घरफिचर्समायमहानगर ब्लॉगस्त्री शक्तीचा शोध !

स्त्री शक्तीचा शोध !

Subscribe

एखादी मुलगी लहानपणापासून जी पापा की परी असते. प्रत्येकवेळी असतेच असही नाही. पण ज्या अनुभवातून, संस्कारातून ती घडते,वाढते ते माहेरचं अंगण व उंबऱ्याच्या आतील जडणघडण तिला तिच्या भावी वैवाहिक आयुष्यात रंग भरण्यासाठी तिला पुरेशी वाटते.

ऊद्या सकाळी जागतिक महिला दिन विशेष आहे. म्हटलं चला एखादी सुंदर काव्य रचना अथवा काहीतरी स्त्री सौदर्य, स्त्री शक्ती अशा आशयाचं लिहायला घेऊ. रविवार असल्याने दिवसभर निवांतच. माझ्या डोक्यात रेंगाळलेल्या शब्दांना एका साच्यात बसवण्यात मी व्यस्त झाले. तोपर्यंत मुलांनी टीव्ही ऑन केला. त्यांचं चॅनल अप डाऊन चालू असताना अचानक आयेशा शब्द कानावर येताच, मी क्षणात हाती रिमोट घेतला. बातमी होती आयेशाची. तिचा तो suicide करण्या अगोदरचा विडीओ मी परवा पाहिला होता. म्हटलं आजकाल काहीही पोस्ट करतात मुली नसेल काही तथ्य. या विचारानं आयेशा प्रकरण मी डोक्यात घेतलच नाही. पण आता बातमी पाहून अंगावर काटा आला. कारण खरचं ‘ ‘आयेशा ‘ ती सुंदर कोवळी पोरगी. जी हसत हसत आपल्याशी बोलत होती ती खरोखरच गेली होती.

नुकताच पूजा चव्हाण च्या मृत्यूच्या राजकीय घडामोडींच्या बातम्या संपत चाललेल्या असताना आता ही नवीन बातमी. आयेशा जाता जाता काय बोलली ” मुझे दुवाँ में याद रखना ” बघता बघता आयेशा संपून जाते. किती देखणी हसमुख. असं म्हणतात की “जे जे न देखे रवी ते ते देखे कवी.” म्हणूनच मला दिसलेली तिची तळमळ व यातना आता लवकर डोक्यातून जाणारी नव्हती. अशा परिस्थितीत कशी करू मी काव्य रचना? असे सुंदर सुंदर चेहरे समाजातून अगदी कायमस्वरूपी निघून जातात आम्हा स्त्रियांच्या हळव्या मनावर रोच एक आघात करत. मग कशी स्त्रीशक्ती जागी होईल माझ्या रचनात्मक काव्यातून.? आजच्या परिस्थितीत खरी गरज आहे ती आम्हाला प्रेरणादायी व आशादायी ठरतील अशा घोषवाक्यांची.

- Advertisement -

एखादी मुलगी लहानपणापासून जी पापा की परी असते. प्रत्येकवेळी असतेच असही नाही. पण ज्या अनुभवातून, संस्कारातून ती घडते,वाढते ते माहेरचं अंगण व उंबऱ्याच्या आतील जडणघडण तिला तिच्या भावी वैवाहिक आयुष्यात रंग भरण्यासाठी तिला पुरेशी वाटते. माझा नवरा मला सुखातच ठेवणार व माझे सासू सासरे माझे लेकीसम लाड करणार या आशेवर तिच्या हातावर मेहंदी रंग धरू लागते. काही सुदैवाने सुखात , ऐश्वर्यात असतात, काहींच्या पदरी पडतो फक्त विरोधाभास मग या प्रतिकूल परिस्थितीत अशा सर्वजणी जगतातच ना?

प्रत्येक स्वभावाची वेगळी अशी शैली असते. काहींना मुरड घालता येते मात्र काही स्त्रिया आपल्या तत्वावर ठाम असतात. पण जेव्हा पुन्हा पुन्हा अगदी सतत तत्वांचा व स्वाभिमानचा बलात्कार होतो तेव्हा “स्त्री “उद्वेगाने पेटून उठते. आपल्या समाजात अशा अनेक स्त्रिया आहेत ज्यांना त्यांच आयुष्य मुरड घालत जगाव लागत. अशा महिलांना कोण विचारात घेणार. जी दिवसभर काम काम करते. घरच्यांना समाधान वाटावं म्हणून अंगावरच दुखणं ” एका गोळीत बरी होईन ओ” असं म्हणून सर्व जबाबदारी पार पाडते. तिला वारंवार कमी लेखलं जातं. तिला नसेल कदाचित पैसा कमावणे जमत. पण किमान पैसा वाचवण्यासाठी जमेल तेवढी शक्कल लढवते. तरीही तिला मान मिळत नाही.बर्याच वेळा ” तुला काय कळतं ? ”

- Advertisement -

असं म्हणून तिच्या आत्मविश्वासाचा घात केला जातो. मग ति शिकते शांत रहायला..ति वैचारिक होते. एक विचार दोन विचार..पुन्हा पुन्हा विचारांच्या गर्तेत ती बांधली जाते. ज्या हातावर मेहंदी खूप रंगावी म्हणून त्याला साखरपाणी लावणारी एक पापा की परी , दोन दोन दिवस स्वतःच्या केसांवर कंगवा सुध्दा फिरवू शकत नाही. अशा समाजात आजही संघर्ष करत जिवन जगणाऱ्या महिला आहेत. समोर आल्या की वाटतं यांना कुठले पुरस्कार ? खरतर स्त्री स्वतः एक शक्ती आहे . शिवाजी महाराज म्हटलं की सहाजिकच डोळ्यासमोर येतात राजमाता जिजाऊ . राजमाता म्हणजे आदर्श संस्कारसरिता, संपूर्ण महाराष्ट्राला, महाराष्ट्रातील प्रत्येक महिलेला आयुष्याभर पुरेल व प्रेरणा देत राहिल अशी विचारधारा. जिला जिला जिजाऊ कळल्या त्या प्रत्येक स्त्रीला ताठ मानेने ऊभे रहाणं जमलं. दुर्दैवाने आयेशा खचली. कारण परिस्थितीशी दोन हात करत जगण्याची कलाच ति विसरली. स्वभावाची मुरड एका विशिष्ट मर्यादेपर्यंत ठिक आहे , पण स्वतःच्या जिवावर बेतणारी मुरड वेळीच थांबवता यायला हवी.

आज खरोखर अगदीच आक्रमक पवित्रा घेतला हो माझ्या लेखणीने. जेव्हा समाजात घडणारी एखादी घटना पुन्हा पुन्हा समाज माध्यमातूनच आपल्या पर्यंत पोहचते तेव्हा एक स्त्री म्हणून शांत रहावत नाही. आपण आपल्या नातलगांना , जिवलगांना जपतो. एखाद्या व्यक्तीच्या बोलण्याचा आपल्या मनावर परिणाम होऊ शकतो. थोडा अबोला धरूयात . राग व नैराश्य मावळतं. ते फार काळ नाही टिकत . पण ईतरांना आपण नकोसे वाटतो म्हणून जगणं थांबवू नये.. परिस्थिती बदलते. कधीकधी रूक्ष वाटणारी नाती सुध्दा पुन्हा पालवू शकतात. माहेरी आईवडील थकलेत. भावंड जमेल तसं आपापल्या संसाराचा गाढा ओढतायत. मग त्यांना टेन्शन नको म्हणून आतल्या आत कुढत बसू नका. किमान एकतरी मैत्रिण आयुष्यात सोबत ठेवा जी तुमच्या मनावरील दडपण ओळखू शकते मानसिक आधार देऊन तुमच्या रहाटगाडग्याला हलकंफुलकं करू शकते. कधीतरी ” मी सिंधूताई संपकाळ बोलते ” हा सिनेमा पहा. मी अनेक वेळा पाहिला आहे. सिंधूताईंना काय होतं. पदरी फक्त विरोधाभास. घाव सहन करत करत जगण्याची कला आज कित्येक जिवांना जगवते आहे.

महिला दिनाच्या निमित्ताने तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आपल्याकडे कोणतंही पद नाही. त्यामुळे सत्कारांचे गुच्छ आज प्रत्येक ” बाईला ” मिळतीलच असे नाही. पण तरीही मी एक महिला आहे. मी स्त्री शक्ती आहे या चेतनाशक्तीने प्रज्वलीत होऊन आपल्या कुटुंबाचे , गावाचे नाव उज्ज्वल होईल असे प्रेरणादायी विचार आपल्या मुलांना देऊयात. आयुष्य खूप सुंदर आहे. ते अधिकाधिक सुंदर पद्धतीने जगायला शिका. ज्या गोष्टी तुम्हाला करायला आवडतात त्यासाठी प्रयत्न करा. घरबसल्या रांगोळी , मेहंदी क्लास घेणे. शिवणकाम करणे. केक्सच्या कलाकृती साकारणे. लिखाण करणे , वाचन करणे . मुलांचा अभ्यास घेणे , कधीतरी मुद्दामच स्वतःच्या सौदर्याचे , स्वतःच्या नजरेतून कौतुक करणे. हक्काच्या माणसावर राग धरणे व रागाला शमविणे या सर्व कलाच आहेत. स्त्री ही मुळातच कलामयी आहे. अशी एकही स्त्री नाही जिच्यामध्ये उपजत कला नाही. फक्त त्या कलेसाठी वेळ द्या.

घटना तर घडतच असतात. मग ती प्रियांका रेड्डी ची असो किंवा आयेशाची. आपण यातून काय साध्य करणार. समाजात व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात. पण आपण फक्त एक महिला आहे म्हणून हार मानत असू तर फक्त पुस्तकी शिक्षण पुरेसे नाही. त्याला सामर्थ्याची जोड हवी. महिला दिनाच्या निमित्ताने खचलेल्या किमान एक दोन महिलांना हा माझा लेख मानसिक आधार देत असेल, तर माझ्या विचारांच्या मंथनातून उमटलेला शब्द न शब्द सार्थकी लागले असे वाटते. अवतीभवती असलेल्या आयेशा नामक मनस्थितीला जगण्यासाठी बळ व उभारी देत एक नवीन पहाट दाखवणारा प्रकाश ठरेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -