Thursday, September 23, 2021
27 C
Mumbai
घर फिचर्स मायमहानगर ब्लॉग दोन हिंदुत्ववाद्यांच्या आत्मनाशाची नांदी!

दोन हिंदुत्ववाद्यांच्या आत्मनाशाची नांदी!

राम मंदिर ट्रस्टने जमीन खरेदी व्यवहारात घोटाळा केला असा आरोप उत्तर प्रदेशातील विरोधी पक्षांनी केल्यानंतर त्याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली, त्याचा भडका महाराष्ट्रात उडाला. शिवसेनेच्या मागणीनंतर भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना भवनसमोर जाऊन आंदोलन करण्याचा प्रयत्न केल्यानंतर शिवसैनिकांनी तिथे धाव घेतली. त्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये जोरदार हाणामारी झाली, यातून महिलाही सुटल्या नाहीत. भाजप आणि शिवसेना या दोन हिंदुत्ववादी पक्षांमध्ये झालेली ही हाणामारी दोघांच्या आत्मनाशाची नांदी ठरू शकेल, असेच दोन्ही पक्षांमध्ये सुरू असलेल्या गळेकापू स्पर्धेतून दिसून येत आहे.

Related Story

- Advertisement -

अयोध्येत उभारण्यात येत असलेल्या राम मंदिराच्या जमीन खरेदी व्यवहारात घोटाळा झाला आहे, असा आरोप समाजवादी पार्टी आणि आम आदमी पार्टीच्या नेत्यांनी केल्यावर असा घोटाळा झाला असेल तर त्याची चौकशी व्हायला हवी, अशी भूमिका शिवसेनेेने घेतल्यामुळे भाजप आणि शिवसेना या पक्षांमध्ये खदखदत असलेला राजकीय राग शिवसेना भवनच्या समोर बुधवारी १६ जूनला उफाळून आला. हा मामला फक्त एकमेकांविरोधात घोषणाबाजीपर्यंत मर्यादित राहिला नाही, तर भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना अक्षरश: हाणामारी केली. त्यातून महिलाही सुटल्या नाहीत. हा प्रकार अन्यत्र कुठे झाला असता तर कदाचित त्याची भीषणता तितकी वाटली नसती, पण हा प्रकार शिवसेना भवनच्या समोर झाला, हे अत्यंत दुर्दैवी आणि अवमानकारक आहे. गेल्या सात वर्षांपासून भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये जी काही धुसफूस आणि आरोप प्रत्यारोप सुरू आहेत ते पाहता, हा जो भडका उडाला, तो उडणारच होता. शेवटी तो उडाला. दोन्ही पक्ष हिंदुत्ववादाला मानणारे असून आम्ही देशातील हिंदुत्वाच्या रक्षणासाठी एकत्र आलो आहोत, असा त्यांचा दावा होता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि भाजपचे नेते प्रमोद महाजन यांनी पुढाकार घेऊन १९८९ साली राज्यात शिवसेना आणि भाजपची युती घडवून आणली.

पुढे ही युती राज्य पातळीवरून स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत पोहोचून दोन्ही पक्षांना सत्तेचा लाभ झाला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रभावी नेतृत्वाचा भाजपला राज्यात विस्तारासाठी फायदा झाला. त्याचसोबत भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जे राज्यात नेटवर्क आहे, याचा फायदा भाजपला झाला. पण तरीही शिवसेनेच्या जिंकून येणार्‍या आमदारांची संख्या मोठी असल्यामुळे शिवसेनेचाच वरचष्मा राहिलेला होता. त्यात पुन्हा शिवसेना म्हणजे महाराष्ट्र आणि मराठी माणसाची अस्मिता असल्यामुळे मुख्यमंत्रीपद हे आमच्याकडेच असायला हवे, अशी शिवसेनेची भावना होती. शिवसेना आणि भाजपच्या युतीची सत्ता १९९५ साली राज्यात आली. काँग्रेसला प्रथमच सत्ता गमवावी लागली होती. त्यावेळी शिवसेनेचे मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले आणि उपमुख्यमंत्रीपद भाजपच्या गोपीनाथ मुंडे यांना मिळाले.

- Advertisement -

पण त्यावेळी कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत भाजपने दमाने घेतले, कारण युतीच्या माध्यमातून राज्यात सत्ता येण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यामुळे आपण संयम ठेवला तर उद्या त्याचा आपल्याला फायदा मिळेल, ही भाजपची भावना होती. पण जेव्हा १९९९ ची विधानसभा निवडणूक झाली तेव्हा उपमुख्यमंत्री म्हणून राहिलेले गोपीनाथ मुंडे यांनी आता आपल्याला मुख्यमंत्रीपद देण्यात यावे, कारण आपण मागील कार्यकाळात आम्ही उपमुख्यमंत्रीपदावर समाधान मानले आहे. पण शिवसेना त्यासाठी काही तयार नव्हती, त्या ओढाताणीत युतीची सत्ता गेली आणि काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता राज्यात आली. पुढील पंधरा वर्षे विरोधात असलेले युतीतील हे जोडीदार सत्ताधार्‍यांवर टीकेचे बाण सोडत होते, पण राज्यात प्रस्थापित असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर त्याचा काही फरक पडत नव्हता.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी त्यावेळी गुजरातमध्ये मुख्यमंत्रीपदाची हॅट्ट्रिक केेलेले नरेंद्र मोदी यांचे नाव पंतप्रधानपदाच्या उमेदवारासाठी भाजपकडून पुढे येऊ लागले. राष्ट्रीय पातळीवर नरेंद्र मोदी आल्यावर त्यांनी भाजपला पहिल्यांदाच केंद्रात बहुमत मिळवून दिले. त्यानंतर राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील सगळी राजकीय गणिते बदलली. कारण पक्षांतर्गत आणि पक्षाबाहेरील विरोधकांना मात देऊन मोदींनी भाजपला बहुमत मिळवून दिले होते. मोदींच्या विजयामुळे महाराष्ट्रातील भाजपची मनस्थिती बदलली. आजवर मनात दाबून ठेवलेल्या भावना त्यांनी प्रत्यक्षात आणायचे ठरवले. आता आपण मुख्यमंत्रीपद मिळवायलाच हवे. कारण आता मोदींची देशात लाट आहे, आता युती केली तर उगाचच फायदा शिवसेनेला होईल. आणि त्यांचे आमदार वाढले तर शिवसेना मुख्यमंत्रीपदाची दावेदार होईल. त्यामुळेच युतीतून बाहेर पडून मोदींच्या लाटेचा फायदा आपण घेऊन मुख्यमंत्रीपद मिळवायचे, असे राज्यातील भाजपच्या नेत्यांना वाटू लागले. त्यामुळे त्यांनी शिवसेनेकडे जास्त जागा मागितल्या, ते शिवसेनेला मान्य नव्हते.

- Advertisement -

ते निमित्त होऊन भाजपची युती तुटली. तिथूनच मग खर्‍या अर्थात जिगरी दोस्त ते कट्टर वैरी असे परिवर्तन होण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये शिवसेना-भाजप युती झाली, पण मने दुरावलेली होती. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर अनेक दिवस नाकदुर्‍या काढून शिवसेना सत्तेत सहभागी झाली, पण त्यांचे मंत्री खिशात राजीनामे घेऊन भाजपच्या डोक्यावर टांगती तलवार ठेवून फिरत होते. मंत्र्यांनी शेवटपर्यंत राजीनामे खिशातून बाहेर काढले नाहीत. त्यामुळे ती फक्त धमकी होती. शिवसेनेला सत्ता सोडायची नव्हती, असेच दिसून आले. शेवटी आदळत आपटत पाच वर्षे गेली आणि २०१९ ची लोकसभा निवडणूक आली. तेव्हा भाजपला मोदींची लोकप्रियता ओसरली असे वाटू लागले. त्यामुळे त्यांनी पुन्हा प्रादेशिक पक्षांना जवळ करायला सुरुवात केली. त्यामुळे त्यांनी शिवसेनेला पुन्हा युतीसाठी जवळ केले.

शिवसेनेशी युती केली तरी भाजपची सत्ता पुन्हा येईल आणि आपण पुन्हा मुख्यमंत्री होणार, असे फडणवीसांना वाटत होते. पण विधानसभेची निवडणूक झाल्यावर शिवसेना मुख्यमंत्रीपदावर हटून बसली, आणि मी पुन्हा येईन, या देवेंद्र फडणवीस यांच्या आत्मविश्वासाला तडा गेला. तिथून या दोन्ही पक्षांमधील परिस्थिती बिघडत गेली म्हणण्यापेक्षा चिघळत गेली. सत्तेसाठी आपण काहीही करायचे अशी मानसिकता दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये तयार झाली. त्यातूनच मग देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना फितवून आपला बाजूला आणले आणि भल्या पहाटे राजभवनावर जाऊन मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायला लावली. रात्रीच्या अंधारात घडलेला हा सगळा प्रकार महाराष्ट्राला अनपेक्षित होता. पण फडणवीसांचा हा प्लॅन फसला. कारण शरद पवारांनी अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना पुन्हा आपल्या गोटात आणले. शिवसेनेला काहीही करून मुख्यमंत्रीपद हवे आहे, हे लक्षात घेतल्यावर पाच वर्षे राज्यात आणि केंद्रीय सत्तेतून बाहेर असलेल्या शरद पवार यांनी बेरजेचे गणित करायला सुरुवात केली. कारण सत्तेतून बाहेर राहण्याचा पवारांचा स्वभाव नाही. पवारांनी शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देऊन राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आकाराला आणले.

अशा प्रकारे त्यांनी आपल्या पक्षाला सत्तेत आणले. पण त्यामुळे हातातोंडाशी आलेली सत्ता गेल्याने भाजप प्रचंड दुखावलेला आहे. त्यामुळे काहीही करून आपल्याला सत्तेत यायला हवे, यासाठी भाजप जंग जंग पछाडत आहे. पण त्याचा काहीच उपयोग होताना दिसत नाही. त्यातून जरा काही निमित्त मिळाले की, हे दोन्ही पक्ष एकमेकांना बोचकारण्याची संधी सोडत नाहीत. खरे तर राम मंदिर जमीन खरेदीत घोटाळा झाला, असा आरोप उत्तर प्रदेशातील राजकीय नेत्यांनी केला आहे. पण त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटले आहेत. ते इतर कुठल्या राज्यात उमटलेले दिसत नाहीत. असा घोटाळा झाला असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे हे शिवसेनेेने राम मंदिर ट्रस्टविषयी विधान केले आहे, राम मंदिर हा आमच्या श्रद्धेचा विषय आहे. त्यामुळे असा भ्रष्टाचार आम्ही सहन करणार नाही, अशी बोचरी टीका शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी केली आहे. या आरोपाचा राग येऊन भारतीय युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना भवनासमोर जाऊन आंदोलन केले. शिवसेना भवन हे शिवसैनिकांचे श्रद्धास्थान असल्यामुळे शिवसैनिक तिथे धावून गेले. त्यामुळे भाजयुमोचे आंदोलक आणि शिवसैनिक यांच्यात हाणामारी झाली. भाजप-शिवसेनेत वाढत जाणार्‍या तणावाचा हा उद्रेक होता.

शिवसेना आणि भाजपचे नेते पूर्वी म्हणत आमची युती ही सत्तेसाठी नाही, तत्वासाठी आहे. हिंदुत्व हा आमच्या युतीचा आधार आहे. पण जर ही युती हिंदुत्वाच्या रक्षणासाठी आणि तत्वासाठी झालेली असेल तर आता सत्तेसाठी ही हाणामारी कशी काय सुरू आहे, याचा विचार या दोन्ही पक्षांनी करावा. सत्तेसाठी त्यांची युती त्यांनी तोडली आहे, पण स्वत:ला हिंदुत्ववादी म्हणवणार्‍या या पक्षांनी पुढील काळात हिंदूविरुद्ध हिंदू या विद्वेषाची नांदी महाराष्ट्रात केली आहे. कारण सत्तेसाठी हा संघर्ष सुरूच राहणार आहे. शिवसेना आणि भाजप एकामेकाला घोडा करून त्याच्या पाठीवर बसू पाहत आहेत, पण ते कुणालाच शक्य होताना दिसत नाही. शिवसेना भवनाच्या समोर जो काही भडका उडाला, त्यातून स्वत:ला हिंदुत्ववादी मानणार्‍या या पक्षांमध्ये मराठी यादवी सुरू झाली आहे, याचे संकेत मिळत आहेत. शेवटी यादवांमध्ये यादवी उफाळल्यावर त्याची परिणती त्यांच्या आत्मनाशात कशी झाली, हे सर्वांनाच माहीत आहे.

- Advertisement -