मंदिरे उघडण्याची सुबुद्धी दे रे म्हाराजा !

महाराष्ट्र वगळता देशभरात ठिकठिकाणी मंदिरे केंद्राच्या आणि राज्यांच्या गाईडलाइन्सचे पालन करून उघडण्यात आली आहेत. महाराष्ट्रात हॉटेल्स, मॉल्स, रेस्टॉरण्ट आणि बार सुरू होतात, मंदिरे मात्र कुलुप लावून बंद आहेत, असा दुजाभाव ठाकरे सरकार का करतेय, हा सवाल राज्यातील साडेबारा कोटी जनतेला पडला आहे. मंदिरात आबाल वृद्धांपासून युवा, महिला, पुरूष आणि जे एकटे जीवन जगत आहेत या सर्वांना भगवंताचा आधार असतो. कोरोनाच्या काळात सारं काही राम भरोसे असताना आणि लस कधी येणार याची काहीच शाश्वती नसताना केवळ मंदिरे बंद ठेवून सरकारला यातून काय साध्य करायचे आहे. आजही बेस्टमधून, एसटीतून, भाजीमार्केट, मासळीबाजारात एक नजर टाकली तर तिथेही गर्दी होतच आहे. गर्दी कमी झालेली नाही आणि कोरोनाच्या भीतीने आता गर्दी कुठलीच कमी होणार नाही. याचे कारण आता प्रत्येकाला कोरोनासोबतच जगायचे असल्याने मास्क, सॅनिटायजर आणि सोशल डिस्टन्सिंग पाळत नेहमीचे सर्व व्यवहार तसेच सुरू आहेत. फक्त आता ठाकरे सरकारने मनातील भीती दूर करण्याची गरज आहे.

कोरोनामुळे राज्यात लॉकडाऊन सुरू करुन आज 200 दिवस पूर्ण झाले आहेत. कोरोनामुळे देशभरात आतापर्यंत सुमारे 67 लाखांहून अधिक कोरोनाबाधित झालेत त्यापैकी समाधानकारक बाब म्हणजे 57 लाखांहून अधिक रुग्ण देशभरात कोरोनाच्या विळख्यातून बरे आलेत. एक लाखांहून अधिक जणांना आपले प्राण गमवावे लागले. महाराष्ट्राच्या आकडेवारीवर नजर टाकली तर 14 लाख रूग्ण पॉझिटिव्ह झालेत त्यापैकी 11 लाख रूग्ण बरे झालेत. मात्र असे असले तरी राज्यात 38 हजार नागरिकांचा कोरोनाने मृत्यू झाला, ही वस्तूस्थिती नाकारता येणार नाही. मग मागील साडे सहा महिन्यांच्या काळात घडलंय काय तर जगभरात कोरोनाच्या विषाणूने हाहा:कार माजवलाय. कोरोनाने जगभरात 10 लाख लोकांचा जीव घेतला. संसर्गाच्या भीतीने उलाढाल थांबली आणि प्रत्येकाने मरणाच्या भीतीने स्वत:ला घरातच कोंडून घेतलं. कोरोनाने बिघडलंय काय तर जगातील सर्वच देशांची अर्थव्यवस्था विस्कटलीय. लोकांच्या नोकर्‍या गेल्याने कोट्यवधी लोक बेरोजगार झालेत. उपासमार झाली आणि त्यातून आलेले नैराश्य, एकटेपणाने माणूस अजूनच हवालदिल झाला. कोरोनाचा कहर कधी संपणार, लस कधी येणार असा प्रश्न प्रत्येकाला पडू लागला आणि त्यातूनच हळूहळू मास्क, सॅनिटायजर आणि सोशल डिस्टन्सिंग सांभाळत मागील महिन्याभरापासून अनलॉक ४ आणि आता सुरू असेलेले अनलॉक 5 सर्वांना दिलासा देणारे वाटतेय.

‘घडलंय बिघडलंय’प्रमाणे काही गोष्टी पूर्ववत होण्यास सुरूवात झाली. हॉटेल्स, बार, रेस्टॉरन्ट सुरू करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनलॉक-५ मध्ये 5 ऑक्टोबरला परवानगी दिली आहे. त्याचप्रमाणे राज्य सरकारने राज्यातील मंदिरे आणि धार्मिक स्थळेही सुरू करावीत, अशी मागणी जोर धरू लागली असून, ती रास्त आहे. कारण थिएटर्स, नाट्यगृहे सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने 15 ऑक्टोबरपासून मार्गदर्शक तत्वे जाहीर केली असून राज्यातही ठाकरे सरकार याबाबतीत सकारात्मक आहे. पण मंदिरे सुरू करण्याबाबत ठाकरे सरकारकडून कोणतेही संकेत दिले जात नाहीत. राज्यातील सर्व व्यवस्था हळूहळू सुरू होत असताना केवळ मंदिरे बंद ठेवण्यामागचे सुपीक डोके कुणाचे? मंदिर उघडल्यावर कोरोनाचा प्रसार जलदगतीने होणार असे कुणी मुख्यमंत्र्यांना खासगीत पटवून दिले आहे का ? हे कुणालाच समजत नाही.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकारचा मंदिर, मशीद, चर्च, गुरुद्वारा, अग्यारी सुरू करण्यावर राग दिसतो, पण त्याचे कारण काय हे मात्र मागील काही महिन्यांपासून अनुत्तरीतच आहे. ‘बाकी सर्व हळूहळू तुपाशी, भगवंत मात्र उपाशी,’ अशीच स्थिती सध्या राज्यातील मंदिरांत बंदिस्त झालेल्या परमेश्वराची करुन ठेवली आहे. कारण भगवंत आणि भक्त यांचे अतुट नाते असते. भगवंत भक्तीचा भुकेलेला असतो. सध्या महाराष्ट्रात सर्व मंदिरांतील देव हे कुलुपात बंदिस्त असल्याने भक्तांची ताटातूट झाली आहे. सहा महिने भक्तांनीही परमेश्वराचा हा विरह सहन केला, आता मात्र भक्तांचा संयम सुटत आहे. त्यामुळे ठाकरे सरकारला लवकरात लवकर सुबुद्धी दे रे बाबा, असे साकडे भाविक आता राज्यभरातून घालत आहेत.

केंद्र सरकारने अनलॉक-४ जाहीर करतानाच मंदिरे उघडण्याबाबत मार्गदर्शक तत्वे जाहीर केली. त्यामध्ये मंदिरे किती वाजता उघडतील, कधी बंद होतील, मास्क, सॅनेटायझर आणि सोेय डिस्टन्सिंगची कडक उपाययोजना करताना कुठेही गर्दी होणार नाही, सार्वजनकि भंडारा आणि प्रसादास मनाई अशा कडक उपाययोजना मांंडल्या. त्या त्या राज्यातील मंदिर देवस्थान समित्यांनीही परमेश्वर आणि भक्त यांच्यातील कोरोनाच्या काळात वाढलेले अंतर कमी करण्यासाठी काटेकोर नियमांचे पालन करीत मंदिरे सुरू केली. महाराष्ट्र वगळता देशभरात ठिकठिकाणी मंदिरे केंद्राच्या आणि राज्यांच्या गाईडलाइन्सचे पालन करून उघडण्यात आली आहेत. महाराष्ट्रात हॉटेल्स, मॉल्स, रेस्टॉरण्ट आणि बार सुरू होतात, मंदिरे मात्र कुलुप लावून बंद आहेत, असा दुजाभाव ठाकरे सरकार का करतेय हा सवाल राज्यातील साडेबारा कोटी जनतेला पडला आहे. मंदिरात आबाल वृद्धांपासून युवा, महिला, पुरूष आणि जे एकटे जीवन जगत आहेत या सर्वांना भगवंताचा आधार असतो. कोरोनाच्या काळात सारं काही राम भरोसे असताना लस कधी येणार याची काहीच शाश्वती नसताना केवळ मंदिरे बंद ठेवून सरकारला यातून काय साध्य करायचे आहे.

आजही बेस्टमधून, एसटीतून, भाजीमार्केट, मासळीबाजारात एक नजर टाकली तर तिथेही गर्दी होतच आहे. गर्दी कमी झालेली नाही आणि कोरोनाच्या भीतीने आता गर्दी कुठलीच कमी होणार नाही. याचे कारण आता प्रत्येकाला कोरोनासोबतच जगायचे असल्याने मास्क, सॅनिटायजर आणि सोशल डिस्टन्सिंग पाळत नेहमीचे सर्व व्यवहार तसेच सुरू आहेत. दुकाने रात्री 10 पर्यंत उघडी आहेत, हॉटेल, बार सुरू झालेत. ई-पास बंद झाल्याने राज्यांतर्गत वाहतूक बिनदिक्कत सुरू आहे. सरकारच पर्यटन वाढीसाठी अनेक योजना जाहीर करीत असताना केवळ मंदिर बंद ठेवून मुख्यमंत्री कुणाचे हित जपत आहेत हाच खरा सवाल आहे. प्रत्येक मंदिर, मशिद आणि चर्चसमोर फुलांची दुकाने असतात. एका हाराच्या दुकानावर साधारण 5 ते 7 जणांचे कुटुंब अवलंबून असते. त्यांचा रोजगार मागील सहा महिन्यांत कोरोनाने गिळंकृत केलेला असताना आता सर्व काही हळूहळू सुरळीत होत असताना मंदिरांवर अवलंबून असणार्‍यांवर अजून किती दिवस उपासमार लादण्याचा विचार राज्यकर्त्यांचा आहे.

कोरोनामुळे जी भीती एप्रिल ते जुलै या कालावधीत होती तेवढी आता राहिलेली नाही हे मान्य करावे लागेल. त्या काळात एखाद्या अ‍ॅम्ब्युलन्सचा आवाज जरी आला तरी धडकी भरायची. मात्र आता काही मिनिटा मिनिटाला सायरनचा आवाज येतो. मात्र त्यातूनच मुंबईकर वाट काढत असतो. हॉस्पिटलला बेड देण्यात आणिऑक्सीजनचा तुटवडा कमी करण्यात राज्य सरकार आणि महापालिकांच्या प्रयत्नांना हळूहळू यश येत आहे. कोरोनाची लक्षणे आढल्यास संबंधित कुटुंब त्या व्यक्तीला समजून घेते. तो राहत असलेल्या कॉलनी, सोसायटीत कुणी कोरोनाबाधितांना वाळीत टाकत नाही हेच काय ते मागील सहा महिन्यांतील फलीत. त्यामुळे मागील 200 दिवसांतील सुधारणा काय तर प्रत्येकजण आपापली काळजी घेत नोकरी, धंदा, ऑनलाइन शिक्षण घेत आहे. राज्य सरकारने काही घेतलेल्या चांगल्या उपक्रमांमुळे कोरोनाबाबत जागरुकता आली आणि त्यातूनच मृत्यू दर कमी कमी होत गेला आहे.

राज्यात अनलॉक-5 मध्ये राज्य सरकारने हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि बार खुले करण्यास काही अटी आणि नियमानुसार परवानगी दिली. आता राज्य सरकारने राज्यातील मंदिरे आणि धार्मिक स्थळेही सुरू करावीत, अशी मागणी जोर धरू लागली आहे. मंदिरे सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विविध धार्मिक गटांशी चर्चा करीत आहेत. मात्र त्यावर तात्काळ निर्णय घेणे अपेक्षित आहे. कारण येत्या 10 दिवसांनंतर नवरात्रोत्सवाला सुरूवात होईल. याअगोदरच सर्व नवरात्रोत्सव मंडळांनी यावर्षी गरबा करणार नाही अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे दांडिया किंवा रासगरबा होणारच नाही. त्यामुळे नवरात्रोत्सवात मंदिरे उघडल्यास कोरोनामुळे आलेली नकारात्मकता, मरगळ दूर होईल आणि सकारात्मक बदल सर्वांमध्ये होण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे. अनेकांच्या नोकर्‍या गेल्यात, काम करुनही पूर्ण मोबदला नाही, आजारपण, एकाकीपणा, भीती आणि आर्थिक प्रश्नांपासून सुटकारा मिळ्यासाठी भगवंताच्या दरबारात काही क्षण घालवावे अशी इच्छा अनेकांनी बोलून दाखवली आहे. ज्येष्ठ नागरिक तर डोळ्यात तेल घालून मंदिरे कधी उघडतात याची वाट बघतात तर घरातील महिलावर्गही मंदिरे सुरू झाल्यावर घरातील एकाकीपणा दूर होईल यासाठी दररोज ठाकरे सरकारच्या पुन:श्च हरिओम, मिशिन बिगेन, अनलॉक यावर बारीक लक्ष ठेवून आहेत.

सोमवारपासून राज्यात अनलॉक-५ अंतर्गत रेस्टॉरंट, बार सुरू झाले. सरकार हे करू शकते तर धार्मिक स्थळे का उघडत नाही, असा प्रश्न वारंवार विचारला जाऊ लागलाय. यावर हॉटेल्स रेस्टॉरंट, बार हे 33 ते 50 टक्के क्षमतेने उघडण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. पण धार्मिक स्थळांबाबत अशी अट टाकणे शक्य होणार नाही. अशा परिस्थितीत मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन गर्दी टाळण्यासाठीच्या उपाययोजनांबाबत मुख्यमंत्री या क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा करीत असल्याचा पोकळ युक्तीवाद सरकारकडून केला जात आहे. विशेष म्हणजे विरोधी पक्ष असलेल्या भाजप आणि मनसेकडून वारंवार मंदिरे उघडण्याबाबत मागणी सुरूच असताना आता महाविकास आघाडी सरकारमधील राष्ट्रवादी आणि काँग्रेसनेही मंदिरे लवकरात लवकर उघडावीत अशी मागणी पत्राद्वारे, ट्विटच्या माध्यमातून केली आहे. याचा अर्थ असा काढायचा का की, मंदिरे उघडण्यास केवळ शिवसेनेचाच विरोध आहे.

काही दिवसांपूर्वी भाजपच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्रात मंदिरे लवकरात लवकर खुली करावीत, अशी मागणी राज्यपालांकडे केली होती. तसेच मंदिरांच्या पुजार्‍यांच्या शिष्टमंडळाने मनसे अध्यक्ष राज्य ठाकरे यांची भेट घेऊन मंदिरे खुली करण्याची मागणी केली होती. तर वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी त्यासाठी पंढरपूरमध्ये आंदोलन केले होते. सर्वच प्रमुख पक्षांकडून वारंवार मंदिरे भाविकांसाठी खुली करण्यासाठी मागण्या होत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे केवळ झोपेचे सोंग आणत असल्याचा हा प्रकार आहे. जर त्यांचा मंदिरांवर आणि तेथील होणार्‍या पूजेवर एवढा राग असे असेल तर आषाढी एकादशीला मुख्यमंत्री ठाकरे यांनी सपत्नीक विठ्ठलपूजा का केली? सर्व उद्घाटने, भूमिपूजन, बैठका, प्रकाशन सोहळे आणि कॅबिनेट बैठका जर व्हिडीओ कॉन्फरन्सने करीत असताना पंढरपुरच्या विठ्ठठ्ल रखमुाईच्या दर्शनाला स्वत: ड्रायव्हिंग करीत का गेले, असा सवाल आता वारकरी विचारत आहेत. पुढील महिन्यात होणार्‍या कार्तिकी एकादशीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही घरुनच ऑनलाइन पूजा करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. राज्यकर्त्यांना आपल्या मनाप्रमाणे वागता येते. आपल्याला एक न्याय आणि दुसर्‍याला दुसरा अशी भूमिका घेतल्यास त्याचे पडसाद भूतकाळात वेगळे उमटलेले आहेत याचे अनेक दाखले आहेत.

लॉकडाऊनमुळे जीम आणि मंदिरे गेल्या पाच महिन्यांपासून बंद आहेत. ती पुन्हा सुरू करावीत या मुद्यावरून भाजपने अत्यंत आक्रमकपणे भूमिका लावून धरली आहे. महाराष्ट्र सरकार दारुची दुकाने उघडायला परवानगी देते, पण मंदिरे उघडायला सरकार अजूनही तयार नाही. वारंवार मागणी करूनही सरकार ऐकायला तयार नाही. यापूर्वी 15 ऑगस्टला जीम आणि मंदिरे सुरू होणार असे सांगितले गेले होते. मात्र, आता ऑक्टोबर महिना उजाडायला आला तरी सरकारने यासंदर्भात कोणतेही भाष्य केलेले नाही. मंदिरे ही आपल्या सर्वांची श्रद्धास्थाने असतात. देशभरात मंदिरे खुली करण्याचा निर्णय याआधीच घेण्यात आला आहे. महाराष्ट्रातील मंदिरे खुली करण्यावर भाजपला मंदिरांची काळजी आहे, पण आघाडी सरकारला मंदिरासोबतच मंदिरात जाणार्‍यांचीसुद्धा काळजी आहे. तरीही लवकरच योग्य तो विचार करून राज्यातील सर्व धार्मिक स्थळे उघडली जातील, असे पालपुद आळवले जात आहे. हॉटेल्स, रेस्टॉरन्ट, बार सुरू झालेत. वाईनशॉप सकाळपासून रात्रीपर्यंत बिनादिक्कत सुरू आहेत. राज्यातील चित्रपटगृहे सुरू करण्यासाठी ठाकरे सरकार सकारात्मक असण्याबाबत बातम्या येतात. केंद्र सरकाने 15 ऑक्टोबरपासून सिनेमा हॉल्स, चित्रपटगृहे, नाट्यगृहे सुरू करण्यास संमती दिली आहे. नवरात्र. दसरा, दिवाळी हा चित्रपट, नाटकांचा मौसम आहे, याचा साक्षात्कार राज्य सरकारला होत असेल तर मंदिरे सुरू करण्याबाबत कुणाच्याही तोंडून एक शब्द बाहेर का येत नाही?

हॉटेल्स, बार, रेस्टॉरन्ट सुरू करण्यासाठी उद्योजक, प्रथितयश नावे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जातात मात्र मंदिरे सुरू करण्यासाठी भगव्या वेशात किंवा धोतरात वावरणारे पुजारी ठाकरे सरकारला दिसत नाहीत का? हा खरा प्रश्न आहे. मागील सहा महिन्यांत केवळ हॉटेल इंडस्ट्री, मनोरंजन इंडस्ट्री तोट्यात आहे का ? मंदिरावरच्या बाहेर स्टॉल लावणार्‍या, पेढे मोदक विकणार्‍यांच्या उपासमारीची हाक राज्य कर्त्यांच्या कानावर जात नाही का? की सरकारला केवळ सुटाबुटातीलच लोकांचा कळवळा आहे, हे एकदा मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्पष्ठ करावे. केवळ मंदिरे सुरू केल्यावरच गर्दी हाईल, अशी भीती मुख्यमंत्र्यांच्या मनात भरविण्यात आजूबाजूच्या राक्षसांनी कुरघोडी केली असेल तर भीत्यापेटी ब्रम्हराक्षस, अशी एक म्हण प्रचलीत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी न भीता न डगमगता इतर गोष्टी हळूहळू सुरू करण्यावर भर देताना या भगवंताचा आवाजही ऐकावा आणि आपल्या आवाजाच्या जोरावर कडक नियमावली लावत नवरात्रीच्या अगोदर मंदिरांचे दरवाजे सामान्य भक्तांसाठी खुले करावेत, हीच अपेक्षा.