कपड्यांवरून कर्तृत्व ठरवणारे महाभाग !

फिनलँडमध्ये सध्या लोक पंतप्रधान सना मरिन यांच्यासाठी रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत. देशात कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आणण्यात यशस्वी झालेल्या महिला नेत्यांच्या यादीत त्यांचे नाव आहे. यामुळे सना यांचे जगभरात अनेक चाहते आहेत. पण त्यांनी एक मॅगझिनच्या कव्हर पेजवरील फोटोमध्ये ब्लेझरच्या आत शर्ट घातला नाही. यामुळे त्या वाईट चालीची स्त्री ठरल्या आहेत. या घटनेमुळे त्यांच्या चारित्र्यावर चिखलफेक करण्याची आयती संधीच विरोधकांना मिळाली आहे. खरं तर हे असे भारतासारख्या देशात झाले असते तर समजण्यासारखे होते, पण फिनलॅॅण्डसारख्या पुढारलेल्या देशात घडत आहे, त्याचा अर्थ कपड्यांवरून महिलेचे कर्तृत्व ठवणारे आणि चारित्र्याचा दाखला देणारे महाभाग जगभर आहेत.

जगभरात लोक आता कोरोनाबरोबर जगायला शिकले आहेत. यामुळे आंतरराष्ट्रीयस्तरावर गेल्या सहा महिन्यांपासून मीडियाच्या कव्हर पेजवर झळकणारा कोरोनाचा विषय आता साईड स्टोरीमध्ये दिसू लागला आहे. सगळं सामान्य होत असल्याचं हे चित्र आहे, पण याचदरम्यान जगात अनेक घटनाही घडत आहेत. यातच सध्या एका बातमीने सगळ्या जगाचं लक्ष फिनलँडकडे वेधले आहे. कारणही तसंच आहे. विषय फिनलँडच्या राजकारणाशी अथवा त्याच्या आजूबाजूच्या शत्रुराष्ट्रांशी संबंधित नसून फिनलँडचे प्रतिनिधित्व करणार्‍या जगातील सर्वात तरुण 34 वर्षीय पंतप्रधान सना मरिन यांच्याशी आहे. तो पण त्यांच्या कणखर, नेतृत्वगुणावर नाही तर एका मॅगेझिनच्या कव्हर पेजसाठी त्यांनी केलेल्या फॅशनशूट संबंधित आहे. कारण या फोटोत सना यांनी काळ्या रंगाचा कट ब्लेजर व ट्राऊझर घातली असून ब्लेझरच्या आत शर्ट मात्र घातलेला नाही. त्यामुळे त्यांचे क्लिव्हेज दिसत आहे. त्यांच्या या हॉट फोटोशूटमुळे त्यांना ट्रोल करण्यात येत असून ही बाई कामातून गेल्याचा ठपका काहींनी सनावर ठेवला आहे. यामुळे कपड्यांवरून बायकांचे चरित्र ठरवणारे महाभाग भारतातच नाही तर जगभरात विखुरलेले असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

या फोटोमुळे कोरोना महामारीतच नाही तर अनेक महत्वपूर्ण निर्णय घेऊन देशवासियांना सुरक्षित ठेवण्यासाठी दिवसरात्र राबणार्‍या सना यांच्या कर्तृत्वावर बोळाच फिरवण्याचा उद्योग विरोधकांनी सुरू केला आहे. सना या देशाच्या पंतप्रधान असून त्यांनी घातलेला पेहराव शरीर प्रदर्शन करणारा असून तो त्यांच्या पदाला शोभत नाही असा गळा विरोधकांनी काढला आहे. तर दुसरीकडे सना यांचे समर्थक त्यांच्या बाजूने उभे असून फिनलँडमध्ये सध्या लोक सनासाठी रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत. सना मरिन विवाहीत असून त्यांना एक मुलगीही आहे. सोशल डेमोक्रेट पार्टीच्या त्या नेत्याही आहेत. अवघ्या 34 व्या वर्षी पंतप्रधानपद मिळवणार्‍या त्या जगातील सर्वात कमी वयाच्या नेत्या आहेत. देशात कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आणण्यात यशस्वी झालेल्या महिला नेत्यांच्या यादीतही त्यांचे नाव आहे. यामुळे सना यांचे जगभऱात अनेक चाहते आहेत. पण त्यांनी कव्हर पेजवरील फोटोमध्ये ब्लेझरच्या आत शर्ट मात्र घातला नाही. यामुळे त्या वाईट चालीची स्त्री ठरल्या आहेत. या घटनेमुळे त्यांच्या चारित्र्यावर चिखलफेक करण्याची आयती संधीच विरोधकांना मिळाली आहे.

खरं तर हे असे भारतासारख्या देशात झाले असते तर समजण्यासारखे होते कारण आपल्या देशात बाई काय पेहराव करते यावरून तिचे चारित्र्य ठरवण्याचा रिकामा उद्योग येथील मंडळी करतात. ती आपली परंपरा आहे असं म्हटलं तरी अतिशयोक्ती होणार नाही. कारण जी बाई अंगभर कपडे घालते ती संस्कारी व जी बाई जीन्स, शर्ट पँट,स्कर्ट, मिडी वगैरे घालते. ती एकदम बेक्कार, कसलेही संस्कार नसलेली, तिला कसलंही वळण नसलेली. पुरुषांना नादी लावणारी, थोडक्यात बारा गावचं पाणी प्यायलेली असे लेबल तिच्यावर चिकटवले जाते. कारण तशीच मानसिकता आहे आपल्या समाजाची. याला काही अपवादही आहेत. पण 100 टक्के समाजापैकी 80 टक्के जनता बाईचे चारित्र्य तिच्या कपड्यांवरूनच ठरवते. हे भारतीय म्हणून आम्हांला तुम्हांला माहीत आहे. पण ज्या युरोपमध्ये पुरुषांच्या तुलनेत मोठ्या पदावर महिलाच अधिक यशस्वी ठरल्या आहेत तेथील महिलांनाही याच कारणांवरून टवाळखोरांचा सामना करावा लागतो हे धक्कादायक आहे. कारण पाश्चिमात्य व तत्सम परदेशातील महिलांचा सामान्य पेहरावच जर पुरुषी पेहरावासारखा असेल तिथे खरं तर असे काही ऐकणे अपेक्षितच नाही. यामुळे फिनलँडच नाही तर जगातील अनेक देशातील नागरिकांनी सना यांना पेहरावावरून ट्रोल करणार्‍यांचा समाचार घेण्यास सुरुवात केली आहे. ही एक अभिमानास्पद बाब निश्चितच आहे.

एका कर्तृत्ववान देशाचे पंतप्रधानपद भूषवणार्‍या महिलेचे चारित्र्य जर कपड्यावरून ठरवण्यात येत असेल तर सगळा देशच तिच्यामागे उभे राहणे हे नक्कीच कौतुकास्पद आहे. या घटनेची तुलना भारताशी केल्यावर आपण किती भंपक आहोत हे समजून येते. कारण थोड्याफार फरकाने असे प्रसंग आपल्या देशातही घडले आहेत. काही वर्षांपूर्वी बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोन हिलादेखील तिच्या ड्रेसवरून ट्रोल करण्यात आले होते. तिने एका कार्यक्रमात घातलेल्या जॅकेटमध्ये तिचे क्लिवेज दिसत होते. तिचे ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यावरून लोकांनी तिला भारतीय संस्कृतीचे डोस पाजायला सुरुवात केली. तर काहींनी तिच्यावरील संस्कार कमी असल्याचे आरोप केले. यावर गप्प बसेल तर ती दीपिका कसली. तिने यावर तिच्या फटकेबाज स्टाईलने सडेतोड उत्तर देत लोकांची तोंडंच बंद केली. हो मी एक स्त्री आहे.

मला वक्ष आहेत आणि क्लिवेजही आहेत. तुम्हाला याचा काही त्रास आहे का, असा उलटप्रश्न करत तिने ड्रेसवरून महिलांचे चारित्र्य ठरवणार्‍यांचा समाचार घेतला होता. पण त्यावेळी तिचे चाहते सोडता कोणीही तिच्या बाजूने उभे राहिले नाही. कारण आपल्या देशात हा प्रश्न इतका मोठा नाही की, ज्यासाठी जनतेने एकत्र यावे व महिलांच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरावे. कारण येथे महिलांना गृहीतच धरले जाते. यामुळे जेव्हा एखादी महिला सार्वजनिक ठिकाणी जीन्स घालते तेव्हा तिच्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोनच बदलतो. तिला असभ्य समजले जाते. तिच्याबद्दल काहीही माहिती नसताना तिच्यावरील संस्कारापर्यंत जाऊन पोहचतात. पण असाच पेहराव घातलेल्या महिलांचे फोटो सोशल मीडियावर, मॅगेझिनमध्ये, मात्र हाच समाज चवीने बघतो. फॉरवर्ड करतो.

काँग्रेसच्या राष्ट्रीय महासचिव प्रियांका गांधी या नेहमी मॉर्डन कपड्यात दिसतात. जीन्स हा त्यांचा आवडता पेहराव. दिल्लीत त्या जीन्स टीशर्टमध्ये दिसतात, पण उत्तर प्रदेशमध्ये ग्रामीण भागात मात्र त्या साडी, टिकली बांगड्या घालून जातात, असा उपहासात्मक टोला एका भाजप नेत्याने मारला होता. त्याला काय म्हणायचे होते हे अख्ख्या देशाला माहीत आहे. त्या विधानाने खळबळ उडाली, पण काँग्रेस वगळता कोणीही प्रियांकांच्या बाजूने बोलले नाही. अगदी महिलासुद्धा. हाच काय तो आपल्या व फिनलँडच्या मानसिकतेमध्ये फरक असावा. परदेशात जेव्हा एखाद्या महिलेच्या अस्मितेवर प्रश्नचिन्ह लावले जाते, तेव्हा तिथे तिच्या समर्थनासाठी महिलाच नाही तर पुरुषही पुढे सरसावतात. मग ते ड्रेस कोड असो वा तिचा विनयभंग पण तिथेही काही महाभाग आहेतच जे महिलांना दुय्यम समजण्यात धन्यता समजतात.

पण तेथील समाज अशा व्यक्तींना थेट शिंगावर घेत त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याची धमक ठेवतो. यामुळेच फिनलँडच्या पंतप्रधानांना ट्रोल करणार्‍यांविरुद्ध तेथे लोक रस्त्यावर उतरत आहेत. आपल्या येथे मात्र निर्भया, हाथरस, कठुआ आणि तशाच महिला अत्याचाराच्या भयानक घटनांनंतर समाजाला जाग येते. जी त्या घटनेच्या क्रूरतेवरच अधिक अवलंबून असते. मात्र कधी एखाद्या महिलेला कपड्यावरून ट्रोल करणार्‍यांविरोधात भारतात लोक एकवटल्याचे ऐकवत नाहीत. फक्त जेव्हा एखाद्या कॉलेजमध्ये ड्रेस कोड लागू करण्यासंबंधी नियम केला जातो, तेव्हा फक्त तरुणाईच त्याविरोधात पुढे येते. पण खरं तर हेच पहिले पाऊल आहे, एखाद्या महिलांच्या स्वतंत्र अस्तित्वाची समाजाला जाणीव करुन देण्याचे. कारण त्यावरूनच त्या स्त्रीची एक प्रतिमा तयार होते समाजासमोर. यामुळे फिनलँडमध्ये आज जे काही सुरू आहे त्याकडे केवळ बातमीपुरते न बघता त्यामागे जनतेची असलेली मानसिकताही लक्षात घ्यायला हवी. ती एक स्वतंत्र चळवळ आहे जी प्रत्येक देशात उभी राहणे गरजेचे आहे.