घरताज्या घडामोडीसत्तेच्या सारीपाटातील कलंदर किमयागार

सत्तेच्या सारीपाटातील कलंदर किमयागार

Subscribe

अहोरात्र प्रचंड कष्ट उपसणारे नेते म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची संपूर्ण देशाला ओळख आहे. 2019 च्या निवडणुकीतील त्यांची सातार्‍यामधील पावसात भिजलेली ऐतिहासिक सभा महाराष्ट्रातील राजकारणात परिवर्तन करून गेली. शरद पवार यांचे राजकारण, राजकीय विचारसरणी याबाबत निश्चितच मतभेद असू शकतात, मात्र प्रचंड कष्ट उपसण्याची तयारी, बहुजन समाजाला सत्तेच्या मुख्य प्रवाहात आणून सत्तेत वाटा देण्याची आग्रही भूमिका, महिलांसाठी राजकारणात अधिकाधिक संधी देण्याचे धोरण, राज्यातील राजकारणाबरोबरच राष्ट्रीय राजकारणाकडे बघण्याची अत्यंत सूक्ष्म निरीक्षणशक्ती हे शरद पवार यांच्या नेतृत्वाचे प्रबळ गुण आहेत.

शरद पवार हे नाव उच्चारताच राजकीय वर्तुळातील भल्याभल्यांच्या डोक्यात टिकटिक आणि हृदयात धडधड वाजू लागते. जिल्हा बँकेच्या निवडणुकीपासून ते केंद्रातील अटल बिहारी वाजपेयी सरकार एका मताने पाडण्यापर्यंतच्या करामतीमध्ये हातखंडा असलेले नेते म्हणून शरद पवार ओळखले जातात. कार्यकर्त्यांची कारकीर्द घडवणारे नेते म्हणून जसे शरद पवार ओळखले जातात तसेच भल्याभल्या नेत्यांची राजकीय कारकीर्द बिघडवणारे नेते म्हणूनही त्यांचेच नाव घेतले जाते. त्यामुळे एका अर्थाने ते खरोखरच राजकारणातले किमयागार आहेत असं जे बोलले जाते, त्यात बर्‍याच प्रमाणात तथ्यदेखील आहे. भूतकाळापासून बोध घेत, वर्तमान काळात तडजोडी करत, भविष्याचा वेध घेणारे नेतृत्व अशा शब्दात शरद पवार यांच्या राजकीय वाटचालीचा आढावा घेता येईल.

राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्राचे तब्बल चार वेळा मुख्यमंत्री पद भूषवलेले, सर्वात तरुण मुख्यमंत्री पदाचा बहुमान मिळालेले, लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आणि त्यानंतर देशाचे संरक्षण मंत्री आणि कृषिमंत्री अशी दोन्ही अत्यंत महत्वपूर्ण खाती सांभाळलेले व आता राज्यसभेचे खासदार असलेले शरद पवार हे राष्ट्रीय राजकारणाबरोबरच राज्यातील राजकारणातही प्रचंड उलथापालथ घडवणारे राजकीय नेते म्हणूनच ओळखले जातात. किंबहुना, शरद पवार यांच्या राजकारणाचे सर्वात मोठे मर्मस्थान जर कोणते असेल तर त्यांच्यामध्ये असलेली ही अकस्मात मोठी उलथापालथ घडवण्याची क्षमता हेच आहे.

- Advertisement -

विरोधी पक्षात असणार्‍यापेक्षा सत्तेत बरोबरीने वावरणार्‍या नेत्यांमध्ये शरद पवार यांच्याबाबत असलेली अदृश्य भीती बरंच काही बोलून जाणारे असते. आणि त्यांच्या अंगभूत असलेली ही उपद्रवक्षमता हेच त्यांच्या आजवरच्या राजकीय यशाचे प्रमुख कारण आहे. त्यामुळेच ते सत्तेच्या सिंहासनावर कोणाला बसवतात यापेक्षा देखील सत्तेच्या कुस्तीमध्ये ते कुणाला चितपट करतात यालाच अधिक महत्त्व असते. मग तो 1995 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार असलेल्या स्वर्गीय विलासराव देशमुख यांचा झालेला पराभव असो की 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपाचे 105 आणि शिवसेनेचे 56 असे मिळून 161 संख्याबळ असलेल्या युतीतून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रिपदाची खुर्ची अकस्मात, अवेळी काढून घेत त्यावर भाजपचाच मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेचा मुख्यमंत्री बसवण्याची खेळी असो. सत्तेच्या व्यवस्थापनात शरद पवार हे यापूर्वीदेखील आणि आता हीदेखील राष्ट्रीय राजकारणात अव्वल स्थानी आहेत असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरू नये आणि त्यामुळेच भारतातील सर्वात लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे देखील जाहीरपणे शरद पवार यांना मानतात ते पवारांच्या या सत्ता स्थापनेच्या व्यवस्थापन तंत्रा मुळेच.

शरद पवार यांच्या राजकीय कारकीर्दीचा बारकाईने अभ्यास करायचा झाल्यास 1999 पूर्वी अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना होण्यापूर्वीची शरद पवार यांची राजकीय कारकीर्द आणि त्यानंतर म्हणजे राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतरची शरद पवार यांची कारकीर्द अशा दोन टप्प्यात प्रमुख्याने त्याचा विचार करता येऊ शकतो. 1999 शरद पवार बघितले तर ते देशाच्या सर्वोच्च सत्ता पदाला अर्थात पंतप्रधानपदाला मुख्य आणि प्रबळ दावेदार असलेले काँग्रेस नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. अर्थात काँग्रेसमध्ये सत्तापदे ही केवळ गांधी कुटुंबीयांशी असलेल्या निष्ठेवरच मिळत असतात.

- Advertisement -

शरद पवार हे काँग्रेसी विचारांचे कट्टर पाईक होते आणि आजही आहेत याबाबत कोणाचेच दुमत असण्याचे कारण नाही. मात्र गांधी कुटुंबियांशी असणारी त्यांची निष्ठा यामध्ये मात्र विश्वासार्हता हा सर्वात मोठा कळीचा मुद्दा ठरवला गेला. वास्तविक शरद पवार यांच्यासारखा जाणकार अभ्यासू आणि उत्तम संसदपटू देशाच्या राष्ट्रांच्या राज्यांच्या समस्यांची जाण असलेला अन्य दुसरा नेता हा काँग्रेसकडे तेवढ्या क्षमतेचा नव्हताच. मात्र शरद पवार यांच्या राज्यातील आणि राष्ट्रीय राजकारणात त्यांच्या राजकीय खेळ यांनी नामोहरम झालेले काही काँग्रेस नेते हे नेहमीच गांधी कुटुंबीयांकडे शरद पवार यांच्या विश्वासार्हतेबाबत सतत प्रश्नचिन्ह उपस्थित करत राहिले आणि त्यामुळे काँग्रेसमध्ये आता शरद पवार यांना फारसे उज्ज्वल भविष्य राहिलेले नाही हे जेव्हा लक्षात आले तेव्हा त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली.

अर्थात हे करत असताना शरद पवार यांच्यासमोर देशातील आणि महाराष्ट्रातील युत्या आणि आघाड्या यांचाच काळ या पुढील राजकारणात असणार हे पक्के ध्यानात आले होते आणि त्यामुळेच जर चंद्रशेखर आणि देवेगौडा हे पंतप्रधान होऊ शकतात तर आपण का होऊ शकत नाही अशा विचारांमधूनच 1999 मध्ये राष्ट्रवादीची स्थापना करण्यात आली.

शरद पवार यांचा राष्ट्रीय राजकारणावरचा अभ्यास आणि एकूणच त्याची जाण हा अत्यंत मजबूत होता आणि त्यामुळेच 2014 सालापर्यंत म्हणजेच देशात नरेंद्र मोदी यांची प्रचंड लाट निर्माण होईपर्यंत भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये देखील आघाडी आणि युतीचा असाच राजकीय पॅटर्न सुरू होता. सत्तेच्या सारीपाटात शरद पवार हे किमयागार आहेत. त्यामुळेच राजकारणात अधिक कष्ट घेतल्यानंतरही कमी फळ जरी पदरात पडले तरीदेखील सत्तेच्या सारीपाटात बाजी कशी मारायची याचे सत्तेचे ठोकताळे आखण्यात आणि त्याची त्याप्रमाणे अंमलबजावणी करण्यामध्ये शरद पवार हे पारंगत आहेत. त्यामुळेच काँग्रेसमध्ये जरी त्यांना पंतप्रधानपदापासून दूर ठेवण्यात आले असले तरीदेखील राष्ट्रीय राजकारणात शरद पवार यांचा जो दबदबा आणि वर्चस्व होते ते कमी करण्यात दिल्लीतील काँग्रेस हायकमांडला फारसे यश मिळू शकले नाही याचे कारणच हे होते.

अर्थात 2014 नंतर देशात नरेंद्र मोदी युग सुरू झाले आणि युती आघाडी यांचे पर्व मागे पडले. मात्र या प्रतिकूल काळातदेखील शरद पवार यांनी त्यांच्या राजकीय मुत्सद्देगिरीची चुणूक दाखवत महाराष्ट्रातील भाजपा सरकारला बाहेरून बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आणि 2014 तो 2019 अशा भाजपच्या किंबहुना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेचे तडाखे स्वतःला कमी कसे बसतील असाच प्रयत्न पवार यांनी त्या काळात केला. पक्षासाठी अहोरात्र प्रचंड कष्ट उपसणारे नेते म्हणून शरद पवार यांची संपूर्ण देशाला ओळख आहे.

2019 च्या निवडणुकीतील त्यांची सातार्‍यातील पावसातील भिजलेली ऐतिहासिक सभा महाराष्ट्रातील राजकारणात परिवर्तन करून गेली. शरद पवार यांचे राजकारण राजकीय विचार मतप्रणाली याबाबत निश्चितच मतभेद असू शकतात, मात्र प्रचंड कष्ट उपसण्याची तयारी, बहुजन समाजाला सत्तेच्या मुख्य प्रवाहात आणून सत्तेत वाटा देण्याची आग्रही भूमिका, महिलांसाठी राजकारणात अधिकाधिक संधी देण्याचे धोरण, राज्यातील राजकारणाबरोबरच राष्ट्रीय राजकारणाकडे बघण्याची अत्यंत सूक्ष्म निरीक्षणशक्ती हे शरद पवार यांच्या नेतृत्वाचे प्रबळ गुण आहेत. यामुळेच ते वयाच्या 81 व्या वर्षातही राष्ट्रवादीच्या वाढीसाठी, विस्तारासाठी स्वतःच्या प्रकृतीचीदेखील पर्वा न करता प्रचंड कष्ट घेत आहेत. त्यामुळेच जोपर्यंत शरद पवार नावाचे हे वादळ महाराष्ट्रावर आणि देशावर घोंगावत आहे तोपर्यंत तरी पवार विरोधकांच्या हाती फारसे काही पडणार नाही ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ समजायला हरकत नाही.

देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाले तरी मराठी माणूस देशाचा पंतप्रधान होऊ शकलेला नाही, ही खंत मराठी माणसांच्या मनात कायम आहे, ती भरून काढण्याचा आटोकाट प्रयत्न शरद पवार यांचे राजकीय गुरू यशवंतराव चव्हाण यांनी केला, पण काँग्रेस आणि राष्ट्रीय पातळीवर गांधी घराण्याची जी मक्तेदारी होती, त्यामुळे यशवंतरावांना पंतप्रधानपदापर्यंत पोहोचू देण्यात आले नाही. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या वारसदार इंदिरा गांधी यांना स्वत:च्या महत्वाकांक्षेसाठी पक्षातील बुजर्गांना बाजूला केले.

त्यामुळे यशवंतराव बाजूला पडले. त्यांच्यानंतर देशाचे पंतप्रधान आपण व्हावे आणि मराठी माणसाचे स्वप्न पूर्ण करावे, अशी शरद पवारांची महत्वाकांशा राहिलेली नाही. त्यासाठी त्यांनी प्रयत्न केले, पण काँग्रेसवर जणू काही मालकी हक्क असलेल्या गांधी घराण्यातील मंडळींना स्वंतत्र प्रतिभेची शरद पवार मानवले नाहीत. ज्यावेळी पवारांना पंतप्रधानपद मिळण्याची संधी आली तेव्हा इंदिरा गांधी यांच्या सूनबाई सोनिया गांधी यांनी आठकाडी आणली आणि पवारांना ती संधी मिळू दिली नाही.

पण पवार हिंमत हरले नाहीत, त्यांनी वेगळा पक्ष काढून आपली वाटचाल सुरू ठेवली. आता वयाची ८१ वर्षे पूर्ण झालेली असतानाही राष्ट्रीय पक्ष असलेला काँग्रेस आणि देशातील प्रादेशिक पक्षांनी एकत्रित करून आता पवार तिसरी आघाडी स्थापन करण्यासाठी सज्ज झालेले आहेत. लक फेव्हर्स द ब्रेव्ह, साहसी माणसाला नशीब साथ देते, अशी एक प्रसिद्ध इंग्रजी म्हण आहे. कुणी सांगावे, शरद पवारांच्या साहसाला नशीब साथ देईल आणि शरद पवार पंतप्रधान होतील. कारण उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनविण्याची अकल्पित गोष्ट पवारांनीच वास्तवात उतरवून दाखवली आहे.


 

Sunil Jawdekarhttps://www.mymahanagar.com/author/sunil-jawdekar/
गेली २८ वर्षे वर्तमानपत्र क्षेत्रात कार्यरत. विविध राजकीय, सामाजिक, प्रशासकीय मुद्द्यांवर आणि पायाभूत सेवासुविधांवर लेखन.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -