नमस्तस्ये नमो नम:

feature sampadkiy
संपादकीय

या देवी सर्वभूतेषु, शक्तीरुपेण संस्थिता,
नमस्तस्ये, नमस्तस्ये, नमस्तस्ये नमो नम:

म्हणजे संपूर्ण प्राणीमात्रांमध्ये जी देवी आईच्या रुपाने वास करते तिला नमस्कार, वारंवार नमस्कार.. सृष्टीतील या देवीचा म्हणजे सृजनाचा उत्सव आजपासून सुरू होतोय. नवरात्र म्हणजे नऊ रात्री. ह्या नऊ रात्री आणि दहा दिवसांच्या दरम्यान देवीची नऊ वेगवेगळी रूपे पुजली जातात. हा उत्सव म्हणजे आपण स्वतःला नवचैतन्याने भरून टाकण्यासाठी तसेच आंतरबाह्य शुद्ध होण्यासाठी आपला वेळ आणि सवड देण्याची संधी आहे. अर्थव्यवस्थेला चालना देणारा हा उत्सव आहेे. याच काळात बाजारपेठा गर्दीने फुलून जातात. नवे वाहन असो की घरातील काही नवे इलेक्ट्रॉनिक उपकरण, नवे घर असो की नवीन कपडे खरेदी, यांचा हाच हंगाम असतो. बहुसंख्य व्यापारी याच काळातील जोरदार खरेदीच्या जोरावर बाकीच्या आठ-दहा महिन्यांतील मंदीला तोंड देत असतात. परंतु गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही परिस्थिती थोडीशी नाजूक आहे. बाजारपेठा गर्दीने फुलल्या तर व्यवसाय वाढेल, पण त्यातून आरोग्याचा मोठा प्रश्न उद्भवू शकतो आणि बाजारपेठेत गर्दीच झाली नाही तर व्यापार्‍यांनी व त्यांच्याकडे कार्यरत कामगारांनी जगायचे कसे असाही यक्ष प्रश्न आहे. यातून सुवर्णमध्य काढण्याची जबाबदारी आता सरकार आणि प्रशासनासह आपल्या सगळ्यांचीच आहे. ही जबाबदारी आपण बखुबी पेलली तर भविष्यात उत्सव निर्विघ्नपणे पार पडतील.

गेली पावणेदोन वर्षे आपले सारे जीवनमान पोखरुन टाकणार्‍या कोरोना विषाणूच्या संसर्गाचा वेग आता मंदावण्याच्या मार्गावर आहे. उत्सव काळातील ही सर्वात दिलासादायक बातमी म्हणावी. या पार्श्वभूमीवर आठवी ते दहावीपर्यंतच्या ‘ज्ञानमंदिरां’ची घंटा एव्हाना वाजली आहे. आजपासून देवांच्या मंदिरात घंटेचाही आवाज निनादेल. दोन वर्षांपासून मंदिरे बंद राहिल्याने या स्थळांभोवती विकसित झालेल्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. मंदिरांबाहेर हार-फुले आणि पूजेचे साहित्य विकणार्‍यापासून पादत्राणे सांभाळण्याचे काम करणार्‍या अतिशय गरीब अशा श्रमिकांची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून गेली, हे सत्य नाकारता येणार नाही. राज्यातील काही मोठ्या देवस्थानांकडे पर्यटकांचा ओघ कमी झाला असल्याने त्यांच्या देणग्यांवर मोठा परिणाम झाला आहे. त्यापेक्षा अधिक परिणाम या मोठ्या देवस्थानांच्या आसपास असणार्‍या अनेक छोट्यामोठ्या व्यावसायिकांच्या दैनंदिन जीवनावर झाला आहे. त्यामुळे या व्यावसायिकांना वाचविण्यासाठी तरी मंदिरे खुली करणे गरजेचे होते. त्यानुसार आजपासून मंदिरे खुली होत असल्याने भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. सगळीकडेच मंदिरांमध्ये रंगरंगोटी आणि विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

मंदिराची साफसफाई आणि परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. निर्माल्य संकलन, भाविकांची तपासणी आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था यासंदर्भातील नियोजन अंतिम टप्प्यामध्ये आले आहेत. ज्येष्ठ नागरिकांसह, मंदिरात येणे शक्य नसलेल्या भाविकांसाठी बहुतांश मंदिर प्रमुखांनी ऑनलाइन दर्शनाची व्यवस्था केली आहे. या काळात गर्दी आटोक्यात आणण्याचे अवघड आव्हान मंदिर व्यवस्थापनाला पेलावे लागणार आहे. त्याचवेळी प्रशासनाचीही मोठी दमछाक होणार आहे. कोरोना प्रतिबंधक लसींचे दोन डोस घेतले आहेत, अशांनाच मंदिरात प्रवेश देण्याचे नियोजन बहुतांश ठिकाणच्या व्यवस्थापनाने केले आहे. परंतु त्यातून गोंधळ वाढणार आहे. अनेकांची इच्छा असूनही त्यांना लसीचा दुसरा डोस अद्याप मिळालेला नाही. तर अनेकांनी लसीकरणाचे प्रमाणपत्र डाऊनलोड केलेले नाही. ऐन गर्दीच्या वेळी या बाबींची तपासणी करणे तशी जिकरीची बाब आहे. अशा परिस्थितीत भाविकांनीही समजदारीची भूमिका घेणे गरजेचे आहे. ज्यांनी दोन्ही डोस घेतले आहेत, त्यांनीच मंदिरात प्रवेश केल्यास संभावित भांडण-तंटे होणार नाहीत. त्यातून आपल्या आरोग्याचेही संवर्धन होईल. मंदिरात जाणे शक्य नसल्यास कळसाचे दर्शन घेण्याची परंपराही प्राचीन आहे.

उज्जैनचे ज्योतिषाचार्य पंडित प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार, ग्रंथामध्ये लिहिले आहे की, ‘शिखर दर्शनम् पाप नाशम्।’ म्हणजेच कोणत्याही मंदिराच्या कळसाचे दर्शन केल्याने पापांचा नाश होतो. त्यामुळे दोन डोस घेतले नसतील तर कळसाचे दर्शन घेतल्यास काही बिघडणार नाही. दुसरीकडे ऑनलाईनच्या व्यवस्थेचाही उपयोग या काळात करुन घेणे गरजेचे आहे. मंदिरात दिसणाराही देव आहे आणि मोबाईल वा कॉम्प्युटरवर ऑनलाईनद्वारे दिसणाराही देवच आहे. दर्शनाचे माध्यम बदलले म्हणून श्रद्धेला तसूभरही धक्का पोहचत नाही. त्यामुळे गर्दीत जाऊन दर्शन घेण्यापेक्षा सध्याच्या घडीला ऑनलाईन दर्शनाचा पर्याय हा आरोग्यसंवर्धनाच्या दृष्टीने अधिक प्रशस्त वाटतो. मंदिरात जायचेच असल्यास सामाजिक अंतर पाळणे, मास्क लावणे आणि वारंवार सॅनिटायझरचा वापर करण्याची जबाबदारी भाविकांची आहे. ही जबाबदारी प्रत्येकाने कर्तव्य म्हणून पाळली तर कोरोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेपासून आपण लांब राहू शकतो. अन्यथा सणांनंतरची लाट कशी असते हे आपण गेल्या दिवाळीच्या काळात अनुभवलेच आहे. कोरोना गेला, आता लस घेण्याची काही गरज नाही, असे लोकांना वाटू लागले होते. त्यामुळे लोकही बिनधास्त झाले होते. पण अशा बेभानपणात लोक असताना कोरोनाचा पुन्हा फिरला. त्याचा संसर्ग वेगाने वाढू लागला. अनेकांना ऑक्सिजन मिळण्याची मुश्किल झाली. अन्य राज्यांमधून टँकरद्वारे ऑक्सिजन मागवावा लागला होता.

दुसरीकडे ग्रामीण भागात पाचवी ते बारावी तर शहरी भागात आठवी ते बारावीच्या वर्गांचा शिक्षणोत्सव अलिकडेच सुरू झालाय. लवकरच उर्वरित वर्गही सुरू होतील. शाळा जास्त काळ बंद राहिल्यास आजच्या या स्पर्धेच्या युगात आपल्या राज्यातील विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसू शकतो. लहान वर्गांच्या शाळा बहुदा दिवाळीनंतरच सुरू होतील. परंतु तोपर्यंत कोरोनाचे संकट गहिरे व्हायला नको. ते संकट टाळण्यासाठी प्रत्येकालाच जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील. नवरात्रोत्सवात गरबा-दांडियांचे कार्यक्रम मर्यादित स्वरुपात घेण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली होती. परंतु गर्दी आटोक्यात आणण्याची जबाबदारी प्रशासनाने घेतली नाही. त्यामुळे हे कार्यक्रम यंदाच्या वर्षीही बंदच असेल. हे एकाअर्थी बरेच झाले. गरबा आणि दांडिया हा गटा-गटाने नृत्य करण्याचा प्रकार आहे. त्यात सोशल डिस्टंन्सिंगचे पालन कसे होईल याचा विचार शासनाने केलेलाच दिसत नाही. केवळ राजकीय दबावापोटी कार्यक्रमांना मंजुरी देण्याची घाई करण्यात आली.

परंतु त्यातून कोरोनाचे संकट वाढण्याची शक्यता अधिक होती. नवरात्रीला प्रारंभ कसा झाला असावा याविषयी काही आख्यायिका आहेत. एका आख्यायिकेनुसार रामाच्या हातून रावणाचा वध व्हावा, या उद्देशाने नारदाने रामाला नवरात्रीचे व्रत करायला सांगितले. नंतर हे व्रत पूर्ण केल्यावर रामाने लंकेवर स्वारी करून शेवटी रावणाला ठार मारले. तर दुसर्‍या आख्यायिकेनुसार महिषासुर नावाच्या असुराशी प्रतिपदा ते नवमी असे नऊ दिवस युद्ध करून देवीने नवमीला रात्री असुराला मारले. तेव्हापासून तिला महिषासुरमर्दिनी म्हणू लागले. थोडक्यात असुरांचा नाश करणारा हा उत्सव आहे. गेल्या पावणेदोन वर्षांपासून कोरोना नावाचा असुर मानवसृष्टीला त्रास देतोय. या असुराचा वध करण्यासाठी शासन, आरोग्य यंत्रणा आणि पोलीस प्रशासन युद्ध पातळीवर प्रयत्न करताहेत. पण नवरात्रोत्सवाच्या काळात प्रत्येक सामान्य नागरिकाने या असुराचा वध करायचे ठरवल्यास आणि शासनाने जे निर्देश दिले आहेत त्यांचे काटेकोरपणे पालन केल्यास त्यातून सणासुदीचा आनंद द्विगुणीत होऊ शकतो.