कोकणात विमान आले, पुढे काय ?

कोकणात चिपी विमानतळावरून नुकतीच विमानसेवा सुरू झाली. यामुळे कोकणी माणसाच्या पंखात मोठे बळ आले आहे. विमानसेवेमुळे इथल्या विकासाला गती मिळेल, इथले रस्ते चांगले होतील, इथल्या व्यापार उद्योगाला चालना मिळेल, रोजगार निर्माण होतील, असे वाटू लागले आहे. कोकणात रेल्वे आल्यावरही असेच वाटले होते; पण इतक्या वर्षांनंतरही तसा फार फरक पडलेला दिसत नाही. कारण विकासासाठी सहकाराची कास धरावी लागते, ती वृत्ती अजून कोकणी माणसात आलेली नाही. ती आल्याशिवाय विकासाचे काही खरे नाही. कोकणात मोठ्या संख्येने येणार्‍या परप्रांतीयांच्या नावाने केवळ बोटे मोडण्यात अर्थ नाही. अर्थनिर्मिती होण्यासाठी त्यांच्याकडून बरेच काही शिकण्याची गरज आहे.

कोकणात सिंधुदुर्ग जिल्हातील चिपी विमानतळाचे ९ ऑक्टोबरला उद्घाटन झाले. कोकणात अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर विमानसेवा सुरू झाली. १९९९ साली नारायण राणे हे राज्याचे मुख्यमंत्री असताना या विमानतळाचे भूमीपूजन करण्यात आले होते; पण आता इतक्या वर्षांनंतर या विमानतळावरून विमानसेवा सुरू झाली आहे. अनेक अडथळे पार करून ही सेवा सुरू झाली आहे. आता ही सेवा अशीच अखंड सुरू रहावी हिच कोकणी माणसांची इच्छा आहे. कोकण रेल्वेचा इतिहासही असाच आहे. कोकण रेल्वे प्रत्यक्ष सुरू होण्यापूर्वी पन्नास वर्षांपासून तिची मागणी करण्यात आली होती. पण कोकणातील भूप्रदेश हा दर्‍याखोर्‍यांनी, डोंगरांनी, नद्यांनी व्यापलेला असल्यामुळे रेल्वे मार्ग कसा तयार करायचा असे मोठे आव्हान सरकार आणि अभियंत्यांसमोर होते. त्याला मोठा खर्च येणार होता. त्यामुळे कोकण रेल्वे कधी येणार याची प्रतीक्षा कोकणी लोकांना लागलेली होती. ती शेवटी पूर्ण झाली. कोकणी माणूस रेल्वेतून कोकणात जाऊ लागला.

अर्थात, ही कोकण रेल्वे होण्यामागे ई. श्रीधरन या कल्पक अभियंत्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी अतिशय चिकाटीने हा प्रकल्प मार्गी लावला. कारण जशी कोकणाची भूमी मार्ग बनवायला अवघड आहे, तशीच कोकणी माणसांची मने वळवणे तितकेच अवघड आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी प्रचंड चिकाटी आणि पाठपुरावा करावा लागतो. सध्या कोकणात रस्त्यांचे जे चौपदीकरण सुरू आहे, त्यासाठी जागा मिळवताना सरकारी यंत्रणांच्या नाकी नऊ येत आहेत, असे केंद्रीय महामार्ग विकास मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. कोकणात रेल्वे आल्यावर कोकणाचा झपाट्याने विकास होईल, कोकणच्या पर्यावरणाला पूरक असे उद्योग इथे उभे राहतील, ज्यामुळे निसर्गाच्या संपन्नतेला हानी पोहोचणार नाही, असे वाटत होते. पण कोकण रेल्वे सुरू होऊन इतकी वर्षे झाली तरी अजूनही ज्या प्रमाणात कोकणी माणसांचा आणि कोकण भूमीचा विकास व्हायला हवा होता तो झालेला नाही. कारण अजूनही रेल्वेतून लोक मोठ्या प्रमाणात नोकर्‍यांसाठी मुंबईलाच येताना दिसत आहेत. गणपती, शिमगा, आणि मे महिन्यांतील काही दिवस चाकरमानी रेल्वेतून आपल्या मूळ गावी जातात. वर्षाच्या इतर दिवशी कोकणातील बरीच घरे बंद असतात.

कुठल्याही प्रदेशात वाहतुकीची साधने आली की, त्या भागाचा विकास होतो असा अनुभव जगभर आहे. कारण त्या भागात नवे उद्योग-धंदे येतात, स्थानिक कौशल्याला वाव मिळतो, त्यामुळे स्थानिक वस्तू सहजतेने अन्य भागात पाठवता येतात, तिथल्या लोकांना पैसे मिळतात. त्यांचे राहणीमान उंचावते. कोकणात रेल्वे सुरू झाल्यापासून स्थानिक लोकांनी थोडीफार हालचाल केली; पण ती काही समाधानकारक नाही. उलट, त्याच रेल्वेचा फायदा घेऊन अगदी केरळ, राजस्थान, उत्तर प्रदेश, गुजरातपासूनचे लोक कोकणात गेले. त्यांनी तिथे सुरुवातीला छोटेछोटे उद्योग सुरू केले. कोकणी माणसाला आपला ग्राहक बनवले. इतकेच नव्हे तर या मंडळींनी आपला बर्‍यापैकी जम बसल्यावर तिथे जमिनी विकत घेतल्या आणि घरे बांधली. आपल्या लाल मातीत काही होत नाही, कोकण सोडून बाहेर गेल्याशिवाय नशीब काढता येत नाही, असे कोकणी माणूस म्हणत राहिला. मुलगा कशीबशी चार पुस्तके शिकला की, देवाला नारळ ठेवून गार्‍हाणे घालून हा मुंबईला जात आहे, याला नोकरी मिळू दे, असे म्हणून मुंबईला रेल्वेतून पाठवणी करू लागला.

तर त्याच वेळी परप्रांतातील लोक याच रेल्वेतून कोकणात जाऊन आपले उद्योगधंदे सुरू करत होते. याच मंडळींनी कोकणात आता चांगलाच जम बसवलेला आहे. त्यांनी कोकणी माणसाला आपले ग्राहक बनवले आहे. आपल्यावर अवलंबून रहायला लावले आहे. त्याच वेळी कोकणी माणूस आता परप्रांतीयांची दादागिरी सुरू झाली आहे, ती आपण मोडून काढली पाहिजे, असा आक्रमक सूर लावताना दिसत आहे. कोकणातील बहुतेक स्थानिकांचे शेती करण्याचे प्रमाण आता कमी झाले आहे. कारण आता शेतीकामासाठी एकतर माणसे मिळत नाहीत आणि मिळाली तरी त्यांची मजुरी खूप जास्त असते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जमिनी पडिक आहेत. आता याच जमिनींवर परप्रांतीय कब्जा करत आहेत. त्या जमिनी ते विकत घेत आहेत, एका बाजूला राजकीय नेते कोकणी माणसाला बाहेरच्यांना जमिनी विकू नका, असे सांगत आहेत. पण त्याचवेळी बाहेरच्या लोकांना कोकणात खुली सूट देत आहेत. शेवटी पैसा बोलतो, याच न्यायाने कोकणातील लोकही बाहेरच्या लोकांना जमिनी विकत आहेत.

जसा जुन्या मुंबईतील मराठी माणूस गुजराती, मारवाड्यांना आपली घरे विकून कल्याण, डोंबिवली आणि विरारकडे रहायला गेला, तशीच परिस्थिती अनेक कोकणी लोकांची झालेली आहे. त्यामुळे फक्त गणपती, शिमग्याला मूळ गावी जाणार्‍या कोकणी माणसाची अवस्था ‘स्वत:च्या घरी दूरचा पाहुणा मी,’ अशी मूळचे कोकणातील असलेल्या विंदा करंदीकर यांच्या कवितेसारखी झालेली आहे. पुण्या-मुंबईत राहणारा मूळ कोकणी माणूस स्वत:च्या घरी दूरचा पाहुणा झालेला आहे आणि परप्रांतातून आलेली मंडळी आता हळूहळू त्याची जमीन-जागा ताब्यात घेत आहेत. आपले उद्योगधंदे वाढवत आहेत. आपल्या देशात कुणीही कुठेही जाऊन नोकरी-धंदा करू शकतो, आपल्या राज्यघटनेने भारतीय नागरिकांना तसे स्वातंत्र्य दिलेले आहे, त्यामुळे कोकणात परराज्यांमधील लोकांनी येऊन उद्योगधंदे उभे केले तर त्यात काही गैर नाही; पण हेच होत असताना कोकणातील स्थानिकांनी मात्र केवळ बघ्याच्या भूमिकेत राहून चालणार नाही. बाहेरून येणारे लोक काही सुरुवातीला फार श्रीमंत नसतात; पण उद्योग करण्याची त्यांची वृत्ती असते.

त्यामुळे ते इथल्या साधनांचा उपयोग करून इथल्याच लोकांना आपला ग्राहक बनवून उद्योग उभे करतात, इथल्याच स्थानिकांच्या जीवावर ते वाढतात. पण त्यासाठी लागणारी दीर्घ मेहनत ते घेत असतात. उद्योग उभे करण्यासाठी लागणारे कौशल्य ते शिकून येतात आणि आपली दुकाने कोकणातील बाजारपेठांमध्ये थाटतात. कोकणी माणसाकडे जमिनी विकून पैसा येतो; पण तो पुन्हा भावकीत विभागला जातो. तो पैसा त्याच्याकडे काही काळ राहतो, पण तो स्वत: काही उलाढाल करत नसल्यामुळे तिथल्या परप्रांतीयांच्या उद्योगात त्याला गुंतवावा लागतो, म्हणजे त्याचा पैसा पुन्हा परप्रांतीयांकडे जातो. कुठलाही उद्योग करण्यासाठी काही गोष्टींची गरज असते, त्या म्हणजे दीर्घ मेहनत, पायाला भिंगरी, डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर तरच कुठलाही धंदा टिकू शकतो अणि वाढू शकतो. या गोष्टींचा कोकणी माणसाला अंगीकार करावा लागेल. पण असे करणे फारशा कोकणी माणसांना जमलेले नाही. त्यामुळे ते आपला उद्योग उभारण्याचा विचार करत नाहीत. काहीजण उत्साहाने सुरुवात करतात; पण ते आपले काम नाही म्हणून आपला धंदा चालवायला परप्रांतीयांना देतात, पण ते भाडे वसूल करायचाही कंटाळा येतो, मग तो धंदा आणि जागा दोन्हीही त्या परप्रांतीयाला विकून टाकतात. याच माध्यमातून कोकणात अनेक परप्रांतीयांनी आपला जम बसवलेला आहे.

कोकणाला निसर्गाचे मूलभूत वरदान लाभलेले आहे. समुद्र किनार्‍याला लागून असलेला हा भूभाग नारळी पोफळीच्या बागांनी सजलेला आहे. कोकणाने अनेक प्रतिभावंतांना भूरळ घातली. अनेकांना लिहिते केले.अनेक बुद्धिजीवी लोकांनी कोकणात जन्म घेतला. या बुद्धिजीवींनी जागतिक किर्ती मिळवली. पण त्यातील कटू वास्तव असे आहे की, त्यांना आपले नशीब काढण्यासाठी कोकण सोडावे लागले. त्यात पुन्हा असे जे किर्तीवंत झाले ते आयुष्यात पुढे पुढे जात राहिले, त्यांनी जागतिक पातळीवरील मानसन्मान मिळवला, पण त्यांनी आपल्या जन्मभूमीकडे फार अभावाने वळून पाहिले. आपल्या बुद्धिमत्तेचा आणि प्रभावाचा उपयोग आपली जन्मभूमी असलेल्या कोकणाच्या विकासासाठी करावा, आपल्या कल्पकतेचा उपयोग करून तिथल्या भूमीपुत्रांना तिथेच राहून उद्योगधंद्याच्या संधी उपलब्ध होतील, असे काही करावे, असे त्यांना वाटले नाही, हे कटू सत्य आहे. अर्थात, याला काही अपवाद आहेत; पण ते अगदीच तुरळक आहेत. त्यामुळे त्यांचा फारसा प्रभाव जाणवत नाही.

कोकणी माणूस सहनशील आणि अल्पसंतुष्ट असल्यामुळेच राजकीय पातळीवरून त्याच्याकडे फारसे लक्ष दिले जात नाही. आहे त्यात चालवण्याची कोकणी माणसाची वृत्ती असल्यामुळे कोकणात कुणी फारशी आत्महत्या करत नाही. कोकणाचा विकासनिधी बरेचदा इतर प्रांतांकडे वळवण्यात येतो. राज्याच्या इतर भागासाठी वैधानिक विकास मंडळे आहेत; पण कोकणवासियांची ती मागणी पडून आहे. कोकणी माणूस डोक्याने हुशार आहे, सहनशील आहे; पण त्याला असहकाराचा शाप आहे. एखादा उद्योग उभारायचा म्हटले की, त्याला काही माणसे एकत्र येऊन एकमेकांना सहकार्य करण्याची गरज असते. पण ती वृत्ती कोकणी माणसात दिसत नाही. त्यामुळे कोकणात सहकार कधीच रुजला नाही. त्यामुळे कोकणी माणसाचे उद्योग उभे राहिले नाहीत. महामँगो प्रकल्प, तसेच साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी कणकवली करूळ येथे उभारलेला काच कारखाना बंद पडला. कोकणात रेल्वे आल्यानंतर कोकणाच्या आणि तिथल्या कोकणी माणसाच्या विकासाला गती मिळेल असे वाटत होते, तसे फारसे झालेले दिसत नाही. आता कोकणात विमानसेवा सुरू झाली आहे. त्या विमानाच्या गतीप्रमाणे कोकणी माणसाच्या विकासाला गती मिळेल, अशी अपेक्षा आहे; पण त्यासाठी कोकणी माणसाला सहकाराची कास धरावी लागेल. एकमेकांची कास सोडण्याच्या वृत्तीला तिलांजली द्यावी लागेल. नाही तर विमानाचा फायदा बाहेरील लोक घेतील, आणि आपल्या विकासाच्या कल्पना हवेतच अधांतरी राहतील.