सोन्याच्या शुध्दतेची कसोटी!

उध्दव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेनं करायला नको ते केलंय असं जरी आपण समजलो मग भाजपने तरी कुठे मोठे सद्वर्तनाचे दिवे लावले आहेत. बाळासाहेब ठाकरे यांची 24 कॅरेटची शिवसेना उरली नाही हे जर खरं असेल तर मग माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांची भाजप तरी देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांनी राखली आहे का? ‘पार्टी विथ डिफरन्स’ म्हणणार्‍या भाजपने तर जगाने ओवाळून टाकलेल्यांना एकत्र आणलंय. सत्तेसाठी आणि त्यातून मिळणार्‍या फायद्यासाठी जे राजकीय फेरीवाले ‘कमल महोत्सवा’त जमले आहेत हेच का वाजपेयी आणि अडवाणी यांना अभिप्रेत होतं ?

‘शिवसेना आता बाळासाहेबांच्या वेळची 24 कॅरेट सोन्यासारखी राहिलेली नाही’, असं निरीक्षण राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नोंदवलंय. शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नवव्या पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येलाच मुनगंटीवार यांच्यासारख्या परिपक्व, संयमी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार्‍या नेत्याची पर्यायी व्यवस्था होऊ शकणार्‍या विदर्भवीराने ही टिप्पणी राज्य कार्यकारिणीमध्ये केली आहे. सोन्याला राजधातू म्हटलं जातं. या राजधातूच्या शुद्धतेचा 24 कॅरेट हा मापक आहे. मात्र याच सोन्याचा तुम्ही दागिना बनवायला जाल तर तो बनत नाही. त्यामध्ये योग्य प्रमाणात तांब्याची मिसळण करावी लागते. ते करताना सोन्याच्या पिवळे धम्मकपणाला कुठेही बाधा पोचणार नाही हे देखील पहावं लागतं. मिश्रण केलेल्या तांब्यांनं आपला गुणधर्म जास्त प्रमाणात सोन्यात मिसळला तर मात्र दागिना तांबडट पडतो आणि त्याची किंमतही घसरते. या सगळ्या गोष्टी सुधीर मुनगंटीवार यांनी लक्षात घेतलेल्या दिसत नाहीत. आणि त्यामुळेच त्यांना शिवसेनेचं 24 कॅरेट असणं अभिप्रेत आहे.

इथे प्रश्न पडतो तो सेनेचे कॅरेट दोन वर्षातच घटले का? त्याआधी केव्हाच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपली भट्टी शांत करुन सूत्रं नव्या पिढीच्या म्हणजे तत्कालीन कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या हाती दिली होती. त्यांनीच बाळासाहेबांच्या 24 कॅरेटमध्ये गरजेनुसार मिश्रण करायला सुरुवात केली. त्याचा परिपाक म्हणजेच आजच्या मुख्यमंत्रीपदाचा अविष्कार आहे. 1995 साली सेनेला मिळालेलं मुख्यमंत्रीपद आणि 2014 ची युतीची सत्ता या काळात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं होतं. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जगाचा निरोप घेतला होता. केंद्रातील एकहाती सत्ता मोदी-शहांच्या हाती एकवटली होती. साहजिकच राज्यातील भाजप नेत्यांनी उठसूठ महाजन-मुंडेंसारखं मातोश्रीचे उंबरठे झिजवणं भाजपच्या नवनेतृत्वाला मान्य नव्हतं.

त्यामुळे 2014 च्या निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि भाजप-सेना युती सत्तेत आली, पण त्या सत्तेला नव्वदीतल्या सत्तेची सर नव्हती. साहजिकच सेनेचे मंत्री खिशात राजीनामे घेऊन पाच वर्षं फिरले खरे, पण ना त्यांनी राजीनामे दिले ना फडणवीस आणि त्यांच्या भाजपने उध्दव ठाकरे आणि त्यांच्या सेनेला किंमत दिली. शिवसेना सत्तेसाठी तोंड दाबून बुक्क्यांचा मार खात होती. या सगळ्यातून त्यांना सुटका हवी होती, पण मार्ग सापडत नव्हता. 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर तो मार्ग सापडला तो ही असा की, दहावी उत्तीर्ण होताना मारामारी असणार्‍या विद्यार्थ्याला डॉक्टरेट मिळाल्यासारखं उध्दव ठाकरेंचं झालं. याच गोष्टीचा फडणवीसांच्या भाजपला मनस्ताप होतोय तर टीम देवेंद्रचा जळफळाट होतोय.

उध्दव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेनं करायला नको ते केलंय असं जरी आपण समजलो मग भाजपने तरी कुठे मोठे सद्वर्तनाचे दिवे लावले आहेत. बाळासाहेब ठाकरे यांची 24 कॅरेटची शिवसेना उरली नाही हे जर खरं असेल तर मग माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांची भाजप तरी देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांनी राखली आहे का? ‘पार्टी विथ डिफरन्स’ म्हणणार्‍या भाजपने तर जगाने ओवाळून टाकलेल्यांना एकत्र आणलंय. सत्तेसाठी आणि त्यातून मिळणार्‍या फायद्यासाठी जे राजकीय फेरीवाले ‘कमल महोत्सवा’त जमले आहेत हेच का वाजपेयी आणि अडवाणी यांना अभिप्रेत होतं? वेगवेगळ्या बँकामधले घोटाळेबाज, बेहिशेबी मालमत्तांचे धनी, खूनांचे आरोपी, असे एक ना अनेक लफडेबाज टाकाऊ भाजपने एकत्र केले आहेत. मग त्यांचं कॅरेट किती हे तरी भाजपाई सुवर्णाकारांनी महाराष्ट्राच्या जनतेला सांगून टाकावं.

बाळासाहेबांच्या सेनेला 24 कॅरेटचा दर्जा देणार्‍यांनी संधी मिळताच तेच ‘नग’ (सुवर्णकारांच्या व्यवसायात दागिन्यांना नग म्हणून संबोधले जाते) बेंटेक्सचे दागिने ठरवून टाकले. त्याचवेळी कथित पक्ष वाढीसाठी फडणवीस-पाटलांनी मोदींच्या आशीर्वादाने असे काही महाभाग गळ्यात बांधून घेतले आहेत की त्यांना एक ग्राम सोनं असलेले दागिने म्हणणंही मुश्किल होऊन बसलं आहे. गेल्या काही काळात सोन्याच्या प्रचंड वाढत्या किमती आणि वाढत्या चोर्‍यामार्‍यांचा विचार करता बर्‍याचशा महिला वर्गाने एक ग्राम सोन्याच्या दागिन्यांकडे आपला मोर्चा वळवला. पण प्रत्यक्षात या दागिन्यांत एक ग्राम तरी सोन्याचा अंश आहे का, असा प्रश्न चिकीत्सक मंडळींना पडू शकतो. कारण एक ग्राम सोन्याची किंमत, त्यासाठी वापरला जाणारा इतर धातू आणि त्याची मजुरी याची सांगड घातली की हे दागिने फक्त बोलण्यासाठी एक ग्राम सोन्याचे असतात. खरंतर त्यात सोन्याचा पत्ताच नसतो. अगदी तसंच फडणवीस-पाटील यांच्या भाजपचं झालंय. त्यांनी जमवलेल्या नगांमध्ये सोन्याचा अंश शोधून सापडत नाही अशी सध्या स्थिती आहे. गेली दोन वर्षतरी राज्याच्या सत्ताबाजारात भाजपची पेढी बंद पडली आहे.

शरद पवारांनी बाजारात असं काही मिनाकारी कलाकुसरीचं कामं करुन ठेवलंय की फडणवीस किती काळ सत्तेच्या प्रतीक्षेत राहतील हे आताच सांगणं कठीण आहे. नियमानुसार तर आणखी तीन वर्षं कुठेच गेलेली नाहीत. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षाचं जे काही चाललंय ते तर विचारायची सोय नाही. अगदी 100 कोटींच्या वसुलीचा मामला उठवणारा पोलीस आयुक्त फरार काय होतो आणि ते करणारा एन्काऊंटर स्पेशालिस्ट तळोज्याच्या तुरुंगात काय खितपत पडतोय. जगातील सर्वोत्तम सुरक्षा घेऊन जगणार्‍या सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीतील मुकेश अंबानींना घाबरवण्यासाठी त्यांच्या 12 हजार कोटींच्या घराबाहेर 18-20 जिलेटिनच्या कांड्या ठेवून त्यांना घाबरवलं काय जातंय. भ्रष्टाचाराचं तर विचारुच नका. मृतदेह ठेवण्याच्या पिशव्यांत घोटाळा, ऑक्सिजन पुरवठ्यात घोटाळा इतकंच काय आजपर्यंत प्रशासनात शिपायांच्या बदल्यांसाठी आणि रजेसाठी कधी पैसे घेतले जात नव्हते. आता राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी त्यातही हात धुवून घ्यायला सुरुवात केली आहे.

पोलीस, आरटीओ, याबद्दल तर बोलूच नका. अशी सध्या स्थिती आहे. पण भ्रष्टाचाराचे चार कागद दाखवून अर्धवट माहिती हाती घेऊन साप साप ओरडत जमीन धोपटण्याचे काम भाजपची नेते मंडळी करत सुटली आहेत. त्यामुळे त्यांना यश तर मिळत नाहीच. आणि मग त्यांना समीर वानखेडे, परमबीर सिंह, रश्मी शुक्ला अशा काही मंडळींचा आधार घ्यावा लागतोय की जे मुळातच भुसभुशीत नीतीमत्तेवरच उभे आहेत. खरंतर महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी जो भ्रष्टाचाराचा उच्छाद मांडलाय तो पाहता त्यांची दररोज सालटी सोलून काढायला हवी. पण फडणवीस-पाटलांनी जे एक ग्राम सोन्याच्या दागिन्यांनी आपली शोकेस भरलीय त्यांचं मात्र हे कामच नाही. आता तर त्या दागिन्यांचा जीवही सत्तेवाचून तडफडून जातो की काय अशी परिस्थिती असताना मुनगंटीवार यांच्यासारखा परिपक्व नेता एक बोट दुसर्‍यांकडे दाखवताना चार बोटं त्यांच्या स्वतःकडे वळतायत हे त्यांच्या लक्षात येत नाहीय की लक्षात येतंय हे त्यांना दाखवायचं नाहीय हाच खरा प्रश्न आहे.

देवेंद्र फडणवीस हे हुशार, कसदार नेते आहेत. झटपट काहीच मिळवण्याकडे त्यांचा कधीच प्रयत्न नसतो. पण बर्‍याचदा त्यांचा आपल्या वाणीवरचा संयम सुटतो आणि ते तोंडघशी पडतात. कधी विधानसभेत मी पुन्हा येईन…मी पुन्हा येईन…असं म्हणून किंवा मी अजूनही मुख्यमंत्री असल्याचंच मला वाटतं असं जाहीर वक्तव्य करणारे फडणवीस सत्ता गेल्यामुळे निराश झाले असतील, पण मानसिकदृष्ठ्या खचले नसल्याचे त्यांचे निकटवर्तीय सांगतात. हे एखाद्या सकारात्मक चर्चेसाठी खरं मानलं तरी फडणवीसांच्या रणनीतीने भाजपचं मात्र नुकसान झालंय. देवेंद्र फडणवीस हे स्वतः उंचपुर्‍या आणि आकर्षक व्यक्तिमत्वाचे धनी आहेत. पण त्यांनी आपल्या भोवती मात्र कमी उंचीच्या आणि खुज्या मंडळींची गर्दी वाढवून ठेवलीय. ही खुज्यांची गर्दी फडणवीसांना उंचीच्या निकषांवर सुखावून टाकेल, पण दिवसेंदिवस सत्तेचा विजनवास गडद करुन टाकेल.

महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांनी आपलं उखळ पांढरं करून घेण्याच्या प्रक्रियेमध्ये भाजपच्या कोणत्याही प्रयत्नांनी हे सरकार पडणार नाही याची काळजी घ्यायला सुरुवात केली आहे. आपला आणि आपल्या पोराबाळांचं व्यवस्थित चाललंय असं समजणारे मंत्री आणि नेते विलक्षण कैफात जगताहेत. फडणवीस आणि त्यांच्या सहकार्‍यांना सूर सापडत नाहीये. अशातच फडणवीसांकडे गोव्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे. जी गोष्ट महाराष्ट्रात तीच शेजारच्या गोव्यामध्ये सुरू आहे. महाराष्ट्रात जास्त जागा जिंकणारा भाजप विरोधात बसलेला आहे आणि गोव्यात अल्पमतातला भाजप निवडणुकांना सामोरं जाऊ पाहतोय, दोन्ही ठिकाणी जबाबदारी फडणवीसांवरच आहे आणि दोन्ही बाजूला अंतर्गत लाथाळ्या आणि कंपूबाजीने भाजपला भंडावून सोडलंय.

अशा परिस्थितीत दुसर्‍यांच्या सोन्याची चकाकी आणि लकाकी तपासत बसण्यापेक्षा भाजपच्या नेत्यांना गावभरातून जमवलेल्या आपल्या दागिन्यांची काळजी घ्यावी लागणार आहे. कारण या दागिन्यांना सत्तेचं पाणी मिळालं नाही तर ते अल्पावधीतच काळवंडतात. अशा काळवंडलेल्या दागिन्यांचा उपयोग ना एखाद्या सुंदरीचं सौंदर्य खुलवण्यासाठी होतो ना जगातला सर्वात मोठा पक्ष म्हणून पाठ थोपटून घेणार्‍या मोदींच्या भाजपसाठी होतो. त्यामुळे अशा एक ग्राम सोन्याच्या दागिन्यांपेक्षा फडणवीसांनी आपले जुनाट घडणावळीचे दागिनेच राजकीय परिस्थितीच्या भट्टीत तापवून उपयोगात आणायला हवेत. नाहीतर चक्रवर्ती राजा होण्याच्या प्रयत्नात आलेलं ओसाडगावचं राजापणं ना फडणवीसांच्या कामाचं आणि ना त्यांच्या भाजपच्या कामाचं… सौंदर्य खुलवण्यासाठी कुठलं सोनं वापरायचं याचा फैसला फडणवीस-पाटील-मुनगंटीवार यांनी एकत्र बसून करायची हीच ती वेळ आहे!