घरफिचर्समायमहानगर ब्लॉगकलामांचे स्वप्न : भारत २०२०

कलामांचे स्वप्न : भारत २०२०

Subscribe

भारत २०२० साली एक विकसित देश म्हणून पुढे आलेला असेल. त्यावेळी मी कदाचित हयात नसेन; पण तुम्ही तो विकसित भारत पहायला नक्कीच असाल, त्यावेळी तुम्हाला माझ्या बोलण्याची सत्यता पटेल, ज्येष्ठ वैज्ञानिक आणि भारताचे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचे हे विधान येणार्‍या अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील. भारताला विकसित होण्यासाठी अजून बरेच टप्पे पार करावे लागतील, पण कलामांंनी ती जिद्द जागविली होती.

भारताचे मिसाईल मॅन आणि माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनी विकसित भारतासाठी २५ वर्षांपूर्वी स्वप्न पाहिले होते. २०२० साली भारत हा विकसित देश झालेला असेल, असा त्यांचा विश्वास होता. त्यासाठी त्यांनी तत्कालीन केंद्र सरकारच्या माध्यमातून ‘टायफॅक’ या संस्थेची स्थापना केली होती. त्यात त्यांनी ज्येष्ठ वैज्ञानिक आणि विचारवंतांचा समावेश केला होता. भारताला २०२० सालापर्यंत विकसित राष्ट्र बनविण्यासाठी काय करावे लागेल, याविषयी विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून सूचना मागविल्या होत्या. या सगळ्या माहितीचा उपयोग करून त्यांनी पुढील पंचवीस वर्षांत भारत विकसनशील स्तरापासून विकसित स्तर कसा प्राप्त करेल, यासाठी पथदर्शक आराखडा तयार केला होता. त्याचे विमोचन त्या वेळचे पंतप्रधान ए.डी.देवेगौडा यांच्या हस्ते झाले होते.

या आराखड्याचे विमोचनही केवळ शासकीय औपचारिक ठरू नये, तो देशातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत विशेषत: तरुण पिढीपर्यंत पोहोचावा. त्यांनी त्यापासून प्रेरणा घेऊन २०२० सालापर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनविण्यासाठी स्वत:ला झोकून द्यावे, अशी त्यांची इच्छा होती. देश विकासाच्या प्रक्रियेत सर्वसामान्य माणूस सहभागी होणे महत्त्वाचे असते. आपण एका मोठ्या प्रक्रियेचा भाग आहोत, ही जाणीव त्याला झाली पाहिजे. आपल्याकडे प्रचंड मोठी लोकसंख्या आहे, त्या लोकशक्तीचा उपयोग देशाला विकसित बनविण्यासाठी झाला पाहिजे, अशी त्यांची तळमळ होती. त्यामुळेच त्यांनी अनेक वैज्ञानिकांना सोबत घेऊन बनविलेला आराखडा ‘इंडिया २०२०: व्हिजन फॉर द न्यू मिलेनियम’ या पुस्तकाच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना उपलब्ध करून दिला. त्या पुस्तकाची देशातील बहुतेक सगळ्या भाषांमध्ये भाषांतरे झाली. या पुस्तकातील आराखड्यातून देशातील विविध क्षेत्रात काम करणार्‍या लोकांना नवी दृष्टी मिळाली. नवी प्रेरणा मिळाली. अब्दुल कलामांनी ‘इंडिया २०२०’ या पुस्तकातून शिक्षकापासून ते वैज्ञानिकापर्यंत त्यांनी काय काय करायला हवे, हे नमूद केले आहे. पत्रकारांनी देशाविषयी सकारात्मक बातम्यांवर भर द्यावा, मल्टिनॅशनल कंपन्यांची भूमिका काय असावी, अशा अनेक गोष्टींबाबत मार्गदर्शन केले आहे.

- Advertisement -

भारताच्या एकूण लोकसंख्येमध्ये तरुणांची संख्या मोठी आहे, त्यांचा उपयोग देश विकासासाठी व्हायला हवा. तरुणांनी देशविकासाच्या प्रक्रियेत सहभागी व्हावे, म्हणून ते विविध शाळा, कॉलेजमध्ये जात असत. मुलांमध्ये मिसळत असत. त्यांच्या मनात देशविकासासाठी झोकून देण्याचे बीज रुजवत असत. देशभर ते त्यासाठी भाषणे देत असत. आपले विचार सर्वदूर पोहोचावे म्हणून त्यांनी ‘बिलियन बीट्स’ हा ई-पेपरही सुरू केला होता. ‘विंग्ज ऑफ फायर’ हे अब्दुल कलाम यांना लिहिलेले पहिले पुस्तक. त्या माध्यमातून त्यांचे जीवन आणि देशाप्रती असलेले त्यांचे प्रेम व्यक्त झाले. यातून त्यांनी आपला जीवन प्रवास कसा झाला. देशाच्या एका टोकाला असलेल्या रामेश्वरम येथील एका खेडेगावातून आपला दिल्लीपर्यंतचा प्रवास कसा झाला, ते उलगडून सांगितले आहे. विंग्ज ऑफ फायर, हे अतिशय प्रेरणादायी पुस्तक आहे. त्यानंतर त्यांनी ‘इग्नायटेड माईण्ड्स’ हे पुस्तक लिहिले. हे छोटेखानी पुस्तक तर अक्षरश: प्रेरणेची मशाल आहे. त्यात कलामांनी भारत पूर्वी विविध क्षेत्रात कसा आघाडीवर होता, याची माहिती देताना आता पुन्हा रेनिसान्स म्हणजे भारताच्या त्या प्रभावशाली पुनरुत्थानासाठी सज्ज व्हायला हवे, असे आवाहन केले आहे.

या पुस्तकात त्यांनी एका ठिकाणी भारताचे महान वैज्ञानिक सी. व्ही. रामन यांच्या एका भाषणाचा उल्लेख केला आहे. त्यात रामन म्हणतात, ‘भारतातील तरुणांनी जगाच्या विविध भागात गेले पाहिजे. त्या ठिकाणी जे आधुनिक ज्ञान आहे ते मिळवले पाहिजे, त्याचा उपयोग भारताच्या विकासासाठी करायला हवा; पण हे सगळे करण्यासाठी आपल्याला ड्रायव्हिंग फोर्सची गरज आहे’. ही चालना स्वत: कलाम आयुष्यभर या देशातील तरुणांना देत राहिले. आज भारतातील तरुण जगाच्या विविध भागात गेलेले आहेत. त्यांनी विविध क्षेत्रात मोठे नाव कमावलेले आहे. ज्या देशात ते आहेत, तेथील प्रगतीमध्ये त्यांचे मोठे योगदान आहे. अमेरिका ही जगातील महाशक्ती आहे. त्यांची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’पासून ते अमेरिकी सरकारच्या प्रशासनामध्ये भारतीय वंशाचे लोक आपले मौलिक योगदान देत आहेत.

- Advertisement -

अमेरिकेचे शासकीय मुख्यालय असलेल्या व्हॉईट हाऊसमध्ये आता दिवाळी साजरी केली जाते. अमेरिकेमध्ये भारतीयांची संख्या तेथील राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीमध्ये महत्वाचा घटक ठरत आहे. हीच परिस्थिती विविध देशांमध्ये आहे. आयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर हे नुकतेच कोकणातील मालवणमधील त्यांच्या मूळ गावी खासगी भेटीसाठी आले होते. तिथे त्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत झाले. भारतीय वंशाचे असे विविध लोक जगातील अनेक देशांमध्ये कार्यरत आहेत. भारताचा एका वेगळ्या प्रकारे जगभर विस्तार झालेला आहे. खरे तर हा ‘विस्तारित भारत’ आहे. आज जेव्हा भारताचे पंतप्रधान विदेश दौर्‍यावर जातात, तेव्हा त्या देशातील भारतीय मोठ्या संख्येने जमून त्यांचे जोरदार स्वागत करतात.

अब्दुल कलाम यांचे म्हणणे होते की, जगातील विकसित देश पुढील पंचवीस वर्षांचा आपला विकासाचा आराखडा बनवत असतात. आपण पुढील वाटचाल करताना त्याचे नियोजन करायला हवे, तरच आपले प्रयत्न योग्य कामासाठी उपयोगी पडतील, अन्यथा ते विस्कळीत होतील, त्याचा अपेक्षित फायदा आपल्याला होणार नाही. कलमांनी पंचवीस वर्षांपूर्वी जो आराखडा तयार करून दिला होता, त्यानुसार भारत आज विकसित देश म्हणून गणला जाऊ शकेल का, असा प्रश्न उपस्थित केल्यास त्यावर विविध मतमतांतरे होतील. पण पंचवीस वर्षांपूर्वी कलामांनी जी सकारात्मक ऊर्जा देशवासियांमध्ये भिनवली, त्याचा नक्कीच परिणाम झालेला आहे. अनेकांनी त्यापासून प्रेरणा घेऊन कार्य केलेले आहे. भारताची लोकसंख्या खूप मोठी आहे. त्यामध्ये विविध स्तर आहेत. विकास शेवटच्या घटकापर्यंत पोचायला त्यामुळे वेळ लागतो. आपल्याकडे लोकशाही आहे, त्यामुळे अनेक घटकांचे म्हणणे विचारात घ्यावे लागते. बरेच वेळा चीन आणि भारत यांच्या विकासवेगाची तुलना करण्यात येते, पण त्यावेळी आपल्याकडे लोकशाही आहे आणि चीनमध्ये एकपक्षीय हुकूुमशाही आहे, हे लक्षात घेतले जात नाही.

शहर आणि गावांची पंचवीस वर्षांपूर्वीची आणि २०२० सालातील स्थिती यात आज बराच फरक आहे. आज आधुनिक संपर्क आणि वाहतूक साधनांमुळे ही दरी बरीच मिटलेली आहे. कलमांचे स्वप्न काही अंशी नक्कीच पूर्ण झालेले आहे. ‘इग्नायटेड माईण्ड्स’ या त्यांच्या पुस्तकात अतिशय तळमळीने आणि विश्वासाने त्यांनी म्हटले आहे, ‘२०२० साली मी कदाचित हयात नसेन, पण भारत विकसित झालेला पहायला तुम्ही मात्र नक्की असाल. त्यावेळी माझ्या बोलण्याची सत्यता तुम्हाला पटेल’. भारताला विकसित देश होण्यासाठी अजून बरेच टप्पे पार करावे लागतील; पण कलामांनी व्यक्त केलेला विकसित भारताचा विश्वास त्यांच्या पश्चातही येणार्‍या पिढ्यांना पुन्हा पुन्हा नवी प्रेरणा देत राहील.

Jaywant Rane
Jaywant Ranehttps://www.mymahanagar.com/author/rjaywant/
25 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. राजकीय, सामाजिक, वैचारिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -