घरCORONA UPDATEशिवसेनेच्या एका नेत्याचे भाजपला प्रश्न... वाचाल तर कळेल...!

शिवसेनेच्या एका नेत्याचे भाजपला प्रश्न… वाचाल तर कळेल…!

Subscribe

महाराष्ट्राच्या जनतेला हवी आहेत या प्रश्नांची उत्तरं!! सध्या माध्यमांवर माजी मुख्यमंत्री आणि एकूणच भाजपा, ज्या पद्धतीने महाराष्ट्र सरकारवर आणि आदरणीय मुख्यमंत्री श्री. उध्दवजींवर तुटून पडत आहे, ते पाहता महाराष्ट्राची जनता भाजपाला खालील प्रश्न विचारत आहे:

१) देशात कोरोनाचे सर्वाधिक संकट महाराष्ट्रावर असताना भाजपाच्या आमदार खासदारांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री सहायता निधी वा कोरोनाच्या लढ्यात महाराष्ट्रासाठी उभारलेल्या निधीमध्ये आपले वेतन जमा केले नाही. उलट या सर्वांनी त्यांचे वेतन पंतप्रधान निधीमध्ये भरणा केले आहे. तसेच खासदार विकास निधी देखील महाराष्ट्रातील भाजपाच्या खासदारांनी केंद्रसरकारकडे वर्ग केला. (अर्थात नंतर केंद्र सरकारने सर्वच खासदारांचा विकास निधी दोन वर्षांकरिता रद्द करून केंद्राच्या तिजोरीत जमा केला.) त्यामुळे महाराष्ट्राचे ७०० कोटींचे नुकसान झाले. कारण हा निधी सर्व खासदारांना विकास कामांसाठी त्यांच्या त्यांच्या मतदार संघात म्हणजे पर्यायाने महाराष्ट्रात वापरता आला असता. खासकरून कोरोनावर इलाज करताना लागणाऱ्या उपकरण, साहित्य खरेदीसाठी वापरता आला असता. याचे भाजपाला ना सोयर ना सुतक!!
या उपर महाराष्ट्रातील भाजपाने निधी संकलनासाठी जे आवाहन केले त्यामधे ही महाराष्ट्र सरकारच्या निधीचा उल्लेख जाणीवपूर्वक टाळून पीएम केअर्स फंड मध्येच मदत करण्याची विनंती केली. हीच का तुमची महाराष्ट्राबद्दलची कळकळ?

- Advertisement -

२) महाराष्ट्राच्या माननीय राज्यपालांचे वेतन, सर्व सोयी सवलती महाराष्ट्र सरकार देते. त्यांनीही आपले वेतन पंतप्रधान सहायता ( PM Cares Fund) निधीमधे जमा केले. महाराष्ट्र सर्वाधिक पीडित असताना माननीय राज्यपाल स्वत:चे वेतन जेव्हा केंद्राकडे दान करतात तेव्हा त्यांना प्रश्न आहे की PM Cares मग CM Care करीत नाहीत का? हीच का तुमची महाराष्ट्राबद्दलची बांधिलकी? महाराष्ट्राच्या इतिहासात महाराष्ट्राबद्दल ममत्व नसणारे हे पहिले राज्यपाल.
काल परावाकडे आपण साऱ्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती अतिशय श्रद्धेने, आदराने, एका शिस्तीने घरात राहून, एक दिवा संविधानाचा, मानवतेचा लावून मनोभावे साजरी केली. त्यांनी देशाला सादर केलेल्या संविधानाचा/घटनेचा घोर अपमान माननीय राज्यपाल करीत आहेत. भाजपा म्हणजे हीन पातळीचे राजकारण पण आता राज्यपाल हेही पूर्णवेळ राजकारणीच!!

३) सहकार्य शून्य पण रोज महाराष्ट्र सरकारवर टीका करण्याचे क्षुद्र राजकारण करणे हाच भाजपाचा सध्या उद्योग सुरु आहे, हे आम्हा सर्वसामान्य माणसांच्या ध्यानी येत नाही असे आपण समजता का?

- Advertisement -

४) काल परवाकडे वाधवा नावाचे बिल्डर लॉकडाऊन असताना देखील महाबळेश्वरला गेले. सदर बाब ध्यानात येताच महाराष्ट्र सरकारने वाधवाना बंदिस्त करून CBIला कळविले आणि ज्या अधिकाऱ्याने ही परवानगी दिली त्याला सक्तीच्या रजेवर पाठवून त्याची अतिरिक्त मुख्य सचिवांमार्फत चौकशी लावली.
पण गप्प बसतील ते भाजपावाले कसे? खुसपटे काढून हा विषय रंगवण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला. खरे तर IPS अधिकाऱ्यांवर राज्य सरकारला यापेक्षा अधिक कारवाई करता येत नाही. त्यावर केंद्राने कारवाई करायची असते. आता केंद्र मूग गिळून गप्प आहे. कारण समजेल का? या अधिकाऱ्याची नेमणूक मागच्याच सरकारने म्हणजे माजी मुख्यमंत्र्यांनीच केली होती. एवढा वाधवाचा विषय महत्वाचा वाटतो तर माल्ल्या, मोदी कसे पळाले हे देखील सांगा.

५) कोरोना ही जागतिक आपत्ती, ती काही इथली उत्पत्ती नाही. केंद्र सरकारकडे ज्या देशांमधून कोरोना बाधित येऊ शकतो, त्या देशांची यादी होती आणि मुंबई विमानतळावर केंद्र सरकारने दिलेल्या सर्व देशांमधील प्रवाशांचे स्क्रीनिंग करण्यात येत होते असे म्हणतात. परंतु ही यादी समग्र नव्हती हे आता कालांतराने सिद्ध झालेले आहे. मग मध्यप्रदेशात सत्ता स्थापन करणे, नमस्ते ट्रम्प ह्यासारख्या गोष्टींना प्राधान्य न देता कोरोनाच्या संकटाकडे वेळीच लक्ष दिले असते, आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीवर लवकर निर्बंध आणले असते तर कदाचित कोरोनाचा प्रादुर्भाव आजच्या इतका झालाच नसता. तुमच्या प्राधान्यक्रमात कालही राजकारण होते आणि आजही केवळ राजकारणच दिसत आहे, हे जनतेला कळत नाही असे आपणास म्हणायचे आहे का?

६) दिल्ली येथे झालेल्या एका कार्यक्रमात तब्बल ९००० लोक कुठल्याही सोशल डिस्टेन्स (समाजांतर), मास्क (नासिकामुख आवरण), सॅनिटायझेशन (निर्जंतुकीकरण) इ. चा अवलंब न करता समाजामध्ये मिसळले, ते देशातील विविध राज्यात गेले आणि कोरोनाचा धोका कैक पटींनी वाढला. मुख्य प्रश्न हा आहे की, या कार्यक्रमाला दिल्ली राज्य सरकारने नव्हे तर केंद्र सरकारच्या गृह खात्याने या धोक्याच्या काळात कशी परवानगी दिली? (दिल्लीचे पोलीस खाते केंद्र सरकारच्या अधिकारात येते) योग्य ती काळजी का घेतली नाही? या कार्यक्रमात सहभागी असलेल्या काही लोकांचा तपास लागत नसल्याबद्दल अहोरात्र टीका करणारे महाराष्ट्रातील भाजपाचे नेते केंद्रीय गृहमंत्री श्री. अमित शाह यांना तोंड उघडून जाब विचारण्याची हिंमत का करत नाहीत?

७) भाजपाच्या आयटी सेलचे पदाधिकारी अफवा पसरवण्यामध्ये आघाडीवर! राज्याचीच नव्हे तर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची तुलना अन्य राज्यांशी करून आपल्याच राज्याची अब्रू वेशीवर टांगताना त्यांना हेही भान राहत नाही की मुंबईची प्रचंड लोकसंख्या, दाटीवाटीच्या वस्त्या, त्यांच्याच कृपेने दिल्लीतून एका धार्मिक कार्यक्रमातून या दाटीवाटीच्या वस्तीत आलेली मंडळी या सर्वाचे परिणाम महाराष्ट्र भोगत आहे आणि ज्या राज्याची तुलना करता त्या राज्यात किती आंतरराष्ट्रीय विमानतळं आहेत आणि परदेशातून किती माणसे त्यांच्या राज्यात आली याचीही माहिती द्या म्हणजे सत्य जनतेला समजेल.

८) पंतप्रधान सहाय्यता निधी असताना देखील पीएम केअर्स फंडाची निर्मिती केली आणि सी एस आर फंड त्या फंडामध्ये जमा करण्याची अनुमती देऊन आयकर कायद्याच्या (इन्कम टॅक्स) कलम 80जी ची सवलतही घोषित केली. मग हाच न्याय राज्याच्या ‘मुख्यमंत्री covid 19’ या सहायता निधीस का लागू केला नाही? आहे का याचे उत्तर? राष्ट्रभक्तीचा आव आणून केंद्रात निधी दिला म्हणजे काही दुसऱ्या राष्ट्राला दिला का? पंतप्रधान हे देशाचे आहेत त्यामुळे तिथे निधी दिला म्हणजे गुन्हा नाही केला. त्यातून राज्याला पैसे मिळणार. काय हा शहाजोगपणा!!! केंद्रात अन्य पक्षाचे सरकार असते आणि त्यांनी PM Cares फंड घोषित केला असता तर आपल्या पक्षाच्या आमदार खासदारांनी कुठे निधी दिला असता हेही जनतेला कळले तर बरे होईल.

वा वा भक्तांनो, भ्रष्ट बुद्धिवंतांनो!!! कोण म्हणतो गुन्हा केला, अरे पाप केले पाप , बर… स्वतःचे घर जळत असताना बंब दिल्लीला पाठवला, तेथून तो पाणी घेऊन येणार आणि येथील आग विझवणार… हा हा हा… आणि पुन्हा आम्ही आग विझवली म्हणून शंखनाद करणार!! आमचेच पाणी व्हाया दिल्ली आमच्याकडे! एवढी जनता दूधखुळी समजता का रे? अशा भयंकर अवस्थेत राज्याची कोंडी करण्याचा हा तुमचा सत्तापिपासू प्रयत्न तुम्हाला लखलाभ होवो!! टाळूवरचे लोणी खाणे तुमच्या संस्कृतीत बसते. सत्ता हेच तुमचे साध्य आणि साधनही…..म्हणूनच कोरोना घुसला असतानाही करोडो जनतेचे जीव धोक्यात घालून अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची भलामण करण्यात, मध्यप्रदेशची सत्ता काबीज करण्यात तुम्ही मशगुल राहिलात……खरे तर तुमचे हे वागणे संघराज्याच्या अधिष्ठानाला धोका निर्माण करणारे आहे म्हणूनच ते निंदनीय, अश्लाघ्य आणि धिक्कारार्ह आहे.

खरे तर आज सर्व राज्ये पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली कोरोनाविरोधात एकत्रितपणे लढत असताना केंद्रातील तुमच्याच सरकारकडून अधिक सहकार्य कसे लाभेल यासाठी प्रयत्न न करता रोज टीकेची राळ उठवून भाजपा क्षुद्र राजकारण करत आहे. अर्थात याला वरिष्ठ नेत्यांची मूक संमती आहे हे तर स्पष्टच दिसत आहे. पण महाराष्ट्रातील भाजपाची सत्ता नसल्यामुळे आलेले वैफल्य ठळकपणे जनतेच्या लक्षात येत आहे.

भाजपाच्या समस्त नेत्यांनो आणि भक्तांनो महाराष्ट्राच्या जनतेला वरील प्रश्नांची उत्तरे द्या, अर्थात तुम्ही ती देणार नाहीत याची आम्हाला खात्री आहे. तोपर्यंत निदान सल्ले आणि टीका बंद करा. आम्ही तुम्हाला पुरते ओळखले आहे.
खरे सांगू, आम्हाला तुमची आता कीव येते…!


लेखक शिवसेनेचे मुंबईतील नेते आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -