अतिनफ्याच्या नादात टीम इंडियाचा असाही तोटा !

सर्वाधिक आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळण्यात कदाचित भारतीय खेळाडूंचा नंबर पहिला ठरावा. मग तो कुठलाही फॉरमॅट असो. याचा फटकाही भारतीय क्रिकेटला अनेकदा बसलाय. कारण अतिक्रिकेटमुळे म्हणजेच अतिआर्थिक नफा मिळवण्याच्या नादात भारतीय संघातील खेळाडूंना दुखापती, त्यातून सावरण्याचा कालावधी अन् विश्रांती मिळतच नसल्याने अनेकदा त्यांच्या कामगिरीवरही त्याचा विपरित परिणाम होत आहे. कोरोनामुळे दीर्घकाळ विश्रांती मिळाली खरी, मात्र त्यानंतर २०२२ चा विचार केला तर भारतीय संघांचे अत्यंत व्यस्त वेळापत्रक पाहणार्‍यालाच थकवा जाणवेल. यात आयपीएलसारख्या पैशांचा पाऊस पाडणार्‍या स्पर्धांमुळेही आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या तंदुरुस्तीचा प्रश्न गंभीर बनलाय, हे विसरून चालणार नाही. योग्य नियोजन, योग्य विश्रांती कालावधी, सूक्ष्म अन् सातत्याने तंदुरुस्ती तपासणी झाल्यास खेळाडूंना दुखापत होण्याचे प्रमाण कमी होईल, असे मत अनेक जाणकार व्यक्त करतात.

२०२१ वर्ष भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये अत्यंत दमदार ठरले. वर्षाची सुरूवात ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका जिंकून झाली आणि त्यानंतर अखेरची लढत दक्षिण आफ्रिकेत सेंच्युरियन मैदानावर ऐतिहासिक विजयाने झाली, हे या वर्षाचे वैशिष्ठ्य ठरले. मात्र, आयसीसी स्पर्धेबाबत भारतासाठी २०२१ वर्ष काहीसे वाईट गेले. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये भारताचा पराभव झाला, तर टी-२० वर्ल्डकपमध्ये संघाची कामगिरी इतकी खराब होती की पहिल्या फेरीत त्यांचे आव्हान संपुष्टात आले अन् असंख्य भारतीयांच्या टीकेचे त्यांना धनी व्हावे लागले. परंतु, टीम इंडियाने गेल्या वर्षी झालेल्या सर्व द्विपक्षीय एकदिवसीय मालिकांमध्ये विजय मिळवत कमबॅक केले. आता २०२२ मध्ये भारताने महत्वाच्या लढतींत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. २०२२ च्या वर्षारंभीच भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या कसोटी, तसेच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत पराभवाचा सामना करावा लागला होता.

याचेही कारण सलगच्या लढती आणि खेळाडूंचा फिटनेस हे होते, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. शिवाय भारतीय संघातील सर्वात मोठा बदल म्हणजेच कसोटी आणि मर्यादित षटकासाठी वेगवेगळे कर्णधार हे कारणदेखील काहीसे कारणीभूत ठरल्याचे बोलले गेले. ऑस्ट्रेलियात होणार्‍या टी-२० विश्वचषकापूर्वी भारतीय संघाने कंबर कसून दक्षिण आफ्रिकेविरुद्धची हार विसरून पुन्हा नव्या जोमाने मैदानात पाऊल टाकले. तेव्हा मोठ्या जोमाने भारतीय संघाने वेस्ट इंडिजला धूळ चारली आणि जोरदार कमबॅक केले. यात सूर्यकुमार यादव, इशांत किशन, व्यंकटेश अय्यर, ऋतुराज गायकवाड, हर्षल पटेल, रिषभ पंत, श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर दीपक हुडा, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव या तरुणाईने उत्कृष्ट खेळ करत विजयी योगदान दिले. या मोठ्या विजयातील एक मोठे कारण म्हणजे घरच्या मैदानावर झालेल्या लढती. शिवाय तरुण-नवख्या खेळाडूंना मिळालेली संधीही विजयाचे कारण ठरली.

यानंतर श्रीलंकेने भारत दौरा केला. या दौर्‍यात तीन टी-२० आणि दोन सामन्यांची कसोटी मालिका झाली. यात कर्णधार रोहित शर्माच्या प्रतिनिधीत्वाखाली भारतीय संघाने श्रीलंकन खेळाडूंना पूर्णत: व्हाईट वॉश दिला. यातही तरुण खेळाडूंची विशेषत: श्रेयस अय्यरची कामगिरी वाखाणण्यासारखी होती. रिषभ पंत, रविचंद्रन अश्विन, जसप्रित बुमराह, रोहित शर्मा यांच्या दमदार कामगिरीमुळे भारताने विजयी लय कायम राखली. भारताच्या या दक्षिण आफ्रिका अन् श्रीलंकेविरुद्धच्या मालिकांनंतर आयपीएलच्या १५व्या हंगामाचे बिगुल वाजले. यात दररोजच्या अत्यंत व्यस्त शेड्युलमुळे भारतीय नव्हे, तर जगभरातील क्रिकेटर्सचा घाम निघाला. या सर्व घडामोडींदरम्यान जानेवारी ते मे अखेरपर्यंत भारतीय क्रिकेट संघातील अनेक मोहोरे जखमी झाल्याच्याही घटना घडल्या. ज्यामुळे यापुढील मालिकांसह दृष्टिक्षेपातील टी-ट्वेन्टी विश्वचषकासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची चिंता वाढली आहे. मूळात सामन्यांचेच नव्हे, तर खेळाडूंचेही योग्य रोटेशन होऊन ‘विश्रांती’लाही तेवढेच महत्व दिले जावे, असे मत अनेक तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात असताना प्रत्यक्षात बीसीसीआयकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून आले आहे. आजवर सुरेश रैना, झहीर खान, उमेश यादव, केदार जाधव, रोहित शर्मा, हार्दिक पंड्या, इशांत शर्मा, मोहम्मद शमी अशा अनेक खेळाडूंना अतिक्रिकेटचे बळी व्हावे लागले आहे, हे विसरून चालणार नाही.

नुकत्याच संपलेल्या आयपीएल स्पर्धेनंतर आता पुन्हा टीम इंडियाला अल्पावधीतच दक्षिण आफ्रिका संघासोबत चार हात करायचे आहेत. पाच टी-२० सामन्यांची ही मालिका होईल. टी-२० वर्ल्डकपच्या आधी भारतीय संघाला तयारीसाठी याचा मोठा फायदा होऊ शकतो. मात्र, खेळाडूंना तंदुरुस्तीकडेही लक्ष द्यावे लागेल, हेही तितकेच महत्वाचे. साधारण या दौर्‍यात भारतीय खेळाडूंना दिवसाआड सामना खेळायचा आहे. यानंतर लागलीच पुन्हा भारतीय संघाला इंग्लंड दौरा करायचा आहे. मायदेशात आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेनंतर भारत इंग्लंड दौर्‍यावर जाणार आहे. तेथे गेल्या वर्षी कोरोनामुळे स्थगित करण्यात आलेली पाचवी कसोटी खेळवली जाणार आहे. त्यानंतर प्रत्येकी ३ सामन्यांची टी-२० आणि एकदिवसीय मालिका होणार आहे. ही महत्वपूर्ण मालिका खेळल्यानंतर भारतीय संघाला काहीसा विश्राम मिळणार आहे.

ऑगस्ट आणि सप्टेंबरवर भारतीय खेळाडूंना सरावावर भर द्यावा लागेल. त्यात खेळाडूंना पावसाच्या मोसमात तंदुरुस्तीकडे खास लक्ष द्यावे लागेल. कारण लागलीच ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये टी-२० विश्वचषक होणार आहे. संपूर्ण विश्वाचे लक्ष लागून असलेल्या या विश्वचषकात भारतीय संघाकडून अधिक अपेक्षा असतील. ऑस्ट्रेलियात होणार्‍या या स्पर्धेत भारतीय संघ जेतेपदासाठी बाजी लावेल. १६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर या काळात होणार्‍या या विश्वचषकात एकूण ४५ सामने खेळवले जाणार आहेत. त्यात भारतीय खेळाडूंना चांगलाच घाम गाळावा लागणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघ सुपर १२ च्या लढतीत ग्रुप २ मध्ये असेल. या ग्रुपमध्ये पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, बांगलादेशसह अन्य दोन संघांचा समावेश असेल. याच दरम्यान, दुसरीकडे वर्ल्डकप होताच ऑस्ट्रेलियाचा संघ भारतीय दौर्‍यावर येणार असून, या दौर्‍यात चार कसोटी, तीन टी-२० सामन्यांची मालिका होणार आहे. या मालिकेची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. मात्र, या मालिकेतही टीम इंडियाचे वेळापत्रक व्यस्त राहणार यात शंका नाही.

दरम्यान, नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये टीम इंडिया बांगलादेश दौर्‍यावर जाणार आहे. तेथे दोन कसोटी, तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. डिसेंबरअखेरीस भारत श्रीलंकेच्या दौर्‍यावर जाणार असून या दौर्‍यात पुन्हा पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार असल्याने यंदाच्या या २०२२ वर्षात भारतीय संघाला चांगलीच घौडदौड करावी लागणार आहे, हे निश्चित!

आयपीएलमुळे असाही तोटा
यंदाच्या आयपीएल सत्रात भारतीय क्रिकेटला मोठा तोटा सहन करावा लागल्याचे चित्र आहे. प्रामुख्याने अतिक्रिकेटचा फटका काही भारतीय खेळाडूंना बसतोय, हेही यातून अधोरेखित होते आहे. आयपीएलच्या या १५ व्या हंगामात भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज दीपक चहर दुखापतीमुळे बाहेर झाला. त्याच्या गैरहजेरीचा फटका चेन्नई सुपर किंग्स संघाला बसला. याच संघातील अत्यंत महत्वाचा खेळाडू आणि यंदाच्या सत्रातील चेन्नईचा सुरुवातीच्या सामन्यांतील कर्णधार रवींद्र जडेजाही दुखापतीने बेजार झालाय. रॉयल चॅलेंजर बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात त्याच्या खांद्याला झालेली दुखापत भारतीय क्रिकेटसाठी मोठी हानीच म्हणावी लागेल. कारण सद्य:स्थितीत फलंदाजी, गोलंदाजीच नव्हे, तर क्षेत्ररक्षणात तुफान फॉर्मात असलेल्या जडेजाकडून आगामी सामन्यांत मोठी अपेक्षा आहे. दुसरीकडे मुंबई इंडियन्सचा तुफानी फलंदाज सूर्यकुमार यादव ही आगामी मालिकांमध्ये महत्वाचा खेळाडू ठरणार आहे. मात्र, गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमारला डाव्या हाताचे स्नायू दुखावल्याने विश्रांती घ्यावी लागली होती. याप्रकरणी बीसीसीआयच्या फिटनेस टीमकडून त्याची विशेष तपासणीही करण्यात आली.

मात्र, त्यात तो दुखापतग्रस्त असल्याचे स्पष्टपणे जाणवल्याने त्याला विश्रांती दिली गेली. सलग दोन वेळा दुखापतींचा शिकार ठरलेला सूर्या लवकर रिकव्हर होणे भारतीय संघासाठी गरजेचे ठरणार आहे. याशिवाय सनरायझर्स संघाकडून खेळणार्‍या वॉशिंग्टन सुंदरलाही फलंदाजीदरम्यान झालेली दुखापत भारतासाठी चिंतेचा विषय ठरली. आयपीएलपूर्वी त्याला वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतून दुखापतीच्या कारणास्तव वगळण्यात आलेे होते. याशिवाय टी. नटराजन यालाही मैदानापेक्षा अधिक वेळ बेंचवरच थांबावे लागले होते. गुडघ्याच्या दुखापतीतून सावरण्यासाठी त्याला फार मोठा काळ घालवावा लागला. सुरेश रैना, केदार जाधव अशा अनेक खेळाडूंनाही दुखापतींचे शिकार व्हावे लागल्याची अनेक उदाहरणे आहेत. आयपीएलमधील अतिक्रिकेट हे यामागचे कारण असल्याचे आजवर अनेकांनी नमूद केले आहे. कारण खेळाडूंकडून तंदुरुस्तीपेक्षा पैशांना अधिक महत्व दिले जात असल्याचेही अनेकदा दिसून आले आहे. तज्ज्ञांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करून केवळ अर्थाजनाच्या मोहापायी क्रिकेट खेळणार्‍यांचीही मोठी हानी झाल्याचे आजवर दिसून आले आहे. या सर्व बाबींचा बीसीसीआयकडून गांभीर्याने विचार होणे अत्यंत गरजेचे आहे. जेणेकरून आंतरराष्ट्रीय क्रमवारीत भारतीय संघ निश्चितच टॉपवर राहील.