बंद करा हा तमाशा!

Subscribe

21 तारखेला मतदान केंद्रावर जाण्यापूर्वी राज्यभरातल्या मतदारांना याची तसूभरही कल्पना नसावी की पुढच्या पंधरा दिवसांमध्ये काय काय पाहावं लागणार आहे! 24 तारखेला संध्याकाळी राज्यभरातले निकाल जाहीर झाले आणि मतदार राजानं सगळ्याच राजकीय पक्षांना त्यांची जागा दाखवून दिल्याचं स्पष्ट झालं. यामध्ये सत्ताधारी भाजपला जसं मतदारांनी जमिनीवर आणलं, तसंच, त्यांचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला देखील मतदारांनी समज दिली. जिथे या दोन्ही मित्रपक्षांच्या जागा मोठ्या प्रमाणावर कमी झालेल्या असतानाच दुसरीकडे विरोधकांच्या जागा मात्र वाढल्या. काँग्रेस आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागांमध्ये मोठी वाढ झाली. त्यामुळे मतदारांनी भाजप-शिवसेना महायुतीच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केल्याचं तर स्पष्टच झालं; पण त्यासोबतच, काँग्रेस-राष्ट्रवादीवर देखील थेट सरकारमध्ये बसवण्याइतपत विश्वास जनतेनं ठेवला नाही. पण इतक्या जागा नक्कीच दिल्या की विरोधकांना आगामी काळात कोणत्या दिशेनं प्रयत्न करायचे आहेत.

शिवसेना-भाजप महायुतीला जनतेनं 160हून जास्त जागा दिल्या. त्यामुळे आता महायुतीचं सरकार सत्तेत येईल आणि पुढचा कारभार सुरळीत सुरू होईल असं वाटून जनता निश्चिंत झाली होती. शेतकरी, कर्मचारी, बेरोजगार, आर्थिक मागास घटक, विद्यार्थी, गृहिणी असे समाजातले सर्वच घटक नव्या सरकारच्या स्थापनेची आणि कामाला सुरुवात होण्याची वाट पाहू लागले. अवकाळी पावसानं झोडपून काढलेल्या बळीराजाला आता लवकरात लवकर सरकार स्थापन होऊन मदतीची प्रक्रिया सुरू होईल आणि निसर्गाने बसलेला फटका भरून काढता येईल, असं वाटू लागलं होतं. महागाईने कंबरडं मोडलेल्या जनतेला सरकारी उपाययोजनांची प्रतीक्षा होती; पण झालं भलतंच! निकाल लागून दोन आठवडे उलटून गेल्यानंतर देखील बहुमत असलेले दोन्ही पक्ष सत्ता स्थापन करण्यात अपयशी ठरले आहेत. त्यांच्यामध्ये काय बोलणी झाली होती, काय तह झाले होते, कोणते समज-गैरसमज झाले होते, कोण कुणाला जुमानत नव्हतं हे सगळे प्रश्न त्यांच्या अंतर्गत भानगडी होत्या. पण या सगळ्यांमध्ये जनतेला मात्र हे समजेनासं झालं आहे की नक्की आमचं काय चुकलं?

प्रचारादरम्यान खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोन्ही नेते कंठरवाने एकच घोषणा करत होते. ‘आमचं ठरलंय’. आता सरकारमध्ये असलेले विद्यमान सत्ताधारी पक्ष, त्या पक्षांचे प्रमुख आणि त्यांच्यामध्ये ठरलेल्या बाबी, या वास्तविकपणे अगदी स्पष्ट, जबाबदारीने आणि पूर्ण विचाराअंती केलेल्या चर्चेनंतर त्यांच्यात काही मुद्यांवर युती झाली. त्यामुळे अर्थातच त्यामध्ये पुन्हा चर्चा करण्यासारखं काहीही उरणार नाही हेच सामान्य मतदारांना अपेक्षित होतं. पण इथे वेगळंच काहीतरी सुरू झालं. गल्ली क्रिकेटमध्ये पहिली बॅटिंग-दुसरी बॅटिंग कोण करणार हे आधी ठरावं आणि नंतर एकाने दुसर्‍याला सांगावं, ‘मी तुला बॅटिंग देणार असं म्हटलंच नव्हतं’, आणि त्यावरून अख्ख्या मैदानात राडा व्हावा, तसं काहीतरी सध्या महाराष्ट्रात घडू लागलं आहे. त्यात मॅच पाहायला आलेल्या प्रेक्षकांना प्रत्यक्ष बॅटिंग किंवा बॉलिंग बघायला मिळण्यापेक्षा एकाच टीममधले दोन बॅट्समन बॅटिंगसाठी एकमेकांशी भांडताना पाहायला मिळत आहेत. आता असं सुरू असताना प्रेक्षकांना आणि त्या त्या खेळाडूंच्या चाहत्यांना प्रश्न तर पडणारच ना? आमचं काय चुकलं?

- Advertisement -

महायुती करताना शिवसेना आणि भाजपमध्ये काय ठरलं? हे कुणीही आधी सांगायला तयार नव्हतं. फक्त ‘आमचं ठरलंय’ असं सांगत त्यांनी सगळ्या प्रचारसभांमधून मतं मागितली. युती म्हणून मतं मागितली. अगदी निकाल लागेपर्यंत नक्की काय ठरलंय? हे कुणीही सांगायला तयार नव्हतं; पण जसा निकाल लागला, तसं काय ठरलं होतं आणि काय ठरलं नव्हतं याचे भडाभडा दाखलेच या पक्षांची नेतेमंडळी जाहीर करू लागली. बरं यातलं कोण खरं बोलतंय हे काही बापड्या मतदारांना उमगेना! एकीकडे महाराष्ट्रातल्या मराठी मनांवर अधिराज्य असल्याचा दावा करणार्‍या शिवसेनेसारख्या पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे म्हणत होते जे ठरलंय ते आणि तेवढंच द्या. पण असं करताना ते खोटं पाडत होते खुद्द राज्याच्या मुख्यमंत्र्यांना! दोघंही एकमेकांवर खोटं बोलत असल्याचा आरोप करत असताना जनतेनं तरी कुणावर विश्वास ठेवावा. यातल्या एकावर विश्वास ठेवला, तर दुसरा खोटं बोलत होता हे आपोआप सिद्ध होतं. मग अशा वेळी दुसर्‍यानं मतदारांना फसवलं, असं मानायचं का? आणि तसं मानायचं असेल, तर मतदारांशीच खोटं बोलणार्‍या या नेत्यांकडे त्याचं काय उत्तर असेल?

मुख्यमंत्रीपदावरून दोन्ही पक्षांमध्ये फाटलं असं सध्यातरी चित्र दिसत आहे. भाजपला पूर्णवेळ मुख्यमंत्रीपद हवंय, तर शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद हवंय. दोन्ही पक्षांना हे असंच का हवंय, याची दोघांचीही कारणं वेगवेगळी असू शकतात. पण त्याच्याशी सामान्य मतदारांना कोणतंही देणंघेणं नसताना उगीच ‘जनादेश-जनादेश’ म्हणत या सगळ्या तमाशाला जनतेचा देखील पाठिंबा आहे असंच चित्र निर्माण केलं गेलं. त्यामुळे शिवसेना म्हणते महायुतीला जनादेश मिळाला म्हणून सरकार देखील समसमान सत्तावाटप असणार्‍या महायुतीचं यायला हवं. तर दुसरीकडे भाजपदेखील म्हणतंय, महायुतीला जनादेश मिळाला म्हणून महायुतीचं सरकार आणि महायुतीचाच मुख्यमंत्री असेल. त्यातही ज्याच्या जास्त जागा असतील, त्याला मुख्यमंत्रीपद या बाळासाहेब ठाकरेंनी एकेकाळी जाहीर केलेल्या फॉर्म्युल्याची आठवणदेखील भाजपमधले दिग्गज करून देत आहेत. पण या सगळ्या खेळामध्ये जनतेची काय इच्छा आहे, हे कुणीच विचारात घेताना किंवा सांगताना दिसत नाही!

- Advertisement -

वास्तविक जर महायुतीला जनतेनं ‘जनादेश’ दिला असेल आणि हे दोन्ही पक्षांतले नेते मान्य करत असतील, तर मग दोघांपैकी इतर कुणीही दुसर्‍या कुणासोबत सरकार स्थापन करणं ही सरळ सरळ जनतेशी प्रतारणाच ठरेल. पण असं असताना बिनधास्तपणे दोन्ही पक्षातले नेते ‘आमच्याकडे पुरेसं संख्याबळ आहे आणि आम्ही त्यांच्याशिवाय देखील सरकार स्थापन करू शकतो’, असे दावे करत आहेत. दोघांमधल्या चर्चांमध्ये काय ठरलं, काय फिसकटलं हा त्यांचा प्रश्न आहे. पण जनादेशाला फाटा फोडून दुसर्‍यांच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन केलं आणि जनतेला फसवलं असं म्हणत हे जनतेची माफी मागणार आहेत का? आणि नसेल, तर उगीच फक्त तोंडावर जनादेश म्हणून मागून नेहमीप्रमाणे मतदारांना गृहीत धरण्याचाच प्रकार होणार असेल, तर जनतेनं यांच्यावर विश्वास का ठेवावा?

खरंतर, ‘तुम्ही असं म्हणाला होतात किंवा आम्ही असं म्हटलोच नव्हतो’, असं म्हणून दोन्ही बाजूंकडची मंडळी अप्रत्यक्षपणे मतदारांनाच दाखवून देत आहेत की आमच्यावर विश्वास ठेऊन तुम्ही किती मुर्खपणा केला आहे. कर्नाटकमध्ये सत्तापेच निर्माण झाला तेव्हा तिथल्या आमदारांना मुंबईतल्या हॉटेलमध्ये ‘लपवून’ ठेवण्यात आलं होतं. त्यांच्यावर हसणार्‍या मराठी मतदारांना अवघ्या काही महिन्यांत तोच राजकीय तमाशा मुंबई त्यांच्याच मराठी आमदारांकडून पाहायला मिळेल, याची सुतराम देखील कल्पना नसावी. मुख्यमंत्रीही म्हणणार मी खरं बोलतोय आणि उद्धव ठाकरेही म्हणणार मी खरं बोलतोय असं चालणार नाही. सध्या महाराष्ट्रातल्या जनतेचं फक्त एकच मागणं आहे. दोघांमधले मतभेद लवकर मिटवा, कोण खरं बोलत होतं आणि कोण खोटं, हे तुम्हाला जनादेश देणार्‍या जनतेला प्रामाणिकपणे सांगा आणि हा तमाशा बंद करा!

Pravin Wadnerehttps://www.mymahanagar.com/author/pravin/
समाजाशी बांधिलकी, बदल घडवण्याची प्रामाणिक इच्छा, त्यासाठी प्रयत्न करण्याची तयारी आणि त्याच तयारीचा एक भाग म्हणून माध्यमांमध्ये प्रवेश. लेखनाची आवड, त्यासाठी वाचनाची निवड. सोबतीला फोटोग्राफीचा छंद, जगण्यासाठी अजून काय पाहिजे?
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -