ताजमहालात दडलंय काय?

ताजमहाल हा तेजोमहालय तर, कुतुबमिनार हा विष्णू स्तंभ असल्याचा दावा करण्यात आला आहे. शिवाय कुतुबमिनार जवळ काही मंडळींनी हनुमान चालीसादेखील म्हणण्याचा प्रयत्न केला आहे. हनुमान चालीसा म्हटल्याने प्रश्नाची तीव्रता जगाला लक्षात येते, असा गोड गैरसमज अर्धवट बुद्धीच्या मंडळींचा झाला असल्यानेच ते नको त्या विषयात हनुमान चालीसेला ओढून आणत तिचा अवमान करीत आहेत.

प्रेमाचे प्रतीक म्हणून ओळखला जाणारा आणि जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेला ताजमहाल सध्या राजकीयदृष्ठ्या चर्चेत आला आहे. राजकीय, सामाजिक आणि धार्मिक अशा फोडी करून जरी मुद्दे मांडले जात असले, तरी या तिघांतूनही भावना भडकवणे हा एकमेव उद्देश समोर येतो. ताजमहालाच्या चर्चेवरूनही मूळ मुद्याला बगल देत भावना भडकवण्याचा उद्योग सुरू आहे. महत्वाचे म्हणजे, उच्च न्यायालयाने हा उद्देश हेरला आणि त्याच दृष्टीने ताशेरेही ओढले. ताजमहालाच्या बाबतीत दावे करणारे जर इतिहास अभ्यासक असते तर न्यायालयाने त्यांचे म्हणणे कदाचित गांभीर्याने घेतले असते. परंतु, ही मंडळी जर हिंदुत्ववादातून असे दावे करत असतील तर न्यायालय त्यांना खडेबोल सुनावणार ही काळ्या दगडावरची रेष आहे.

भाजप नेते रजनीश सिंह यांनी ताजमहाल हा तेजोमहाल म्हणजे महादेवाचे मंदिर असल्याचा दावा केला. दुसरीकडे भाजपच्याच नेत्या राजकुमारी दिया सिंह यांनी ताजमहाल आणि जयपूरचे कनेक्शन याबाबत खुलासा करताना म्हटले की, ताजमहालची जमीन ही आमच्या पूर्वजांची आहे. ही जमीन आमचा वारसा आहे. आमच्या घराण्याकडे त्या जमिनीशी संबंधित कागदपत्रे आहेत. राजकुमारी यांच्या दाव्यानेही सर्वत्र ताजमहालाविषयी चर्वितचर्वण सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर ताजमहालच्या २२ बंद खोल्या उघडण्याची मागणी करणारी याचिका अलाहाबादच्या उच्च न्यायालयात दाखल झाली. पण, या याचिकेच्या सुनावणी दरम्यान याचिकाकर्त्याचा चांगलाच हिरमोड झाला असावा. ताजमहालबाबत योग्य ते संशोधन करुन मगच याचिका दाखल करा, अशा शब्दांत न्यायालयाने याचिकाकर्ते तथा भाजपच्या प्रवक्त्यांना फटकारलेे. न्यायाधीश डी. क.े उपाध्याय यांनी याचिकाकर्त्यांना खडे बोल सुनावत जनहित याचिकांच्या व्यवस्थेचा दुरुपयोग न करता आधी ताजमहाल कोणी बांधला याचा अभ्यास करा, विद्यापीठात जाऊन पीएचडी करा आणि मग न्यायालयात या, असा सल्ला दिला आहे. जनहित याचिका या व्यवस्थेचा दुरुपयोग करु नका, उद्या तुम्ही येऊन न्यायाधीशांच्या कक्षात जाण्याची परवानगी मागाल. असे कसे चालेल?, असा सवाल न्यायालयाने केला.

तुम्हाला ज्या विषयाबाबत काही माहिती नाही त्याचा अभ्यास करा. जर तुम्हाला कोणी अभ्यास किंवा संशोधन करण्यापासून रोखले तेव्हा न्यायालयाकडे न्याय मागू शकता, अशा कठोर शब्दांत न्यायालयाने फटकारताना अशा बाबी पुन्हा न्यायालयात आणून न्यायालयाचा वेळ घेऊ नये, असाच जणू संदेश या सुनावणीवेळी दिला. त्यामुळे आता तरी या वादावर पडदा पडणे गरजेचे आहे. परंतु, वाद सुरू होताच तो थांबविणारी व्यवस्था अद्याप भारतात तरी नसल्याने आपली तथाकथित अतिबुद्धीमान राजकारणी मंडळी या व्यवस्थेचा फायदा उचलतात आणि वाद पेटवतच ठेवतात. इतकेच नाही तर ताजमहालाबरोबर कुतुबमिनारही तोंडी लावण्यासाठी वादात ओढण्याचे ‘महत’ काम आपल्या काही मंडळींनी केले आहे.

ताजमहाल हा तेजोमहालय तर, कुतुबमिनार हा विष्णू स्तंभ असल्याचा दावा करण्यात आला आहे. शिवाय कुतुबमिनार जवळ काही मंडळींनी हनुमान चालीसादेखील म्हणण्याचा प्रयत्न केला आहे. हनुमान चालीसा म्हटल्याने प्रश्नाची तीव्रता जगाला लक्षात येते, असा गोड गैरसमज अर्धवट बुद्धीच्या मंडळींचा झाला असल्यानेच ते नको त्या विषयात हनुमान चालीसेला ओढून आणत तिचा अवमान करीत आहेत. खरे तर ताजमहालासंदर्भातील वाद हा आताचा आहे असेही म्हणता येणार नाही. १९५६ मध्ये इतिहास अभ्यासक पुरुषोत्तम नागेश ओक तथा पी. एन. ओक यांनी ताजमहाल हे शिवमंदिर असल्याचा ‘ट्रू स्टोरी ऑफ ताज’ या पुस्तकात दावा केला होता. २०१५ मध्ये आग्रा सत्र न्यायालयात ताजमहालाला तेजोमहालय मंदिर जाहीर करण्यासाठी याचिका दाखल झाली होती.

२०१७ मध्ये भाजप खासदार विनय कटियार आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ताजमहालाला तेजोमहल मंदिर घोषित करण्याची मागणी केली होती. असे असले तरी, ताजमहाल हे शिव मंदिर आहे असा सर्वप्रथम दावा पी.एन. ओक यांनी केला होता. ओक यांनी असा दावा का केला असावा असाही प्रश्न सर्वसामान्यांना पडू शकतो. मुळात ओक यांचे लिखाण अभ्यासता त्यांच्यावर हिंदुत्वाचा प्रभाव असावा असे दिसते. इस्लाम आणि ख्रिश्चॅनिटी ही वैदिक हिंदुत्वाचीच रूपे आहेत, असे त्याचे मत होते. ओक यांनी भारतीय इतिहासाच्या पुनर्लेखनाचा ध्यास घेतला होता. कारण ब्रिटिशांनी लिहिलेला भारतीय इतिहास चुकीचा असल्याचे त्यांचे म्हणणे होते. ओक यांनी दिल्लीत स्थायिक होऊन काही वर्षे पत्रकारिता केली. पुढे ओक यांनी ‘इन्स्टिट्यूट फॉर रिरायटिंग हिस्टरी’ या संस्थेची स्थापना केली. त्यांचा ताजमहालविषयीचा सिद्धांत सर्वाधिक गाजला.

बहुतांश मुस्लीम मशिदी आणि वास्तूंच्या ठिकाणी पूर्वी मंदिरे होती, असा ओक यांचा ठाम विश्वास होता. कारण अनेक मुस्लीम राज्यकर्त्यांनी भारतावर आक्रमण करून इथे राज्य केलेले आहे. त्यासाठी त्यांनी इथल्या धार्मिक प्रेरणा दडपून टाकल्या आहेत. ताजमहाल हेही पूर्वी शिवमंदिर होते आणि आजही पूर्ण ताजमहाल आपल्याला दाखवला जात नाही, याचे कारण त्याठिकाणी दडलेले हिंदू मंदिराचे पुरावे, हेच आहे, असे ते मानत. ताजमहालातील मुख्य समाधी आणि चमेलीच्या मजल्याखाली २२ खोल्या आहेत, ज्या बंद करण्यात आल्या आहेत, त्या उघडण्याची मागणी पुढे आली. मुघल काळापासून या खोल्या बंद असल्याचे म्हटले जाते. या खोल्या शेवटच्या वेळी १९३४ ला उघडल्या गेल्या होत्या. त्यानंतर येथे केवळ तपासणी करण्यात आली. असे म्हटले जाते की, ताजमहालाच्या जागेवर पूर्वी तेजोमय किंवा तेजोमहाल नावाचे महादेवाचे मंदिर होते. शाहजहानने मंदिर तोडून त्या जागी ताजमहाल बांधल्याचा दावा करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर सर्व इस्लामिक आणि ख्रिस्ती वास्तूंचे उत्खनन करण्याची परवानगी मिळाली पाहिजे, असे ओक यांचे म्हणणे होते.

इतिहासलेखनाची नवी भारतीय पद्धतही ओक यांनी प्रथम मांडली. त्यावर त्या काळात ताशेरे ओढले गेले; परंतु नंतर काही इतिहासकारांनी तीच पद्धत चोखाळली. इतिहास अभ्यासकांनी हे मुद्दे सपुरावा सिद्ध करायला हवेत. केवळ राजकीय स्वार्थासाठी असे मुद्दे चघळले जाणार असतील तर त्यातून काहीही साध्य होणार नाही. त्यातील तथ्यांचा शोध घेण्यासाठी इतिहास अभ्यासकांनी पुढे यायला हवे आणि या संशोधनातून जे पुढे येईल ते तितक्याच विशाल मनाने मान्यही करायला हवे. पण त्यासाठीचे इतिहास अभ्यासक कुठल्या जाती-धर्माचा प्रभाव असणारे नसावे तर ते लौकिकार्थाने इतिहासाच्या ध्यासासाठी झपाटलेले असावे इतकेच.