Friday, May 7, 2021
27 C
Mumbai
घर फिचर्स मायमहानगर ब्लॉग इकडे कोरोना, तिकडे मरोना!

इकडे कोरोना, तिकडे मरोना!

Related Story

- Advertisement -

मराठीत एक म्हण आहे, इकडे आड, तिकडे विहीर, त्यालाच समान अशी इकडे कोरोना, तिकडे मरोना, अशी स्थिती सध्या मुंबई आणि महाराष्ट्रातील लोकांची झालेली आहे. त्यात पुन्हा मध्यमवर्गीय आणि ज्यांचे हातावर पोट आहे, जे आज कमावतात आणि आज खातात, रोजंदारीवर काम करतात, त्यांची अवस्था तर अतिशय बिकट झालेली आहे. कारण कोरोनाने त्यांची वाताहत केली आहे. कोरोना या संसर्गजन्य विषाणूने भारतात प्रवेश करून आता दीड वर्ष होऊन गेले आहे. साधारण कोरोना हा वर्षभराने नियंत्रणात येईल आणि जीवनमान पुन्हा पूर्वीसारखे सुरू होईल, असे वाटत होते. त्यामुळे २०२० या वर्षाला लोकांनी निरोप दिल्यानंतर मोठ्या आशेने आणि उत्साहाने २०२१ या नव्या वर्षाचे स्वागत केले होते. कारण २०२० च्या शेवटाला कोरोना ओसरण्याची लक्षणे दिसू लागली होती. त्यात पुन्हा कोरोनाला प्रतिबंध करणार्‍या लसींच्या चाचण्या यशस्वीरित्या पार पडत होत्या.

कोरोना ओसरतोय, आता लसींची तशी काय आवश्यकता आहे, अगदी इतक्या मानसिकतेपर्यंत लोक आले होते. त्यानंतर पुढे लसी उपलब्ध झाल्यानंतरही त्या टोचून घेण्याची कुणाला फारशी गरजही वाटत नव्हती. कारण गेला कोरोना, आता लसींची काय गरज, असे वाटू लागले. ज्या लोकांनी कोरोना प्रभावाच्या वर्षभरातील कालावधीत आपले जीव धोक्यात घालून अत्यावश्यक सेवांसाठी काम केले होते. त्या डॉक्टर्स, नर्स, पोलीस, बेस्ट कर्मचारी, पालिकेच्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांना लस देण्याचे निश्चित करण्यात आले, पण फारसे कुणी पुढे येत नव्हते. त्यात पुन्हा लसींबद्दल काही लोकांनी विविध गैरसमज पसरवले होते. त्यामुळे लोकांच्या मनात शंका येऊ लागल्या होत्या. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, कोविशिल्ड लसीचे निर्माते अदर पुनावाला, मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांना स्वत: कोरोना प्रतिबंधक लस घेऊन लोकांना दाखवून त्यांचा विश्वास वाढवावा लागला होता.

- Advertisement -

कोरोना नव्या वर्षात निघून जाईल, असे वाटत असताना त्याने पुन्हा जोर पकडला. सध्या तर महाराष्ट्रात कोरोनाचा प्रभाव वाढलेला आहे. कोरोनाची दुसरी लाट आलेली आहे, असे वैद्यकीय तज्ज्ञ म्हणत आहेत. काही पाश्चिमात्य देशांमध्ये तिसरी आणि चौथी लाट आली आहे, असे म्हटले जात आहे. त्यामुळे लाटे मागून लाट धावते, तरी कोरोना संपेना, अशी सध्या सगळी परिस्थिती झालेली आहे. भारतात आणि महाराष्ट्रात अजून किती लाटा येतात, हे पहावे लागेल. त्या लाटा रोखणे हे जसे केंद्र आणि राज्य सरकार आणि पालिका प्रशासनाचे काम आहे, तशीच ती लोकांचीही जबाबदारी आहे, हे लोकांनी लक्षात घेण्याची गरज आहे. कारण गेल्या दीड वर्षातील कोरोनाची वाटचाल आणि त्याच्या तर्‍हा आणि त्याच्या येणार्‍या नव्या आवृत्या हे सगळ्यांनी लक्षात घेण्याची गरज आहे. कोरोना हा जणू काही पुराण काळातील राक्षसाप्रमाणे झालेला आहे, त्याच्या एका रूपाला नष्ट केले की, तो दुसरे रूप घेऊन पुढे येत आहे. त्यामुळे हा कोरोनाचा खेळ किती काळ चालणार हे कोडे जगातील जीवशास्त्रज्ञांना पडले आहे.

हा आजार संसर्गामुळे पसरत असल्यामुळे स्वत:ला एका ठिकाणी बंदिस्त करून गर्दी टाळणे हा उपाय अवलंबिण्यात येत आहेे. पण असा गर्दी टाळण्याचा प्रयोग म्हणजेच लॉकडाऊन काही काळ केला की, तेवढ्या पुरता हा कोरोना नियंत्रणात येतो, पण पुन्हा गर्दी वाढू लागली की, पुन्हा त्याला जोर चढू लागतो. याचा अर्थच असा आहे की, गर्दी वाढली की, कोरोना पुन्हा जिवंत होतो. त्यात पुन्हा कोरोना हा असा प्रकार आहे की, तो गरिबांच्या घरी फार काळ वसती करत नाही, इतकीच काय तो गरीब वस्त्यांमध्ये फार काळ राहत नाही. पण तो श्रीमंत लोकांच्या मोठमोठ्या कॉम्प्लेक्समध्ये शिरकाव करतो. मागील दीड वर्षांत कोरोनामुळे रस्त्यावरचा एखादा भिकारी मेल्याचे एकही उदाहरण सापडत नाही, असे का याचे उत्तर वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडेही नाही. मुंबईत धारावी ही प्रचंड मोठी झोपडपट्टी आहे, तिथे आठ महिन्यांपूर्वी कोरोनाचा संसर्ग झाला होता, पण तो अल्पावधीत नियंत्रणात आला. इतकेच नव्हे २०२१ या नव्या वर्षात अलीकडेच तिथे काही कोरोनाची लागण झालेले रुग्ण सापडले होते, पण आताही कोरोना अल्पावधीत नियंत्रणात आला. कोरोना गरीब देशांपेक्षा युरोप आणि अमेरिकेसारख्या श्रीमंत देशांमध्ये अजूनही आटोक्यात येताना दिसत नाही. सर्व रोगप्रतिबंधक साधने आणि आधुनिक वैद्यकीय सुविधा असताना असे का होत आहे, याचा तेथील तज्ज्ञांनी विचार करण्याची गरज आहे. इतकेच नव्हे तर भारताने दोन लसी विकसित केल्या, त्याची निर्यात इतर देशांना होत आहे.

- Advertisement -

अर्थात, आता भारतात रुग्ण वाढत असल्यामुळे लस निर्यातीवर मर्यादा आणण्याची गरज निर्माण झालेली आहे. खरे तर युरोपमधील देश, अमेरिका, रशिया या विकसित देशांनी मोठ्या प्रमाणात कोरोनावर लसी विकसित करायला हव्या होत्या, कारण त्यांच्याकडे अनेक मोठ्या प्रयोगशाळा आहेत. पण हे देश असे का करत नाहीत, याचे आश्चर्य वाटते. ज्या देशातून या कोरोनाचा उगम झाला, तो चीन तर आता जगासमोर मूग गिळून गप्प आहे. त्यामुळे बरेच वेळा कोरोनाचे काही गौडबंगाल आहे की काय, असाही सर्वसामान्य माणसांना प्रश्न पडतो. आताही अनेकांना हा प्रश्न पडत आहे की, युपी बिहारसारख्या मोठी लोकसंख्या असलेल्या राज्यामध्ये कोरोना का पसरत नाही. पश्चिम बंगालसह पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत, तिथे होणार्‍या प्रचारसभांच्या गर्दीमुळे कोरोना का वाढत नाही, हा कोरोना फक्त मुंबई आणि महाराष्ट्रात का वाढत आहे, असा सामान्य माणसाला पडणारा प्रश्न आहे. पण अनेक लोक पोटापाण्यासाठी इतर राज्यांमधून महाराष्ट्र आणि प्रामुख्याने मुंबईत येतात म्हणून इथली कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे, असे राज्यातील सत्ताधारी म्हणत आहेत.

तर दुसर्‍या बाजूला राज्यात विरोधात असलेला भाजप सत्ताधार्‍यांना कचाट्यात पकडण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे. खरे तर सध्या सगळ्यांनी पक्षभेद विसरून कोरोनाला कचाट्यात पकडून त्याला नष्ट करण्याची गरज आहे, अशा वेळी एकमेकाला कचाट्यात पकडण्याची खेळी राजकीय पक्षांकडून केली जात आहे, त्यामुळे कोरोनाला जीवदान मिळत आहे. त्यामुळे सामान्य माणसासमोर कसं जगायचं, असा प्रश्न पडला आहे. संपूर्ण लॉकडाऊन लागू करू नये, असाच सगळ्यांनाच सूर आहे. कारण लॉकडाऊन झाल्यानंतर काय भोगावे लागते, त्याचा अनुभव मागील वर्षात अनेकांनी घेतलेला आहे. अनेक उद्योगधंदे बंद पडले, त्यामुळे अनेकांच्या नोकर्‍या गेल्या, बेरोजगारीमुळे लोक बेजार झाले. जीव वाचवण्यासाठी गावाकडे पोहोचण्यासाठी पायपिट करताना अनेकांची वाताहत झाली. गावाच्या वेशीवर त्यांना क्वारंटाईन होऊन काही दिवस काढावे लागले, म्हणजे ना शहर ना गाव, अशी त्यांची त्रिशंकू अवस्था झाली. त्यामुळे कोरोना हा इतक्यात कायमस्वरुपी जाणारा नाही, त्यामुळे जगण्यापुरती जागा ठेवून काय ते निर्बंध लागू करा, पण एकदम आमची मान आवळू नका. नाही तर कोरोनाला मारता मारता आमचेच मरण येईल, अशी भीती मुंबई आणि महाराष्ट्रातला सामान्य माणूस व्यक्त करत आहे.

- Advertisement -