पवार साहेबांनी मला कधिही एकटे पाडले नाही…

मी पवार साहेबांना वस्तुस्थिती समजावून सांगितली, कि साहेब मी जे काही प्रश्न विचारले आहेत ते मी माझ्या अभ्यासातून विचारले आहेत. माझा जो या विषयावरचा अभ्यास आहे त्या अभ्यासातून निर्माण झालेले प्रश्न मी ब. मो. पुरंदरे यांना विचारले आहेत.

Jitendra Awhad and Sharad Pawar

आज दिवसभर समाज माध्यमांवर एक बातमी पसरते आहे कि, जितेंद्र आव्हाडांना शरद पवारांनी एकटे का पाडले. आज जे मी कधीच कोणाला बोललो नाही. सांगितले नाही ते मी इथे लिहीत आहे. दुपारची वेळ होती आणि टिव्हीवरती ब. मो. पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण शासनाने जाहिर केला अशी बातमी आली. ती बातमी येताच मी माझ्या स्वत:च्या मनातले पाच प्रश्न हे ब. मो. पुरंदरे यांना टाकले. व त्याचे त्यांनी उत्तर द्यावे अशी मागणी केली. मी ब. मो. पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर लिहीलेल्या कादंब-या याचा तसेच 2004 साली आलेल्या जेम्स लेनच्या पुस्तकाचा प्रचंड विरोधक आहे. Hindu King In Islamic India ह्या पुस्तकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या मातोश्रींविषयी ज्या घाणेरड्या गोष्टी लिहीण्यात आल्या होत्या, त्या पहिल्यांदा महाराष्ट्रभर सांगणा-या काहीजणांपैकी मी एक होतो. त्यामुळे या पुस्तकांमधील त्या गोष्टी जेम्स लेनला कोणी सांगितल्या हे प्रश्न तेव्हाच उपस्थित झाले होते. ब. मो. पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण दिल्यानंतर हे प्रश्न पुन्हा उपस्थित झाले आणि ते उपस्थित करणारा महाराष्ट्रातील पहिला राजकीय नेता अथवा इतिहासावर भाष्य करणारा मी होतो.

ते प्रश्न विचारल्यानंतर पक्षातून अर्थातच माझ्यावर दबाव सुरु झाला. कि तुम्ही या प्रकरणातून माघार घ्या आणि माफी मागा. मी स्पष्टपणाने सांगितले कि, माफी तर मागणारच नाही आणि माघार घेणार नाही मी शांत बसेन. पण, जेव्हा प्रचंड दबाव वाढायला लागला तेव्हा मला वाटले कि, आपला राजकीय बळी जाणार. कारण, मी माघार घेणार नव्हतो, मी माफी मागणार नव्हतो. आणि म्हणून तातडीने मी पवार साहेबांना फोन लावला. तसा मी मनातून प्रचंड घाबरलेलो होतो. मी पवार साहेबांना वस्तुस्थिती समजावून सांगितली, कि साहेब मी जे काही प्रश्न विचारले आहेत ते मी माझ्या अभ्यासातून विचारले आहेत. माझा जो या विषयावरचा अभ्यास आहे त्या अभ्यासातून निर्माण झालेले प्रश्न मी ब. मो. पुरंदरे यांना विचारले आहेत. तेव्हा साहेबांनी मला सांगितले कि, सामाजिक विषयामध्ये मतभिन्नता असू शकते. तेव्हा तू जे काही तुझ्या अभ्यासातून करतो आहेस ते तू कर. हा विषय तू गेले अनेक वर्षे हाताळतो आहेस त्यामुळे तुला कोणाचे ऐकण्याची गरज नाही. तू तुझ्या मार्गाने पुढे जा. त्यानंतर सातत्याने जेव्हा प्रश्न विचारले गेले तेव्हा कोणाचाही विचार न घेता आदरणीय शरद पवार साहेबांनी कायम माझी बाजू घेतली अगदी जाहीर माध्यमातून देखील घेतली. त्यांना औरंगाबाद, अकोला तसेच मुंबईमधील पत्रकार परिषदेमध्ये जेव्हा माझ्या या विषयावरती पक्षाची भूमिका आणि जितेंद्र आव्हाड यासंबंधी प्रश्न विचारले गेले तेव्हा जाहीरपणाने त्यांनी माझी बाजू घेतली. जाहीरपणाने त्यांनी जितेंद्र आव्हाड जे बोलतोय ते योग्यच आहे अशी भूमिका ते घेत राहीले.

आता मागच्या तीन चार महिन्यांपूर्वी परत एकदा ब. मो. पुरंदरेंचा विषय निघाला आणि तेव्हा सुद्धा मी भाष्य केलं. ते भाष्य केल्यानंतर मी त्यांच्या सगळ्या शिवचरित्राचा तसेच जेम्स लेनच्या पुस्तकाचे पान नं. सहित सगळे दिल्यानंतर पवार साहेबांचा मला फोन आला, कि जितेंद्र तू पान नं. सांगतो आहेस ते पान नं. बरोबर आहे ना. तर मी त्या पानाची ची झेरॉक्स काढून साहेबांना पाठवली. त्यानंतर दुस-या दिवशीच्या पत्रकार परिषदेमध्ये पुन्हा शरद पवार साहेब बोलले कि, जे कोणी ब. मो. पुरंदरेंच्या शिवचरित्राविषयी बोलतात त्यांचा मला प्रचंड अभिमान आहे. म्हणजे 2004 साली सुरु झालेले हे प्रकरण आजही चालू आहे, आणि यामध्ये कायम मी एकमेव राजकीय नेता होतो त्यावेळेस कि, ज्याने उघडपणाने ब. मो. पुरंदरेंच्या विरोधात भूमिका घेतली. आणि आज मी अत्यंत अभिमानाने सांगतो कि, माझे नेते आदरणीय शरद पवार साहेब यांनी कधीच मला बाजूला केले नाही. कधीच मला एकटे पाडले नाही. किंबहुना पक्षामध्ये अनेक जणांची वेगळी भूमिका असतांना एका छोट्याश्या बहुजन कार्यकर्त्याच्या बाजूने ते उभे राहीले हे मला आज महाराष्ट्राला सांगावेसे वाटते. पक्षातून दबाव असतांना, पक्षातील दुस-या फळीचे अनेक नेते माझ्या मताच्या विरोधात असतांना ते कायम माझ्या मागे सावलीसारखे उभे राहिले हे उभ्या महाराष्ट्राला मी स्पष्टपणाने सांगू इच्छितो. सांगलीमध्ये जेव्हा माझ्यावरती हल्ला झाला त्यानंतर त्यांनी स्वतःहून तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांना पत्र लिहून माझ्या सुरक्षेत वाढ करावी अशी जाहीर मागणी केली. जेंव्हा-जेंव्हा माझ्या सुरक्षिततेविषयी प्रश्न उभे राहिले तेव्हा त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन माझी सुरक्षा वाढविण्यासाठी आग्रह धरला.

आजपर्यंतच्या माझ्या राजकीय लढाईत मी गेले 35 वर्षे त्यांच्याबरोबर आहे. अनअनेकांनी माझ्या विरोधात कुरघोड्या गेल्या, माझ्या विरुद्ध षड्यंत्र रचली, अनेक कटकारस्थाने रचली गेली. ते सगळे एकाच कारणाने यशस्वी होऊ शकले नाही. ते एकमेव कारण होते आदरणीय शरद पवार साहेब…तरी उगाच गैरसमज पसरविण्याच्या बातम्या लावू नका. आदरणीय शरद पवार साहेबांनी कधी मला एकटे पाडले नाही त्यामुळेच मी इथं पर्यंत पोहचू शकलो

हे सगळं माझ्या निष्ठेचे फळ आहे

-डॉ. जितेंद्र आव्हाड