घरफिचर्समायमहानगर ब्लॉगशिवसेनेचा अट्टाहास, भाजपचा थयथयाट, पवारांची भूमिका!

शिवसेनेचा अट्टाहास, भाजपचा थयथयाट, पवारांची भूमिका!

Subscribe

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जे काही बंडाचे वारे शिरले आहे, त्याला शिवसेनेचा अट्टाहास, भाजपचा थयथयाट कारणीभूत आहे. आता त्यातून कसा मार्ग काढायचा हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरच प्रामुख्याने अवलंबून आहे. कारण मागे देवेंद्र फडणवीसांनी अजित पवार आणि त्यांच्या समर्थक आमदारांना हायजॅक करून पवारांना असाच धक्का दिला होता. आता त्यांनी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांना हायजॅक करून तसाच धक्का पवारांना परत दिला आहे. शरद पवारांनी अजित पवारांना परत आणून फडणवीसांच्या पंखातील हवा काढली होती, आताही ठाकरे सरकारच्या आशा या शरद पवारांवरच अवलंबून आहेत, आता शरद पवार फडणवीसांवर मात करतात की, फडणवीस यावेळी यशस्वी होतात ते आता पहावे लागेल.

महाराष्ट्र सध्या राजकीय वादळात सापडलेला आहे. त्याला एकेकाळी हिंदुत्वाच्या जाहीरपणे आणा भाका घेणार्‍या शिवसेनेचा अट्टाहास आणि भाजपचा थयथयाट कारणीभूत आहे. २०१९ साली महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक झाली. त्यावेळी भाजप आणि शिवसेनेने युतीत निवडणूक लढवली होती, पण त्यावेळी मुख्यमंत्रीपदाचे आश्वासन केंद्रीय मंत्री अमित शहांनी आम्हाला दिले होते, तसेच आम्ही शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्याचे वचन स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दिले होते, त्यामुळे मुख्यमंत्रीपद आपल्याला हवे, असा हट्ट शिवसेनेने लावून धरला. सुरुवातीला भाजपला असे वाटत होते की, २०१४ साली महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक भाजप आणि शिवसेनेने युती तोडून स्वतंत्रपणे लढवली होती. मोदी लाट असल्यामुळे आता आपण मुख्यमंत्रीपदाची आलेली संधी कशाला सोडा म्हणून भाजपलाही काही युतीची गरज नव्हती. त्यामुळे दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे एकमेकांच्या विरोधात मैदानात उतरले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तर भाजप आणि त्यांच्या केंद्रीय आणि राज्य पातळीवरील नेत्यांचा समाचार घेताना अजिबात हात राखून ठेवला नाही. भाजपवर आपण टोकाची टीका केली, तर राज्यातील लोक आपल्याला बहुमत देतील आणि आपले बहुमताचे सरकार राज्यातील येईल, असे वाटत होते. भाजपनेही तसाच पवित्रा घेतला होता, मोदी लाटेचा पुरेपुर उपयोग करून त्यांनाही बहुमत मिळवून त्यांना आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री आणायचा होता. या निवडणुकीत पंतप्रधानपदी असलेली नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात २६ प्रचारसभा घेतल्या, शेवटी मोदींचा आवाजही बसला, इतकी मेहनत घेऊनही त्यावेळी भाजपला त्यावेळी १२२ आमदार निवडून आणता आले, त्यांना बहुमतापर्यंत पोहोचत आले नाही. त्यावेळी देवेंद्र फडणवीस त्यांनी सत्तास्थापनेचा दावा केला.

- Advertisement -

त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने तांत्रिक पांठिबा देऊन ते सरकार वाचवले. शिवसेनेने भाजपच्या विरोधात निवडणूक लढवलेली होती, तरी पण भाजपने शिवसेनेला सोबत येण्यासाठी खूप विनवण्या केल्या, आपल्यालाही बहुमत मिळवता आले नाही, आपल्या जागा भाजपपेक्षाही बर्‍याच कमी आहेत, हे लक्षात घेऊन त्यांनी शेवटी शिवसेनेने भापजच्या नेतृत्वाखालील सत्तेत सहभागी होण्याचे मान्य केले. त्यानंतर पाच वर्षे ते भाजपसोबत सत्तेत होते. पण आपल्याला मुख्यमंत्रीपद पाहिजे हा शिवसेनेचा अट्टाहास हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून राहिलेला आहे. त्यामुळे २०१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना भाजपसोबत पाच वर्षे सत्तेत असली तरी त्यांच्या भाजपशी संघर्ष सुरूच होता. ते सत्तेत राहूनही विरोधकाची भूमिका पार पाडत होते. त्यांचे मंत्री खिशामध्ये राजीनामे घेऊन फडणवीस सरकारवर नेहमी टांगती तलवार ठेवत होते, पण त्यांनी सत्तेतून बाहेर पडावे, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सांगत नव्हते, कारण त्यांनी एक भीती होती, ती म्हणजे आपण सत्तेतून बाहेर राहिलो तर आपल्याकडचे आमदार आपल्यातून फुटून भाजपमध्ये शक्यता नाकारता येत नव्हती. त्यामुळे मनाला पटत नसले तरी भाजपसोबत सत्तेत राहणे आवश्यक होते.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत हेच दुभंगलेले दोन पक्ष उपरती होऊन एकत्र आले. यात भाजपचा पुढाकार होता. या निवडणुकीत आमचे बहुमत येईल, ही निवडणूक केवळ एक औपचारिकता आहे, मी पुन्हा येईन, असे भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस सांगत होते. त्यांना मराठी माणूस दुखावला जाऊ नये, म्हणून शिवसेनेला सोबत घ्यायचेे होते, पण आपल्याला यावेळी बहुमत मिळेल, असे भाजपला वाटत होते. पण त्या निवडणुकीत जिंकलेल्या जागांची संख्या मागील निवडणुकीपेक्षा कमी झाली. १२२ वरून १०५ वर आली. शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद हवे होते, पण देवेंद्र फडणवीस यांना ते मान्य नव्हते, त्यांना ते पूर्ण पाच वर्षे हवे होते. खरे तर देवेंद्र फडणवीस यांंनी केलेली ही मोठी चूक होती. कारण त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नाराज झाले.

- Advertisement -

त्या नाराजीचा फायदा राजकारणातील मातब्बर नेते शरद पवार यांनी फायदा घेतला आणि आपल्या पक्षाला सत्ता मिळेल अशा प्रकारच्या महाविकास आघाडीला आकार दिला. १९९९ साली झालेल्या निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजप यांच्यात आलेल्या वितुष्टाचा फायदा शरद पवार यांनी घेतला होता, त्यावेळी पवारांनी काँग्रेसमधून बाहेर पडून वेगळा राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष स्थापन करून त्यांनी काँग्रेसच्या विरोधात निवडणूक लढवली होती. पण शिवसेना आणि भाजप यांच्यातील मुख्यमंत्रीपदावरून सत्ता स्थापनेचे गाडे अडले होते, ते पाहून पवारांनी दिल्लीला जाऊन काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी सलोखा केला आणि महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार स्थापन केले. ते पुढे पंधरा वर्षे टिकले. यावेळीही त्यांनी आपल्या पक्षाकडे शक्य असताना मुख्यमंत्रीपद घेतले नव्हते.

२०१९ सालच्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजप आणि शिवसेना यांच्यातील मुख्यमंत्रीपदी पदावरून झालेली कोंडी लक्षात घेऊन शरद पवारांनी ही संधी साधली. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांना कुठल्याही परिस्थिती मुख्यमंत्री मिळवायचे होेते. त्यातूनच मग शरद पवारांच्या पुढाकाराने महाविकास आघाडीचे सरकार राज्यात सत्तेवर आले. खरे तर हे समीकरण जुळवणे वाटते तितके सोपे नव्हते. कारण ठाकरे आणि शरद पवार यांचे घरगुती पातळीवर चांगले संबंध असले तरी राजकीय संबंध हे नेहमीच वादळी आणि टोकाचे राहिलेले आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शरद पवारांना जी काही विशेषणे लावली ती आजही अनेकांच्या चर्चेचा भाग आहेत. त्यामुळे शिवसेनेसोबत शरद पवारांनी हातमिळवणी करणे अवघड होते. त्यात पुन्हा शिवसेनेला सोबत घेतले तरी आवश्यक संख्याबळ होत नव्हते, त्यामुळे काँग्रेसला सोबत घेणे आवश्यक होते, पण शिवसेना सत्तेत येणार असल्यामुळे काँग्रेस त्यासाठी तयार नव्हती. पण पवारांनी महाराष्ट्रात मोदींना शह देण्यासाठी काँग्रेसला राजी केले. त्यानंतर राज्यात एका अकल्पित अशा आघाडीचा जन्म झाला. तिची सत्ता गेली अडीच वर्षे चालली आहे.

शरद पवारांची आजवरची राजकीय कारकीर्द पाहिली तर त्यांनी अशाच अकल्पित राजकीय आघाड्या जन्माला घातलेल्या आहेत, पण त्या अल्पकालीन ठरलेल्या आहेत. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या महाविकास आघाडीची वाटचाल ही त्याच दिशेने होताना दिसत आहे. मुळात हे तिन्हीही पक्ष मोदींना शह देऊन सत्ता मिळवण्याच्या एकमेव महत्वाकांक्षेने एकत्र आलेले आहेत. त्यात पुन्हा त्यांचे हे आघाडीचे सरकार पाडण्यासाठी राज्यातील भाजपच्या नेत्यांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून जो काही आटापिटा केला, ते पाहता स्वत:ला संस्कारित समजल्या जाणार्‍या भाजपची किव आणणारा आहे. भाजप नेते ठाकरे सरकार पडण्यासाठी वारंवार तारखा देत होते आणि आजही देत आहेत. इतकेच नव्हे तर हे सरकार पडेल, यासाठी तशी परिस्थिती असल्याचा भास निर्माण करत होते. घोटाळ्यांच्या आरोपांच्या फैरी डागत होती.

सत्तेतीतल अनेकांच्या मागे ईडी, आयकर विभाग अशा केंद्रीय तपास यंत्रणाचा फेरा लावत होते. त्यांच्या कारवाईला नेत्यांना समोरे जावे लागते होते, पण ठाकरे सरकार काही पडत नव्हते. त्यामुळे भाजपमध्ये मोठे नैराश्य आलेले होते. नुकत्याच झालेल्या राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत भाजपचा एक एक सदस्य जास्त निवडून आला, त्यामुळे त्यांचा आनंद गगनात मावेनासा झालेला आहे. इतका त्यांचा जल्लोष बटबटीत वाटत होता. हा आनंद साजरा होत असताना दुसर्‍या बाजूला शिवसेनेमध्ये विविध कारणांनी नाराज असलेले एकनाथ शिंदे यांनी आपल्या सोबत ४६ आमदार असल्याचा दावा करत बंड केले. या बंडावर कसा तोडगा काढायचा यावर सध्या खल सुरू आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हवरून माझ्यावर माझी माणसे नाराज असतील तर मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यायला तयार आहे, असे सांगितले.

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना आपल्याकडे वळवून पहाटेच्या वेळी राजभवनावर नेऊन उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली आणि स्वत: मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. फडणवीस यांनी शरद पवारांना दिलेला हा अनपेक्षित धक्का होता. सुरुवातीला लोकांना वाटले की, ही शरद पवारांची चाल आहे. पण नंतर लक्षात आले की, ही देवेंद्र फडणवीसांची चाल होती. पुढे शरद पवार यांनी आपल्या राजकीय मुरब्बीपणाचा उपयोग करत अशी काही चक्रे फिरवली की, अजित पवारांसोबत गेलेले सगळे आमदार एक एक करत शरद पवारांच्या मागे उभे राहिले आणि अजित पवारांचे बंड फसले. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांची फटफजिती झाली. आपण केलेली ही चूक होती, त्यामुळे आपल्या प्रतिमेला धक्का बसला असे त्यांना पुढे मान्य करावे लागते. आताही एकनाथ शिंदे यांनी ४६ आमदार आपल्यासोबत असल्याचा दावा करून बंड केले आहे आणि प्रथम गुजरात, आणि नंतर गुवाहाटी इथे वास्तव्य केले आहे, त्यामागेही भाजप आणि देवेंद्र फडणवीस आहेत हे कुणी वेगळे सांगण्याची गरज नाही.

शरद पवार यांनी राज्यातील राजकारणावर प्रभाव असलेल्या अजित पवार यांचे बंड मोडून काढले. त्यांच्या तुलनेत एकनाथ शिंदे हे छोटे नेते आहेत, त्यामुळे त्यांचे बंड मोडून काढणे हे शरद पवारांनी मनावर घेतले तर कठीण नाही. कारण हे बंड यशस्वी ठरले तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील आणि पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाची, शिवसेनेची आणि काँग्रेसची सत्ता जाईल, त्यामुळे पवार असे सहजा सहजी होऊ देणार नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात कात्रजचा घाट हा वाक्प्रचार शरद पवारांमुळेच प्रचलित झालेला होता. भाजपला सत्ता मिळवायची असेल तर त्यांना शिवसेनेच्या आमदारांचे सहाय्य लागणारच आहे, पण तो शरद पवार मिळू देतील का, हा खरा प्रश्न आहे. मुळात हे तीन पक्षांचे महाविकास आघाडीचे सरकार शरद पवारांमुळेच अस्तित्वात आले आहे. पवारांचे राजकारण संपले असे देवेंद्र फडणवीस मागच्या निवडणुकीच्या प्रचारातून सांगत होते, पण त्याच पवारांनी फडणवीसांची सत्ता आणि मुख्यमंत्रीपद घालवले. आता फडणवीसांनी एकनाथ शिंदेंना आपल्याकडे वळवून पवारांना पुन्हा आव्हान दिले आहे, पण जसे पवारांनीच सांगितले आहे, ‘माझे वय झाले असले तरी मी म्हातारा झालेलो नाही.’ त्यामुळे महाविकास आघाडीचे काय होणार हे पवारांवरच अवलंबून आहे.

Jaywant Rane
Jaywant Ranehttps://www.mymahanagar.com/author/rjaywant/
25 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. राजकीय, सामाजिक, वैचारिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -