घरफिचर्समायमहानगर ब्लॉगसुषमाताई, तुम्ही प्रबोधन नव्हे तर, जागर करताय!

सुषमाताई, तुम्ही प्रबोधन नव्हे तर, जागर करताय!

Subscribe

अनिल मारुती म्हसकर

इतिहास उगाच घडत नसतो, त्यासाठी एखादी घटना घडावी लागते. बाहेर राजकीय घडामोडी फार भयंकर घडत आहेत. वास्तविक त्यावर चर्चा म्हणजे आकाश बगलेत पकडू पाहण्यासारखे आहे. जसजशी राजकीय समीकरणे बदलत चालली आहेत, तसतशी त्यांच्या व्याख्याही दिशाहीन होत चालल्या आहेत. पूर्वी प्रजेसाठी राजा राज्य करत असे, आता राजासाठी प्रजेलाच वेठीस धरण्याची कार्यप्रणाली थेट न्यायमंदिरापासून ते प्रशासनाच्या उंबरठ्यावर लाचारी करत असताना दिसत आहे. खरंच, मन आणि बुद्धी बधीर होत जाते.

- Advertisement -

लोकशाहीचा चौथा स्तंभ (आता पहिल्या तीन स्तंभाची काहीही माहिती नाही, कारण ते वावटळासारखे कधी चर्चेत आले नाहीत) म्हणून पत्रकारिताकडे पाहिले जाते. नशीब आज दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर, टिळक, आगरकर हयात नाहीत, अन्यथा तेही आजच्या शेटजींच्या दावणीला बांधलेली पत्रकारिता पाहून बधीर झाले असते. हाताच्या बोटावर मोजण्याइतके पत्रकारितेचे पावित्र्य जपणारे पत्रकार सोडले तर बाकीचा सर्कशीचा खेळ आहे, हे नाईलाजाने म्हणावेसे वाटते.

इलेक्ट्रोनिक मीडिया ब्रेकिंग न्यूजसाठी दुनियेच्या या बाजारात अक्षरश: फिरताना दिसत आहेत. फक्त बातमी कशी होईल? आणि मला कव्हरेज कसे मिळेल? याचसाठी आपले प्राण पणाला लावत असल्याचे दुर्दैवी चित्र नेहमीच दिसत आहे. समस्या दाखविणे आणि त्यास न्याय देण्यासाठी बातम्या दिल्या जात नाहीत, हे दुर्दैव आहे. बरं, अँकरच म्हणतात आमचे चॅनल सोडून इतर कुठेही जाऊ नका! असे वारंवार सांगत असताना स्वत: दुसऱ्या दिवशी दुसऱ्या शेटजींच्या चॅनेलला आल्यावर “उघडा डोळे बघा नीट” असेही बेशरमपणे सांगायला हेच अँकर जराही कचरत नाहीत. कारण ते पॅकेजचे मिंधे असतात, पत्रकारितेचे नव्हे. लोकशाही वेशीला टांगण्याच्या आजच्या समाजरचनेला खरे म्हणजे कोण जबाबदार? हे विचारमंथनातूनच पुढे यावयास हवे, तेच काम आज सुषमाताई करीत आहेत. त्यात खोलात जाऊ इच्छित नाही.

- Advertisement -

काहीही असो, सुषमाताई तुम्हीं खऱ्या अर्थाने अंधारातून प्रकाशाकडे आलात. तुम्हाला मिळालेल्या राजकीय व्यासपीठाच्या माध्यमातून तुमच्यातील भारतरत्न घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशासाठी बनविलेले संविधान घरोघरी, मनामनात पोहचविण्याचे महानकार्य तुमच्याकडून होत आहे, ही या देशाचा एक नागरिक म्हणून माझी प्रामाणिक भावना आहे. उतावीळ लोक सत्तेसाठी माती खातात, तुम्ही या मातीतून उभा राहिलेला समाज आपल्या प्रभावी तेवढ्याच विवेकपूर्ण संभाषणातून लोकांसमोर आणत आहात. आपले विचार आजच्या राजकीय उलाढालीवर परिणामकारक उदाहरणातून कार्यकर्त्यांसमोर येत असल्याने जेवढी गर्दी, तेवढी तुमच्या विचारांचे दर्दी निर्माण झाले आहेत. विशेष म्हणजे, संविधानात काय आहे? आपली कर्तव्ये काय आहेत? याचे आपण केवळ प्रबोधन करत नसून तो एक जागर ठरत आहे.

मा. शिवसेना पक्षप्रमुख श्रीमान उद्धवजी ठाकरे यांच्यावर चोहोबाजूंनी टीका करणाऱ्या गिधाडांना तेथेच विचाराने ठेचायला पक्षप्रवेश केलात, तो राजकीय स्वार्थासाठी, पदासाठी नसून सर्वसामान्यांची शिवसेना पुन्हा मजबूतपणे उभी करणेसाठी! आणि त्यामुळेच अधिक सक्षमपणे गद्दारांशी लढण्यास आम्हांला बळ मिळाले आहे. ताई, तुम्हाला देण्यासाठी शिवसेनेकडे काहीही नसताना तुम्ही केवळ पक्षहितासाठी आणि शिवसेनाच या संविधानाचे संरक्षण करील, या विश्वासाने आपण या कुटुंबात सहभागी झालात. आम्हा शिवसैनिकाना एक विचारवंत ताईच मिळाली, अशी प्रामणिक भावना आज प्रत्येक शिवसैनिकाची आहे. तुम्ही प्रत्येकवेळी ‘दादांनो’ म्हणून साद घालता आम्ही तुम्हाला शिववचन देतो शिवसेना तुमच्याबरोबर भाऊ म्हणूनच सावलीसारखी कायम राहील. तुम्ही सुरू केलेला हा जागर ‘झोपेचे सोंग घेऊन झोपणाऱ्यांचे डोळे नक्कीच लख्खपणे उघडण्यास’ कारणीभूत होवो आणि उद्याचा उज्वल व प्रजाहितकारी महाराष्ट्र माननीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली उदयास येवो, हीच आई तुळजाभवानीकडे प्राथर्ना करतो. आपल्या पुढील प्रबोधन जागर यात्रेस मन:पूर्वक शुभेच्छा.

(लेखक हे जोगेश्वरी पूर्व येथील शिवसैनिक आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -