घरफिचर्समायमहानगर ब्लॉगअमराठींचा बळीचा बकरा!

अमराठींचा बळीचा बकरा!

Subscribe

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्या क्षणापासून ते पाडण्यासाठी केंद्रातील नेत्यांच्या सहकार्याने राज्यातील भाजपच्या नेत्यांनी हरतर्‍हेने प्रयत्न केले. यात आता महाविकास आघाडीने आपला अर्धा कार्यकाल पूर्ण केला. खरे तर हे सरकार यापूर्वीच कोसळावे यासाठी भाजपकडून सुरू असलेले उपद्व्याप हे इतके थेट होते की ते अगदी सगळ्यांना सहज दिसत होते. राज्यपाल हे राज्यातील भाजपच्या भल्यासाठी पोषक असावेत म्हणून अगोदर नियुक्त केलेल्या राज्यपालांची बदली करून ज्यांना प्रत्यक्ष राजकारणाचा अनुभव आहे असे राज्यपाल आणण्यात आले. त्यांच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारची कशी कोंडी होईल याचे डावपेच आखण्यात आले.

राज्य सरकारने यादी पाठवलेल्या १२ आमदारांच्या नावाचा निर्णय राज्यपालांनी इतके महिने उलटल्यावरही बासणात बांधून ठेवला आहे. त्यावर न्यायालयीन लढाई लढली तरी त्याचा काही उपयोग झालेला नाही. केंद्रीय तपास संस्थांचा ससेमिरा आघाडी सरकारच्या मंत्र्यांच्या मागे लावण्यात आला. ज्यांच्या मागे ईडी लावणे शक्य नाही, त्यांच्यावर आयकर विभागाच्या धाडी टाकून त्यांना उघडे पाडण्यात आले. गुढीपाडव्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांचा विषय काढला. त्यानंतरच्या भाषणात भोंगे काढण्यासाठी अल्टिमेटम दिला. राज यांची ही भूमिका भाजपला पोषक ठरणारी आहे. त्यामुळे त्यांना आनंद झाला. त्यानंतर भाजपच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली, पण राज हे काही सहजासहजी आपल्या कह्यात येतील असे नेते नाहीत याची भाजपलाही कल्पना आहे.

- Advertisement -

कारण राज यांना सोबत घ्यायचे तर भाजपला राज्यातील आपले बहुमताचे स्वप्न बाजूला ठेवावे लागेल. त्यात पुन्हा पुढील काळात कुठल्या प्रकारे युती करायची, असे सगळे प्रश्न आहेत. त्यात पुन्हा बरेचदा असे होते की राज ठाकरे शिवसेनेवर टीका करतात. त्यामुळे शिवसैनिक अधिक जोशात कामाला लागतात. त्याचबरोबर राज ठाकरे हे क्राऊड पुलर आहेत, पण त्याचे मतांमध्ये रूपांतर होत नाही अशी अलीकडच्या काळातील स्थिती आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी अलीकडे घेतलेली हिंदुत्ववादी भूमिका भाजपसाठी पोषक असली तरी त्याचा महाविकास आघाडी निकालात काढण्यासाठी किती उपयोग होईल याबाबतही भाजपच्या नेत्यांना नक्की ठोकताळा बांधता येत नाही. कारण महाविकास आघाडी सरकारची अजून अडीच वर्षे बाकी आहेत. भाजपला फक्त ठाकरे सरकार जावे, अशी अनिवार इच्छा आहे, पण त्याचा मार्ग सापडत नाही.

महाविकास आघाडीच्या विरोधात आरोपांची आघाडी उघडणार्‍यांमध्ये एक गोष्ट लक्षात येईल की राज्यातील भाजपमधील अमराठी नेते पुढे आहेत. सरकारमधील मंत्र्यांवर सतत नवनवीन घोटाळ्यांचे आरोप करून त्यांची कागदपत्रे पत्रकारांना दाखवण्यात किरीट सोमय्या आघाडीवर आहेत. किरीट सोमय्या हे मुंबईत राहत असले, त्यांची पत्नी मराठी भाषिक असली, ते बर्‍यापैकी मराठीत बोलत असले तरी त्यांना मुंबई आणि महाराष्ट्रातील माणसांनी मराठी माणूस मानलेले आहे असे वाटत नाही. तीच परिस्थिती भाजपच्या वतीने पुढे आलेले मोहित कंबोज यांची आहे आणि आता तीच परिस्थिती रवी राणा आणि नवनीत राणा यांची आहे. भाजपचा हा काय अजेंडा आहे हेही कळण्यास सध्या मार्ग नाही.

- Advertisement -

कारण राज्यातील भाजपच्या नेत्यांच्या तुलनेत किरीट सोमय्या यांचा आवाज जास्त मोठा दिसतो. तसेच जेव्हा सत्ताधार्‍यांकडून विशेषत: शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांच्याकडून सोमय्यांवर बोचरी भाषा वापरून प्रत्युत्तर दिले जाते, तेव्हा ज्या आक्रमकपणे सोमय्या यांची बाजू लावून धरायला हवी, तसे राज्यातील भाजपचे नेते करताना दिसत नाहीत. ते फक्त सोमय्या यांच्या बाजूने काही बोलण्याची औपचारिकता पार पाडताना दिसतात. ठाकरे सरकारविरोधातील भाजपच्या मोहिमेत आता महाराष्ट्रात नव्याने मोहित कंबोज उतरले आहेत. कंबोज हे तसे काही फारसे माहीत असलेले नाव नव्हते, पण शाहरूख खानच्या मुलाला अमली पदार्थ सेवनाच्या आरोपाखाली अटक

केल्यानंतर कंबोज लाईम लाईटमध्ये आले. त्यांनी नवाब मलिक आणि शाहरूखपुत्राचा विषय लावून धरला. मोहित कंबोज यांची मजबूत शरीरयष्टी आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व यामुळे अलीकडच्या काळात भाजपच्या वतीने विशेषत: मुंबईमध्ये त्यांचा प्रभाव वाढत चालला आहे. ठाकरे सरकारला पेचात पकडण्यासाठी हालचाली करताना ते आघाडीवर दिसत आहेत. नुकतेच ते शिवसेना पक्षप्रमुख आणि मुुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वांद्रे येथील मातोश्री या निवासस्थानाबाहेरून गाडीने जात होते. त्यावेळी त्यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केला. त्यांची गाडी अडवण्यात आली. त्यावेळी झटापट झाली, पण तिथून ते गाडी वेगाने पुढे नेत कसेबसे निसटले. आपण एका पत्रकाराचा लग्न समारंभ आटोपून येत होतो, असे कंबोज यांनी सांगितले, पण शिवसैनिकांचा असा आरोप आहे की, कंबोज हे मातोश्री परिसरात रेकी करायला आले होते.

कंबोज यांच्या पाठोपाठ आता अपक्ष आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी अचानक हनुमान चालिसाचा विषय पुढे आणला. खरे तर मशिदींवरील भोंगे उतरवले नाही, तर मशिदींसमोर भोंग्यांवर हनुमान चालिसा लावण्यात येईल, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला होता, पण हनुमान चालिसा उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्रीसमोर जाऊन म्हणण्याचा विषय राणा दाम्पत्याने कसा आणि कशासाठी उचलून धरला हेही अनाकलनीय आहे, पण जेव्हा पोलीस त्यांना खार पोलीस ठाण्यात घेऊन गेले, तेव्हा त्यांना भेटायला किरीट सोमय्या गेले. त्यामुळे राणा दाम्पत्याचा बोलवता धनी हा भाजपच आहे हे गुपित उघड झाले.

सोमय्या जेव्हा पोलीस ठाण्यात गेले त्यावेळी या विषयावर अगोदरपासून आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केली. त्यात सोमय्या काही प्रमाणात जखमी झाले. राणा दाम्पत्याची ताकद मर्यादित आहे. त्यात पुन्हा ते अपक्ष लोकप्रतिनिधी आहेत. असे असताना ते मातोश्रीवर जाण्याचे धाडस दाखवतात आणि त्यासाठी शिवसैनिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरतात हे पाहिल्यावर राणा यांच्यामागे मोठी ताकद आहे असेच सिद्ध होत आहे. राणा दाम्पत्य वर्षा बंगल्यासमोर गेले नाही, ते मातोश्रीसमोर गेले. त्यामुळे हे उद्धव ठाकरे यांना आव्हान आहे हे दिसून आले. भाजपच्या बाजूने ही अमराठी मंडळी उतरलेली दिसत आहे. त्यांच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. त्यात भाजपकडून या अमराठी मंडळींचा बळीचा बकरा तर बनवला जात नाही ना?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -