घरसंपादकीयअग्रलेखखोडकर दादा...प्रेमळ ताई!

खोडकर दादा…प्रेमळ ताई!

Subscribe

2019 मध्येही भल्या पहाटे दादांना कसेबसे समजावून काकांच्या नकळत अत्यंत गुप्ततेत शपथविधी उरकून घेतल्यानंतरही ताईंनी दादाप्रेमाचा जो काही आलाप गायला की त्यामुळे दादांचे मनपरिवर्तन होऊन दादा पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या सरकारात थेट उपमुख्यमंत्रीपदावर जाऊन बसले आणि देवेंद्र भाऊंच्या ‘मी पुन्हा येणार’च्या स्वप्नाचा अक्षरश: चुराडा झाला.

महाराष्ट्राच्या राजकारणात अशी काही घराणी आहेत की राज्याचे राजकारण या घरांमधील नेत्यांभोवतीच काही काळ फिरत राहते. मग ते पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे असोत की उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि सुप्रियाताई सुळे हे बहीण भाऊ असोत. पंकजाताई आणि धनंजय मुंडे हे बहीण भाऊ असले तरी दोघांचे राजकीय पक्ष तरी किमान वेगळे आहेत. त्यामुळे दोघांमध्ये राजकीय संघर्ष, टीका टिप्पण्या याकडे राजकीय चष्म्यातून तरी किमान पाहिले जाते. त्यातही दोघांमध्ये अधूनमधून राजकीय जुगलबंदी झडत असतेच तो भाग वेगळाच. मात्र तरीही पवार कुटुंबियांमधील अजितदादा आणि सुप्रियाताई या दोघांमधील वैयक्तिक मतभेदांकडे मात्र राजकीय जाणकार बारीक नजरेतून पहात असतात. अर्थात अजितदादा हे सुरुवातीपासूनच काहीसे खोडकर असल्याने ते खोड्या करायचे काही थांबत नाहीत आणि सुप्रियाताई दादाच्या खोड्यांना राजकीय चिमटे काढायचे काही सोडत नाही. या दादा आणि ताईमधील खरे भांडण शरद पवार यांच्या राजकीय वारसदारीतून अधिक आहे.

दादाला राज्याचे मुख्यमंत्री होण्याची सतत घाई तर ताईला दादा मुख्यमंत्री झाला तर स्वत:च्या राजकीय भवितव्यासह पवार साहेबांनी (म्हणजे तिच्या वडिलांनी) प्रचंड कष्ट उपसून वाढवलेल्या राष्ट्रवादी पक्षाचे काय होणार ही चिंता सतत छळत असते. अर्थात दोघेही ताई दादा राजकीय क्षेत्रात प्रचंड हुशार आहेतच त्याबद्दल वाद असूच शकत नाही. मात्र त्यातही दादा मात्र नावाप्रमाणेच राष्ट्रवादीसह अन्य पक्षांवरही दादागिरी करत असल्याने अधिक हुशार आहेत. तसा दादांचा स्वभावही मोकळा आणि बिनधास्त व बेधडक आहे. त्यामुळे अरेला कारे करणे असो की कोणालाही अंगावर, शिंगावर घेणे असो दादा त्यात तरबेज आहेत. ताई यादेखील राजकारणातील निष्णात प्रकांड पंडित अशा शरद पवारांच्या कन्या असल्याने त्याही काही सहजासहजी हार मानणार्‍या नाहीत. त्यामुळे जमेल तेव्हा, जमेल तशी एकमेकांवर कुरघोडी करण्यात कोणतीही कसूर मागे शिल्लक ठेवतच नाहीत.

- Advertisement -

मग अडीच वर्षांपूर्वी राजभवनात भल्या पहाटे झालेला शपथविधी असो की काल देहू येथील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा यांना बोलण्यास मिळाली नसलेली परवानगी असो. एरवी अत्यंत फटकळ बोलणारे अशी राजकीय वर्तुळापासून ते बारामतीतील गाव खेड्यापर्यंत ख्याती असलेले दादा पंतप्रधानांच्या कार्यक्रमात त्यांना भाषण करु न दिल्यामुळे कोठेही चकार शब्दही बोलताना दिसले नाहीत. त्यांचा हा विनम्रपणा लक्षात आल्यामुळे लगोलग ताईंनी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना पंतप्रधानांच्या कार्यक्रमात बोलू न देणे हा महाराष्ट्राचा अपमान असल्याची ओरड ठोकत दादाच्या अपमानाचा तातडीने वचपा काढण्याची संधी सोडली नाही. विशेष म्हणजे ताईने विविध वृत्तवाहिन्यांवर यावरुन जोरदार आवाज उठवेपर्यंत कोणाच्या ध्यानीमनीदेखील असे काही झाले आहे हे नव्हते. त्यामुळे कालच्या ताईंच्या राजकीय चपळाईला दादांनी दाद द्यायलाच हवी. ताई दादांच्या या अनोख्या सख्यात सर्वात मोठी कोंडी झाली आहे ती नागपुरवाल्या देवेंद्रभाऊंची.

2019 मध्येही भल्या पहाटे दादांना कसेबसे समजावून काकांच्या नकळत अत्यंत गुप्ततेत शपथविधी उरकून घेतल्यानंतरही ताईंनी दादाप्रेमाचा जो काही आलाप गायला की त्यामुळे दादांचे मनपरिवर्तन होऊन दादा पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या सरकारात थेट उपमुख्यमंत्रीपदावर जाऊन बसले आणि देवेंद्र भाऊंच्या ‘मी पुन्हा येणार’च्या स्वप्नाचा अक्षरश: चुराडा झाला. मंगळवारी या सार्‍या प्रसंगाची पुन्हा उजळणी झाली. पंतप्रधानांच्या कार्यक्रमात दादांना जरी बोलू दिले नसले तरी देवेंद्रभाऊ बोलले की. आणि एवढा मोठा अपमान झाल्यानंतरही देवेंद्र भाऊ आणि दादा एकाच विमानातून प्रवास करत मुंबईतही आले हे विशेष. दादांनी महाराष्ट्राच्या अपमानाचा चकार शब्दही काल कोठे काढला नाही. भाजपचे सदाभाऊ खोत तर प्रतिक्रिया देताना म्हणालेदेखील की, देवेंद्रभाऊ बोलले म्हणजे दादा बोलले. तरी देवेंद्र भाऊंचे नशीब मोठे पवार दिल्लीत राष्ट्रपतीपदाच्या बैठकांमध्ये व्यस्त होते.

- Advertisement -

नाहीतर त्यांनी देखील यावर त्यांच्या तिरकस शैलीत भाष्य करुन अडचणी अधिक वाढवून ठेवल्या असत्या. अर्थात यात मजेशीर बाब म्हणजे ताईंची नेमकी अडचण दादांना पंतप्रधानांच्या कार्यक्रमात भाषण करु दिले नाही ही आहे की त्यांना बोलू न देताही ते पंतप्रधानांशी सुसंवाद साधत होते ही आहे? महाराष्ट्राचा अपमान झाला ही सल आहे की अपमान झाल्यानंतरही दादा आणि देवेंद्र भाऊ एकाच विमानातून मुंबईत गप्पा ठोकत आले ही आहे? जाऊ दे ते काहीही असले तरी दादांनी काढलेल्या खोडीमुळे सर्वांना पुन्हा एकदा ताई दादांचे अतूट सख्य यानिमित्ताने पहायला मिळाले. खोडकर दादांमुळे यापुढे देखील असे मनोरंजनाचे प्रसंग पुन्हा पन्हा अनुभवण्यास मिळतील आणि राज्यातील मायबाप जनता तिचे सारे पोटापाण्याचे प्रश्न विसरुन काही क्षण का होईना आनंदात व्यतीत करेल एवढीच काय ती भाबडी अपेक्षा यातून करता येईल.

अजित पवार यांना पंतप्रधानांच्या उपस्थितीतील कार्यक्रमात बोलू दिले नाही यावरून इकडे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आवाज उठवला, पण तिकडे वृत्तवाहिन्यांवर मंचावर पंतप्रधानांच्या बाजूला बसलेले दादा मोदींसोबत इशारेवजा बोलताना दिसत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात कोण कुणाशी कधी सूत जुळवेल, हे काही सांगता येत नाही. सध्या मोदींची चलती आहे, ते दोन वेळा पंतप्रधान म्हणून बहुमताने निवडून आलेले आहेत. दुसर्‍या बाजूला मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला सध्या कुणी कायमस्वरुपी अध्यक्ष मिळणेही मुश्कील होऊन बसले आहे, त्यामुळे काँग्रेसचा मोदींसमोर काय टिकाव लागणार हे स्पष्ट दिसत आहे.

त्यामुळेच वरून मोदींवर कितीही टीका केली, तरी आतून मोदी सगळ्यांनाच हवे असतात. कारण मोदी हैं तो मुमकीन हैं, हे सगळ्यांनाच पटलेले आहे. त्यामुळे काँग्रेस सोडला तर राज्यातील प्रादेशिक पक्षांचे नेते मोदींशी सलोख्याने वागत असतात. त्यामुळे दादा असोत, ताई असो, नाही तर काका असोत, महाराष्ट्राच्या मैत्रीपूर्ण संस्कृतीचा मुलामा देऊन मोदींशी जवळीक राखून असतात. त्यामुळे मोदींच्या भाषणात आपल्याला बोलण्याची संधी मिळाली नाही याविषयी दादांनी कुठेही खळखळ केलेली दिसली नाही. उलट विमानतळावर मोदींचे अगदी हात जोडून स्वागत करताना दादा दिसत आहेत, तर मोदी त्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस करण्याच्या मुद्रेत दिसत आहेत. महाराष्ट्रात सध्या कुणाचे सूत कुठे जुळेल हे सांगता येत नाही हेच खरे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -