घरफिचर्समायमहानगर ब्लॉगदोघांच्या प्रेमाचा तिसर्‍याला लाभ

दोघांच्या प्रेमाचा तिसर्‍याला लाभ

Subscribe

भाजपला पाण्यात बघणारा आणि भाजपच्या विजयाबद्दल कायम मनात संशय बाळगणारा कट्टर मतदार आहे. त्यालाही भाजपचा विजय हा ईव्हीएम मशिनमुळेच झाला याची खात्री आहे. राज ठाकरे यांनी ईव्हीएमच्याविरोधात आघाडी उघडल्यावर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचा तो पारंपारिक मतदार आज राज ठाकरेंच्या बाजूने उभा राहिला आहे. ईव्हीएमविरोधातील आंदोलनासाठी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे हेच केंद्रस्थानी होते. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि इतर विरोधी पक्षांचे नेते त्यांच्या बाजूला बसले होते. त्यातून ईव्हीएमविरोधी आंदोलन हे राज ठाकरे यांच्याभोवती केंद्रीत झाले हे भाजपविरोधी मतदाराच्या मनात बिंबवण्यात राज ठाकरे यांना यश आले.

राज ठाकरे यांना ईडीची नोटीस आली आहे. दादर येथील कोहिनूर मिल खरेदी व्यवहारात गैरप्रकार झाल्याचा संशय ईडीला असल्यामुळे त्यांनी राज ठाकरे यांना नोटीस बजावून चौकशीसाठी बोलावले आहे. येत्या २२ ऑगस्ट रोजी राज ठाकरे यांची ईडीच्या मुंबईच्या कार्यालयात चौकशी होणार आहे. ईडीची नोटीस आल्यावर साहजिकच राज ठाकरे यांनी त्याचा राजकीय फायदा घेणे हे सहज समजण्यासारखे आहे. राज ठाकरे हे राजकीय नेते आहेत. त्यामुळे ईडीच्या नोटीसीचा आधार घेत, आपल्या विरोधी पक्षाला म्हणजे सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला फटाकरणे आणि त्या माध्यमातून जनतेची सहानुभूती मिळवणे हे राजकारणाचे डावपेच असतात. त्यानुसार सर्व व्यूहरचना मनसेने केल्यास त्यात वावगे नाही. मात्र त्यात इतर विरोधी पक्ष राज ठाकरे यांच्या मागे जाऊन स्वत:चे नष्ट होऊ पहाणारे अस्तित्व अधिकच धूसर करणार नाहीत, हाच खरा प्रश्न आहे. कधी नरेंद्र मोदींची प्रशंसा करणार्‍या राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान मोदींविरोधात आघाडी उघडली. तेव्हापासून राज ठाकरे आणि मोदी समर्थकांमध्ये जुंपली आहे. भाजप आणि मोदी समर्थकांनी राज ठाकरे यांना पाण्यात बघण्यास सुरुवात केली आहे.

राज ठाकरे यांच्या मनसे पक्षातील त्यांचे अनेक जुने सहकारी त्यांना सोडून गेले. मागील पाच वर्षांत राज ठाकरे यांच्या पक्षाची पुरती वाताहात झाली. लोकसभा निवडणुकीच्यादरम्यान राज ठाकरे यांनी आपला एकही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभा केला नाही. मात्र त्यांनी मोदींवर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली. त्यामुळे गर्दी जमवणारे राज ठाकरे त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला हवेहवेसे झाले. या दोन्ही पक्षात राज ठाकरे यांच्यासारखा गर्दी खेचणार नेता नसल्यामुळे राज ठाकरे यांच्या सभा काँग्रेस, राष्ट्रवादीच्या उमेदवारांसाठी झाल्या. वास्तविक लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होण्यापर्यंत काँग्रेस आघाडीत मनसे दाखल होण्याच्या बातम्या रंगत होत्या. पण काँग्रेसला ते मंजूर नव्हते आणि राष्ट्रवादीला मनसेची साथ हवी होती. राज ठाकरे यांनी आपले उमेदवार उभे न करता, सेना-भाजपचे उमेदवार पाडण्याचा निवडणूक कार्यक्रम हाती घेतला. काँग्रेसला फुकटचा प्रचारक मिळाला. तशी टीकाही राज ठाकरे यांच्यावर झाली. पण सध्याच्या जगात कोणीही फुकट काही करते का?

- Advertisement -

महाराष्ट्रात नरेंद्र मोदी यांच्यानंतर गर्दी खेचणारा स्टार प्रचारक राज ठाकरे हेच होते. राहुल गांधींच्या सभेला गर्दी जमवावी लागते. पण काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार आपल्या भागात मतदारसंघात राज यांनी प्रचाराला यावे किंवा सभा घ्यावी,अशी मागणी करत होते. किंबहुना पवार-राहुलसाठी जितकी मागणी नाही, त्याच्या अनेक पटीने मोदी विरोधासाठी राज यांच्याकडे उमेदवारांची रीघ लागलेली होती. महाराष्ट्रात मोदीविरोधी राजकारणाचा सर्वात मोठा लढवय्या किंवा म्होरक्या नेता, अशीच राजविषयी जनमानसात प्रतिमा झाली होती. त्यात सर्व काँग्रेसी वा राष्ट्रवादी नेते मागे पडले आहेत. अगदी प्रकाश आंबेडकरांचेही नाव पुसले गेले. काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाचे जे निष्ठावान मतदार अनुयायी असतील, त्यांच्याव्यतिरिक्त लाखो हजारो मोदी भाजप विरोधक आहेत. जे मनापासून मोदींचा द्वेष करतात व त्यासाठी कोणाच्याही मागे जायला तयार आहेत. त्यांच्यासाठी आता पवार वा अशोक चव्हाण वा तत्सम कुठल्याही नेता किंवा पक्षापेक्षा राज ठाकरे हाच एकमेव प्रभावी पर्याय म्हणून पुढे आलेले आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी वा अगदी मुस्लीम वा दलितांचा एक वर्ग राजकडे ओढला गेला आहे.

लोकसभा निवडणुकीत राज यांनी कितीही प्रचार केला वा रान उठवले, तरी सेना-भाजपच्या एक टक्काही मतांवर राजचा प्रभाव पडला नाही. मात्र राजकडे संशयाने बघणार्‍या समाजघटक वर्गाची दृष्टी अचानक बदलून गेली आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा मोठा पराभव झाला. त्यामुळे भाजप आणि मोदींचा कट्टरविरोधक मतदार काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल कमालीचा नाराज झाला आहे. त्याचा ओढा आता भाजप विरोधाचे समर्थ नेतृत्व करू शकणार्‍या राज ठाकरे यांच्याकडे वळला आहे. कुठलीही जागा लढवत नसतानाही मोदी विरोधातल्या कोणालाही निरपेक्ष वृत्तीने मदत करणारा राज ठाकरे हे एक समर्थ नेते झाले आहेत. एकही जागा न लढवता राज ठाकरे यांनी आपला नवा मतदारसंघ तयार केला आहे. बिहार, उत्तर प्रदेश, तेलंगणा, दिल्ली अशा विविध राज्यांतून काँग्रेस नामशेष झाली, त्यातून तिथले प्रादेशिक पक्ष उभे राहत गेले. मग महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी यांची जागा घेण्यास राज ठाकरे सरसावले नाहीत का?

- Advertisement -

आज काँग्रेस, राष्ट्रवादी मागे ठराविक मतदार आहे. पण त्याला प्रभावित करणारे नेते वा वक्ते, त्या दोन्ही पक्षांकडे नाहीत. नेमकी तीच जागा राज ठाकरे यांनी निवडणुका न लढवता भरून काढली आहे. दुसरीकडे फुकटचा प्रचार म्हणून याच दोन्ही पक्षांनी राजसाठी आमंत्रणे देऊन व गर्दी जमवून त्यांना अधिक प्रभावी बनवायला हातभार लावला आहे. लोकसभा निवडणुका संपल्यानंतर ईव्हीएममुळे भाजप पुन्हा सत्तेत आली, असा कांगावा विरोधी पक्षांनी केला. राज ठाकरे यांनीही ईव्हीएमबद्दल आघाडी उघडली. त्यासाठी ते ममता बॅनर्जींपासून सोनिया गांधी यांना भेटून आल्या. भाजपला पाण्यात बघणारा आणि भाजपच्या विजयाबद्दल कायम मनात संशय बाळगणारा कट्टर मतदार आहे. त्यालाही भाजपचा विजय हा ईव्हीएम मशिनमुळेच झाला याची खात्री आहे. राज ठाकरे यांनी ईव्हीएमच्याविरोधात आघाडी उघडल्यावर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचा तो पारंपारिक मतदार आज राज ठाकरेंच्या बाजूने उभा राहिला आहे. ईव्हीएमविरोधातील आंदोलनासाठी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे हेच केंद्रस्थानी होते. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि इतर विरोधी पक्षांचे नेते त्यांच्या बाजूला बसले होते. त्यातून ईव्हीएमविरोधी आंदोलन हे राज ठाकरे यांच्याभोवती केंद्रीत झाले हे भाजपविरोधी मतदाराच्या मनात बिंबवण्यात राज ठाकरे यांना यश आले. अशा परिस्थितीत ईडीने राज ठाकरे यांच्याविरोधात बजावलेली नोटीस हे राज ठाकरे यांना आयतेच मिळालेले कोलित आहे. राज ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूती बाळगून असलेला मतदार आता त्यांच्याकडेच वळणार हे निश्चित आहे. त्यातच विरोधी पक्षांनी राज ठाकरे यांच्या पाठीशी उभे राहून त्यांचे स्थान अधिकच बळकट केले आहे.

सुमारे तीन महिन्यांनी विधानसभेच्या निवडणूक आखाड्यात राज आपला पक्ष घेऊन उतरतील, तेव्हा त्यांना आघाडीत घेतले नाही तर काँग्रेस, राष्ट्रवादीलाच त्याच्या झळा सोसाव्या लागणार आहेत. आगामी विधानसभेत भाजप-सेनेची युती बहुतेक निश्चित झाली आहे. त्यांच्या विरोधातला एकमेव नेता म्हणून राज ठाकरेंनी आपली प्रतिमा उभारण्याचा प्रकल्प एव्हाना पूर्ण झाला आहे. ईडीची चौकशी झाली तरी सर्व कागदपत्रे क्लिअर असल्यामुळे आपल्याला अटक होणार नाही, याची खात्री राज ठाकरे यांना आहे. त्यामुळे ते त्याबाबत निश्चिंत आहेत. मात्र या चौकशीचा उपयोग जास्तीत जास्त भाजप-सेनाविरोधी मतदार आपल्या बाजूने वळण्यासाठी ते करून घेणार हेही निश्चित आहे. तर दुसर्‍या बाजूला ईडीचा वापर खरंच भाजप आपल्या राजकीय विरोधकांना संपवण्यासाठी करत असेल तर राज ठाकरे यांना नोटीस पाठवून भाजपने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस संपवण्यासाठी तो डाव टाकला असण्याची सर्वाधिक शक्यता आहे. राज ठाकरे यांनी भाजपविरोधक मतदार आपल्या बाजूने खेचला असला तरी यावेळी विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे हे भाजप-सेनेपुढे आव्हान उभे करू शकतील, इतका तो निश्चितच नाही. मात्र राज ठाकरेंकडे येणारा मतदार काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बुडणार्‍या जहाजाचे छिद्र अधिक मोेठे करू शकेल इतका मात्र निश्चितच आहे. त्यामुळे दोघांच्या प्रेमात लाभ मात्र राज ठाकरेंचा आहे.

Santosh Malkarhttps://www.mymahanagar.com/author/msantosh/
आपलं महानगर मुंबई आवृत्ती निवासी संपादक. गेली २५ वर्षे पत्रकारितेत आहे. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -