Monday, September 27, 2021
27 C
Mumbai

ठाकरे उवाच…

Related Story

- Advertisement -

शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणांची स्वतंत्र अशी एक ठाकरी शैली होती. बर्‍याच वेळा बाळासाहेबांनी विरोधकांना हाणलेल्या टोल्यांचे वर्णन ‘ठाकरी बाणा’ या शब्दात केले जात असे. शिवसेनाप्रमुखांनंतर शिवसेनेची सूत्रे पूर्णपणे शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांच्या हातात आली. भाषणांच्या पद्धतीत बघायचे गेल्यास बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे यांच्या भाषणशैलीतील जमीन-अस्मानचा फरक हा कोणालाही लक्षात येणारा आहे. शिवसेना आणि शिवसैनिक ही मुळातच आक्रमक संघटना म्हणून ओळखली जाते. त्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब यांचे अत्यंत ओजस्वी आणि शिवसैनिकांमध्ये निखारे फुलवणारे परखड आणि रोखठोक भाषण लक्षात घेतले तर दुसरीकडे अशा आक्रमक संघटनेचा वारसा पुढे चालवणार्‍या उद्धव ठाकरे यांच्या भाषणाची पद्धत म्हणजे परस्पर विरोधी दोन टोके होती. उद्धव ठाकरे यांच्या या भाषणशैलीमुळेच शिवसेनाप्रमुखांच्या आक्रमक शैलीत घडलेले शिवसेनेचे काही ज्येष्ठ नेते हे शिवसेनेला फार भविष्य नसल्याचा अंदाज घेत शिवसेनेला सोडून गेले, हेदेखील विसरता येणार नाही.

भाषणात कच्चे असलेले उद्धव ठाकरे हे कृतीत मात्र अत्यंत अचूक राहिले आणि आता तर म्हणजे महाराष्ट्रात शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन परस्परविरोधी पक्षांची आघाडी होऊन त्यांच्या सरकारचे नेतृत्व उद्धव ठाकरे यांच्याकडे आल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून ठाकरे यांची जी भाषणे होत आहेत त्यामध्ये त्यांनी जाणीवपूर्वक काही सुधारणा केल्या आहेत हे लक्षात घेणे गरजेचे आहे. आणि केवळ शिवसेनेलाच नव्हे तर महाराष्ट्रातील अन्य राजकीय पक्षांच्या नेत्यांनीही मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी केलेली संतुलित राजकीय भाषणे हे नक्कीच ऐकायला हवीत असे म्हटले तर त्याबद्दल कोणाला नवल वाटू नये. संघटना म्हणून शिवसेनेचा व्यापक विस्तार करायचा असल्यास त्याला काळाप्रमाणे बदलावे लागेल, नवे आयाम द्यावे लागतात, तसे देण्याचा उद्धव ठाकरे यांचा प्रयत्न राहिलेला आहे. राजकीय जीवनात वावरताना नेत्यांच्या भाषणाला मोठे महत्व असते, त्यात पुन्हा जेव्हा कुठल्याही पक्षाचा नेते सरकारमध्ये पदावर बसलेला असेल तर त्याला फारच भान ठेवावे लागते, अन्यथा तो टीकेचे लक्ष्य बनतो. मुख्यमंत्री झाल्यावर उद्धव ठाकरे यांनी याचे भान ठेवलेले आहे.

- Advertisement -

अर्थात याला निमित्त आहे ते उद्धव ठाकरे यांनी काल त्यांच्या सासरवाडीत अर्थात डोंबिवलीत केलेल्या भाषणाचे. उद्धव ठाकरे यांच्यापूर्वी भाजपच्या दोन प्रमुख नेत्यांची भाषणे ही या कार्यक्रमात झाली. त्यामध्ये एक होते ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील पंचायत राज्य मंत्री आणि भिवंडीचे खासदार कपिल पाटील यांचे तर दुसरे भाषण होते ते डोंबिवलीचे भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण यांचे. या दोन्ही भाषणाचा उल्लेख यासाठी कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यानंतर केलेल्या भाषणामध्ये या दोन्ही नेत्यांच्या भाषणांना जे प्रत्युत्तर दिले ते उद्धव ठाकरे यांच्यातील गेल्या दोन वर्षातील मुरलेल्या राजकीय नेत्याचे मुसद्दी भाषण होते असे म्हणता येईल. राज्यात 2019 मध्ये राजकीय सत्तांतर झाले आणि भाजपबरोबर निवडणुकीपूर्वी युतीत असलेली शिवसेना हे भाजपची साथ सोडून सत्तासुंदरीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर गेली. शिवसेनेच्या किंबहुना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या या एका धक्कादायक निर्णयाचा मोठा परिणाम हा भाजपवर झाला.

हातातोंडाशी आलेला नव्हे तर घशापर्यंत गेलेला सत्तेचा घास हा भाजपच्या घशातून काढून उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेकडे घेण्याचे धाडस दाखवले होते. केंद्रात सत्ता असताना महाराष्ट्रात सत्ता नसल्याचे जे मोठे फटके स्थानिक पातळीवर भाजपला बसले त्याची खंतवजा तक्रार युतीचे कार्यकर्ते म्हणून डोंबिवलीवासीय भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी त्यांच्या भाषणात व्यक्त केली. मग त्यामध्ये डोंबिवलीला निधी देण्यामध्ये केला जाणारा सापत्नभाव असेल की अगदी डोंबिवलीतील भाजप कार्यकर्त्यांना स्थानिक पोलिसांपासून होणारा उपद्रव असेल, रवींद्र चव्हाण यांनी ती खदखद मुख्यमंत्र्यांसमोर अत्यंत मोकळेपणाने मांडली. त्यानंतर मोदी सरकारमधील राज्यमंत्री कपिल पाटील यांनीदेखील त्यांच्या भाषणामध्ये भिवंडी-कल्याणमधील विकास कामांबाबत मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. मात्र कपिल पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे कैफियत मांडण्याची पद्धत आणि आमदार रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केलेली खंत यातील फरकावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जी ठाकरी शैलीतील टिपणी केली ती खूप काही बोलून जाणारी होती.

- Advertisement -

मुळात शिवसेना पक्षप्रमुख म्हणून आणि राज्याचे मुख्यमंत्री म्हणूनदेखील उद्धव ठाकरे हे काही भाजपच्या विरोधात नाहीत. एकीकडे मोदी सरकारच्या मंत्रिमंडळातील एक कॅबिनेट मंत्री नारायण राणे हे सतत उद्धव ठाकरे यांच्या नावाने उणीदुणी काढत असताना त्याच मंत्रिमंडळातील भाजपचे राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याबाबत बोलताना मुख्यमंत्री कपिल पाटील आणि आपल्यातील कनेक्शन मजबूत असल्याचे जे सांगत आहेत त्यातूनही बराच बोध घेण्याची गरज आहे. उद्धव ठाकरे यांचा हा टोला केवळ डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांना नसून तो भाजपमधील उद्धव ठाकरे द्वेष्टे असलेल्या सगळ्याच भाजपच्या नेत्यांना आहे असे मानले तर ते चुकीचे होणार नाही. कनेक्शन मजबूत नसले की रवींद्र चव्हाण यांच्यासारखे होते असे अत्यंत चपखल आणि मार्मिक बोलून उद्धव ठाकरे यांनी भाजपमधील वाचाळ वीरांच्या मर्मस्थानावर बोट ठेवले आहे. भाजपचे जे वाचाळवीर सध्या मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांच्यावर चहुबाजूंनी तुटून पडत असतात त्यांच्याकरिता उद्धव ठाकरे यांनी दिलेला हा अप्रत्यक्ष सल्ला आहे असेदेखील मानता येऊ शकते.

अखेरीस सत्तेपुढे शहाणपण चालत नाही अशी म्हण आहे त्यामुळे भाजपने त्यांच्या स्वप्नात जरी उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री म्हणून नसले तरी प्रत्यक्षात गेल्या पावणेदोन वर्षांपासून तेच महाराष्ट्राचा कारभार चालवत आहेत याकडे दुर्लक्ष करता येत नाही. किमान कपिल पाटील आणि रवींद्र चव्हाण यांची शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांच्याशी असलेल्या जवळकीच्या संबंधांमुळे हे दोन्ही नेते युतीचे कार्यकर्ते म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्यांना काही गोष्टी स्पष्टपणे किमान सांगू तरी शकले. उद्धव ठाकरे द्वेष्ठ्यांना ती जागा देखील मित्रत्वाच्या नात्यात दुर्दैवाने शिल्लक राहिलेली नाही असेच काहीसे चित्र आहे. त्यामुळेच भाजप नेत्यांच्या भाषणाला मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी जो सकारात्मक प्रतिसाद दिला, तो निश्चितच लोकशाहीतील राजकीय मूल्य अधिक वृद्धिंगत करणार आहे असे म्हणावे लागेल.

कल्याण डोंबिवली तसेच कपिल पाटील प्रतिनिधित्व करत असलेल्या भिवंडीतील विकास कामांसाठी पाहिजे तेवढा निधी देऊ निधी कमी पडू देणार नाही, असे जे आश्वासन महाआघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी काल डोंबिवलीत दिले आहे ते त्यांच्यातील एका परिपक्व राजकीय नेत्याचे आश्वासन आहे या दृष्टीने त्याकडे पाहण्याची गरज आहे. त्याचबरोबर ज्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपनेते शिवसेनेला सतत टार्गेट करत असतात, त्यांनादेखील उद्धव ठाकरे यांनी जे खडे बोल सुनावले आहेत ते लक्षात घेता शिवसेनेने हिंदुत्वाचा जो धागा त्याने पकडला आहे तो भविष्यातदेखील ते कदापि सोडणार नाहीत, हे उद्धव ठाकरे यांनी कालच्या भाषणात स्पष्टपणे अधोरेखित केले आहे.

- Advertisement -