Friday, July 30, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर फिचर्स मायमहानगर ब्लॉग आव्हानांचे शिवधनुष्य...

आव्हानांचे शिवधनुष्य…

Related Story

- Advertisement -

शिवसेना आज आपला 55 वा वर्धापन दिन साजरा करत आहे. राज्याच्या मुख्यमंत्रीपदी उद्धव बाळासाहेब ठाकरे हे विराजमान आहेत. सुवर्णमहोत्सव साजरा केलेली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याच नेतृत्वाखाली भविष्याची वाटचाल करत आहे. 1966 साली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण या सूत्रांसहित शिवसेनेची स्थापना केली. 55 वर्षांच्या वाटचालीमध्ये शिवसेनेनं अनेक चढ-उतार पाहिले. जय-पराजय, बंड, नाराजी, आंदोलन, तुरुंगवार्‍या, टीका, कौतुक हे सारं शिवसेनेनं अनुभवलं. शिवसेना ही सुरुवातीला बाळासाहेब ठाकरे तर आता उद्धव ठाकरे यांच्या एकछत्री अंमलाखाली कार्यरत असलेली संघटना राज्याच्या सत्तेतला महत्वाचा पक्ष म्हणून महाविकास आघाडीच्या रुपात राज्यात कार्यरत आहे. या महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे राज्याचा गाडा हाकत आहेत. कोणत्याही संघटनेला किंवा पक्षाला आपला मुख्यमंत्री राज्यावर राज्य करत असताना अनुभवणं हा खरोखरच आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण असतो.

हे सौभाग्य सध्या शिवसेना अनुभवत आहे. अर्थात हे काही पहिल्यांदा घडलेलं नाही. शिवसेना तिशीच्या उंबरठ्यावर असतानाच राज्यात पहिल्यांदा बिगर काँग्रेसी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या रूपाने स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राज्याच्या गादीवर बसवला. मनोहर जोशी यांनी अत्यंत कुशलतेने शिवसेनाप्रमुखांचा ठाकरी बाणा आणि भाजप यांच्यामधील समन्वय साधत पावणे चार वर्षे मुख्यमंत्री म्हणून कारभार केला. त्यानंतर शिवसेनाप्रमुखांच्या स्वभावाला साजेशा पद्धतीतच तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचा राजीनामा घेण्यात आला आणि अत्यंत सामान्य कुटुंबातून आलेल्या आणि कट्टर शिवसैनिक हीच ओळख जपणार्‍या नारायण राणेंना ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदावर बसवलं. नारायण राणे यांचे मुख्यमंत्री होणं हे फक्त आणि फक्त बाळासाहेब ठाकरे यांच्यासारख्या करिष्मा असलेल्या नेत्यालाच जमू शकतं अशा पद्धतीची ती निवड होती. त्यानंतर आता म्हणजे पन्नाशी पार केल्यावर स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. ते शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत आणि त्याही आधी ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव आहेत.

- Advertisement -

शिवसेना आणि आमचं एक वेगळंच नातं आहे. शिवसेनेने वेळोवेळी घेतलेले काही निर्णय आणि घडामोडींबद्दल आम्ही वेळोवेळी भाष्य केलं आहे. आमच्या मत प्रदर्शनाबद्दल आणि अग्रलेखांबाबत शिवसेनेनं त्यांच्या पद्धतीनं व्यक्त होणं पसंत केलं. पण म्हणून आम्ही घेतला वसा टाकलेला नाही. अर्थात, स्थित्यंतरं हा निसर्गाचा नियम आहे तसं सगळंच बदललं आहे. त्यामुळेच या बदललेल्या राजकीय परिस्थितीतला महाराष्ट्र सामोरा जातोय. त्याचाच परिपाक म्हणजे राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची आघाडी सत्तेवर आहे आणि मागच्या विधानसभेत सर्वाधिक जागा मिळवून भाजप विरोधी पक्षांच्या बाकावर बसलेला आहे हीच लोकशाहीची खरी गंमत आहे. शिवसेनाप्रमुख ठाकरे हे संघटनेत लोकशाहीला फारसे महत्व देत नव्हते, मात्र आता त्यांचे चिरंजीव उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना संविधानाच्या आधाराने चालणारं आणि विचारविनिमय करूनच वाटचाल करायला भाग पाडणारं नेतृत्व म्हणून काम करावं लागत आहे.

उद्धव ठाकरे तेल लावलेल्या राजकीय कुस्तीगीरांच्या फडात नवखे असले तरी यशस्वीपणे एकापाठोपाठ एक डाव जिंकत आहेत, त्याबद्दल त्यांचं कौतुकच करायला हवं. चर्चा, समित्या, अभ्यासगट, अहवाल, पाहणी दौरे यांच्या पलिकडे जाऊन शिवसेनेनं वाटचाल केलीय. या वाटचालीत निष्ठावंत शिवसैनिकांचं योगदान मोठं आहे. आयुष्यभर शिस्तीने मातोश्रीतील ठाकरेंचा आदेश पाळणार्‍यांचा खूप मोठा वर्ग शिवसेनेत आजही आहे. हा शिवसैनिक कोरोनाच्या महामारीतही रस्त्यावर सामान्यांसाठी उतरलेला बघायला मिळाला. उद्धव ठाकरे यांच्याकडे मुख्यमंत्रीपद आल्यानंतर अवघ्या तीन महिन्यात कोरोनासारख्या भयंकर महामारीच्या संकटाने राज्यासह देशाला आणि जगाला हादरवलं. सुमारे शंभर वर्षांपूर्वी आलेल्या प्लेगनंतर इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणात राज्यात आणि देशात मृत्यूचं तांडव बघायला मिळालं. उध्दव ठाकरे यांच्या कार्यकाळातला बराचसा वेळ, सरकारी पैसा, यंत्रणा आणि ऊर्जा या महामारीत वाया गेली. उध्दव ठाकरे यांनी धीराने आपल्या मंत्रिमंडळातल्या सहकार्‍यांना सोबत घेऊन या समस्येतून वाट काढायचा प्रयत्न केला, त्याचंही कौतुक शिवसेनेच्या वर्धापनदिनी करायलाच हवं. कारण नवखे असलेल्या मुख्यमंत्री उध्दव यांना त्यांच्या राजकीय विरोधकांनी घेरल्यावर त्यांचा पक्ष आणि शिवसैनिक यांनीच त्यांना धीर दिला, हे विशेष.

- Advertisement -

दीड वर्षाच्या कार्यकाळानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आता राजकीय खेळपट्टीवर स्थिरावले आहेत. या काळात मात्र त्यांचा उर्जेनं भरलेला शिवसेना पक्ष काहीसा मौनव्रत घेतल्यासारखा वाटला. कारणं पक्षप्रमुख सर्वोच्च पदावर असताना विरोध तरी कोणाला आणि कसा करायचा हा स्वाभाविक प्रश्न शिवसैनिकांना पडला असावा. त्यामुळे त्यांनी यासाठी मोदी आणि केंद्र सरकार यांची निवड केली. अर्थात कर्जबाजारी महाराष्ट्र आणि कोरोना याबरोबरच सेनानेत्यांच्या काही चुका आणि त्यावर केंद्रीय संस्थांचा तपास यामुळे फारसा प्रभाव पाडता आला नाही. नुकतीच झालेली मुख्यमंत्री ठाकरेंची दिल्लीवारी, शुक्रवारी राजभवनावर राज्यपाल कोश्यारींवर वाढदिवसाच्या निमित्ताने झालेला शुभेच्छा वर्षाव यालाही एक वेगळा अर्थ आहे. अर्थात राजकारणात काहीही घडू शकतं. तिथे काहीही घडताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षालाही चेतवत ठेवण्याची किमया साधायला हवी. नव्या जुन्याचा मेळ घालता यायलाच हवा. साठच्या दशकात मराठी माणसाच्या न्याय हक्कांसाठी सुरू झालेल्या शिवसेनेने वेळोवेळी आपली दिशा बदललेली आहे.

अर्थात, त्याला बहुरंगी आणि बहुढंगी मुंबईचं स्वरूपही कारणीभूत आहे. सध्या पक्षप्रमुख उद्धव यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे हे राजकारणात सक्रिय आहेत. त्यांच्याकडे असलेल्या कॅबिनेट मंत्रीपदाबरोबरच ते मुंबई महानगरपालिकेच्या कारभारातही बारीक लक्ष घालत आहेत. हे करत असताना जुने शिवसैनिक आणि नेते दुखावणार नाहीत याची काळजी ठाकरे पिता-पुत्रांना घ्यावी लागणार आहे. बदलणार्‍या काळाबरोबर राजकारणाची परिभाषा आणि नव तंत्रज्ञान झपाट्याने बदलत आहे, त्याची जोड देऊन संघटनेची व्याप्ती वाढवण्याचं काम हे खर्‍याखुर्‍या अर्थाने आदित्य ठाकरे यांना करावं लागणार आहे. संघटना आणि मुख्यमंत्री यांच्यामधला दुवा होण्याचं काम आदित्य यांना करावं लागणार आहे. अर्थात, यासाठी आदित्य यांनी आपल्या भोवतीच्या सुरक्षेच्या आणि मित्रमंडळींच्या कड्यातून बाहेर येणं ही शिवसेनेसाठी काळाची गरज आहे. राज्याच्या कानाकोपर्‍यात शिवसेनेच्या शाखा आणि शिवसैनिक आहेत त्या प्रत्येकाला भेटणं, ऐकणं आणि न्याय देणं हे संपूर्णत: उद्धव ठाकरे यांच्याकडून अपेक्षिणे म्हणजे काहीसं अन्यायकारक ठरू शकतं. त्यामुळे हा सगळा व्याप आदित्य यांनी अभ्यासू पद्धतीने जमिनीवर उतरून समजून घेणं हीदेखील या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला शिवसेनेची प्रमुख गरज वाटते. राज्याच्या प्रमुखपदी संघटनेचा सर्वोच्च नेता बसल्यानंतर संघटनेला एक वेगळंच शैथिल्य येतं.

हे शैथिल्य दूर करण्यासाठी नेत्यांनी सांघिक प्रयत्न करणंही गरजेचं आहे. शिवसेना हा तळागाळातला पक्ष आहे. हीरक महोत्सवाकडे वाटचाल करणार्‍या शिवसेनेला येणार्‍या काळात बरीच आव्हानं पेलायची आहेत. त्या राजकीय लढ्यांसाठी कष्टकरी, शेतकरी, तरुण आणि महिलांना आपल्याबरोबर सातत्याने ठेवणं ही एक कसोटीच ठरणार आहे. गेल्या काही काळात राजकारणाचं व्यापारीकरण झालं त्याचा फार मोठा फटका शिवसेनेला बसला नाही. याचं कारण शिवसैनिकांचं पक्षाभोवती असलेलं मोहोळ हेच आहे. सत्तेत असताना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ‘जनता दरबार’ची एक संकल्पना राबवायला सुरुवात केलीय. एका बाजूला मंत्रालयातली सत्ता आणि दुसर्‍या बाजूला पक्षाचं जाळं याची वीण घट्ट करण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रयत्न सुरू केलेत. त्याला दुसर्‍या फळीतील सहकार्‍यांनी जो प्रतिसाद दिलेला आहे तसा प्रयत्न शिवसेनेत होणं गरजेचं वाटत आहे. शिवसेनेसमोर आव्हानांचे शिवधनुष्य आहे. सत्ता आणि संघटनेचा मेळ घालण्यासाठी शिवसेनेला नवी रणनीती बनवता आली तर त्यांचं भविष्य उज्ज्वल होईल.

- Advertisement -