काश्मिरी पंडित पुन्हा वार्‍यावर

जम्मू-काश्मीर खोर्‍यातील काश्मिरी पंडित, हिंदू आणि परराज्यातील नागरिकांना दहशतवाद्यांकडून लक्ष्य करून त्यांच्या हत्या केल्या जात आहेत. याशिवाय काही स्थनिक नागरिकांवरही हल्ले केले जात आहेत. काश्मीर खोरे पूर्वीपेक्षा शांत झाल्यामुळे अनेक काश्मिरी पंडित कुटुंबे पुन्हा काश्मीर खोर्‍यात परतले होते.

संपादकीय

देशाला धार्मिक तेढ, संघर्ष आणि जातीय दंगली तशा नव्या नाहीत. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरही देशात असे प्रकार अनेकदा घडलेले आहेत. त्याही स्थितीतून देश सावरला. आता पुन्हा एकदा एका विशिष्ट धर्माच्या धार्मिक वास्तूंवर दावे केले जात असल्यानं देशातलं वातावरण गढूळ होताना दिसत आहे. त्यातूनच देशात पुन्हा संघर्षाची ठिणगी पडली आहे. दुसरीकडे दहशतवाद्यांनी पुन्हा डोकं वर काढून काश्मीर खोर्‍यात टार्गेट किलींगचं सत्र सुरु करत निष्पापांचे जीव घ्यायला सुरुवात केली आहे. धगधगतं काश्मीर पुन्हा एकदा दहशतवादी कारवायांनी हादरू लागलं आहे. काश्मीरमध्ये ५ ऑगस्ट २०१९ पासून टार्गेट किलिंगची मालिका सुरू झाली आहे. याचदिवशी केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा (३७० कलम) काढून जम्मू-काश्मीरला केंद्रशासित प्रदेश घोषित केले होते. काश्मिरी पंडितांच्या परतीसाठी सरकारने प्रयत्न केले.

त्यांना नोकर्‍या दिल्या आणि राहण्यासाठी घरेही दिली. केंद्र सरकारने हे पाऊल उचलल्यामुळे संतप्त झालेले दहशतवादी टार्गेट किलिंग करत आहेत. ७ मे ला श्रीनगरमध्ये डॉ. अली जान रस्त्यावर दहशतवादी हल्ल्यात पोलीस कॉन्स्टेबल गुलाम हसन डार यांचा मृत्यू झाला. १२ मे ला बडगाममधील चाडूरा तहसील कार्यालयात घुसून कर्मचारी राहुल भटची हत्या करण्यात आली. १३ मे ला पुलवामाच्या गडूरा गावात निःशस्त्र पोलीस कर्मचारी रियाज अहमदचा यांची हत्या करण्यात आली. १७ मे ला बारामुल्लामध्ये दारू दुकानावर ग्रेनेड हल्ला करण्यात आला होता. त्यात राजौरीचे सेल्समन रंजीत सिंहचा मृत्यू झाला. २४ मे ला श्रीनगरमध्ये पोलीस कर्मचारी सैफुल्ला कादरी यांची हत्या करण्यात आली. २५ मे ला बडगाममध्ये टीव्ही अभिनेत्री अमरीन भटची त्यांच्या राहत्या घरातच हत्या करण्यात आली. त्यानंतर ३१ मे ला कुलगामच्या गोपालपोरामध्ये हिंदू शिक्षिका रजनी बाला यांची हत्या करण्यात आली. २ जूनला कुलगाम जिल्ह्यात बँक व्यवस्थापक विजय कुमार यांची गोळी घालून हत्या करण्यात आली.

दहशतवाद्यांनी २६ दिवसांत ८ लोकांची हत्या केली. ९० च्या दशकातील हत्याकांडाच्या थरकाप उडवणार्‍या स्मृती टार्गेट किलिंगमुळे पुन्हा ताज्या झाल्या आहेत. त्यामुळे काश्मीरपासून जम्मूपर्यंत जनक्षोभ उसळला आहे. जम्मू-काश्मीर खोर्‍यातील काश्मिरी पंडित, हिंदू आणि परराज्यातील नागरिकांना दहशतवाद्यांकडून लक्ष्य करून त्यांच्या हत्या केल्या जात आहेत. याशिवाय काही स्थनिक नागरिकांवरही हल्ले केले जात आहेत. काश्मीर खोरे पूर्वीपेक्षा शांत झाल्यामुळे अनेक काश्मिरी पंडित कुटुंबे पुन्हा काश्मीर खोर्‍यात परतले होते. मात्र, जानेवारीपासून आतापर्यंत पाच महिन्यांत १६ लोकांच्या हत्या झाल्या आहेत. अधिकारी-कर्मचारी, पोलीस, शिक्षक आणि सरपंचांसह अनेकांना लक्ष्य करण्यात येत आहेत. भीतीच्या वातावरणामुळे काश्मिरी पंडित आणि शासकीय कर्मचारी जीव वाचवण्यासाठी पुन्हा पलायन करत आहेत. त्यामुळे केंद्रातील भाजप सरकारसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला ऐनकेन प्रकारे नामोहरम करण्याच्या प्रयत्नात असलेल्या भाजपवर टार्गेट किलिंगवरून लक्ष्य करण्याचं काम आता शिवसेनेकडून केलं जात आहे. सध्या जम्मू-काश्मीरमध्ये सुरू असलेल्या घटना या काश्मिरी पडितांची सुरक्षितता आणि त्यांचे त्यांच्या मातीशी तुटलेले नाते अधोरेखित करतात. आता आदित्य ठाकरेंनीदेखील यावर मोठे वक्तव्य केले आहे. याद्वारे त्यांनी केंद्राला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यसभा जिंकूच मात्र आता काश्मिरी पडितांचा मुद्दा महत्वाचा असल्याचं म्हणत आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारवरच निशाणा साधला आहे. तेथील वातावरण दिवसेंदिवस बिघडत आहे. यावर केंद्र सरकारमधील मंत्री आणि देशभरातील भाजप नेते मौन धारण करून आहेत. आता ठोस पावलं उचलण्याची वेळ आली आहे, असा चिमटा काढण्याचं काम आदित्य ठाकरेंनी केलं आहे. महाराष्ट्राचे दरवाजे काश्मिरी पंडितांसाठी कायम खुले असतील, असे आश्वासनही त्यांनी दिले आहे. संजय राऊत यांनी तर आता काश्मीर फाईल्स- पार्ट २ काढून काश्मीर आणि तेथील काश्मिरी पंडितांचं वास्तव समोर आणा, असे आव्हानच त्यांनी भाजपला दिलं आहे.

शिवसेनेच्या आव्हानाला भाजपमधून अद्याप तशी प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, ज्ञानवापी प्रकरणावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची आलेली प्रतिक्रीया याचा विचार करायला भाग पाडते. वाराणसी येथील ‘ज्ञानवापी’बाबत आपल्या मनात आस्था आहे, जे योग्य आहे ते आपण करत आहोत. पण प्रत्येक मशिदीमध्ये शिवलिंग कशासाठी शोधत आहोत, असा सवाल डॉ. मोहन भागवत यांनी केला आहे. यातून सरसंघचालक सामंजस्याची भूमिका घेत असल्याचं दिसत असलं तरी त्यांचं पुढचं वाक्य विचार करायला लावणारं आहे. त्यातून सरसंघचालकांना नक्की काय साधायचं आहे, हे सुजाणांच्या सहज लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. सध्या हिंदू आणि मुस्लीम पक्षकारांनी या वास्तूवर दावा सांगितला आहे. काही स्थळांबाबत आपल्या मनात विशेष आस्था आहे, आपण त्याबाबत बोलतोही. आपण रोज नवा मुद्दा आणता कामा नये. मुळात हा वादच आपण कशासाठी वाढवत आहोत. हिंदूंचं खच्चीकरण करण्यासाठी बाहेरून आलेल्या मुस्लिमांनी त्याकाळी हिंदूंची देवळे तोडली. त्यामुळे या मंदिरांचं पुनःनिर्माण व्हावे, अशी हिंदूंची इच्छा आहे, अशी सरसंघचालकांनी जोडलेली पुस्ती म्हणूनच महत्वाची आहे. मंदिरांच्या मुद्यावर आता आम्हाला काहीही म्हणायचं नाही.

हिंदू-मुस्लिमांनी एकत्रित येत यावर तोडगा काढायला हवा. मुस्लिमांसोबत आलेल्या त्यांच्या अनेक पद्धती देखील बाहेरच्या प्रांतातील आहे. हिंदू राष्ट्राचा मुसलमानांशी आलेला संबंध हा स्वातंत्र्य लढ्यापासून आहे. पाकिस्तानची निर्मिती झाल्यानंतर अनेक मुस्लीम देश सोडून गेले. मात्र काही नागरिक गेले नाही. त्यांनी या देशामध्ये समरस होऊन रहायला हवं, सल्ला देण्यासही सरसंघचालक विसरलेले नाहीत. अशा राजकीय खेळी सुुरू असतानाच काश्मीर खोर्‍यात पुन्हा सुरू झालेल्या दहशतवादी कारवाया महत्वाचा मुद्दा बनला आहे. यावर्षींच्या पहिल्या पाच महिन्यात खोर्‍यात सर्वाधिक हिंसक घटना घडल्या आहेत. खोर्‍यात झालेल्या चकमकीत २७ अतिरेकी मारले गेले असताना दहा निष्पाप नागरिकांचेही बळी गेले आहेत. पाच महिन्यात ९७ अतिरेकी, १८ सुरक्षा रक्षक, आणि १९ नागरिकांसह १३४ जीव गेले आहेत. दहशतवादी फक्त काश्मीरच्या स्वातंत्र्यासाठी कारवाया करताहेत असं नाही. तर देशभरात सुरू असलेल्या धार्मिक तेढीही त्यांच्या कारवाया वाढवण्यास हातभार लावत असतात, हे विसरून चालणार नाही. म्हणूनच पुन्हा एकदा धगधगू लागलेला काश्मीर चिंतेचा विषय बनला आहे.