रहस्य दोन चाणक्यांच्या भेटींचे

संपादकीय

महाराष्ट्राचं राजकारण सध्या वेगळ्या वळणावर असताना दिल्लीच्या राजकारणालाही आता उकळी फुटायला सुरुवात झाली आहे. उकळी फोडणारे दुसरे कुणीही नसून ते आहेत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार. राजकारणातील चाणक्य म्हणून ओळख असलेल्या शरद पवारांनी गेल्या बुधवारी दुसरे चाणक्य तथा राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांची दिल्ली येथील निवासस्थानी पुन्हा एकदा भेट घेतली. शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यातील ही तिसरी भेट आहे. राजकारणातील बारकाव्यांचा आणि लोकांची नस ओळखण्याचा प्रचंड अनुभव असलेले हे दोन्ही नेते एकत्र आल्यावर त्यातून देशाच्या राजकारणावर किती मोठा परिणाम होऊ शकतो, याचा अंदाज एव्हाना सर्वच पक्षांना आला असावा आणि म्हणूनच पवार आणि किशोर यांच्या भेटींच्या चर्चांना महत्व प्राप्त झाले आहे. हे दोनही नेते तिसर्‍या आघाडीचा मुद्दा अजेंड्यावर नसल्याचे सांगत आहेत. परंतु दोघांमध्ये वारंवार होत असलेल्या भेटी या तिसर्‍या आघाडीचेच संकेत देतात. किशोर यांचा परिसस्पर्श लागल्याने संबंधित पक्ष वा नेत्याचे ‘स्टार’ कसे बदलतात हे देशाने अनुभवले आहे. गतअनुभव त्याची साक्ष देतो.

देशाच्या राजकारणातून काँग्रेसला हलवणे अवघड असल्याचे ज्यावेळी बोलले जात होते, त्यावेळी म्हणजे २०१४ च्या लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान प्रशांत किशोर यांनी नरेंद्र मोदींसाठी काम केले होते. ‘अब की बार मोदी सरकार’चा नाराही त्यांनीच शोधून काढला. काही वर्षांपासून नेहमीच चर्चेत राहिलेला ‘चाय पे चर्चा’ हा कार्यक्रमही किशोर यांचीच देण मानली जातो. लोकसभा निवडणुकीनंतर प्रशांत किशोर यांची नितीश कुमार यांच्याबरोबर जवळीक वाढलेली दिसली. त्यावेळी झालेल्या निवडणुकीत नितीश कुमार यांच्या निवडणूक व्यवस्थापनाची जबाबदारी किशोर यांनीच सांभाळली. इतकेच नाही तर या काळात नितीश कुमार यांनी लालूप्रसाद यादव यांच्यासोबत जुळवलेली राजकीय समीकरणे हा किशोर यांच्याच चाणक्यनीतीचा भाग असल्याचे सांगितले गेले. यानंतर पंजाब आणि उत्तर प्रदेश विधानसभांच्या निवडणुकांसाठी त्यांनी राहुल गांधी यांच्यासोबत काम केले. पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यासाठी केलेला प्रचार त्यावेळी चर्चेचा विषय बनला होता. ज्याप्रमाणे आता प्रशांत किशोर अचानक दिल्लीतील शरद पवारांच्या निवासस्थानी वा मुंबईतील सिल्वर ओकवर ‘अवतरले’ तसेच ते २०१९ च्या निवडणुकांपूर्वी अचानक मातोश्रीवर गेले होते. त्यावेळीसुद्धा राजकीय सारवासारव झाली होती. मात्र नंतर काय घडले ते सर्वश्रुत आहे.

या निवडणुकीत किशोर यांनी शिवसेनेसाठी काम तर केलेच; परंतु त्याहीपेक्षा अधिक लक्ष आदित्य ठाकरे यांच्या ‘इमेज मेकिंग’कडे दिले. ‘आदित्य संवाद’ हा निवडणुकीतील कार्यक्रम त्याचाच एक भाग होता. शिवाय भाजपची साथ सोडून ‘एकला चलो रे’चा नारा देण्याची संकल्पनाही किशोर यांनीच सर्वप्रथम मांडल्याचे बोलले जाते. पश्चिम बंगाल निवडणुकीपूर्वी किशोर यांनी वर्तवलेले भाकित चर्चेत आले होते. या निवडणुकीत भाजपला १०० पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत. जर या पक्षाला यापेक्षा जास्त जागा मिळाल्या तर मी निवडणूक रणनीतीकार म्हणून काम सोडेन, असे किशोर यांनी निवडणुकीपूर्वी म्हटले होते. निवडणूक निकालानंतर किशोर यांचा दावा खरा ठरला. त्यानंतरही त्यांनी राजकीय रणनीतीकार म्हणून काम सोडत असल्याचे जाहीर केले. आज शरद पवारांशी त्यांच्या होणार्‍या भेटी रणनीतीकार म्हणून नाहीत असे जरी मानले तरीही या भेटीतून राजकीय भूकंप होण्याचीच दाट शक्यता विश्लेषकांना वाटतेय. त्यामुळेच या भेटींना राष्ट्रीय पातळीवर महत्व दिले जातेय. किशोर यांच्या कामाची एक विशिष्ट पध्दत आहे. ते कोणत्याही राजकीय पक्षाचे काम हाती घेतात तेव्हा त्या पक्षाच्या अध्यक्षाशी ते दीर्घकाळ चर्चा करतात. त्यानंतर त्यांचा चमू पक्षाचे सर्वेक्षण करतो आणि तथ्य संकलनाचे सादरीकरण करतो.

या सगळ्यांनंतर पक्षाला उभारी देण्याची नीती ठरवली जाते. या प्रक्रियेतील पहिला टप्पा शरद पवार यांच्या भेटीने गाठला आहे. त्यामुळे देशाच्या राजकारणात शरद पवार आणि त्याअनुषंगाने राष्ट्रवादीचा शिक्का अधिक ठळक करण्याच्या अंतस्थ हेतूनेच किशोर यांना पाचारण करण्यात आले असावे असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. २०१४ च्या निवडणुकीनंतर किशोर यांचे भाजपशी सौख्य राहिलेले दिसत नाही. त्यामुळे भाजपला पायउतार करण्यासाठी किशोर आता सक्रिय झाल्याचे प्रथमदर्शनी तरी दिसते. यानिमित्ताने राष्ट्रवादीची पुनर्बांधणीही करता येणे शक्य आहे. अर्थात राष्ट्रवादीची पुनर्बांधणी करण्यासाठी शरद पवार यांच्यासारख्या चाणाक्ष नेत्याला प्रशांत किशोर यांची अजिबातच आवश्यकता नाही. शरद पवारांची काम करण्याची पद्धती बघितली तर, लक्षात येते की त्यांच्याकडे सर्वेक्षणं मोठ्या प्रमाणात असतात. ते प्रत्येक मुद्याचा अतिशय बारकाईने अभ्यास करतात. त्यामुळे किशोर यांनी पवारांना राष्ट्रवादीविषयी शहाणपण शिकवणे हे न पटणारे आहे. किंबहुना, पवारांच्या भेटीनंतर किशोर यांच्या ज्ञानातच मोठी भर पडली असेल. दुसरीकडे भाजपला पायउतार करण्याइतकी ताकद राष्ट्रवादीत आहे का, असाही प्रश्न उपस्थित होऊ शकतो. लोकसभेत राष्ट्रवादीचे अवघे पाच खासदार आहेत. त्यामुळे ही शक्यताही नगण्य अशीच म्हणावी लागेल. त्यामुळे प्रशांत किशोर आणि शरद पवार यांच्यात काय चर्चा झाली असावी असाही प्रश्न पडू शकतो.

भाजपला लोकसभा निवडणुकीत ४०० जागांवर मात देता येणे शक्य असल्याचा अंदाज किशोर यांनी पवारांशी बोलताना व्यक्त केल्याचे सांगितले जाते. त्या जागा कोणत्या, कोणत्या राज्यात किती जागा आहेत, त्या राज्यात कोणते प्रादेशिक पक्ष मोठी भूमिका बजावू शकतात, याची आकडेवारीच प्रशांत किशोर यांनी पवारांना दिली. एकट्याच्या बळावर काँग्रेस भाजपला हरवू शकत नाही, हे वास्तव आहे. त्यामुळे प्रादेशिक पक्षांना एकत्र येऊन चालल्याशिवाय पर्याय नाही. या पक्षांना एकत्र आणण्याची ताकद आजच्या घडीला केवळ शरद पवारांमध्येच आहे. देशपातळीवर भाजप विरोधकांनी एकत्र येण्याचा फॉर्म्युला काय असेल, तसे न घडल्यास राज्य पातळीवर विरोधकांनी एकत्र येण्याचा फॉर्म्युला काय असावा याची माहितीही त्यांनी पवारांना दिल्याचे सांगितले जाते. अर्थात या भेटींचा संबंध लौकिकार्थाने राज्याच्या राजकारणाशीही जोडला जातोय. त्यासाठी राज्याच्या सध्याच्या संख्याबळात डोकावून पाहायला हवे. राज्यात शिवसेनेकडे ५६, राष्ट्रवादीकडे ५३ आणि काँग्रेसकडे ४४ जागा आहेत.

यात शिवसेनेने २०१९ मध्ये भाजपबरोबर युती करुन १२४ जागा लढवल्या होत्या. यात शिवसेनेच्या ५६ जागांपैकी २५ जागा या काँग्रेसच्या उमेदवाराविरुद्ध आणि २९ जागा या राष्ट्रवादीच्या उमेदवारांविरुद्ध लढवल्या आणि जिंकल्या. राष्ट्रवादीला सर्वाधिक जागांवर पराभव सहन करावा लागला तो शिवसेनेच्या उमेदवारांमुळे. तर काँग्रेसला सर्वाधिक फटका देणारा पक्ष भाजप ठरला. महाविकास आघाडीतील तीनही पक्षांनी २०२४ ची निवडणूक एकत्रितरित्या लढवली तर त्यातून काय साध्य होईल? यापुढील काळात काँग्रेसला स्वबळावर निवडणूक लढवायची असेल तर शिवसेना आणि राष्ट्रवादी युती सत्ताकारणाला तारुन नेईल का? जर शिवसेनेने पुन्हा भाजपबरोबर युती केली तर मग समीकरण कसे असेल या शक्यशक्यतांवर चर्चा करण्यासाठी शरद पवार यांनी प्रशांत किशोर यांना भेटीचे निमंत्रण दिले असावे. याच हालचालींच्या पार्श्वभूमीवर मोदींनीही एनडीएला बळकटी देण्यासाठी प्रयत्न सुरु केल्याचे दिसते. त्यातूनच शिवसेनेवर गळ टाकण्याचा ‘कार्यक्रम’ सुरू झाल्याचे दिसते.