पालखीचे भोई!

Subscribe

मी यापुढे पालखीचा भोई होणार नाही. शिवसैनिकाला मुख्यमंत्री म्हणून पालखीत बसवेन, अशा निर्धाराने पेटून उठलेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पालखी वाहण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे खांदे मिळवण्यासाठी अहोरात्र धडपड करत आहेत. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काही सहजासहजी आपले खांदे उपलब्ध करून देणार नाहीत. कारण ती राजकारणात कसलेली मंडळी आहेत. त्यामुळे पालखीत बसण्याचे शिवसेना पक्षप्रमुखांचे स्वप्न वास्तवात उतरणे वाटते तितके सोपे नाही.

आजवर मी दुसर्‍याच्या पालखीचा भोई झालो, पण या पुढे होणार नाही, मला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शिवसैनिकाला पालखीत बसवायचे आहे, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगून याबाबत आम्ही कुठल्याही परिस्थितीत तडजोड करणार नाही, असा ठाम निर्धार व्यक्त केल्यामुळे भाजपचा सत्ता स्थापण्याचा मार्ग कुंठित झाला. सत्ता स्थापन करण्यासाठी युती धर्माचे पालन करून शिवसेना आपल्याला साथ देतील आणि युतीचे सरकार स्थापन होईल, असे भाजपच्या नेत्यांना वाटत होते, पण भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी युती करताना जो फिप्टी फिप्टीचे वचन दिले ते पालन करत नसल्यामुळे आम्ही भाजपसोबत जाणार नाही, असे शिवसेनेने स्पष्ट केले.आमचा मुख्यमंत्री होणार नसेल तर आमचे अन्य मार्ग मोकळे आहेत, अशी भूमिका घेऊन शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाशी आपला मुख्यमंत्री बनवण्यासाठी सत्तेची समीकरणे जुळवायला सुरुवात केली.

महाराष्ट्राच्या राजकारणावर गेली अनेक वर्षे जबरदस्त पकड असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना त्यांनी गळ घातली. सत्तेची संधी आली तरी ती सोडण्याचा पवारांचा स्वभाव नाही. त्यामुळे सुरुवातीला जरी त्यांनी जनतेने आम्हाला विरोधात बसण्याचा निकाल दिला असल्यामुळे आम्ही विरोधात बसणार असे सांगितले, पण शिवसेनेच्या माध्यमातून महाराष्ट्रासारख्या प्रमुख राज्यातून भाजपला जर सत्तेपासून दूर ठेवता आले तर त्याचा मोठा फायदा आपल्याला पुढील काळात होईल, याची पवारांना आणि काँग्रेस नेत्यांनाही कल्पना आहे. त्यामुळेच त्यांनी महाराष्ट्रातून भाजपला सत्तेपासून दूर ठेवले, तर मोदींना शह देता येईल, म्हणूनच राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या हालचाली सुरू आहेत, पण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिलेल्या मुदतीत कुठलाही पक्ष सत्ता स्थापन करू न शकल्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे.

- Advertisement -

काँग्रेसमुक्त भारताची मोहीम उघडून नरेंद्र मोदी यांनी २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला पार भुईसपाट केले. त्यांना लोकसभेत विरोधी पक्षाचे स्थान मिळेल इतक्याही जागा मिळाल्या नाहीत. त्यानंतर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत तर भाजपला पूर्वीपेक्षाही जास्त जागा मिळाल्या. त्यामुळे मोदींचा अश्वमेध केंद्रीय पातळीवर रोखता येत नाही. याची काँग्रेसला कल्पना आहे. त्यामुळे प्रादेशिक पातळीवर त्यांना कसे रोखता येईल, यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असतात. त्यात आपल्याला यश येऊ शकते, याचा प्रत्यय काँग्रेसला मोदींचे गृहराज्य असलेल्या गुजरातमध्ये आला. गुजरातमध्ये मोदी तीन वेळा मुख्यमंत्री होते. ते गुजरातचे विकासपुरुष म्हणून ओळखले जात होते, पण ते पंतप्रधान झाल्यावर पाच वर्षांनंतर गुजरातमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत स्वत: मोदी प्रचारासाठी उतरूनही भाजपला बहुमत मिळवताना चांगलाच घाम फुटला होता. उलट, गुजरातमध्ये काँग्रेसच्या जागा चांगल्याच वाढल्या. गुजरातने काँग्रेसला नवा विश्वास दिला. त्यामुळे भाजपला प्रादेशिक पातळीवर थोपवण्याची भूमिका काँग्रेसने घेतलेली आहे. त्यामुळे ज्या राज्यात भाजपची सरकारे आहेत, तिथून भाजपची सत्ता जाईल, यासाठी अन्य पक्षांना पाठिंबा देण्याच्या प्रयत्नात काँग्रेस असते. त्यामुळेच महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादीला पाठिंबा देण्याचा काँग्रेसचा मनसुबा असावा, पण अजून सत्तेचे समीकरण जमताना दिसत नाही.

काँग्रेस आणि भाजप हे राष्ट्रीय पक्ष आहेत. त्यांची व्याप्ती देशभर आहे. हे दोन पक्ष विविध राज्यांतील प्रादेशिक पक्षांसोबत युती आणि आघाडी करतात, पण ती सोयीसाठी असते. त्यांना ती फार काळ कायम ठेवायची नसते. त्याच्या सोबत राहून हळुहळू त्या प्रादेशिक पक्षाचा प्रभाव आणि आवाका कमी करायचा असतो. जेव्हा सत्तावीस वर्षांपूर्वी भाजपने शिवसेनेशी युती केली, त्यामागे हाच उद्देश होता. छोटा भाऊपणा स्वीकारून आपली वाटचाल सुरू ठेवायची आणि पुढे आपला प्रभाव वाढवायचा. भाजपने महाराष्ट्रात तसेच केले. युती केली तेव्हा शिवसेनेकडे बाळासाहेब ठाकरे यांचे प्रभावी नेतृत्व होते. त्याचा उपयोग भाजपला झाला. दोन्ही पक्षांनी आपल्या युतीला हिंदुत्वाचा आधार दिला. आमची युती लोकांच्या हितासाठी आणि हिंदुत्वावर आधारलेली आहे. ती सत्तेच्या स्वार्थासाठी झालेली नाही. असेच दोघेही लोकांना सांगत राहिले. पण ते किती फोल आणि आपमतलबी आहे, हे सध्या राज्यात या दोन्ही पक्षांचा राजकीय सत्ता मिळवण्यासाठी जो काही संघर्ष सुरू आहे, त्यावरून दिसून येत आहे.

- Advertisement -

भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे, त्यामुळे त्यांचे विषय राष्ट्रीय पातळीवरील आहेत. राष्ट्रीय पातळीवर आपला प्रभाव वाढवण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांनी प्रयत्न करून पाहिला, पण त्यांना त्यात फारसे यश आले नाही. कारण या दोन्ही पक्षांचा पाया हा प्रादेशिक आहे. शिवसेना भाजपशी स्पर्धा करण्यासाठी मोठे विषय हाती घेण्याची धडपड करते, पण त्यांना फारसा प्रतिसाद मिळत नाही. शिवसेनेची स्थापनाच मुळात भूमिपुत्रांचा पक्ष म्हणून झालेली आहे. असे भूमिपुत्रांसाठी स्थापन झालेले पक्ष प्रत्येक राज्यात आहेत. त्यामुळे अन्य राज्यांमध्ये शिवसेनेला स्थान मिळाले नाही. महाराष्ट्र हा आपला बालेकिल्ला आहे. त्यामुळे इथला मुख्यमंत्री आपलाच व्हायला हवा ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची इच्छा आहे. आम्ही केंद्रात आणि राज्यात गेली पाच वर्षे उपेक्षा सहन केली. दुय्यम खाती स्वीकारली, पण आता ते शक्य नाही. म्हणूनच शिवसेनेने फिप्टी फिफ्टीचा आग्रह कायम ठेवला आहे. सध्या भाजपही कचाट्यात सापडली आहे. त्यांना अन्य पर्याय नाही, त्यामुळे मुख्यमंत्रिपदाची संधी मिळवण्याची हिच ती वेळ आहे, हे हेरूनच शिवसेनेने ठाम भूमिका घेतलेली आहे.

आदित्य ठाकरे यांना विधानसभा निवडणुकीत उतरवून त्यांना जिंकून आणण्यामागे त्यांना मुख्यमंत्री बनवायचे आहे, हा शिवसेनेचा हेतू स्पष्ट आहे, पण महाराष्ट्रासारखे मोठे राज्य आणि आदित्य ठाकरे यांचा अनुभव याचा काही ताळमेळ बसताना दिसत नाही. पूर्वी अशी खिचडी सरकारे आपत्कालीन स्थितीत स्थापनही झाली, पण त्यांचा फार काळ टिकाव लागला नाही. उद्धव ठाकरे काश्मीरमधील भाजप आणि मेहबुबा मुफ्ती या भिन्न विचारसरणींच्या सरकारचे उदाहरण देत आहेत आणि काँग्रेस-राष्ट्रवादीशी हातमिळवणीचे समर्थन करत आहेत, पण ते सरकार अल्पावधीत कोसळले हे ते लक्षात घेत नाहीत. काय व्हायचे ते व्होवो, पण आपला मुख्यमंत्री व्हायलाच हवा, असा त्यांचा अट्टाहास आहे. खरे तर अशाच अट्टाहासातून राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले आणि शिवसेना दुबळी झाली. आता ज्या पक्षांशी त्यांची विचारसरणी जुळत नाही, अशांशी हातमिळवणी करून ते किती काळ सत्ता चालवणार आहेत, असा प्रश्न आहे. कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे काही नि:स्वार्थीपणे शिवसेनेचा मुख्यमंत्री खांद्यावर बसवून घेणार नाहीत. त्यामुळे यापुढे पालखीचा भोई मी होणार नाही, असे शिवसेना पक्षप्रमुख म्हणत असले तरी भविष्याच्या पोटात काय दडले आहे, ते येणारा काळच सांगू शकेल.

Jaywant Rane
Jaywant Ranehttps://www.mymahanagar.com/author/rjaywant/
25 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. राजकीय, सामाजिक, वैचारिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -