लॅन्सेट नावाचा बागुलबुवा!

लॅन्सेटचे हे संपादकीय प्रसिद्ध झाल्याबरोबर देशातील सर्व मोदी विरोधक सरसावले. त्यांनी मोदींवर टीका करायला सुरुवात केली. लॅन्सेट...लॅन्सेट म्हणताना हा लॅन्सेट कोण बाबा आहे जो भविष्यवाणी वर्तवतो आहे? तो ऑक्टोपस आहे की पोपट असा प्रश्न देशातील सर्वसामान्यांना पडला. तो स्वाभाविक होता. कारण इंग्लंडमधून प्रसिद्ध होणारे हे जर्नल त्यांच्यापर्यंत येण्याचा सवाल नव्हता. तसा भारतातील कथित बुद्धिमंतांपर्यंत ही हे जर्नल येणे शक्य नाही. केम्ब्रिज, ऑक्सफर्ड विद्यापीठात शिकलेले आणि ज्याचा प्राण अद्यापही लंडनमध्ये घुटमळत असलेल्या काँग्रेसच्या चिदंबरम यांनी प्रथम लॅन्सेटचा हा अग्रलेख प्रसिद्ध करून टीका केली, मग सर्व तुटून पडले.

दी लॅन्सेट नावाचे एक मेडिकल जर्नल आहे. ते फार जगप्रसिद्ध आहे असे म्हणतात. तर त्या जर्नलच्या संपादकीयमध्ये कोरोनाची दुसरी लाट खूप भयंकर आहे आणि त्यात भारतात 1 लाखापेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडणार, रस्त्यावर प्रेताचे खच पडणार असे भाकीत केले होते. इतकेच नाही तर त्याला जबाबदार पंतप्रधान मोदी असणार, निवडणुका, कुंभमेळा अशा गोष्टीना लॅन्सेटने जबाबदार धरले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना म्हटलं आहे की, ट्विटरवर टीका करणार्‍यांना रोखण्यापेक्षा कोविडला रोखण्यावर त्यांनी भर द्यायला हवा होता.

स्वत:वरची टीका आणि खुल्या चर्चेला रोखण्याचा प्रयत्न यामुळे ते माफीला पात्र नाहीत, असं परखड मत ‘लॅन्सेट’मध्ये नोंदवण्यात आलं आहे. सुरुवातीच्या टप्प्यात कोरोनावर नियंत्रण मिळवल्यानंतर सरकारच्या टास्क फोर्सची बैठकच झालेली नाही. याचे परिणाम आपल्या समोर आहेत. कोरोनाचं संकट वाढतच चाललं आहे आणि भारताला यासंदर्भात नव्याने पावलं उचलण्याची आवश्यकता आहे. सरकार आपल्या चुका मान्य करणार का यावर नव्या धोरणांचं यश अवलंबून असेल. देशाला पारदर्शी नेतृत्व देणार का हाही मुद्दा आहे, असं ‘लॅन्सेट’मध्ये म्हटलं आहे. लॅन्सेटने म्हटल्याप्रमाणे, वैज्ञानिक आधारावर सार्वजनिक आरोग्याशी निगडित उपाययोजना करायला लागतील. जोपर्यंत लसीकरण वेगाने सुरू होत नाही तोवर कोरोनाला रोखण्यासाठी सर्वतोपरी पावलं उचलायला हवीत.

लॅन्सेटचे हे संपादकीय प्रसिद्ध झाल्याबरोबर देशातील सर्व मोदी विरोधक सरसावले. त्यांनी मोदींवर टीका करायला सुरुवात केली. लॅन्सेट…लॅन्सेट म्हणताना हा लॅन्सेट कोण बाबा आहे जो भविष्यवाणी वर्तवतो आहे? तो ऑक्टोपस आहे की पोपट असा प्रश्न देशातील सर्वसामान्यांना पडला. तो स्वाभाविक होता. कारण इंग्लंडमधून प्रसिद्ध होणारे हे जर्नल त्यांच्यापर्यंत येण्याचा सवाल नव्हता. तसा भारतातील कथित बुद्धिमंतांपर्यंत ही हे जर्नल येणे शक्य नाही. केम्ब्रिज, ऑक्सफर्ड विद्यापीठात शिकलेले आणि ज्याचा प्राण अद्यापही लंडनमध्ये घुटमळत असलेल्या काँग्रेसच्या चिदंबरम यांनी प्रथम लॅन्सेटचा हा अग्रलेख प्रसिद्ध करून टीका केली, मग सर्व तुटून पडले. पण याच लॅन्सेटने मागील कोरोनाच्या लाटेत काय भाकीत वर्तवले होते आणि ते किती खरे झाले हे कोणीही तपासले नाही.

मागे त्यांनी भारतात कोरोनामुळे 10 लाखापेक्षा जास्त लोक मरतील, असे भाकीत करून मोदींना दूषणे लावली होती, पण तसे काहीच झाले नाही. उलट इंग्लंड, जर्मनी, अमेरिका या देशात मृतांचा खच पडला असताना लॅन्सेटने एक शब्दही लिहिला नाही. अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जवळ येताच लॅन्सेटला साक्षात्कार झाला. मग ते ट्रम्प यांच्या मागे लागले. अमेरिकेत कोरोना कसा थैमान घालतोय याची रसभरीत वर्णने लॅन्सेटमध्ये येऊ लागली. ट्रम्प गेले आणि लॅन्सेटच्या तोंडाला पुन्हा कुलूप लागले. इतके की, आता त्यांना अमेरिकेत कोरोना दिसत नाही. हे वैद्यकीय जर्नल असूनही त्यांनी भारताने 370 कलम रद्द केल्याने काश्मीरमध्ये हिंसाचार उसळेल असे भाकीत केले होते. आता 370 कलाम आणि आरोग्याचा संबंध काय? पण इतर देशात ढवळाढवळ करायची यांची सवय जुनीच आहे. पण लॅन्सेटचा अग्रलेख डोक्यावर घेऊन नाचणार्‍यांची कीव येते. मोदींविरोधात आपण बाह्य शक्तीच्या हातचे बाहुले बनतोय हेही यांना कळेनासे झाले आहे.

हे लॅन्सेट चीनच्या विरोधात मात्र मावळ भूमिका घेताना दिसून येते. आतापर्यंत एकदाही त्यांनी कोरोनाच्या प्रसाराबाबत चीनची कानउघाडणी केली नाही. उलट चीनकडे त्यांनी सोयीस्कर कानाडोळा केला. इतकेच नव्हे तर लॅन्सेटला मानणारेही गप्प बसले आहेत. अमेरिकेचे माजी अध्यक्ष ट्रम्प यांनी कोविड 19 हा चायनीज व्हायरस असा उल्लेख केल्यामुळे लॅन्सेट समर्थकांमध्ये खळबळ माजली. त्यांनी ट्रम्प यांच्यावर हल्ला चढवला. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांच्या विरोधात उभे राहू इच्छिणार्‍या जो बायडेन यांनी त्यावरून उलट ट्रम्प यांच्यावर टीका केली. ट्रम्प यांनी कोरोना व्हायरसचा उल्लेख चायनीज व्हायरस असा केला ही बाब चिन्यांना चांगलीच झोंबली. आणि चीनचे लाभार्थी असलेल्या लॅन्सेट समर्थकांना झोंबली. त्यांचा संताप अनावर होता. भर पत्रकार परिषदेमध्ये काही पत्रकारांनी ट्रम्प यांना याचा जाब विचारण्याचाही प्रयत्न केला. त्यावर ट्रम्प म्हणाले की, मी रेसिस्ट नाही. व्हायरस चीनमधून आला हे खरे ना? मग मी तेवढेच बोललो आहे.

आपल्या बोलण्याचे ट्रम्प यांनी समर्थन केले म्हणून लॅन्सेट समर्थक अधिकच भडकले होते. हे लॅन्सेट समर्थक आणि राजकारण्यांमध्ये एक मोठा फरक असतो. जिहादी वृत्तीने जगात वावरणारे लॅन्सेट समर्थक आपल्या म्हणण्यासाठी प्राणाची बाजी लावत असल्याचा आव आणतात. मी मरेन पण तुला मारेन अशी त्यांची जिद्द असते. राजकारणी तसा नसतो. त्याला दोन पावले पुढे कधी टाकायची आणि एक पाऊल मागे कधी घ्यायचे ही कला चांगलीच अवगत असते. कोणत्या प्रश्नासाठी किती बाजी लावायची याचे भान असावे लागते तेव्हा माणूस लोकप्रतिनिधी होऊ शकतो. उदाहरण देऊन स्पष्ट करायचे तर पोलीस आणि सैनिक यांच्या मानसिकतेमधला फरक तुम्ही बघितला आहे काय? सैनिकाला प्रशिक्षण असे दिले जाते की कोणत्याही परिस्थितीमध्ये दुश्मन समोर असेल तेव्हा त्याचा बीमोड करेपर्यंत उसंत घ्यायची नाही. शत्रूचा पूर्ण खातमा झाल्याशिवाय सैनिक शस्त्र खाली ठेवत नाही. याउलट पोलिसांचे प्रशिक्षण असते. त्यांना समाजावर वर्चस्व गाजवायचे असते. समाजाच्या मनामध्ये आपल्याविषयी धाक निर्माण करायचा असतो. पण असा समाज हा तुमचा शत्रू आहे असे काही त्याच्या प्रशिक्षणामध्ये शिकवले जात नाही, कारण खरोखरच पाहता समोरून हल्ला जरी करून येत असला तरी असा समाज शत्रू नसल्यामुळे वेळ पाहून पोलिसाने माघार घ्यावी असे त्याचे प्रशिक्षण त्याला शिकवते.

आणि या प्रशिक्षणातील फरकाला साजेसे वेगवेगळे शस्त्र दोघांना हाती दिले जात असते. त्यांच्या कार्यक्षेत्रासाठी जो कायदा बनतो त्यातही या फरकाचे भान ठेवलेले आपल्याला दिसते. सैनिक आणि पोलिसामधला हा फरक आहे. म्हणून जेव्हा आक्रमक समाज पोलिसांना आवरता येत नाही तेव्हा लष्कराला पाचारण करावे लागते. बर्‍याच दिवसांनी सापडला रे म्हणत त्यांना ट्रम्पवर धावून जाण्याची संधी मिळाल्याने ते खूश झाले आता मोदी कचाट्यात सापडल्याने लॅन्सेट समर्थक खूश झाले आहेत. लॅन्सेटने मोदींवर ठपका ठेवल्यानंतर भारतातील मोदीविरोधकांना स्वर्ग दोन बोटे उरला आहे, इतका आनंद झालेला आहे. आपल्याकडे गोर्‍या चमडीची गुलामगिरी आनंदाने स्वीकारणार्‍यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे गोर्‍यांच्या जगातील म्हणजेच पाश्चिमात्य जगातील कुठल्याही व्यक्तीने किंवा नियतकालिकाने एखाद्या भारतीय व्यक्तीवर किंवा संस्थेवर भाष्य केले की, जणू ती काही दैवी आकाशवाणी आहे, या भावनेतून आपण ती पूज्य मानत असतो. त्याचे दाखल देत सुटतो. ती व्यक्ती केवळ रंगाने गोरी आहे, तसेच ते नियतकालिक गोर्‍यांच्या देशातील आहे, इतकाच निकष आपल्यासाठी पुरेसा असतो.

त्यामुळे लॅन्सेट या पाश्चिमात्य जगातील नियतकालिकाने भारतातील कोरोनाच्या उद्रेकाला जबाबदार धरल्यानंतर आता मोदी विरोधक अतिशय अ‍ॅक्टिव्ह मोडवर आलेले आहे. त्यात काँग्रेस तर पहिल्या क्रमांकावर असणार यात प्रश्नच नाही. ज्या अमेरिकेने मोदींना एकेकाळी व्हिसा नाकारला होता, तिच अमेरिका ते पंतप्रधान झाल्यावर त्यांना डोक्यावर घेऊन नाचत होती. या सगळ्यांचा मोदी विरोधकांना विसर पडतो, याचेच आश्चर्य वाटते. पण सध्या ते लॅन्सेटच्या प्रेमात पडले आहेत,त्याला काय करणार? पण काहीही झाले तरी सध्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, सगळ्या देशाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्यामुळे लॅन्सेट काय हवे ते बोलले तरी भारताचे नेतृत्व मोदींकडे आहे. पुढील काळात कोरोनाची स्थिती हाताळून नियंत्रणात आणण्याचे सगळे निर्णय त्यांनाच घ्यायचे आहेत. त्यामुळे मोदी विरोधकांनी किती आनंद व्यक्त करून मोदींना दुषणे दिली तरी या कोरोना काळातून देशाला बाहेर काढण्याची जबाबदारी मोदींवरच आहे. आज कोरोनाने कहर केलेला असताना जगभरातून भारताकडे जी मदत येत आहे, त्यामागे मोदींचे मैत्रीपूर्ण संबंधांचे परराष्ट्र धोरण कारणीभूत आहे, याचा भारतातील मोदीविरोधक आणि लॅन्सेट कधीतरी विचार करणार आहे का?