‘रोखठोक’कारांचा फुसका बार !

संपादकीय

महाराष्ट्रातील प्रसारमाध्यमांनी मंगळवारी कोणतंही काम न करता फक्त शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद कव्हर करावी असंच वातावरण दिसून येत होतं. या बहुचर्चित पत्रकार परिषदेसाठी संजय राऊत यांच्यासारख्या दरबारी नेत्याची एंट्रीदेखील एखाद्या लोकनेत्यासारखी झाली होती. राऊत ज्या नाशिकचे कारभारी आहेत तिथून इच्छुकांची मोठी गर्दी नाशिक ते मुंबईच्या मार्गावर करण्यात आली होती. शिवसेनेच्या आमदार, खासदार आणि पदाधिकार्‍यांना आवताण धाडण्यात आलं होतं. संजय राऊत यांची पत्रकार परिषद ही ‘राऊतांची’ आहे असा समज झाल्यास त्याकडे गांभीर्याने पाहिलं जाणार नाही, यामुळे ती ‘शिवसेनेची’ आहे असं भासवण्याचा प्रयत्न ‘इव्हेंट मॅनेजमेंट’ जपणार्‍या रोखठोककारांनी नीट केला होता. त्यासाठी ‘इव्हेंट मॅनेज’ करणार्‍या कंपन्यांकडून टी-शर्ट परिधान करून काही तरुणांचे गटही शिवसैनिकांच्या गर्दीतून फिरताना दिसत होते.

पत्रकार परिषदेच्या आधी दोन तास वृत्तवाहिन्यांचे कॅमेरे शिवसेना भवनातील सभागृहात लावण्यात आले होते. सध्या ज्या ‘सोशल मीडिया’चा जमाना आहे त्यावरून जोरदार माहौल बनवला होता. अशी पत्रकार परिषद प्रत्यक्षात सुरू होताच माध्यमांचे प्रतिनिधी आणि उपस्थित नेत्यांमध्येही ‘फुस्स’ हीच भावना ऐकायला आली. या पत्रकार परिषदेत काहीच दम नव्हता म्हणण्यापेक्षा तो एक फुसका बार होता. ऑक्टोबर 2019 पासून संजय राऊत यांच्या रोज सकाळी जो पत्रकार परिषदांचा सिलसिला सुरू झाला तो आजतागायत कायम आहे. संजय राऊत रोज सकाळी नित्यनेमाने वाहिन्यांच्या प्रतिनिधींना सामोरे जातात. त्यामुळे आधीच आपलं वक्तृत्व मूल्य उतरणीला लावून बसलेले राऊत खरंच कसदार बोलणार की त्यांचा बार फुसका ठरणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. त्याहीपेक्षा अनिल देशमुख बाहेर येतील आणि त्यांच्या कोठडीत भाजपचे साडेतीन नेते असतील, असं राऊत यांनी म्हटलं होतं. त्याचाच गौप्यस्फोट करण्यासाठी मुख्यत: ही पत्रकार परिषद घेण्यात आली होती.

राऊतांच्या ‘बाईटांची’ नित्यनेमाने शेती करणार्‍या वाहिन्यांमधल्या शेतकर्‍यांनी अशी काही पिकं घेतली होती, जणू काही आंतरराष्ट्रीय पातळीवरचं संपूर्ण माध्यमविश्व राऊत काय बोलतात याकडेच डोळे लावून बसलेलं होतं. गेली दोन वर्षं दररोज वाहिन्यांच्या कॅमेरासमोर ‘बाईट’ देण्याचा सराव असलेले राऊत मात्र त्यांच्यादृष्टीनं असलेल्या ‘फायनल’ साठी अत्यंत सुमार दर्जाच्या तंत्राने खेळत होते. संपूर्ण पत्रकार परिषद राऊत त्यांच्या उजव्या बाजूला बसलेल्या सेना नेत्यांकडे बघून बोलत होते. पत्रकार परिषदेच्या मधेच राऊतांनी कॅमेर्‍याकडे बघून बोलावं याच्यासाठी कल्ला केला. तेव्हाही ‘गिरे तो भी टांग उपर’ अशा आविर्भावात राऊत वाहिन्यांच्या आणि न्यूजपोर्टलच्या प्रतिनिधींना ‘मी सेंटरलाच आहे’, ‘मीच सेंटर आहे’ असं सुनावत होते. शिवसेना भवनाच्या परिसरात ‘राऊत साहेब आगे बढो’च्या घोषणा देणार्‍या कार्यकर्त्यांच्या गर्दीतून वाटत काढत पत्रकार परिषदेत पोचलेले राऊत, ‘झुकेंगे नही’ असं म्हणत किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला करण्यासाठी सरसावलेले राऊत मूल्यवर्धित मुद्यांच्या बाबतीत मात्र कमी पडले.

राज्यसभा सदस्य असलेल्या संजय राऊत यांनी जे मुद्दे उपस्थित केले त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा धमाका नव्हता, जे काही होतं ती निव्वळ शोभेची दारूच. ज्या साडेतीन नेत्यांबद्दल राऊतांनी वातावरण निर्मिती केली होती त्यांच्याबद्दलही ते काही बोलत नाहीत हे लक्षात येताच माध्यम प्रतिनिधींनी त्यावर त्यांना बोलतं करण्याचा प्रयत्न केला. त्याआधीच ‘प्रश्नोत्तर नाही’ असं सांगून पत्रकारांना गप्प करण्याचा प्रयत्नही राऊत यांनी केला. त्यांचा हा प्रयत्न म्हणजे त्यांच्या पोतडीत असलेली धमाक्याची दारू किती शोभेची आहे हे अधोरेखित करणारा होता. संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांवर जो बहुचर्चित हल्ला केला त्यामुळे त्यांना साधा ओरखडा पडला नाही. तुरुंगाच्या वाटेवर असलेल्या भाजपच्या साडेतीन नेत्यांची नाव सांगण्यासाठी उद्यापासून भेटूया असं सांगणार्‍या राऊत यांची देहबोली प्रचंड मोठं उसनं अवसान आणणारी दिसली.

सोमय्या यांनी शिवसेनेच्या ज्यांना जेरीस आणलंय ते प्रवक्ते आमदार प्रताप सरनाईक, खासदार भावना गवळी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चाणक्य अनिल परब आणि माजी मंत्री आणि जालन्याचे शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्यापैकी कोणीही या पत्रकार परिषदेच्या आजूबाजूला फिरकला नाही. ज्या बांधकाम व्यावसायिकाच्या बरोबरीच्या भागीदारीबद्दल राऊत यांनी जे सांगितलं तो वादग्रस्त, भ्रष्टाचारी राकेश वाधवान सर्वपक्षीय नेत्यांचा मित्र आहे. किरीट सोमय्या यांचा भांडाफोड करण्यासाठी घेतलेली रोखठोककरांची पत्रकार परिषद मोहित कंबोजच्या दिशेने सरकली. कंबोज म्हणजे एक उचापतखोर गृहस्थ आहे. राऊतांचा हा निरस ‘सामना’ म्हणजे बहुचर्चित कसोटी मालिकेतला वांझोटा खेळ ठरला. ईडीच्या मंडळींनाही या पत्रकार परिषदेने हादरे बसतील, असे ते म्हणाले. खरं तर याला खूपच वेगळं धाडस लागतं. जे राऊतांकडे ओतप्रोत भरलेले आहे.

प्रत्येक नकारात्मक गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीनंही पाहायला हवं. त्या नियमाप्रमाणे ‘संजय उवाच’ या नाटकाकडे तळाच्या शिवसैनिकाला महापालिका निवडणुकांच्या आधी मिळालेला ‘बूस्टर’ असं म्हणून पाहिलं तर मात्र सामनाकारांचा हा कार्यक्रम कारणी लागला असं म्हणायला हरकत नाही. निवडणुकीआधी या सगळ्या शैथिल्य आलेल्या शिवसैनिकांना राऊत यांच्या कार्यक्रमामुळे बूस्टर मिळाला. ज्या सेनेच्या नेत्यावर शेकडो कोटींचे भ्रष्टाचाराचे आरोप किरीट सोमय्या यांनी केले आहेत, त्यांच्यापेक्षा शिवसेना भवनाच्या परिसरात जमलेल्या सामान्य कार्यकर्त्यांवरच गेली 50 वर्षं शिवसेनेची भिस्त आहे. जुनी जीर्ण झालेली प्रकरणं समोर आणत संजय राऊतांसारखे शोभेची दारू उडवणारे फुसके बार या शिवसैनिकांना पुन्हा एकवार कामाला लावू शकले हे नाकारून चालणार नाही.

राऊतांच्या ‘विजयी करा’च्या आणि ‘आगे बढो’च्या घोषणा होणार्‍या या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांची कोअर टीम आणि शिवसेनेचा ताबा घेण्यासाठी आसुसलेली युवासेना चार हात लांब राहिली होती. आदित्य ठाकरे यांच्या मर्जीतील नेत्यांना आणि शिवसैनिकांना सेनेत सध्या महत्व मिळत आहे, अशा दिवसात आपण ठाकरेंसाठी आणि महाविकास आघाडी सरकारसाठी राबत असून भाजप आपल्याला सुळावर चढवत आहे, असं वातावरण तयार करण्याची राऊत यांची धडपड सोडली तर बाकी सगळा खेळ म्हणजे अनिर्णीत सामनाच होता. राऊत यांनी जम्बो पत्रकार परिषदेच्या रुपाने जंगी ‘सामना’ आयोजित केला होता, त्यात ‘रोखठोक’पणाचा मोठा आव आणण्यात होता, तरी त्यातील यशस्वीतेच्या ‘सच्चाई’चा शोध घ्यावा लागेल.