घरफिचर्समायमहानगर ब्लॉगनिसर्ग आणि विविधता!

निसर्ग आणि विविधता!

Subscribe

निसर्गात आपल्याला विविधता आढळते, खरे तर विविधता ही निसर्गनिर्मित आहे असेच म्हणावे लागते. विविधतेची सुरुवात आपल्याला आपल्या हातांच्या बोटांपासून करावी लागेल. निसर्गाने हाताची बोटे ही सारख्या उंचीची बनवलेली नाहीत. कारण ती तशी असती तर आपल्याला हाताच्या पंजाचा प्रभावी उपयोग करता आला नसता. एखादी गोष्ट व्यवस्थित मुठीत पकडता आली नसती. ही बोटे विविध उंचीची आहेत, म्हणून हाताचा प्रभावी उपयोग करता येतो. निसर्गात सगळ्याचा गोष्टी एकाच रंगाच्या किंवा एकाच अकाराच्या असत नाहीत. प्राण्यांमध्ये नर आणि मादी अशीही विविधता आहे. नर आणि मादी मिळून एकच प्राणी असे केलेले नाही. याला काही प्राणी अपवाद आहेत. जसे गांडूळ. अशा प्राण्यांना उभयलिंगी ( hermaphrodite) असे म्हणतात.
सूरही सात आहेत. नाहीतर सगळे एकसुरी कंटाळवाणे झाले असते.

आपल्या शरीराच्या अवयवांचा आकार वेगवेगळा असतो. सगळे अवयव एकसारखे किंवा एकाच अवयवाने सगळे शरीर बनत नाही. अगदी आपले मनाचेसुद्धा विविध moods असतात. विविध स्थिती असतात. शरीरदेखील एका स्थितीत फार काळ ठेऊन चालत नाही. जर ते दीर्घ काळ एकाच स्थितीत राहिले तर त्याचे त्या स्थितीत बद्धिकरण होईल. ते त्या स्थितीत अडकले जाईल. fix होईल. त्या स्थितीतून त्या माणसाला बाहेर पडता येणार नाही. परिणामी त्याचा मृत्यू होईल. जसे आपला हात एकाच स्थितीत चार वर्षे बांधून ठेवला तर तो त्या स्थितीतून नंतर बाहेर येणार नाही. तो तसाच राहील. शरीराचं काय मनाच्याही स्थिती बदलत राहतात. त्या बदलत राहणे अपेक्षित आहे. तसे झाले नाही आणि मन जर एकाच स्थितीत अडकून राहिले तर त्याचे बद्धीकरण होईल आणि परिणामी मनाचा मृत्यू होईल म्हणजे ते निष्क्रिय होऊन जाईल. हे मी मानवाचे एक उदाहरण घेतले. हाच नियम सृष्टीतील सगळ्या सजीव घटकांना लागू होतो.

- Advertisement -

निसर्गाचा व्यवहार म्हणजे सृष्टीचे चक्र सुरू राहण्यासाठी निसर्गाने अशी विविधता निर्माण केलेली आहे. विविधता नसेल तर सगळ्या गोष्ट even म्हणजेच सम होऊन सगळे सृष्टीचक्र ठप्प होऊन जाईल आणि ते नष्ट होईल. निसर्गाला हे सृष्टीचक्र नष्ट करायचे नाही. म्हणजेच त्याला स्वतःला नष्ट व्हायचे नाही, म्हणून त्याने ही विविधता निर्माण केलेली आहे किंवा झालेली आहे. जसे जगात सगळेच एकाच आकाराचे, एकाच रंगाचे आणि एकाच विचाराचे झाले, तरी समस्या निर्माण होऊ शकेल.

माणसासह प्राण्यांमधील संघर्ष हा निसर्गानेच लावून दिलेला आहे. सगळेच जर एकाच स्वभावाचे असते आणि वैचारिक विविधता नसती तर संघर्ष झालाच नसता. संघर्ष झाला नसता तर नवनिर्मिती झाली नसती. कारण दोन गोष्टी किंवा विचार घासल्या गेल्यानंतरच तिसरी गोष्ट निर्माण होत असते.

- Advertisement -

सगळीच जर एकसमानता असती तर निसर्गात संघर्ष झालाच नसता. प्रत्येक गोष्टीत जी स्थितीज ऊर्जा म्हणजे potential energy भरलेली आहे तिचे गतीज ऊर्जेत kinetic energy मध्ये रूपांतर होणे आवश्यक असते. तरच निसर्गाचा व्यवहार सुरू राहतो. जसे आपल्याकडे जी बुध्दिमत्ता आणि ज्ञान असते किंवा शारीरिक शक्ती असते ती स्थितीज ऊर्जा असते. ती आपण एखाद्या कामासाठी किंवा आपल्याला हवे असते ते मिळवण्यासाठी वापरतो म्हणजे उपक्रमांना जोडतो तेव्हा आपल्यातील स्थितीज ऊर्जेचे गतीज ऊर्जेत म्हणजे kinetic energy मध्ये रुपांतर होते. जसे कोळसा जाळला की त्याचा निखारा होतो. कोळशातील स्थितीज ऊर्जा आगीच्या माध्यमातून गतीज उर्जेत रूपांतरित होते. त्या आगीवर आपल्याला जेवण शिजवता येते. कोळशांवर जेवण शिजत नाही. ते निखाऱ्यांवर शिजते.

निसर्ग आपल्याला असे पेटवत असतो, त्यामुळे आपल्यातील ऊर्जा व्यक्त होत असते. त्यामुळे नवनिर्मिती आणि विविध व्यवहार सुरू राहतात. निसर्गाने आपल्याला पेटवले नसते तर आपण सजीव घटक केवळ कोळसे होऊन पाडून राहिलो असतो. मतभिन्नता, आकार आणि प्रकार भिन्नता नसती तर सजीवांमध्ये संघर्ष झालाच नसता. भिन्नता म्हणजेच विविधता ही निसर्गाने सजीव घटकांमधील स्थितीज ऊर्जा ही गतीज ऊर्जेत रूपांतरित होऊन सृष्टीचक्र सुरू राहावे त्यासाठी निर्माण केलेली आहे.

सारांश असा की, जगात आपण जो संघर्ष पाहतो तो निसर्गनिर्मित आहे. कारण सृष्टीचक्र सुरू राहणे ही निसर्गाची गरज आहे. कारण तो त्याच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे सृष्टीचक्र सुरू राहण्यासाठी निसर्ग सजीव घटकांना biotic factors आपापसात लढवत ठेवतो.

मानवाने तो विविध प्रकारे टाळण्याचा प्रयत्न केला तरी तो वेगळे रूप घेऊन उफाळून येतो. यात बरेच सजीव मरतात. मालमत्ता नष्ट होते. पण जे जिवंत राहतात त्यांचा पुढचा प्रवास नव्याने सुरू होतो.

पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धांमुळे जी जीवित, भावनिक आणि वित्त यांची अपरिमित हानी झाली ते पाहून जगातील अनेक राष्ट्रे एकत्र येऊन त्यांनी पुढील काळात अशी महायुद्धे टाळण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना केली. त्यातून पुढील महायुद्ध रोखण्याचा प्रयत्न झाला. पण निसर्ग शांत बसला नाही. त्याने वेगळ्या प्रकारे कोरोनाच्या माध्यमातून तिसरे महायुद्ध जगावर लादले, ज्याचा आपण सध्या सामना करत आहोत. महायुध्दे जशी दीर्घ काळ चालली तसे हे corona महायुद्ध दीर्घ काळ चालणार आहे. त्यात अनेकजण मारले जाणार आहेत. जे जिवंत राहतील ते नवा दृष्टीकोण आणि नव्या वेदना घेऊन पुढचा प्रवास सुरू करतील.

निसर्ग स्वतः जिवंत राहण्यासाठी म्हणजे सृष्टीचे चक्र सुरू राहण्यासाठी सजीवांना विविधतेच्या माध्यमातून असेच पुढेही लढवत राहील. कारण आजवरचा प्रवास त्याने सजीवांना लढवत ठेवूनच केलेला आहे.

Jaywant Rane
Jaywant Ranehttps://www.mymahanagar.com/author/rjaywant/
25 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. राजकीय, सामाजिक, वैचारिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -