत्यांना पुढे करण्यात आले आहे. आता ते फुशारून जाऊन, प्रसंगी भाजप आणि नागपुरी नेतृत्वाच्या बचावासाठी खडसे, मुंडे, तावडे, बावनकुळे यांच्यावर धावून जायला कमी करणार नाहीत. अर्थात आज खडसे, मुंडे, तावडे, बावनकुळे जात्यात भरडले जात असले तरी आपण सुपात आहोत, याचं भान तिकीट मिळणाऱ्या रणजितसिंह मोहिते पाटील वगळता (ते मुळचे भाजपचे नाहीत) इतर तिघांनी लक्षात ठेवायला हरकत नाही.

– प्रभाकर नारकर (लेखक ज्येष्ठ पत्रकार असून राजकीय अभ्यासक आहेत.)