घरफिचर्समायमहानगर ब्लॉगराज ठाकरेंचा आवाज काश्मिरी पंडितांचे पलायन थांबवेल!

राज ठाकरेंचा आवाज काश्मिरी पंडितांचे पलायन थांबवेल!

Subscribe

काश्मीरमधून हिंदू पंडितांच्या दहशतवाद्यांकडून हत्या होत असल्यामुळे त्यांचे पुन्हा पलायन सुरू झाले आहे. अगोदरच १९९० साली काश्मीरमधून मोठ्या प्रमाणात काश्मिरी पंडितांनी जीव वाचवण्यासाठी देशाच्या अन्य भागात आश्रय घेतला आहे. डोळ्यादेखत सगळे होत असतानाही केंद्र सरकार, प्रशासन, लष्कर काय करत आहे, असा प्रश्न सामान्य माणसाला पडतो. अशा वेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरेे यांनी आवाज उठवला तर काश्मीरमधील हिंदू पंडितांचे जीव वाचवण्यासाठी आणि पलायन थांबवण्यासाठी केंद्र सरकार सक्रिय होईल असे वाटते. कारण राज ठाकरे यांच्या आवाजामुळे बदल घडल्याचे लोकांनी बरेचदा पाहिलेले आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी बिगर मुस्लिमांचे आणि त्यातही प्रामुख्याने हिंदू पंडितांचे हत्याकांड सुरू केले आहे. त्यामुळे पुन्हा १९९० साली हिंदू पंडितांनी आपला जीव वाचवण्यासाठी नेसत्या कपड्यानिशी पळ काढला, त्याची पुनरावृत्ती होते की काय असे वाटू लागले. अर्थात आता तिथे हिंदू पंडितांची संख्या खूपच कमी झालेली आहे. पण जे तिथे कसेबसे राहिले होते किंवा सरकारने त्यांना सरकारी नोकर्‍या देऊन पुन्हा आणले होते, त्यांची परिस्थिती अलीकडे सुरू झालेल्या हत्यासत्रामुळे फारच बिकट झालेली आहे. त्यांना आपली घरेदारे सोडून काश्मीरमधून पळ काढून अन्य राज्यांमध्ये आश्रय शोधावा लागत आहे.

अशा वेळी सर्वसामान्य माणसाला असा प्रश्न पडतो की, देशात हिंदुत्ववादी विचारसरणीच्या नरेंद्र मोदींचे सरकार आहे, जिथून काश्मिरी पंडित पलायन करत आहेत, तो भाग भारताच्या हद्दीत आहे, तर मग हे हत्याकांड होत असताना भारताचे लष्कर काय करत आहे, त्यांना मोदी सरकार आदेश देऊन हत्याकांड घडवणार्‍या दहशतवाद्यांचा बंदोबस्त का केला जात नाही. अलीकडेच जेव्हा ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट प्रसिद्ध झाला तेव्हा काश्मिरी पंडितांचे काय हाल झाले ते लोकांसमोर आले, तोपर्यंत त्याची फारशी कुणाला कल्पना नव्हती. १९९० साली काश्मिरी पंडितांनी जीवानिशी पलायन केले. आजही यातील अनेक लोक अतिशय हलाखीच्या अवस्थेत देशाच्या अन्य भागांमध्ये आपले जीवन कंठत आहेत. त्यांच्यावर हा जो काही आघात झाला, त्यामुळे अनेक लोक मनोरुग्ण झाले. पण हे पाहिल्यानंतर काही वेळ हळहळ व्यक्त करण्यापलीकडे देशातील सामान्य माणसांच्या हाती काहीच नाही.

- Advertisement -

नरेंद्र मोदी यांच्या सरकारने काश्मीरमधील ३७० कलम रद्द करून जम्मू-काश्मीरमधील मुस्लीम नेते आणि पाकिस्तान यांना जबरदस्त धक्का दिला. कारण काश्मीरमधील मुस्लीम नेत्यांची ३७० कलमामुळे काश्मीर ही स्वत:ची जहागीर झाली होती. त्याचसोबत बाजूलाच असलेल्या पाकिस्तानसाठी काश्मीरचा स्वतंत्र दर्जा हा सोयीचा होता. पण मोदी सरकारने भाजपच्या वचननाम्यानुसार ३७० कलम रद्द केले. त्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये मुस्लीम नेत्यांची मक्तेदारी मोडून पडली आणि पाकिस्तानची गैरसोय होऊ लागली. त्यातूनच मग पुन्हा काश्मीरमधील हिंदूंचे दहशतवाद्यांकडून टार्गेट किलिंग सुरू झाले. त्यातूनच आता काश्मीरमधून हिंदू पंडितांचे पुन्हा पलायन सुरू झाले आहे. आपल्याच देशात आपल्याला आपले घरदार सोडून जीव वाचवण्यासाठी अन्यत्र पलायन करावे लागते, यापेक्षा दुर्दैव ते कुठले असणार. हे सगळे प्रकार पाहता काश्मीरमधून सगळ्या बिगर मुस्लिमांना बाहेर पिटाळून लावण्याचा हा डाव असल्याची शंका आल्यावाचून राहत नाही. हिंदूंना काश्मीरमधून हाकलून देण्याच्या कटाचे सूत्रधार हे पाकिस्तानात बसलेले आहेत, हे काही नव्याने सांगण्याची गरज नाही. कारण भारतात १९९३च्या मुंबई बॉम्बस्फोटापासून आजवर ज्या घातपाताच्या घटना घडल्या त्यामागे पाकिस्तानातील सूत्रधारांचा हात असल्याचे उघड झालेले आहे.

मुंबईत हाहाकार उडवणारा अजमल कसाब आणि त्याचे साथीदार हे पाकिस्तानातून आलेले होते, हे सिद्ध होऊनही पाकिस्तानने त्यांच्या मृतदेहांचा ताबा घेतला नाही. पाकिस्तानातून अनेक आत्मघातकी बॉम्ब भारतात हल्ल्यासाठी पाठविण्यात येतात. सध्या पाकिस्तान हा चीनच्या कचाट्यात सापडला असून त्याची अशी काही हालत झालेली आहे की तोच एक आत्मघातकी बॉम्ब झालेला आहे. त्यामुळे पाकिस्तानचा प्रवास आता स्वत:चा घात करून घेण्याच्या दिशेने वेगाने सुरू आहे. पाकिस्तानमध्ये महागाई प्रचंड वाढली आहे. परिस्थितीवरील सरकारचे नियंत्रण सुटत आहे. पाकिस्तानचे तीन तुकडे होतील, असे पाकिस्तानचे पदच्युत पंतप्रधान इम्रान खान स्वत:च म्हणत आहेत. त्यामुळे पाकिस्तानची सध्या काय अवस्था आहे ते लक्षात येऊ शकते. त्यामुळेच आपले अस्तित्व टिकवण्यासाठी पाकिस्तान स्वत: पोसलेल्या हस्तकांच्या माध्यमातून भारतातील हल्ले वाढवणार यात शंका नाही. कारण भारतातील परिस्थिती अस्थिर राहील आणि भारत पाकिस्तानध्येच गुंतून राहील यासाठी चीनसारखे अन्य देश पाकिस्तानला मदत करत असतात. अमेरिका वरून पाकिस्तानच्या कारवायांबद्दल नाराजी व्यक्त करत असला तरी आतून त्याला आर्थिक आणि लष्करी मदत करत असतो.

- Advertisement -

या देशांच्या मदतीमुळेच पाकिस्तान भारताच्या कुरापती काढत असतो. या सगळ्याला धार्मिक अंग आणि रंगही आहे. दहशतवादाला कुठला धर्म नसतो, असे म्हटले तरी त्याला विशिष्ट धर्माचा रंग देऊन त्या माध्यमातून त्या धर्मातील लोकांना दहशतवादी कारवायांमध्ये गुंतवले जाते किंवा सहाय्यभूत केले जाते. पाकिस्तानच्या निर्मात्यांनीच त्या देशाला इस्लामिक स्टेट म्हणून घोषित केलेले होते. स्वतंत्र भारतातील सत्ताधारी नेत्यांनी भारताला धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून घोषित केले. पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या सूत्रधारांचे हल्ले हे धार्मिक आधार घेऊन होत आहेत. पाकिस्तानातील कट्टरवादी लोक भारताला हिंदुस्तान असेच संबोधतात. त्यामुळे इस्लामिक स्टेट असलेल्या पाकिस्तानची लढाई ही सेक्युलर भारताशी असते. त्यामुळे भारतविरोधात कारवाया करताना पाकिस्तान धर्माच्या नावावर संघटित असतो, पण भारत मात्र सेक्युलॅरिझमच्या नावाखाली विविध विचारांमध्ये विभागलेला असतो.

त्यामुळे भारताच्या मुठीएवढा असलेला पाकिस्तान भारताला वर्षानुवर्षे झुंजवत आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये अनेक लोकांचे बळी घेत आहे. इतकेच नव्हे तर पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या म्होरक्यांना सरकारकडून मदत केली जात आहे, संरक्षण पुरवले जात आहे. त्यांच्यावर न्यायालयाकडून काहीतरी दिखावू कारवाई करण्यात येते. पाकिस्तानात बसलेले अनेक दहशतवादी म्होरके हे भारताची डोकेदुखी ठरत आहे. कारण सीमेपलीकडून हे म्होरके भारतातील लोकांना धर्माच्या नावावर आपल्याकडे वळवत आहेत, त्यांचा स्लीपर सेल्स म्हणून वापर करत आहेत. त्यांच्या माध्यमातून घातपात घडवत आहेत. सध्या काश्मीरमध्ये जी पंडित आणि बिगर मुस्लिमांची कत्तल सुरू आहे, त्यामागे पाकिस्तानची प्रेरणा आहे. कारण पाकिस्तानने भारतविरोधातील आपल्या कारवाया थांबवल्या तर त्यांना भारतविरोधी कारवाया करण्यासाठी काही देशांकडून जे फंडींग मिळते ते मिळणार नाही.

भारत जरी या सगळ्या गोष्टीकडे धर्मनिरपेक्ष म्हणून पाहत असला तरी हल्लेखोर मात्र आपल्या हल्ल्यांना धार्मिक रंग देऊन विशिष्ट धर्माच्या लोकांचा नैतिक पाठिंबा मिळवण्यात यशस्वी ठरत आहेत. अशा यावेळी या सगळ्याला उत्तर कसे द्यायचे हा एक कूटप्रश्न होऊन बसतो. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पक्षाची निशाणी ही रेल्वेचे इंजिन आहे. त्यांचे हे इंजिन शासकीय यंत्रणेला चालना देत असल्याचे बरेच वेळा दिसून आलेले आहे. म्हणजे राज ठाकरे यांनी एखाद्या प्रश्नावर भूमिका घेऊन आपले विचार मांडले की त्याची सत्तेत असलेल्या सरकारला दखल घेऊन त्यानुसार कारवाई करावी लागते. कारण राज ठाकरे हे लोकांच्या मनातले बोलत असतात. त्यांनी गुढीपाडव्याच्या सभेत मशिदींवरील भोंगे उतरवण्याचा विषय जाहीर केला आणि त्याला अल्टिमेटम दिले. खरे तर मशिदींवरील ध्वनी प्रदूषण करणारे भोंगे उतरविण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने अगोदरच दिलेला आहे, पण कुणी त्याची दखल घेत नव्हते.

धार्मिक विषय आहे म्हणून कुठल्याही पक्षांचे सरकार असले तरी त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करण्यात येत होते, पण राज ठाकरे यांनी हा विषय उचलून धरल्यानंतर सर्वात अगोदर भोंगे उतरवण्याची अंमलबजावणी उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने केली. त्यांनी प्रशासनाला मशिदींसोबतच इतर धर्मियांच्या धर्मस्थळांवरील भोंगे उतरवण्याचे आदेश दिले आणि त्याची अंमलबजावणी करायला लावली. इतकेच नव्हे तर महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीने धार्मिक स्थळांवरील भोंग्यांबाबत सर्वपक्षीयांची बैठक बोलावून भोंग्यांच्या वापराविषयी नियमावली लागू केली. राज ठाकरे यांचा पक्ष सध्या राज्यात सत्तेत नाही. त्यांना निवडणुकीच्या राजकारणात फारसे यश मिळत नाही. पण असे असले तरी राज ठाकरे यांच्या आवाजामध्ये प्रचंड शक्ती आहे. त्याची दखल कुठल्याही सरकारला घ्यावी लागते.

सध्या काश्मीरमधून बिगर मुस्लिमांना आणि प्रामुख्याने हिंदू पंडितांवर हल्ले करून पळवून लावण्याचे जे काही प्रकार सुरू आहेत, त्याला कोण रोखणार हा प्रश्न आहे, पण राज ठाकरे यांनी काश्मीरमधून जीव वाचवण्यासाठी घरेदोरे सोडून पलायन करणार्‍या या लोकांसाठी आवाज उठवला तर योगी आदित्यनाथ सरकारने जशी राज यांच्या भोंगे उतरविण्याच्या घोषणेची दखल घेतली तशी केंद्रातील मोदी सरकार घेईल आणि लष्कराला आदेश देईल. त्यानंतर हिंदूंचे टार्गेट किलिंग करणार्‍या दहशतवाद्यांचा बंदोबस्त करण्याच्या कामाला गती येईल असे वाटते. राज ठाकरे यांच्या पक्षाला निवडणुकांमध्ये फारसे यश मिळत नसले तरी राज ठाकरे यांचा प्रभाव काही त्यामुळे कमी होत नाही. त्यांच्या वाढत्या वयाप्रमाणे तो वाढत जात आहे. राज ठाकरे यांच्यासारख्या नेत्याची खरी गरज समाजाला आपत्कालीन परिस्थितीत लागत असते. त्याच वेळी त्यांचे महत्व लोकांच्या लक्षात येते.

रझा अकादमीच्या कार्यकर्त्यांनी आझाद मैदानात जो हैदास घातला तेव्हा धार्मिक तेढ वाढेल म्हणून सत्ताधारी सरकारसह सगळेच राजकीय पक्ष मूग गिळून गप्प बसले. प्रसारमाध्यमांच्या ओबी व्हॅन जाळल्या तरी ते काही बोलले नाहीत. पुरुष आणि महिला पोलिसांवर लैंगिक हल्ले झाले तरी पोलीस प्रमुखांनी पोलीस अधिकार्‍यांना शिव्या देऊन गप्प बसवले. शासन, प्रशासन काहीच न करता गप्प बसतात आणि लोकांच्या मनात धगधगणार्‍या भावनांचा अवमान करतात, तेव्हा एखादा नेता पुढे येऊन त्याने लोकांच्या मनातील धगधग सगळ्यांसमोर मांडण्याची गरज असते. त्याची पूर्तता राज ठाकरे करत असतात. रझा अकादमीच्या कार्यकर्त्यांनी जी कृत्ये केली, त्याविरोधात राज ठाकरे यांनी मेळावा घेऊन आवाज उठवला. त्यानंतर सरकार याविषयी सक्रिय झाले. सध्या काश्मीरमधून बिगर मुस्लीम आणि हिंदू पंडितांच्या ज्या हत्या सुरू आहेत, त्यामुुळे ते जीव वाचवण्यासाठी पलायन करत आहेत. ते पलायन थांबवायचे असेल तर राज ठाकरे यांनी त्यासाठी आवाज उठवण्याची गरज आहे. त्यांनी तसे केले तर शासन, प्रशासन आणि अन्य यंत्रणा दखल घेऊन पावले उचलतील. परिणामी काश्मिरी पंडितांच्या हत्या आणि होणारे पलायन थांबेल.

Jaywant Rane
Jaywant Ranehttps://www.mymahanagar.com/author/rjaywant/
25 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. राजकीय, सामाजिक, वैचारिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -