भाजपचे पितळ पडले उघडे…

सुशांत सिंहच्या मृत्यूनंतर या मुद्यावर देशात जे खालच्या दर्जाचे राजकारण झाले ते संपूर्ण देशाने पाहिले. बिहार आणि महाराष्ट्र पोलिसांमध्ये झालेल्या आरोप प्रत्यारोपानंतर मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर उपस्थित केलेले प्रश्नचिन्ह महाराष्ट्रातील मराठी माणसाला आवडले नाही. सुशांत सिंह प्रकरणातून पुढे अंमलीपदार्थ प्रकरण उघडकीस आले. त्याचा तपास सुरू आहे. एव्हाना या प्रकरणातील राजकीय आरोप प्रत्यारोपाचे मूल्य संपुष्टात आले आहे. लोकांच्या जीवनमरणाचा प्रश्न झालेल्या कोरोनावरून, देशातील वाईट स्थितीत असलेल्या अर्थव्यवस्थेच्या विषयावरून लक्ष विचलित करण्याची केंद्राची खेळी बर्‍यापैकी यशस्वी झाली आहे. सुशांत सिंह प्रकरणाने दोन व्यक्तींना देशाच्या राजकारणात मध्यवर्ती ठिकाणी आणले. पहिली व्यक्ती सिनेक्षेत्रातील कंगना राणावत तर दुसरी व्यक्ती पत्रकारिकेतील अर्णव गोस्वामी या दोघांनीही वाद वक्तव्यांची राळ उडवून सुशांत सिंह प्रकरणानंतर केंद्राला अडचणीत आणणारे इतर विषय सोडून या दुय्यम विषयांभोवतीच राज्याचे राजकारण कसे फिरत राहील याची व्यवस्थित काळजी घेतली होती.

सुशांतच्या मुद्यावरून राज्यात सत्ताधारी शिवसेनेवर आरोप करताना भाजपाची केंद्रातील सत्तेमुळे अडचण झाली होती. कोरोनासाठीच्या राज्याच्या मदतनिधीवरून सेनेने भाजपाला कोंडीत पकडल्यावर या विषयावरून जनतेचे लक्ष वळवण्यासाठी कंगनाच्या आरोपांचा उपयोग करण्यात आला. कंगनाच्या आरोपाला मुंबई महापालिकेच्या कारवाईने उत्तर मिळाल्यावर भाजपाला फ्रंटफूटवर गेल्यासारखे वाटले होतेच. कंगनाच्या कार्यालयावर केलेल्या कारवाईमुळे सेनेने स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतल्याच्या भ्रमात हे प्रकरण आता सीबीआयकडे गेल्यानंतर या प्रकरणाचा प्राथमिक तपास मुंबई पोलिसांनी केल्याचा विसर पडला होता. बिहार पोलिसांच्या माध्यमातून मुंबई पोलिसांवरील झालेल्या आरोपांमुळे भाजपाचा मुंबईकर समर्थकही नाखूश होता. ही चर्चा आता होण्याचे कारण हाथरस प्रकरणानंतर त्याच बिहार पोलिसांच्या कार्यशैलीबद्दल निर्माण झालेले प्रश्नचिन्ह हे सुशांत सिंह प्रकरणातील मुंबई पोलिसांच्या कार्यशैलीपेक्षा जास्त मानहानीकारक असतानाच भाजपाचे खाकीचे राजकारण त्यांच्यावरच उलटणारे आहे.

हाथरस घटनेतील त्या गावाला तटबंदी करून छावणीचे स्वरुप आले आहे. या गावात पोलिसांकडून सातत्याने दमनाचा मार्ग अवलंबला जात असल्याच्या बातम्या येत आहेत. काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना झालेल्या धक्काबुक्कीच्या पार्श्वभूमीवर बिहार पोलिसांची देशभर नाचक्की झाली आहे. या धक्कीबुक्कीची छायाचित्रे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. यातील काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी पोलिसांकडे टाकलेला कटाक्ष असलेले छायाचित्र भाजपासाठी त्रासदायक ठरणारे आहे. भाजपाच्या बेफाम, बेलगाम सत्तेच्या अहंकारातून निर्माण झालेल्या या क्षणाची दखल इतिहास घेईल, असा सूर भाजपाच्या विरोधकांनी लावला आहे. कंगना राणावतचे कार्यालय तोडून मुंबई महापालिकेने केलेल्या कथित चुकीपेक्षाही मोठा दगड केंद्राने स्वतःच्या पायावर मारून घेतली आहे. हाथरस घटनेनंंतर भाजपाचा देशातील अहंकारी चेहरा पुन्हा हिडीसपणे समोर आला आहे. केंद्रात आणि राज्यातही सत्तेत असलेल्या भाजपाच्या गर्वाचे घर खाली येण्यासाठी हाथरसची घटना कारण ठरणार नसती. मात्र या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करताना त्याबाबतची वस्तुस्थिती देशासमोर भाजपाकडून मांडली जायला हवी होती. मात्र उत्तर प्रदेशातील ठाकूर समुदायाचा सामाजिक वरचष्मा, भाजपाचा परंपरागत मतदार आणि त्यांचे राजकारणातील स्थान याचा विचार करता योगी सरकारकडून हे प्रकरण पोलिसांकरवी दडपण्याचाच प्रयत्न होत असल्याचे स्पष्ट आहे.

हाथरसमधील पीडित कुटुंबाला माध्यमांंशी बोलण्यास मज्जाव करण्यात आला आहे. याबाबत उत्तर प्रदेश पोलिसांची भूमिकाही संशयास्पद राहिली आहे. पीडित मुलीच्या मृत्यूनंतर मृतदेहाचे घाईघाईने झालेले दहन संशयाच्या भोवर्‍यात नेणारे आहे. यातील मुलीवर अत्याचार झालाच नव्हता, जीभ कापलीच नव्हती, असे सांगितले जात आहे. मात्र त्यानंतरही या घटनेचे गांभीर्य कमी होत नाही. या घटनेनंतर पीडित मुलगी रुग्णालयात दाखल झाल्यावर आणि तिचे म्हणणे स्पष्ट झाल्यावरही पोलिसांनी वेळीच आरोपींच्या मुसक्या आवळल्या नाहीत, असा आरोप विरोधकांनी केला आहे. या घटनेनंतर पीडित कुटुंब दहशतीखाली आहे. असे असताना उत्तर प्रदेश पोलिसांचे गोडवे गाणारे राज्यातील विरोधक हाथरस घटनेनंतर उत्तर प्रदेश पोलिसांच्या संशयास्पद कृतीबाबत मौन बाळगून आहेत. तर सुशांत सिंह प्रकरणानंतर मुंबई पोलिसांची भीती वाटलेल्या कंगना राणावतला हाथरस प्रकरणातील उत्तर प्रदेश पोलिसांविषयी काहीच माहिती नसल्याची स्थिती आहे. काँग्रेसच्या काळातील अत्याचार प्रकरणात तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांना बांगड्या पाठवण्याची भाषा करणार्‍या भाजपाच्या महिला नेत्यांची स्मृती हाथरस प्रकरणात कुंठीत झाली आहे. हाथरस प्रकरणानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतलेली भूमिका ही पूर्णपणे राजकीयच आहे. हाथरस घटनेनंतर उत्तर प्रदेशातील ठाकूर समुदायाने आरोपींच्या पाठीशी समाज म्हणून राहाण्याची घेतलेली भूमिका संतापजनक आहे.

हाथरस घटनेमुळे येत्या काळात मोठ्या प्रमाणात सामाजिक ध्रुवीकरण होणार आहे. कोरोना काळात तबलिगी, राम मंदिर निकाल, बाबरी प्रकरणात अलिकडेच झालेली नेत्यांची सुटका, सुशांत सिंह मृत्यू प्रकरणातून धार्मिक ध्रुवीकरण साधण्याचा प्रयत्नच झाला. बिहारमधील निवडणुकीसाठी सुशांत सिंह मृत्यू प्रकरण महत्वाचे होते. तर हाथरस प्रकरण काँग्रेस आणि भाजपाच्या विरोधकांसाठी कमालीचे महत्वाचे होणार आहे. सुशांत सिंह प्रकरणातील तपासाची तत्परता भाजपा हाथरस प्रकरणात दाखवणार का, असा प्रश्न या निमित्ताने विचारला जात आहे. दुसरीकडे योगी आदित्यनाथ सरकारने घेतलेली भूमिका ही सातत्याने संशयास्पद राहिल्याने त्याबाबत केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारलाही आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले आहे. तर सुशांत सिंह प्रकरणानंतर पुछता है भारत म्हणणार्‍या पत्रकाराला हाताशी धरून हाथरस प्रकरणात काँग्रेसवर उडवलेली 50 लाखांची राळ आणि त्याविषयी आरोपाची वेळ निश्चितच चुकलेली आहे. हे प्रकरण भाजपवर उलटण्याची चिन्हे आहेत. असे असताना भाजपाच्या सोबत असलेल्या मित्र पक्ष रिपाइंचे रामदास आठवलेही हाथरसनंतर भाजपाविरोधातील रोषाचे धनी ठरणार आहेत.

भाजपाने आठवलेंच्या माध्यमातून अगदी राष्ट्रवादीच्या शरद पवारांनाही नव्या सत्तासमीकरणात ऑफर दिली. ही ऑफर देण्यामागे राज्यातील सत्ताधारी पक्षाविरोधात पसरवण्यात येणार्‍या भ्रमाचा भोपळा सुशांत सिंह प्रकरणातील नुकत्याच आलेल्या एम्सच्या वैद्यकीय अहवालानंतर फुटला आहे. या अहवालातून सुशांत सिंह याचा मृत्यू, आत्महत्या असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर भाजपाने केलेल्या एकूणच या विषयावरील राजकारणातील फोलपणा नेमका याच वेळी उघडा पडला आहे. सुशांत आणि मनिषा या दोन्ही मृत्यू प्रकरणात भाजपाकडून उत्तर प्रदेश आणि बिहार पोलिसांच्या बाजूने सूर आळवला जात होता. मात्र हाथरस प्रकरणानंतर उत्तर प्रदेश पोलिसांची काळवंडलेली प्रतिमा पुसली जाणारी नाही. या प्रकरणानंतर शिवसेनेने हाथरसच्या मुद्यावर कधी बोलणार, असा थेट प्रश्न कंगनाला विचारला आहे. कंगनाच्या माध्यमातून राज्याला बदनाम करण्याचे षङ्यंत्र उघडे पडल्याचे मत सेनेने मांडले आहे. ठाकरे ब्रँडला बदनाम करताना मुंबई आणि मुंबई पोलिसांनाही बदनाम करणार्‍यांनी हाथरस विषयावरून उत्तर प्रदेश पोलिसांच्या भूमिकेवर व्यक्त व्हावं अशी अपेक्षा केली जात आहे.

शिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी टाकलेल्या सुशांत सिंह प्रकरणाच्या जाळ्यात आता भाजपाच पुरती अडकली आहे. एम्समधून आलेल्या मृतदेह तपासणी अहवालानंतर भाजपाच्या आरोपातील हवा निघून गेली आहे. सुशांत सिंह प्रकरणानंतर अमली पदार्थ विषयावरून शिवसेनेला आणि ठाकरे कुटुंबाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न या अहवालानंतर भाजपाच्या पुरता अंगलट आला आहे. शिवसेनेने बिहार निवडणुकीत 25-30 उमेदवार उभे करण्याचा विचार केलेला आहे. त्यामुळे येत्या काळात या दोन्ही प्रकरणी शिवसेनेला भूमिका स्पष्ट करावी लागेल. ही भूमिका स्पष्ट करताना राज्यात आणि बिहारमधील भूमिका परस्परांना छेदणार नाहीत, याचीही काळजी सेनेला घ्यावी लागेल.

मुंबई पोलीस ही एक उत्तम तपास यंत्रणा आहे. सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाची चौकशी करत असताना मुंबई पोलिसांकडेही सगळी माहिती होती. पण नैतिकतेच्यादृष्टीने मृत व्यक्तीची आणि त्याच्या कुटुंबीयांची बदनामी व्हायला नको,अशी भूमिका मुंबई पोलिसांची असते, परंतु हे प्रकरण सीबीआयकडे जाताच गांजा आणि ड्रग्जचा विषय जगजाहीर झाल्याचे स्पष्ट झाले. या विषयाकडे संजय राऊत यांनी वेधलेले लक्ष मुंबई पोलिसांच्या कार्यकुशलतेवर बोट उचलणार्‍यांना लगावलेली चपराक आहे.