घरफिचर्समायमहानगर ब्लॉगकृतीतून व्यक्त होणारे व्यक्तिमत्व म्हणजे शेखर ताम्हाणे...!

कृतीतून व्यक्त होणारे व्यक्तिमत्व म्हणजे शेखर ताम्हाणे…!

Subscribe

काही व्यक्ती अशा असतात ज्यांच्याशी आपला रोजचा संपर्क असतोच असं नाही, पण तरीसुद्धा एक वेगळीच आपुलकी निर्माण झालेली असते ती त्या व्यक्तीच्या स्वभावामूळे. शेखर ताम्हाणे हे असंच एक व्यक्तिमत्व… उगाच पुढे पुढे करण्याची सवय नाही अर्थात त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे तसं त्यांना करायची गरज देखील कधी पडली नाही. अत्यंत शांतपणे आणि मार्मिक बोलणं, हळुवार आवाजात संवाद साधणे, आपल्या मिश्किल स्वभावाने आपलंसं करून घेणारं व्यक्तिमत्व… अशा व्यक्तीशी सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली. आमच्या मराठी नाटक समूहात येणार का? विचारल्यावर फक्त नाटकाबद्दल बोलणार असलात तर मला तुझ्या काय अप्पा समूहात सामील करून घे अशी परवानगी मिळाल्यावर मराठी नाटक समूह आणि शेखर ताम्हाणे ह्यांचे ऋणानुबंध जुळले. ते आमच्या समूहात आले आणि दुसरा प्रायोगिक नाट्य महोत्सव आयोजित केलेला होता, त्याचा संपूर्ण पेपर जाहिरातीचा खर्च मी करणार हे लगेच जाहीर देखील करून चेक देखील पाठवून दिला. कुठल्याही उपक्रमाला आर्थिक पाठबळ हवेच असते आणि ते असे कुणीच काही न सांगता खर्चाचा एक भार स्वतःहून उचलणे हे त्यांचे वेगळेपण तेव्हाच जाणवले. तुम्ही उत्तम कार्य करताय, निदान प्रयत्न करताय बिनधास्त करा मी माझ्या परीने जमेल तशी मदत करेन हे त्यांचे कायम वाक्य असायचे. नुसतं बोलण्यापेक्षा कृतीतून सिद्ध करणारे हे व्यक्तिमत्व होते.

नंतर हळूहळू समूहाच्या उपक्रमातील शेखर सरांचा सहभाग वाढायला लागला. मराठी रंगभूमी संदर्भात दस्तावेज तयार करण्यासंदर्भात मुलुंड जिमखान्यामध्ये आमची सभा झाली, त्यात एक पुस्तक करावे असे ठरले त्याला साधारण दीड लाखा पर्यंत खर्च येऊ शकतो अशी चर्चा झाली तर क्षणार्धात त्याचा सर्व छपाईचा खर्च मी करणार, जमले पैसे तर द्या नाही तर राहू दे, आत्ता उपक्रम सुरू तर करू असं लगेच सांगणारे शेखर सर निराळेच… बरं खर्च करण्यासाठी कुठेही मोठेपणा, मानसन्मान अपेक्षित नाही केवळ एक चांगला उपक्रम आर्थिक बाबी मूळे अडता कामा नये अशी त्यांची भूमिका होती. या उपक्रमाबद्दल विचार, संशोधन सुरू असतानाच कोरोना महामारीने संपूर्ण जग त्रस्त झाले आणि त्याचा फटका मराठी व्यावसायिक रंगभूमीला देखील बसला. पडद्यामागील कलाकारांसाठी मदत निधी उभारून आर्थिक सहाय्य द्यावे असे समूहावर ठरत होते. आमच्या समूहाची अधिकृत नोंदणी वगैरे नसल्याने आर्थिक मदत कुठच्या खात्यात जमा करावी हा प्रश्न होताच. शिवाय त्याची विश्वासार्हता जपणे हे देखील अत्यंत महत्वाचे होते. मोठ्या प्रमाणात जमा होणारी रक्कम त्याचे वितरण कसे करावे याबाबतीत आयकर खात्यातर्फे चौकशी होऊ शकते का वगैरे विषय सुरू होता त्यात देखील आत्ता आपल्याला या मंडळींना आधार देणे महत्वाचे आहे, माझ्या अकाउंट डिटेल्स द्या काय लागेल तो टॅक्स मी भरेन म्हणून लगेच खात्याच्या डिटेल्स पाठवून रक्कम जमा करायला सुरुवात देखील केली. असा डॅशिंग माणूस म्हणजे शेखर ताम्हाणे. बरं यात बाकी कसलाही इंटरफेअर नाही, काम झालं पाहिजे हीच भूमिका. कोरोना काळात सगळे घरी बसलेले असतानाच अनोखी पत्र लेखन स्पर्धा घ्यायची आणि त्याची सर्व रोख रकमेची पारितोषिके आपल्या मदत निधीमध्ये जमा करायची पण ती सगळी रोख रक्कम मी स्वतः त्या त्या विजेत्याच्या नावाने जमा करणार ही कल्पना देखील त्यांचीच आणि तो देखील उपक्रम यशस्वी झाला. संपूर्ण रकमेचा चोख हिशेब देऊन उपक्रमाची सांगता झाली तेव्हा त्यांना विलक्षण समाधान झाले असं माझ्याशी बोलायचे.

- Advertisement -

समूहाच्या उपक्रमाबद्दल उत्तम सूचना करायचे, दस्ताऐवजसाठी वेब साईट तयार करण्याचे ठरले तेव्हा त्यासाठी मौलिक सूचना ते सतत करत असायचे, या उपक्रमासाठी आमचा अभिषेक मराठे आणि ते कायम संपर्कात असायचे. मदत निधी उपक्रमाच्या वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात रक्कम जमा झाली की काही विघ्नसंतोषी लोकांनी त्यात कुरापती काढायला सुरुवात केली तेव्हा त्यांचे सोशल मीडियावर कान ओढायला आणि समूहाचा उपक्रम यशस्वी करण्यासाठी कुठलीही भीड न बाळगता ते व्यक्त होत असत, अडथळे येणारच पण जोपर्यंत आपण चांगलं काम करतोय तो पर्यंत कुणाची भीड बाळगायची गरज नाही, काय होईल ते बघू, आपण समर्थ आहोत उत्तरं द्यायला ही त्यांची ठाम भूमिका शेवटपर्यंत होती.

कुठलाही मोठेपणा या व्यक्तीला नको असायचा त्यामुळे असं आर्थिक बाबींचं कौतुक त्यांना आवडले नसतेच पण त्यांच्या या सहकार्याचा उल्लेख करणे हे समूह प्रमुख म्हणून मला महत्वाचे वाटते म्हणून हा प्रपंच.

- Advertisement -

एक सिद्धहस्त नाटककार, उत्तम माणूस आणि आधारस्तंभ गमावल्याची खंत तर नक्कीच वाटत राहणार.

शेखर सर, कोरोना सारख्या आजाराशी तुम्ही १५ दिवस दिलेली लढाई काल अखेर संपली, आज तुम्ही आमच्या सोबत नसलात तरी तुमच्या आठवणी सदैव आमच्या सोबत असतीलच. ईश्वर तुमच्या आत्म्यास शांती देवो हीच प्रार्थना.

– आशीर्वाद मराठे

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -