दीन.. दीन.. दिवाळे…

संपादकीय

संपूर्ण देशाची नव्हे तर जगाची अर्थव्यवस्था कोरोनामुळे पूर्णपणे ढासळून गेली आहे. महाराष्ट्र या स्थितीला अपवाद कसा राहू शकेल? त्यामुळे महाराष्ट्राची आर्थिक घडीदेखील या संपूर्ण काळात पूर्णपणे पालटली आहे. दारिद्य्ररेषेखालील जनता तर या जीवघेण्या विषाणूच्या हल्ल्यापासून जरी काही प्रमाणात बचावली असली तरी गरिबीच्या आणि महागाईच्या विषाणूने या वर्गावर प्रचंड आघात केले आहेत. नोकरीच्या आणि सुशिक्षितपणाच्या जोरावर नोटाबंदीसारख्या अत्यंत खडतर परिस्थितीतही स्वतःला आणि स्वतःच्या कुटुंबाला शाबूत राखणारा अल्पउत्पन्न गटातील मध्यमवर्ग आर्थिक संकटाने पार होरपळून निघाला आहे. कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय हे आता जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी पदरमोड करू लागले आहेत. उच्चवर्गीय आणि गर्भश्रीमंत यांच्या दैनंदिन जीवनावर जरी या परिस्थितीमुळे फारसा फरक पडला नसला तरी त्यांच्या व्यवसायाची आर्थिक चाके अर्थचक्राच्या गाळात रुतून बसली आहेत.

बाजारपेठा गर्दीने फुलून गेलेला दिसत असल्या तरी प्रत्यक्षात ही खरेदी 25 टक्क्यांच्या वर जात नाहीये, हे बाजारपेठेचे दुर्दैवी चित्र आहे. त्यामुळे व्यापारी वर्ग हवालदिल झाला आहे. दुर्दैवाचे दशावतार सुरू असतानाच देशातील सर्वात मोठा सण म्हणून ओळखली जाणारी दिवाळी ही सुरू झाली आहे. ऑफलाइन ऑनलाईन दिवाळी सेलिब्रेशनचे मार्ग व्यापार्‍यांनी शोधून काढले आहेत. मात्र लोकांच्या हातात पैसाच खुळखुळत नसल्यामुळे दिवाळी ऑनलाईन असो की ऑफलाईन असो खरेदीदारांची पाठ त्याच्याकडे फिरली आहे. गेल्या आठ-नऊ महिन्यांच्या लॉकडाऊनमुळे जागतिक आणि भारतीय अर्थव्यवस्थेची जी चिरफाड झाली आहे, त्याचे दुष्परिणाम भारतीयांना येणारे आणखी काही महिने यापेक्षा अधिक प्रमाणात बसणार आहेत. लोकांचा कल आता चंगळवाद यापेक्षा जीवनावश्यक आणि गरजेपुरते आवश्यक वस्तूंच्या खरेदीकडे वळला आहे. साहजिकच त्याचा मोठा फटका बाजारपेठेला खाजगी क्षेत्राला, सेवा क्षेत्राला आणि उद्योग क्षेत्राला बसत आहे. त्यामुळे व्यवसाय उद्योगात पूर्वीसारखी तेजी राहिली नाही हे स्पष्टपणे दिसत आहे. दुर्दैवाने केंद्र आणि राज्य सरकारांच्या पातळीवर ही परिस्थिती झपाट्याने पूर्वपदावर आणण्यासाठी ज्या काही ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे, त्या होताना दिसत नाहीत हे या देशाचे आणि राज्याचे मोठे दुर्दैव म्हणावे लागेल.

भारतीयांची दिवाळी म्हटली की फटाक्यांची दमदार रंगीत आतषबाजी, घरोघरी दरवळणारा दिवाळी फराळाचा सुगंध, महिला आणि पुरुषांची खरेदीची लगबग, दिवाळीचा प्रारंभ होण्यापूर्वीच आठवडाभरापासून गर्दीने ओसंडून वाहणार्‍या बाजारपेठा, गर्दीने फुलले मॉल्स, इमारतींच्या गच्चीवर घरांच्या दारांवर खिडक्यांवर होणारी आकर्षक विद्युत रोषणाई, बाजारपेठांमध्ये दुकानांच्या बाहेर लटकणारे रंगीबेरंगी आकाश कंदील चांदण्या, मेवामिठाईची मोठी उलाढाल, सोने-चांदीच्या दुकानात खरेदीसाठी उडणारी झुंबड, गिफ्टची देवाण-घेवाण आणि शुभेच्छांची दिवाळी पत्रे ही खरीखुरी परंपरागत भारतीयांची दिवाळी साजरी करण्याची पद्धत. कालांतराने हळूहळू यात बदल होत गेला. दिवाळी भेट कार्डची जागा सोशल मीडियावरील आकर्षक संदेशांनी घेतली. मध्यमवर्गीयांची ऑनलाईन खरेदी वाढली. फटाक्यांचा ओढा कमी होऊन मध्यमवर्गीयांचा पर्यटनाकडे ओढा वाढला.

मात्र असे असले तरी दिवाळी सण साजरा करण्याचा उत्साह आणि त्यासाठी मनाजोगता खर्च करण्याचा फंडा हा काही बदलला नाही. त्यात नेहमीच्या मासिक वेतनाबरोबरच नोकरदारांना दिवाळीचा बोनसही वेगळा मिळत होता, त्यामुळे नोकरदार कामगार आणि कनिष्ठ मध्यमवर्ग सढळ हाताने खर्च करत दिवाळीचा आनंद द्विगुणित करत होता. यंदा मात्र हा उत्साह कोरोनाने पूर्णपणे उखडून टाकला. बोनस राहिला दूर, पगाराचे वांदे झाले असल्यामुळे कनिष्ठ मध्यमवर्गीयांच्या आणि त्यातही कामगार गोरगरीबांच्या उत्पन्नाला फार मोठी कात्री लागली. सहाजिकच दिवाळ सणाचा उत्साह कुठच्याकुठे मावळून गेला. यंदा मुंबई पुण्याबरोबरच ठाणे, कल्याण डोंबिवली यासह राज्यभरातील दिवाळी पहाटचे कार्यक्रम रद्द झाले आहेत. हवा आणि प्रदूषण टाळण्यासाठी व त्यामुळे फटाक्यांच्या धुरांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी राज्य सरकारने आणि महापालिकांनी तसेच पोलिसांनी मोठ्या आवाजाच्या फटाक्यांवर बंदी आणली आहे. मात्र जरी सरकारने या वेळी बंदी आणली नसती तरी देखील यावेळची दिवाळी ही आवाज रहितेच राहिली असती कारण मोठ्या आवाजाचे महागडे फटाके खरेदी करण्याची क्षमता आता मध्यमवर्गीयांमध्ये नाही.

नोकरी व्यवसायात मोठ्या प्रमाणावर आर्थिक मंदी असल्यामुळे त्याचा मोठा परिणाम नोकरी क्षेत्रावर झाला आहे. लॉकडाउनच्या काळात अनेकांचा रोजगार गेला. कंपन्या, उद्योग आणि सेवा क्षेत्र सुरू झाले असले तरी उत्पादन केलेल्या मालाला पूर्वीसारखा उठाव नाही. अशा परिस्थितीत पुन्हा नव्याने उत्पादन करण्याची जोखीम पत्करायला कुणी तयार नाही. एरवी दिवाळी म्हटली की कपड्यांची खरेदी ही दहा-पंधरा दिवसांच्या आधीपासून सुरू व्हायची, आता कोरोनाच्या भीतीमुळे कपडा खरेदीत लक्षणीय घट झाली आहे. सहाजिकच कपडा उद्योग आणि त्यावर अवलंबून असणारे छोटे-मोठे लघुउद्योग हे अडचणीत सापडले आहेत.

उद्योग व्यवसायाच्या यशाचे गणित हे उद्योगाच्या उलाढालीवर अवलंबून असते. बाजारपेठेत जेवढा खरेदीदारांचा उत्साह अधिक तेवढे उद्योग आणि कंपन्या अधिक भरभराटीला येतात हे व्यवसायाचे सरळ साधे गणित आहे.

मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर यासारख्या मोठ्या महानगरांमध्ये व आसपासच्या प्रदेशात दसरा दिवाळीचा सण हा घरखरेदीसाठी मोठा अनुकूल काळ मानला जातो. मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय शहरात 3 ते 5 कोटींपर्यंत फ्लॅटच्या किमती आहेत. तर पुणे, ठाणे, नाशिक, नागपूर यासारख्या मुंबईच्या तुलनेने कमी बाजारभाव असलेल्या शहरांमध्ये दीड-दोन कोटींमध्ये फ्लॅट खरेदी करता येतो. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात मालमत्तांच्या खरेदीमध्ये उत्साह दिसून आला. मालमत्तांच्या खरेदीचे मागचे दोन महिने उत्साहपूर्वक वाटले असले तरी तो उत्साह हा मागच्या दहा महिन्यांचा बॅकलॉग होता, हे जर लक्षात घेतले तरी मुंबई, ठाणे आणि पुणे यासारख्या शहरांमध्ये घर खरेदी क्षेत्रांमध्ये अथवा रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये किती मंदी आहे याचा अंदाज बांधता येऊ शकतो. मुंबई-पुण्यात आणि ठाण्यात तर घरे बांधून तयार आहेत. मात्र खरेदीदाराच नाहीत अशी स्थिती आहे.

खरेदीदारांना घरांकडे वळवण्यासाठी बांधकाम व्यावसायिक वेगवेगळ्या सवलती, आकर्षक भेटवस्तू आणि जाहिरातींचा भडिमार करत असूनही घर खरेदी क्षेत्रातील मंदीबाई हटायला तयार नाही. घरबांधणी क्षेत्र तेजीत असणे याचा अर्थ केवळ बिल्डर तेजीत असणे असा होत नाही तर बांधकाम क्षेत्रावर अवलंबून असणारा अन्य मोठा वर्ग आहे ज्याच्यामध्ये सिमेंट पुरवठा करणार्‍या कंपन्या आल्या, स्टील उद्योग आला, इमारतीसाठी लागणार्‍या ग्रॅनाईट, टाईल्स, विद्युत साहित्य, इमारतींसाठी लागणारे लाकडाचे साहित्य, प्लंबर ते अगदी रंगार्‍यांपर्यंत असे बरेच छोटे-मोठे घटक अवलंबून असतात. ते या मंदीबाईच्या फेर्‍यात पूर्णपणे होरपळून निघाले आहेत. या सार्‍या वर्गाची दिवाळी यंदा अंधारात आहे. त्यामुळे यंदा जरी दिवाळी दीन दीन असली तरी पुढच्या वर्षीची दिवाळी मात्र खर्‍या अर्थाने नव्या उत्साहाची आणि दिन दिन दिवाळी असो. या मंदीबाईच्या फेर्‍यात अडकून पडलेल्या तमाम श्रमिक गरीब आणि मध्यमवर्गीय समाजाला दिवाळीच्या याच शुभेच्छा.