वाटेवरती काचा ग….

लैंगिक हेतूने केलेला कुठलाही स्पर्श गुन्हाच असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने याआधी याविषयी दिलेल्या निकालाचा संदर्भ या सर्वोच्च न्यायालयाच्या अलिकडच्या निकालामागे आहे. एखाद्या लहान मुलीचा हात पकडणे किंवा संबंधित उल्लेख केलेला आक्षेपार्ह स्पर्श ही गोष्ट लैंगिक शोषणात येत नसल्याचे खंडपीठाने म्हटले होते. पोक्सो अंतर्गत या बाबी लैंगिक शोषणात मोडत नसल्याचा निकाल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने याआधी दिला होता. या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्यावर सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द ठरवण्यात आला आहे.

बहुसंख्य शहरातील लहान मुलामुलींचे पालकही नोकरीकामानिमित्त दिवसातील निश्चित वेळेत आपल्या मुलांची जबाबदारी पाळणाघर किंवा जवळच्या नातेवाईकांकडे सोपवून घराबाहेर पडतात. लहान मुलांवरील अत्याचारामागे अनेकदा शेजारी राहाणारा इसम, नातेवाईक असल्याचे स्पष्ट होते. अनेकदा लहान मुलांवर होणार्‍या लैंगिक अत्याचाराची माहिती पालकांना उशिरा समजल्याचेही अनेक प्रकरणांवरून समोर आले आहे. शाळेत किंवा शाळेत घेऊन जाणार्‍या बसमध्येही लहानग्यांवर अत्याचार झाल्याची प्रकरणे याआधी समोर आलेली आहेत. चांगला आणि वाईट स्पर्श ओळखण्यासाठी लहान मुलांचे समुदेशन केले जाते. यात स्पर्शाविषयीचे संकेत शिकवले जातात. यात निर्देशीत केलेल्या संकेताविरोधात उच्च न्यायालयाचा निर्णय असल्याचे बालकांसाठी काम करणार्‍या सामाजिक संस्थांचे म्हणणे होते. त्यामुळे या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले.

मुलांवरील लैंगिक अत्याचार ओळखण्याबाबत पालकांमध्ये सजगता असणे गरजेचे आहे. याविषयी मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यासाअंती काही मुद्दे मांडण्यात आलेले आहेत. वय वर्षे अकरा ते अठरा वर्षापर्यंत मुलींवरील अत्याचाराविषयी ही बाब महत्वाची आहे. संबंधित आरोपी व्यक्तींकडून मोबाईमधली आक्षेपार्ह चित्रफित दाखवली जाणे, शारीरिक अवयवांविषयी टिप्पणी करणे, धमकावणे, भीती घालणे, घरी सांगितल्यास आईवडिलांना किंवा भावंडांना इजा करण्याची धमकी देणे, खाऊ किंवा इतर गोष्टीचे आमिष दाखवणे, चौदा ते अठरा वर्षाच्या मुलांना फूस लावून पळवून नेणे असे अत्याचाराचे प्रकार आहेत. सिनेमा, चित्रपटात काम मिळवून देतो, घरांतील पालक मंडळी वाईट आहेत, ते तुला समजून घेत नाहीत, तुझा छळ करत आहेत, असे बोलून सहानुभूती दाखवून गैरफायदा घेणे, जर लैंगिक अत्याचार झालाच तर त्याचे मोबाईल चित्रिकरण केल्याचे सांगून बदनामी करण्याची धमकी देणे, आदी प्रकार अशा घटनांमध्ये समोर आलेले आहेत.

आपल्या पाल्यावर अत्याचार होत असल्याचे ओळखणे पालकांसाठी महत्वाचे आहे. यात पालकांनी दिवसातील निश्चित वेळ आपल्या पाल्यांना द्यायलाच हवा. त्यासाठी संवादातून विश्वास, प्रेम आणि जिव्हाळ्याचे नाते पालक मुलांमध्ये असायला हवे. भौतिक सुखाच्या शर्यतीत अनेकदा पैसा कमावण्याच्या प्रयत्नात पालकांकडून मुलांकडे दुर्लक्ष होते. त्यासाठी मुलांसोबत संवाद आणि आपलेपणाची भावना वाढायला हवी. मुलामुलांना एकटं वाटता कामा नये, आपले आईबाबांपेक्षा इतर गोष्टी त्यांच्यासाठी जास्त महत्वाच्या आहेत, हा समज मुलांसाठी धोकादायक होऊ शकतो, ज्याचा गैरफायदा इतर मंडळी घेऊ शकतात.

वडिलांपेक्षा मुली आपल्या आईकडे मनमोकळेपणाने बोलू शकतात, त्यासाठी आईने याविषयी सजग असणे महत्वाचे आहे. आपल्या आजूबाजूला असलेल्या अनोळखी व्यक्तींशी जास्त संपर्क येणार नाही, मुले त्यांच्या आमिषाला भुलणार नाहीत, यासाठी आईने मुलींशी योग्य संवाद ठेवायला हवा, यात अतिकाळजीही मुलांना भित्रेपणाकडे नेत असल्याने त्यातील योग्य मध्यम मार्गाचा अवलंब करता यायला हवा. पालकांनी मुलामुलींच्या वागणुकीत बदल समजून घेण्याची गरज आहे. यात मुले मूक शांत राहाणे, तणावात आणि भीतीच्या छायेखाली वावरणे, तोंडाने लैंगिक अत्याचाराचाबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणे किंवा असा विषय पूर्णपणे टाळणे, घराबाहेर मित्र सवंगड्यांमध्ये मिसळण्याबाबत उदासीन होणे, गुप्तांगाची काळजी दाखवणे किंवा फार काळजी घेणे, आंघोळीसाठी किंवा शौचास गेल्यानंतर जास्त वेळ घालवणे, घरातून पळून जाणे, नियमित असलेल्या वागणुकीत फरक येणे अशी काही लक्षणे मुलांमुलींमध्ये आढळू शकतात.

वयाच्या तुलनेत लैंगिकतेबद्दल जास्त माहिती घेण्याचा प्रयत्न करणे किंवा माहिती असणे, झोपेत अस्वस्थ होणे, दचकणे अशी लक्षणेही आढळतात. मुलांच्या बाबतीतही मित्रांमध्ये मिसळण्यास भीती वाटणे, एकदम कठोर वागणे, एखाद्या जागी जाण्यासाठी नकार देणे किंवा ठिकाणे टाळणे, झोपेत दचकणे अशी किंवा इतर लक्षणे आढळू शकतात. मात्र वागणुकीत अशा बाबी आल्यास इथे लैंगिक अत्याचारच आहे, अशा टोकाला जाण्याची गरज नाही, या वागणुकीमागे इतरही कारणे असू शकतात. अशा वेळी शांततेने समजून घेत योग्य माहिती घेऊन, संबंधित योग्य लोकांचा सल्ला घेऊन असे प्रकरण संयमाने विवेकबुद्धीने हाताळणे महत्वाचे आहे.

लैंगिक अत्याचारातील गुन्ह्यासाठी देहाचाचा देहाशी संपर्क आवश्यक असल्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर याबाबतच्या निकष आणि संकेतांमध्येही बदल होण्याची शक्यता आहे. अत्याचाराच्या लक्षणांची पोक्सो कायद्यातील व्याप्ती त्यामुळे वाढणार आहे. लैंगिक अत्याचारापासून मुलांचे संरक्षण करण्यासाठी असलेल्या कायद्याच्या उद्देशालाचा उच्च न्यायालयाच्या याआधीच्या निर्णयामुळे धक्का पोहचला होता, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. लैंगिक हेतू ठेवून कपड्यांमधून व्यक्तीला स्पर्श करणे हेसुद्धा पोक्सो कायद्याच्या व्याख्येत समाविष्ट आहे, असं सांगत न्यायालयांनी स्पष्ट शब्दांमध्ये संदिग्धता शोधण्यात अतिउत्साही होता कामा नये, असे स्पष्ट केले. विषय लहान मुलांचा आणि अतिशय संवेदनशील असल्याने आणि लहानग्यांच्या संरक्षणाबाबत असलेल्या कायद्यातील तरतुदींचा असल्याने या तरतुदी कुचकामी ठरतील, असा निर्णय सर्वोच्च न्यायालय देऊ शकत नाही, असेही मत सर्वोच्च न्यायालयाने मांडले. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने 12 जानेवारी रोजी दिलेल्या निर्णयाविरुद्ध अ‍ॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल, एनसीडब्ल्यू तसेच महाराष्ट्र राज्य यांनी दाखल केलेल्या अपिलांविषयी सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने याबाबत निरीक्षणे नोंदवली आहेत.

लहानग्यांच्या लैंगिक छळाबाबत सजगतेमध्ये अनेक मुद्यांचा अंतर्भाव होणे गरजेचे आहे. आपल्या देशाची संस्कृती, संस्कार आदींच्या बळावर आपल्या समाज समुदायात अशा लहान मुलांवर होणारे अत्याचार पाप मानले गेल्याने अशा घटना घडणारच नाहीत, आपण त्याची चिंता आणि आवश्यक काळजी घेण्याची गरज नाही, या भ्रमातून पालकांनी पहिल्यांदा बाहेर पडायला हवे. वाईट घटना घडल्यास मुलांवर दोष थोपवून तुझंच, चुकलं तिथं जायची काय गरज होती, असं बोलून मुलांचा हिरमोड करू नये, त्यामुळे मुले एकाकी पडतात, ज्यामुळे अत्याचार करणार्‍याच्या बचावासाठी पोषक वातावरण निर्माण होते.

मदुराईतील शाळेच्या मुख्याध्यापकाविरोधात विद्यार्थीनीच्या लैंगिक छळाची तक्रार दाखल झाली होती. याबाबत जवळपास शेकडो पालकांनी अशा तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर या मुख्याध्यापकाला अटक झाली. या मुख्याध्यापकाने अत्याचार पीडितांना नापास करण्याची धमकी देऊन अत्याचार केल्याचे उघड झाले. या प्रकरणात पालकांनी अतिशय महत्वाची बाब ध्यानात घ्यायला हवी, शिक्षक किंवा बाहेरील व्यक्ती मुलाविषयी अवास्तव प्रेम दाखवत असेल, अतिरेकी अधिकार गाजवणे, गोड बोलणे, नियमबाह्य ममत्व दाखवणे आदी लक्षणे वेळीच ओळखल्याने अशा घटना वेळीच रोखता येतील, पालकांनी आपल्या पाल्यांच्या सुरक्षेसाठी, पालन किंवा संगोपनासाठी बाहेरच्या व्यक्तींवर विसंबून राहाता कामा नये. लहानग्यांवर होणार्‍या अत्याचारातील आरोपी अनेकदा ओळखीचा व्यक्तीच असल्याचे स्पष्ट होते. रस्त्यावरील इतर घटकांकडून होणार्‍या अत्याचारात मुलांचे अपहरण करून अत्याचार करण्याचे गुन्हे घडलेले आहेत. त्यामुळे मुलांना एकटं खेळायला पाठवू नये, त्यांच्यावर लक्ष ठेवावे, ही मुले कोणाकोणाच्या संपर्कात येतात, यावरही पालकांनी लक्ष ठेवायला हवे. आपल्यावर लहानपणी अत्याचार झाला किंवा तसा प्रयत्न झाल्याचे समाजातील नावाजलेल्या व्यक्तींनीही मोठे झाल्यावर स्पष्ट केले आहे. त्यामुळे यातील सामाजिक सजगतेची आवश्यकतेची किती गरज आहे हे स्पष्ट व्हावे.

लहान मुलांचे म्हणणे गांभीर्याने समजून न घेणे त्याकडे दुर्लक्ष करणे ही पालकांनी फार मोठी चूक आहे. ज्याचा वाईट परिणाम मुलांना भोगावा लागतो. अनेकदा अत्याचार होत असल्याचे उघड झाल्यावरही पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली जात नाही. मुलांची, कुटुंबाची आणि पालकांच्या होणार्‍या बदनामीची अवास्तव भीती यामागे असते, आपल्या मुलीवर अत्याचार झाल्याचे जगजाहीर झाल्यावर उद्या तिच्याशी लग्न कोण करेल, अशी भीती पालकांना असते, त्यातून अत्याचार करणा-यांना पाठिशी घातले जाते. लहान मुले निष्पाप असल्याने त्यांना लैंगिकतेबद्दल माहीत नसल्याने ती अत्याचाराला सहज बळी पडतात, अशा घटनांमध्ये ती स्वतःचा बचाव करू शकत नाहीत. ती जबाबदारी पालकांची असते. कायद्यानुसार अल्पवयीन मुलीसोबत ठेवलेले शरीरसंबंध बलात्कारात मोडतात, मग अशा मुलीची त्यासाठी सहमती जरी असली तरी ती सज्ञान नसल्याने तो अत्याचार मानला जातो. अल्पवयीन मुलाला फूस लावून पळवून नेणे, हा अपहरणाचा गुन्हा मानला जातो.

आपल्या सामाजिक धारणांमुळे अत्याचार करणार्‍यापेक्षा अत्याचार झालेल्या पीडितेलाच सामाजिक रोषाला सामोरे जावे लागते. समाजाला तोंड दाखवायला जागा राहिली नाही. अब्रू, इज्जत गेल्याच्या धारणांमुळे पीडिता अनेकदा आत्महत्येचा धोकादायक मार्ग स्वीकारतात. अशा परिस्थितीत लहान मुलांची स्थिती आणखीच बिकट असते. लहानपणी झालेल्या अत्याचाराचा मुलांच्या भविष्यावरही विपरीत परिणाम होतो, अशा मुलांना धीर देणे, त्यांच्यासोबत राहणे, त्यांना माया, जिव्हाळा, प्रेमाचा ओलावा देणे, झालेली एक घटना होती त्यामुळे आयुष्य संपलेलं नाही, असा धीर पालक आणि कुटुंबाकडून मिळण्याची गरज असते. लहानपणी झालेल्या अत्याचारामुळे तरूणपणी मुलामुलींच्या वैवाहिक जीवनावरही परिणाम होण्याची शक्यता असते, योग्य समुपदेशन आणि प्रेमाच्या ओलाव्याने भूतकाळातील वाईट घटनांचा भविष्यावरील परिणाम निश्चितच टाळता येतो, समजुतदारपणा, संयम, सजगता आणि सुरक्षितता यातून अशा कटू स्मृती कायमच्या विस्मृतीत पाठवता येतात.