घरफिचर्समायमहानगर ब्लॉगसेन्सेक्स आणि निफ्टी : शेअर बाजाराचा तापमापक

सेन्सेक्स आणि निफ्टी : शेअर बाजाराचा तापमापक

Subscribe

आपण रोज सेन्सेक्स आणि निफ्टीसंबंधी बातम्या वाचत असतो. सेन्सेक्स वाढला, सेन्सेक्स पडला असं आपण नेहमी ऐकत असतो. सेन्सेक्स म्हणजे शेअर बाजार असा हा शब्द परवलीचा झाला आहे. मुंबई शेअर बाजार (BSE) आणि राष्ट्रीय शेअर बाजार (NSE) हे देशातील दोन प्रमुख शेअर बाजार आहेत. सेन्सेक्स हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक आहे. तर निफ्टी हा राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक असतो. शेअर बाजाराची रोजची परिस्थिती आपल्याला सेन्सेक्स, निफ्टीवरून समजत असते. मुंबई आणि राष्ट्रीय या दोन शेअर बाजारांमध्ये जे काही चमत्कार घडतात, त्याचे हे शब्द निर्देशक आहेत.

शेअर बाजारात गुंतवणूक करणार्‍यांची संख्या मागील काही वर्षांमध्ये वाढली आहे. तर अनेकांना गुंतवणूक करण्याची इच्छा असते. अशा गुंतवणूकदारांनी शेअर बाजार म्हणजे काय, बाजाराची कार्यपद्धती, संबंधित संज्ञा जाणून घेणे आवश्यक आहे. या लेखात आपण की सेन्सेक्स आणि निफ्टी काय असतो आणि तो कसा काढला जातो? तसेच डीमॅट म्हणजे काय? हे जाणून घेणार आहेत. आपण रोज सेन्सेक्स आणि निफ्टीसंबंधी बातम्या वाचत असतो. सेन्सेक्स वाढला, सेन्सेक्स पडला असं आपण नेहमी ऐकत असतो. सेन्सेक्स म्हणजे शेअर बाजार असा हा शब्द इतका परवलीचा झाला आहे. मुंबई शेअर बाजार (BSE) आणि राष्ट्रीय शेअर बाजार (NSE) हे देशातील दोन प्रमुख शेअर बाजार आहेत. सेन्सेक्स हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक आहे. तर निफ्टी हा राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक असतो. शेअर बाजाराची रोजची परिस्थिती आपल्या सेन्सेक्स, निफ्टीवरून समजत असते. सेन्सेक्स म्हणजे सेन्सिटिविटी इंडेक्स.

सेन्सेक्स इतक्या इतक्या अंकांनी आपटला, इतक्या इतक्या अंकाने वाढला असं आपण ऐकत, वाचत असतो. पण सेन्सेक्सचा हा वाढीचा आणि घटीचा आकडा कसा काढला जातो हा प्रश्न अनेकांना पडला असेल. मुंबई शेअर बाजारात ५ हजारांपेक्षा अधिक कंपन्यांची नोंदणी झाली आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजारातील नोंदणी झालेल्या कंपन्यांचा आकडा जवळपास १९०० आहे. मात्र, सेन्सेक्सची कामगिरी मोजण्यासाठी या ५ हजारांमधील फक्त ३० कंपन्यांचा आधार घेतला जातो. म्हणजे सेन्सेक्समध्ये ३० कंपन्यांचा समावेश होतो. या ३० कंपन्यांच्या शेअर्सची रोजची कामगिरी पाहूनच सेन्सेक्स काढला होता. म्हणजे या कंपन्याच्या शेअर्समधील चढ-उतारावरून सेन्सेक्स वाढला की घटला हे ठरते. सेन्सेक्सला बीएसई ३० किंवा बीएसई सेन्सेक्स असंही म्हणतात.

- Advertisement -

मुंबई शेअर बाजारातील ५ हजार कंपन्यांपैकी सेन्सेक्समध्ये ३० कंपन्या निवडताना काही निकष लावले गेले आहेत. या ३० कंपन्या भारतीय अर्थव्यवस्थेच्या विविध औद्योगिक क्षेत्रांचे प्रतिनिधित्व करतात. म्हणजेच त्या-त्या औद्योगिक क्षेत्रातील या कंपन्या आकाराने आणि भागभांडवलाने मोठ्या आहेत. वित्तीय, वाहन, भांडवली वस्तू उद्योग, बँकिंग, तेल व वायू, माहिती तंत्रज्ञान, उर्जा, धातू व खाण, दूरसंचार या क्षेत्रातील कंपन्यांचा सेन्सेक्समध्ये समावेश आहे. या हेवीवेट कंपन्यांच्या शेअर्समधील रोजची होणारी उलाढाल सेन्सेक्सची कामगिरी ठरवतो. सेन्सेक्समधील कंपन्यांची यादी वेळोवेळी बदलत असते. मुंबई शेअर बाजार आवश्यकतेनुसार ह्या यादीत बदल करतो. मात्र, सेन्सेक्समधील शेअर्सची संख्या कायम तीसच असते. ती वाढत नाही किंवा कमी होत नाही. फक्त यातील कंपन्या बदलतात.

निफ्टी हा राष्ट्रीय शेअर बाजारातील नोंदणीकृत ५० प्रमुख शेअर्सचा निर्देशांक आहे. म्हणजे निफ्टीमध्ये ५० शेअर्सचा समावेश होतो. सेन्सेक्सप्रमाणे निफ्टीतील या कंपन्या हेवीवेट आहेत. २२ वेगवेगळ्या उद्योगांमधून या ५० कंपन्या निवडल्या जातात. निफ्टी NATIONAL आणि FIFTY या दोन शब्दांपासून तयार झाला आहे. त्याला निफ्टी फिफ्टी असंही म्हणतात.

- Advertisement -

फ्री फ्लोट म्हणजे काय?
सेन्सेक्सची गणना फ्री फ्लोट बाजार भागभांडवलावर आधारीत केली जाते. कोणत्याही कंपनीच्या एकूण भागभांडवलाच्या जेवढे भागभांडवल शेअर बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असते त्याला बाजार भागभांडवल (Market Capitalization) असे म्हणतात. म्हणजे प्रवर्तक आणि सरकारचा हिस्सा एकूण भागभांडवलातून वजा करून शिल्लक राहिलेली रक्कम बाजारात विकण्यासाठी उपलब्ध असते. ही रक्कम म्हणजेच फ्री फ्लोट बाजार भागभांडवल.

उद्दा. एखाद्या कंपनीचे भागभांडवल २ लाख कोटी रुपये आहे. या भागभांडवलात प्रवर्तक आणि सरकारचा हिस्सा १ लाख कोटी रुपयांचा असल्यास उरलेले १ लाख कोटी रुपये म्हणजे फ्री फ्लोट बाजार भागभांडवल. या १ लाख कोटी रूपयांचे शेअर्स सर्वसामान्य गुंतवणूकदारांना खरेदीसाठी उपलब्ध असतात. सेन्सेक्समधील अशा ३० कंपन्यांच्या फ्री फ्लोट भागभांडवलाची बेरीज केली जाते. या एकूण फ्री फ्लोट भागभांडवलाचे जेवढे शेअर्स शेअर बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्या शेअर्सच्या किमतीची सरासरी काढून सेन्सेक्स काढला जातो. कंपनीकडून जारी केलेल्या एकूण शेअर्सची संख्या गुणिले शेअर्सचा भाव यावरून किती फ्री फ्लोट बाजार भागभांडवल आहे याची माहिती मिळते. निफ्टीही अशाच प्रकारे ५० कंपन्यांच्या फ्री फ्लोट बाजार भागभांडवलावर काढला जातो.

सेन्सेक्सचे आधार मूल्य १ एप्रिल १९७९ पासून १०० प्रमाणे घेतले आहे. यासाठी १९७८-७९ आधार वर्ष आहे. म्हणजे सेन्सेक्स सुरू झाला तेव्हा तो १०० अंक होता. निफ्टीचे आधार वर्ष १९९५ आहे आणि आधार अंक १००० आहे. निफ्टीची गणना ३ नोव्हेंबर १९९५ पासून केली जाते. म्हणजे निफ्टी सुरू झाला तेव्हा तो १००० अंकापासून सुरू झाला असे म्हणूया. या दोन्ही निर्देशांकाचा एकच हेतू म्हणजे शेअर बाजारातील स्थिती सांगणे. थोडक्यात, सेन्सेक्स, निफ्टीचे बदलणारे अंंक आपल्याला शेअर बाजारातील सद्य:स्थितीत दाखवतात. मुंबई शेअर्स बाजाराचे (बीएसई) सेन्सेक्स सारखेच आणखी काही निर्देशांक आहेत. उदा. बीएसई ५०, बीएसई १००, बीएसई २००, बीएसई ५००, बीएसई स्मॉल कॅप, बीएसई लार्ज कॅप. तर एनएसईचे निफ्टी फिफ्टी सारखेच एनएसई १००, एनएसई २००, एनएसई ५०० एनएसई मिडकॅप, एनएसई बँक, एनएसई फार्मा आदी निर्देशांक आहेत.

डीमॅट- शेअर बाजारात प्रवेशाचा मार्ग
शेअर बाजारात व्यवहार करण्यासाठीची सर्वात पहिली पायरी म्हणजे डीमॅट खाते उघडणे. जसे आपण पैसे ठेवण्यासाठी बँक खाते उघडतो तसेच शेअर्स ठेवण्याचे खाते म्हणजे डीमॅट. आज जवळजवळ सर्वच सरकारी आणि खासगी बँका तसंच शेअर ब्रोकर डीमॅट उघडण्याची सुविधा देतात. पूर्वी शेअर्स खरेदी केल्यावर शेअर्स सर्टिफिकेट दिली जाईची. पण आता हा व्यवहार सर्व ऑनलाईन असतो. शेअर्स, बाँड्स डिबेंचर्स, सरकारी रोखे आदी कागदी स्वरूपात न ठेवता डिमटेरियलायझेशन करुन इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डच्या स्वरुपात ज्या खात्यात ठेवता येतात ते खाते म्हणजे डीमॅट. १९९६ पासून कागदी स्वरूपात शेअर्स सर्टिफिकेट देणं बंद होऊन डीमॅटची सुरूवात झाली. डीमॅटची सुरूवात ही शेअर बाजारातील मोठी क्रांती होती. यानंतर शेअर बाजाराचा वेगाने विस्तार झाला. सर्व व्यवहार ऑनलाइन झाल्यामुळे फसवणुकीची शक्यताच घटली.

बँकेत सेव्हिंग खाते उघडल्यावर आपल्याला पासबुक दिलं जातं. पासबुकमध्ये किती पैसे आपल्या खात्यात आहेत ते दिसतं. अगदी तसंच डीमॅट खात्याचं स्टेटमेंट आपल्याला मिळतं. त्यावरून आपल्या खात्यात कोणते, किती आणि किती रकमेचे शेअर्स आहेत ते कळतं. डीमॅट खातं उघडण्याची सुविधा देणारी संस्था म्हणजे डिपॉझिटरी. देशात सेंट्रल डिपॉझिटरी सव्हिर्सेस (CDSL) आणि नॅशनल सिक्युरीटीज डिपॉझिटरी (NSDL) अशा दोन मुख्य डिपॉझिटरीज आहेत. या दोन्ही डिपॉझिटरीमध्ये आपल्याला थेट डीमॅट खातं उघडता येत नाही. यासाठी डिपॉझिटरीजने एजंट नेमलेले असतात. त्यांना डिपॉझिटरी पार्टिसिपंट (डीपी -DP) असं म्हणतात. खासगी व राष्ट्रीयीकृत बँका, शेअर ब्रोकर आदी सीडीएसएल आणि एनएसडीएलच्या डीपी आहेत. या डीपींंमध्ये आपण डीमॅट खाते उघडतो. बँकेच्या कोणत्याही शाखेत जाऊन तुम्ही डीमॅट उघडू शकता. या डीमॅट खात्यांची नोंद डिपॉझिटरीजकडे इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डच्या स्वरुपात असते. या डिपॉझिटरीजवर Security & Exchange Board of India (सेबी) चं नियंत्रण असतं.

बँकेत खातं उघडताना काही रक्कम भरावी लागते. मात्र डीमॅट उघडताना शेअर्स खरेदी करण्याचं बंधन नसतं. तसंच त्यानंतरही खात्यात शेअर्स ठेवण्याचे बंधन नसतं. डीपी डीमॅट खात्यासाठी दर वर्षाला शुल्क आकारतात. डीमॅटची वार्षिक फी ५०० ते ८०० रुपये असते. काही ब्रोकर कंपन्या लाईफटाईम डीमॅट शुल्क माफ करतात. पण यासाठी त्यांचे काही निकष असतात. डीमॅट खातं उघडण्याची प्रकिया खूप सोपी आहे. आता तर अवघ्या १५ ते २० मिनिटात डीमॅट खातं उघडले जातं. त्यानंतर तुम्ही तात्काळ शेअर्स खरेदी आणि विक्री करू शकता.

डीमॅटसाठी लागणारी कागदपत्रे
पॅन कार्ड,सहा महिन्यांचे बँक स्टेटमेंट,रहिवाशी पुरावा, २ रंगीत फोटो,बँकेचा क्रॉस केलेला चेक, केवायसी माहिती, ट्रेडिंग खाते, डीमॅट खाते आणि ट्रेडींग खाते हे वेगवेगळे असते. डीमॅट खाते उघडतानाच ट्रेडींग खाते उघडले जाते. शेअर्स ठेवण्यासाठी डीमॅट खाते असते. तर शेअर्स खरेदी, विक्री ट्रेडींग खात्यातून केली जाते. म्हणजे ट्रेडींग खात्यातून घेतलेले शेअर्स डीमॅट खात्यात जमा होतात.

ऑनलाइन ट्रेडिंग करण्यापूर्वी स्टॉक ब्रोकर्सकडे त्यांच्या क्लायंटच्या वतीने खरेदी आणि विक्री ऑर्डर देण्याची जबाबदारी होती. ऑनलाइन ट्रेडिंग सेवांमुळे गुंतवणूकदार आता ऑनलाइन किंवा फोन कॉल करून खरेदी आणि विक्रीच्या ऑर्डर देऊ शकतात. ट्रेडिंग खाते स्टॉक ब्रोकरद्वारे प्रदान केले जाते आणि ते क्लायंटला शेअर्स खरेदी किंवा विक्री करण्यास अनुमती देते. ट्रेडिंग खाते गुंतवणूकदाराचे डीमॅट खाते आणि बँक खात्याला जोडले जाते. तुम्ही तुमच्या ट्रेडिंग खात्याद्वारे खरेदी ऑर्डर देऊ शकता. तसेच खरेदी आणि विक्रीसाठी आवश्यक रक्कम उपलब्ध होते. गुंतवणूकदार अनेक ट्रेडिंग खाती ठेवू शकतात. या खात्यांमध्ये मार्जिन खाते, सेवानिवृत्ती बचतीचे खाते, दीर्घकालीन शेअर्ससाठी खरेदी आणि होल्ड खाते आणि एक दिवसाचे ट्रेडिंग खाते यांचा समावेश असू शकतो. ट्रेडिंग खाते गुंतवणूकदाराला त्याची वैयक्तिक ट्रेडिंग मर्यादा सेट करण्याची परवानगी देते. गुंतवणूकदारांना ट्रेडिंग खाते वापरून शेअर्स, गोल्ड ईटीएफ, फॉरेक्स, ईटीएफ आणि डेरिव्हेटिव्ह खरेदी आणि विक्री करता येते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -