शिवसेनेचा राष्ट्रीय आत्मविश्वास

संपादकीय

शिवसेनेने दादरा नगर हवेली या लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक जिंकल्यानंतर त्या पक्षाच्या नेत्यांमध्ये नवा आत्मविश्वास निर्माण झाला आहे. महाराष्ट्राच्या बाहेर अशा प्रकारे लोकसभेत जाण्याचा शिवसेनेला मिळालेला हा पहिलाच विजय आहे. या विजयानंतर शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांची प्रात:कालीन मुलाखत देताना बदललेली बॉडी लँग्वेज आणि चेहर्‍यावरचे तेज मिळालेल्या नव्या ऊर्जेचे संकेत देत आहेत. अनेक वर्षे त्यांनी ज्यांच्यासोबत युतीमध्ये महाराष्ट्रातील विविध पातळ्यांवर सत्तासोबत केली, तो भाजप आता त्यांच्यासाठी शत्रू नंबर एक बनलेला आहे. त्यामुळे काहीही करून भाजपचा पराभव होण्याइतका आनंद सध्या शिवसेना आणि त्यांच्या नेत्यांपेक्षा अन्य कुठल्याही नसेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ ची लोकसभा निवडणूक लढवताना काँग्रेसमुक्त भारताचा नारा दिला होता. लोक अगोदरच्या केंद्रातील काँग्रेसप्रणित युपीएच्या सरकारला कंटाळले होते. त्या सरकारला दहा वर्षे होत आली होती. त्यांचे प्रमुख नेते आणि पंतप्रधान मनमोहन सिंग यांचेही वय झाले होते. राहुल गांधी यांचा फारसा प्रभाव पडत नव्हता. अशा स्थितीत जनतेलाही नव्या दमाचा नेता हवा होता, त्यात मोदी हे गुजरातचे विकास पुरुष म्हणून नावारुपाला आलेले होते. त्यामुळे त्यांना राष्ट्रीय पातळीवर संधी दिल्यास ते भारताचे विकास पुरुष बनतील ही आशा लोकांना होती. त्यांनी मोदींना बहुमत दिले. त्यामुळे भाजप बहुमताने सत्तेवर आला.

देशभरात नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपला मोठ्या प्रमाणात फटका बसल्याचे दिसले, त्यामुळेच केंद्रातील मोदी सरकारने सावध पवित्रा घेतलेला दिसतो. देशभरात पेट्रोल आणि डिझेल यांचे सतत वाढत जाणारे दर काही प्रमाणात कमी करण्यात आले. पोटनिवडणुकांमध्ये लोकांच्या मनातील मोदी सरकारविषयी जी नाराजी आहे, त्याचेच पडसाद पडल्याचे दिसले. मोदींचा केंद्रातील दुसरा कार्यकाल पूर्ण व्हायला अजून तीन वर्षे बाकी आहेत, पण मोदींच्या करिष्म्याला धक्के बसू लागले आहेत, हेच या पोटनिवडणुकांनी सुचित केले. त्यामुळे विशेषत: शिवसेनेला जास्त आनंद झालेला आहे. कारण त्यांना तिसर्‍या आघाडीच्या माध्यमातून केंद्रात सरकार आणायचे आहे. त्यासाठी त्यांनी देशातील प्रादेशिक पक्षांची जमवाजमव सुरू केलेली आहे. राष्ट्रीय पातळीवर आपला विस्तार व्हावा यासाठी शिवसेनेने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असल्यापासून प्रयत्न चालविलेले होते, पण इतर राज्यांमध्ये आपले पाय रोवणे त्यांना शक्य झाले नाही, उलट, तिथे उभे करण्यात आलेल्या उमेदवारांची डिपॉझिट्स जप्त झाली. आम्ही हिंदुत्ववादी आहोत. महाराष्ट्रात आम्ही मराठी आहोत, गुजरातेत गुजराती आहोत, कर्नाटकमध्ये कानडी आहोत, असे सर्व राज्यांमध्ये आहोत, अशी व्यापक भूमिका मांडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अन्य राज्यांमध्ये शिवसेनेचा विस्तार करण्याचा प्रयत्न केला.

त्या राज्यांमधील जे भूमीपुत्रांचे प्रादेशिक प्रश्न आहेत, ते आम्ही हाताळू असे सांगितले. पण शिवसेना हा जसा महाराष्ट्रातला भूमीपुत्रांचा पक्ष आहे. तसेच अन्य राज्यांमध्येही भूमीपुत्रांच्या समस्या मांडणारे पक्ष आहेत. त्यामुळे शिवसेनेला तिथे जागा मिळणे शक्य नव्हते. तरीही शिवसेनेने आपले प्रयत्न काही सोडले नाहीत. जेव्हा महाराष्ट्रात शिवसेनेचा मित्रपक्ष असलेल्या भाजपशी सत्तेवरून तेढ निर्माण झाली तेव्हा शिवसेनेने अन्य राज्यांमध्ये भाजपच्या उमेदवारांच्या विरोधात आपले उमेदवार उभे करुन शक्य होतील, तितकी भाजपची मते फोडण्यात समाधान मानले. महाराष्ट्रात भाजपसोबत त्यांची जी तेढ निर्माण झाली त्याचा विस्तार देशभर झाला आहे. शिवसेना पूर्णपणे मोदी सरकारच्या विरोधात गेलेली आहे. एकेकाळी काँग्रेसची कडवी विरोधक असलेली शिवसेना आता त्यांची खास मित्र झालेली आहे.

खरे तर काँग्रेस आणि शिवसेना यांच्या विचारसरणी भिन्न आहेत. महाराष्ट्रात शिवसेना असलेल्या महाविकास आघाडीत काँग्रेस सहभागी झाली, यामागे त्यांची असहायता आणि राजकीय गरज होती. कारण देशभरात मोदी लाटेपुढे काँग्रेसचा टिकाव लागत नसताना महाराष्ट्रात मोदींना शह देणे शक्य आहे, याच भावनेतून ते सत्तेत सहभागी झाले. पण आता काळ जसा पुढे सरकत आहे तसे शिवसेनेचे पक्षप्रमुख असलेल्या उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रीपदावरील बस्तान अधिक भक्कम होताना दिसत आहे. त्यामुळे काँग्रेसची अस्वस्थता वाढत आहे. शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांना शिवसेेना आणि प्रादेशिक पक्षांची सत्ता केंद्रात आणायची आहे. काँग्रेसलाही सोबत घ्यायचे आहे. जसा महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमत्री होणारच असा निर्धार त्यांनी केला होता, आणि तो निर्धार सातत्याने लावून धरून पूर्ण केला. कुणालाही कल्पना नसताना उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. उद्धव ठाकरे हे पंतप्रधानही होतील, असे अधून मधून राऊत म्हणत असतात.

पण अशा वेळी ते इतकी वर्षे पंतप्रधानपदावर आपली मोहोर उमटवण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शरद पवारांकडे आपण दुर्लक्ष करत आहोत, हे लक्षात घेत नाहीत. पण राऊत यांच्या या वक्तव्यावर मराठी माणूस पंतप्रधान झाला तर चांगलेच आहेत, असे बोलून पवार बाजू मारून नेत आहेत. हिंदुत्वाच्या आधारावर शिवसेना आणि भाजप महाराष्ट्रात एकत्र आले होते, पण पुढे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावरून त्यांच्यात मतभेद होऊन त्यांची अनेक वर्षांची युती तुटली. आता भाजपला सत्तेतून बाहेर ठेवून सत्ता मिळवण्यासाठी ठाकरे आणि पवार हे दोन मराठी एकत्र आले आहेत. उद्या पंतप्रधानपदावरून या दोन मराठींमध्ये मतभेद होणार नाहीत, याची खात्री कोण देणार ? आता दादरा नगर हवेलीमधील विजयानंतर शिवसेनेच्या पंखांमध्ये राष्ट्रीय पातळीवर उड्डाण घेण्यासाठी हवा भरली आहे. पण त्याच वेळी काँग्रेसचे राहुल गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी हे ज्यांच्या पक्षांच्या नावामध्ये काँग्रेस हा समान शब्द आहे, असे नेते पंतप्रधानपदासाठी उत्सुक आहेत, हे राऊतांना विसरून चालणार नाही. कारण शिवसेनेच्या पंखातील हवा कायम ठेवणे किंवा काढणे हे या तीन पक्षनेत्यांच्या हाती आहे. काँग्रेसला सध्या अध्यक्षच नसल्यामुळे तो पक्ष विस्कळीत झालेला आहे.

अध्यक्ष म्हणून आपल्याकडेच जबाबदारी राहील, असे सोनिया गांधी सांगत असल्या तरी पक्षाला अधिकृत अध्यक्ष नाही, त्यामुळे पक्षामध्ये गटबाजी फोफावून नुकसान होत आहे, याची कल्पना सोनिया गांधी यांना असली तरी, त्या सध्या हतबल आहेत. कारण राहुल गांधी पक्षाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारायला तयार नाहीत. पक्षातील जुने जाणते नेते याविषयी सोनिया गांधी यांना कळकळीने सूचना करत आहेत, पण त्या बुजुर्गांना गप्प बसवले जात आहे. महाराष्ट्रात शिवसेना असलेल्या सत्तेत सहभागी होऊन हळूहळू आपला प्रभाव वाढवता येईल, असे काँग्रेसला वाटत होते, पण तसे होताना दिसत नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी शिवसेनेला मुख्यमंत्रीपद दिले खरे पण आता त्यांना महाराष्ट्रात शिवसेनेच्या पालखीचे भोई व्हावे लागले आहे. शिवसेनेची सत्तेवरील मांड पक्की होताना दिसत आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीने केंद्रातून नरेंद्र मोदींना दूर करण्यासाठी राज्याप्रमाणे केंद्रातही पालखीचे भोई होऊन केंद्रीय सत्तेची सूत्रेही आपल्या पक्षनेतृत्वाच्या हाती द्यावी, असेच शिवसेनेला दादरा नगर हवेलीच्या विजयानंतर वाटू लागले आहे.