बंदुकीच्या टोकावर अमेरिकी तरुणाई !

अमेरिकेत गन लॉबी अत्यंत प्रभावशाली आहे. त्यांच्या वळचणीला अनेक राजकीय नेते आहेत. त्यामुळे बंदूक विरोधी कायदा प्रभावीपणे राबविताना अडचणी आहेत. असे सांगितले जाते की, गन लॉबी आणि रिपब्लिकन पक्षात आर्थिक सोटेलोटे असल्यामुळे सिनेटमध्ये कायदा मंजूर होण्यास अडथळा येत आहे.

संपादकीय

गेल्या आठवड्यात मंगळवारी अमेरिकेतील टेक्सासमध्ये एका माथेफिरू विद्यार्थ्याने १९ चिमुरड्या विद्यार्थ्यांसह दोन शिक्षकांना अवघ्या काही मिनिटांत बंदुकीच्या गोळ्या झाडून कायमचे संपवून टाकले. अमेरिकेत असे प्रकार अधून मधून घडत असल्यामुळे प्रसारमाध्यमांनी त्याची तेवढ्यापुरताच दखल घेतली. वास्तविक अमेरिकेसारख्या अतिप्रगत देशात जेव्हा काही घडते तेव्हा ती मोठी बातमीच ठरते असे नाही तर त्यावर व्यापक चर्चा होत असते. यावेळी तसे काही घडल्याचे जाणवले नाही. तरी पण वयात येत असलेले तरुण हातात बंदूक घेऊन समोरच्यांना कायमचे संपवून टाकणार असतील तर त्यापासून वयात येणारी पोरं स्फूर्ती घेणार नाहीत, याची काळजी घेतली पाहिजे. जगात अमेरिका हा अत्यंत प्रगत आणि शक्तीशाली देश समजला जातो. विज्ञानाच्या जोरावर या देशाने केलेली प्रगती थक्क करणारी आहे.

अशा देशात बंदुकीची दहशत असावी, हा प्रकार विचित्र वाटतो. एकाच देशातील नागरिक बंदुकीने एकमेकांना संपवत आहेत. टेक्सासमध्ये ज्याने भीषण हत्याकांड घडवून आणले तो अवघ्या १८ वर्षांचा तरुण आहे. वाढदिवसाला खेळण्यातील बंदूक विकत घ्यावी तशा त्याने दोन बंदुका विकत घेतल्या. बाहेर पडणारा नातू नेमक्या कोणत्या कामगिरीवर निघालाय हे माहीत नसलेल्या आजीने त्याला काहीतरी खावून जा असे सांगितले. यावर काही बोलण्याऐवजी या तरुणाने पहिली गोळी आजीवर झाडली. ती सुदैवाने यात बचावली आहे. त्यानंतर हा विकृत तरुण उबाल्डे येथील रॉब एलिमेंटरी शाळेत गेला आणि समोर येईल त्या विद्यार्थ्यावर गोळ्या झाडत राहिला. यात इयत्ता तिसरी आणि चौथीमधील १९ विद्यार्थी, दोन शिक्षक मृत्यू पावले. या घटनेची राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी गंभीर देखील घेतली असली तरी अमेरिकेतील बंदूकराज लवकर संपेल असे कुणीही छातीठोकपणे सांगणार नाही.

अमेरिकेत गन लॉबी अत्यंत प्रभावशाली आहे. त्यांच्या वळचणीला अनेक राजकीय नेते आहेत. त्यामुळे बंदूक विरोधी कायदा प्रभावीपणे राबविताना अडचणी आहेत. असे सांगितले जाते की, गन लॉबी आणि रिपब्लिकन पक्षात आर्थिक सोटेलोटे असल्यामुळे सिनेटमध्ये कायदा मंजूर होण्यास अडथळा येत आहे. अमेरिकेत ज्येष्ठ आणि इतर अशा जवळपास ६५ ते ७० टक्के लोकांकडे बंदुका आहेत. बाजारात जाऊन डास मारण्याचा फवारा विकत आणावा तशी तिकडे सहजपणे बंदूक उपलब्ध होत आहे. आपल्याकडील देशी कट्टा किंवा छर्र्‍याच्या बंदुकीप्रमाणे या बंदुका नाहीत तर आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित त्यांची निर्मिती केली आहे. अमेरिका हा लोकशाही प्रणालीवर चालणारा देश आहे. सुशिक्षितांचा देश आहे. तरीही कधीतरी बंदुकबाजीच्या घटना घडतात हे त्या देशाच्या प्रगतीचे लक्षण मानायचे की विकृती समजायची, असा सवाल टेक्सासच्या घटनेमुळे उपस्थित झाला आहे.

१९९४ मध्ये अमेरिकेत प्राणघातक शस्त्रांवर बंदी घालण्यात आल्यानंतर बंदुकीने होणार्‍या हत्यांमध्ये काही प्रमाणात घट झाली, मात्र बंदुकीची दहशत कायमची संपुष्टात आणणे तेथील प्रशासनाला जमले नाही. एका माहितीनुसार, सन २०१९ मध्ये अमेरिकेत गोळीबाराच्या तब्बल ४१७ घटना घडल्या होत्या. २०२० मध्ये ६११, तर २०२१ आणि २२ मध्ये मेपर्यंत अनुक्रमे ६९३ आणि २२७ घटना घडल्या आहेत. क्षणभर तेथील नागरिकांना बंदुकीची भाषाच समजते असे वाटावे तसा हा प्रकार आहे. कुटुंबात संस्कारांशी वाकडे असेल तर विकृतीशिवाय दुसरे काही निष्पन्न होणार नाही. आई-वडील पैशांचा मागे असल्याने मुलांकडे लक्ष देण्यास वेळ नाही. बहुतांश मुले मोबाईलवर देमार चित्रपट पाहतात आणि नको ते धाडस करण्यास तयार होतात. अमेरिका किंवा इतर पाश्चात्य देशात मुलांवर सुसंस्काराची बोंब असल्याचे अनेकदा बोलले गेले आहे. तेथील जीवन एका चाकोरीत अडकलेले असल्याने मुलांना आई-वडिलांकडून चांगले काही शिकवले जाईल, याची शक्यता तशी कमीच आहे.

अमेरिकेत गोळीबारात मृत्यू पावलेल्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. कोवळ्या वयातील मुलांना काही सेकंदात संपवून टाकण्याची विकृती नेमकी कशातून जन्माला आली, याचा उलगडा अनेक चमत्कारिक वैज्ञानिक शोध लावणार्‍या अमेरिकेला अद्याप झालेला नसेल असे मानणे धाडसाचे ठरेल. लहान मुलाच्या हातात सहजपणे बंदूक येत असेल तर हे असेच घडणार यात शंका नाही. १९७० पासून अमेरिकेतील शाळांतून गोळीबाराच्या जवळपास २०० च्या आसपास घटना घडलेल्या आहेत. विंचवाची नांगी विंचू मेल्यानंतरही वळवळत असेल तर ती ठेचावीच लागते, किंबहुना विंचू मारण्याआधी नांगी ठेचावी लागते. अमेरिकेत प्रभावी गन लॉबीमुळे प्रशासनाला ते जमलेले नाही. तेथे सहजपणे घडते ते जगात इतरत्र घडू नये याची काळजी घ्यावी लागेल. आपल्याकडे अधूनमधून मुलांच्या नको त्या धाडसाच्या घटना घडत असतात. आताची पिढी मोबाईलच्या आहारी गेलेली आहे. मुलं दिवस-रात्र मोबाईलमध्ये गुरफटून गेलेली आहेत. मध्यंतरी पब्जीसारख्या खेळाने मुलांना इतके वेड लावले की त्यात काहींना जीव गमवावा लागला. याच पब्जीचे नाव बदलून नवा अवतार आलेला आहे.

मुले तास न् तास त्यात गुंतलेली असतात. आई-वडील दोघेही कामावर बाहेर पडत असतील तर मुलांना ती पर्वणी असते. त्यामुळे मोबाईल हा त्या मुलांसाठी जीव की प्राण ठरलेला आहे. आपल्या देशाने विज्ञानाकडे चांगल्यापैकी झेप घेतली असल्याने नावाजलेली भारतीय संस्कृती बदलणार यात शंका नाही. भारतीय संस्कृतीचे पाश्चात्य आणि इतर देशांना अप्रूप वाटत असताना आपण आपल्या संस्कृतीकडे ‘ही काय नको ती भानगड’ या भावनेतून पाहत आहोत. एखाद्या घरात धार्मिक वातावरण असेल तर त्या घरातील कुटुंबाची खिल्ली उडवली जात आहे. धार्मिकतेकडे एका बाजूला ओढा वाढत असताना नसतं झंझट नको म्हणून धार्मिकतेकडे दुर्लक्ष करणार्‍यांची संख्याही वाढत आहे. धार्मिकपणा म्हणजे देव-देव करीत बसायचे नाही तर त्यातून चांगलं काही तरी शिकायचं असते, असे सांगायला कमीपणा वाटत आहे. त्यामुळे मुले, विशेषतः शहरी भागातील, नको त्या किंवा चुकीच्या बाबींकडे अधिक वळत असल्याचे सांगितले जाते. उद्या या मुलांच्या हाती सहजपणे बंदुका आल्या तर, हा सवाल आताच उपस्थित केला गेला पाहिजे. आपल्याकडे अमेरिकेसारखे किंवा पाश्चात्य देशासारखे काही घडणारच नाही, असे समजणे चुकीचे ठरेल. सुरुवातीला या गोष्टी साध्या वाटतात, पण अप्रिय काही घडले की पश्चातापाची वेळ येते. त्यामुळे आपण सावध राहणे केव्हाही इष्टच ठरेल!