घरफिचर्समायमहानगर ब्लॉगशिक्षणातील बदलते राजकारण!

शिक्षणातील बदलते राजकारण!

Subscribe

राजधानीत दिल्लीसह देशभरातील अनेक विद्यापीठांतील परिस्थिती सध्या गंभीर आहे. शिक्षणाचे माहेरघर समजल्या जाणार्‍या या विद्यापीठांमध्ये सध्या राजकीय आखाड्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या तोडफोडीनंतर येथील परिस्थिती आणखीनच गंभीर होऊ लागली आहे. एकंदरीतच या परिस्थितीमुळे देशभरातील इतर विद्यापीठांमध्ये देखील त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. यामुळे अनेक विद्यापीठांमध्ये त्याविरोधात आवाज उठविताना परिस्थिती अवाक्याबाहेर गेल्याचे चित्र आपण अनेक ठिकाणी पाहिले आहे. त्यामुळे देशभरातील विद्यापीठांमध्ये सध्या शिक्षण कमी राजकारण वाढत चालले आहे. एकंदरीत राज्यातील विद्यापीठांमध्ये शिक्षणाच्या तुलनेत वाढत असलेले राजकारण ही खर्‍या अर्थाने शोकांतिका म्हणावी लागेल.

शिक्षणाचा व्यापार, शिक्षणातील बदल, शिक्षणातील राजकारण या सगळ्या गोष्टी शिक्षणापेक्षा खूप जास्त मोठ्या होत असलेल्या सध्या दिसून येत आहेत. हे जाणवण्याचं मुख्य कारण म्हणजे गेले काही वर्ष ‘जेएनयू’ आणि इतर विद्यापीठांमधील चिघळत जाणारी परिस्थिती. कोणतीही शिक्षणसंस्था ही मुख्यत्वे शिक्षणासाठी समर्पित असते, पण गेले काही वर्ष जेएनयूची आणि या विद्यापीठांमधील परिस्थिती पाहता शिक्षण कमी आणि राजकारण जास्त अशी स्थिती दिसून येत आहे. जेएनयूमध्ये सतत विद्यार्थ्यांवर होणारे हल्ले आणि हिंसाचार हा आता खरं तर चर्चेसाठी नवा विषय राहिलेला नाही, पण हे असं का याचा विचार मात्र होताना दिसत नाही. आपल्या देशात खरं तर युवा पिढी ही मोठ्या प्रमाणात आहे आणि राजकारणामध्ये या पिढीला टार्गेट करणं अतिशय सोपं जातं. आता हजारो आणि लाखोंच्या संख्येने ही युवा पिढी राजकारणामध्ये येताना दिसत आहे. देशाला दिशा देण्यासाठी शिक्षण आणि राजकारणात येणे या दोन्ही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत, पण त्याचा अर्थ शिक्षणात राजकारण आणणे असा होत नाही.

खरे तर सर्वच नागरिकांना राजकारणात जमेल तसा आणि त्याप्रमाणे सहभाग घ्यायला हवा. त्यामुळे शिकायच्या वयात राजकारण कशाला असा प्रश्न ज्यांना पडतो त्यांच्यासाठी खरे तर राजकारणात येण्याचे वय हे मतदान १८ व्या वर्षी होते म्हणजे तेव्हापासून कधीही असे आहे, पण अशाप्रकारे प्रश्न विचारून राजकारणातून विद्यार्थ्यांना वेगळे ठेवायचे प्रयत्न सुरू होतात असे म्हटले जाते. अभ्यास करण्याच्या वयात राजकारणाची काय गरज असेही म्हटले जाते, पण काही अंशी हे खरेदेखील आहे. काही विद्यार्थी हे शिक्षणाच्या नावाखाली कितीतरी वर्ष एकाच संस्थेत राहून केवळ राजकारण्यांना फायदा व्हावा यासाठी काम करत असतात. मग अशा वेळी शिक्षणात घाणेरडे राजकारण घुसवण्याची काय गरज आहे असाही प्रश्न पडतो, पण असे बिनधास्तपणे प्रश्न विचारणार्‍यांना मात्र हिंंसाचाराला सामोरे जावे लागते. आपण करू ती पूर्व दिशा अशीही काही ठिकाणी परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

- Advertisement -

मोठ्या कष्टाने बर्‍याच जणांचे आई- वडील हे मुलांना महाविद्यालयात शिक्षणासाठी प्रवेश मिळवून देतात. मात्र, काही चुकीच्या लोकांच्या नादाला लागून मुलं वेगळ्याच मार्गाला वळतात. मुलांना दिशा देण्याचं आणि मुलांना चुकीचा मार्ग दाखवण्याचं अर्थात राजकारणासाठी नादाला लावण्याचे ही दोन्ही कामे महाविद्यालयातूच होत असतात हे कधीच नाकारता येणार नाही. यापैकी शिक्षणाची गोडी असलेली मुलं ही नक्कीच यातून तावून सुलाखून निघतात. मात्र, काही मुलं मात्र या राजकारणात अशा तर्‍हेने गुरफटली जातात की त्यांच्या शिक्षणाचा बोर्‍या वाजतो हे नक्की. ही परिस्थिती एखाद्या चित्रपटातील वाटली तरीही ही सत्य परिस्थिती आहे. अशी परिस्थिती अनेक महाविद्यालयातून दिसून येते. इतकेच नव्हे तर विद्यापीठांमधून राजकारणात विद्यार्थ्यांनी वळावे, ही अपेक्षा व्यक्त केली जाते, पण सध्याची परिस्थिती ही राजकारणापलीकडे गेल्याने ही बाब चिंतेचा विषय ठरली आहे.

मग प्रश्न असा निर्माण होतो की, खरंच शिक्षणामध्ये अशा तर्‍हेचे राजकारण करण्याची गरज आहे का? अगदी पूर्वीपासून राजकारण हा शिक्षणामधील मोठा काटा ठरलाच आहे. अनेक महाविद्यालयातून निवडणुकाही लढवल्या जातात. मध्यंतरी या हिंसाचाराचे वळण लागल्यामुळे या निवडणुकाही थांबवण्यात आल्या होत्या. मात्र, पुन्हा एकदा याचं राजकारण सुरू झाले आहे. काही जणांच्या मते यामुळे तरुण सजग राहतात आणि हुकूमशाही हाणून पाडतात, पण प्रत्येक गोष्टीला दोन बाजू आणि दोन विचार असतात. त्यामुळे ज्यांना कुणाला राजकारण कळते किंवा राजकारणातील डावपेच कळतात त्यांनी सहजपणाने शिक्षणाबरोबर राजकारण भाग घेतला तरीही चालून जाते, पण चुकीच्या वाटणार्‍या निर्णयावर मत देणे अथवा विरोध करणे हे कितपत योग्य आहे. असे विद्यार्थी आणि असे अर्धवट शिक्षण हे नक्कीच घातक ठरते.

- Advertisement -

महत्त्वाची गोष्ट म्हणजे राजकारण, त्यात होणारी आंदोलने या सगळ्यामुळे विद्यार्थ्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होते की नाही? तर असा विचार केल्यास, युक्तिवाद केल्यास तरुणांना सतत अभ्यासाकडे लक्ष देत राहिल्यास, राजकारणात नक्कीच भाग घेता येणार नाही. अभ्यास सांभाळून राजकारण करणे तसे कठीण नाही, पण आपण कोणत्या गोष्टींना प्राधान्य देतोय हे त्या विद्यार्थ्यांच्या वागण्यावर नक्कीच अवलंबून आहे. महाविद्यालये आणि विद्यापीठातील प्रश्न आणि वाद या त्या त्या पातळीवर सोडवण्यात येण्याची गरज आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधीऐवजी विद्यार्थी प्रतिनिधीची गरज खरं तर आहे. बर्‍याचदा आपल्याला दिसून येते की, विद्यार्थ्यांच्या भावना भडकविण्याचे काम, त्यांची आवड दडपण्याचे राजकारण हे विविध राजकीय नेते करत आहेत. विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविणे गरजेचे आहे, पण या सगळ्यात राजकीय वळण लागून शिक्षण आणि त्यासंबंधित गोष्टी मात्र कुठेतरी दूर राहात असल्याचे या बदलत्या राजकारणामुळे घडत असल्याचे गेल्या तीन ते चार वर्षांपासून दिसून येत आहे. चर्चा अनेक होतात, पण त्यातील नक्की राजकारण काय आणि पुढे यामध्ये भरडल्या गेलेल्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे काय, असे प्रश्न मात्र विलंबित राहिलेले दिसून आले आहेत.

जेएनयूमधील तणाव लक्षात घेता त्यावर कोणाचे तरी नियंत्रण असणे नक्कीच गरजेचे आहे. या सगळ्यातून शिक्षण महत्त्वाचे आणि हिंसाचार न होता, राजकारण न होता प्रश्न सोडविणे महत्त्वाचे आहे. मात्र, हे करत असताना कोणत्याही राजकीय पक्षांनी आपली विचासरणी अथवा आपल्या पक्षाचा स्वार्थ या संस्थांच्या मध्ये आणणं योग्य नाही आणि हेच सर्रास होताना दिसून येत आहे. ज्यामुळे राजकारणाने या शिक्षणाचाही खेळखंडोबा झालेला आहे. त्याचा परिणाम सध्याच्या युवा पिढीच्या शिक्षणावर जास्त होताना दिसून येत आहे. एकीकडे शिक्षणाचे महत्त्व समजावून देत असताना दुसरीकडे त्यामध्ये राजकारण आणून त्याचा खेळखंडोबा करणं हे चित्र सध्या वाढत चालल्याचे दिसून येत आहे आणि याला कुठेतरी आळा बसणेही तितकेच महत्त्वाचे आहे. या परिस्थितीला आळा तेव्हाच बसेल जेव्हा विद्यार्थ्यांना खर्‍या अर्थाने राजकारण कळून आपले भवितव्य कोणत्या शिक्षणात आहे याची जाण येईल. हा दिवस लवकरच येईल अशी अपेक्षा करण्याव्यतिरिक्त आपल्याही हातात काहीच नाही हे मात्र खरं!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -