कोकणातील पर्यटनवृद्धीला कल्पकतेची गरज !

कोकणाच्या सौंदर्याला रासायनिक कारखानदारीचे नख लागले असले तरी कोकणातील पर्यटनस्थळांचा डंका दूरपर्यंत वाजत आहे. निसर्गाने भरभरून सौंदर्य दिलेल्या कोकणात बाहेरून येणार्‍या, तसेच स्थानिक पर्यटकांना उत्तमोत्तम सुविधा निर्माण करून देण्याची कल्पकता पाहिजे तशी दाखविण्यात येत नाही. पर्यटन विकासाच्या नावाखाली अनेकदा कोटींची उड्डाणे झाली आहेत. आलेला निधी पायाभूत सुविधांसाठी किती वापरला गेला, याची आकडेवारी एकदा जाहीर होणे आवश्यक आहे. पर्यटनामुळे कोकणातील एरव्ही दुर्लक्षित असलेल्या भागांतील अर्थकारण बदलले आहे. आज तेथे बर्‍यापैकी पैसा येत आहेत.

राज्यसभेनंतर विधान परिषदेच्या निवडणुकीवरून राजकीय गरमागरमी सुरू असताना राजकारणात रस नसलेल्यांना यंदाचा पावसाळा कधी सुरू होतोय याचे वेध लागलेले आहेत. अलिकडच्या काही वर्षांत दळणवळणाच्या बर्‍यापैकी सुविधांमुळे पावसाळ्यात घराबाहेर पडून निसर्गरम्य वातावरणात वर्षा पर्यटनाचा मनमुराद आनंद घेण्याकडे अनेकांचा कल वाढलेला आहे. अर्थात या पर्यटनासाठी कोकणाला झुकते माप मिळते हे सांगायला नको. गेल्या काही वर्षांत कोकणात पावसाळी पर्यटनासाठी येणार्‍यांची संख्या प्रचंड वाढली आहे. हे पर्यटक मुंबई किंवा जवळपासच्या शहरांतून येतात असे नाही तर महाराष्ट्रातील विविध भागांतून ते येतात. पर राज्यांतूनही कोकणात वर्षा सहली येऊ लागल्या आहेत. कोकणात धो-धो पाऊस कोसळायला लागल्यानंतर डोंगरातून फेसाळत येणारे धबधबे पाहून भान हरपून जाते. या धबधब्याखाली बसून आनंद घेतला जात असतो. पहिला पाऊस सलग ८-१० दिवस पडल्यानंतर कडकडीत उन्हामुळे शुष्क झालेला परिसर हिरवागार होऊन जातो. कोकणातील हा नजारा डोळ्यांचे पारणे फेडणारा असतो. त्यामुळे हौशी आणि निसर्गप्रेमी पर्यटकांची पावले कोकणाकडे न वळली तर नवल!

पण& पण पर्यटकांचे पावसाळी पर्यटन हे बरेचसे रामभरोसे असते. दरवर्षी पाऊस सुरू झाला की पावसाळी पर्यटनासाठी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या गप्पा केल्या जातात. परंतु जेथे नेहमीच्या पर्यटनाला उपयोगी पडतील अशा सुविधा धडपणे नाहीत तेथे पावसाळी पर्यटनासाठी खास सुविधा निर्माण केल्या जातील असे मानणे तद्दन मूर्खपणाचे ठरेल! वास्तविक कोकणला ७२० किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभल्याने पर्यटकांचा ओढा इकडे आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, इतकेच नव्हे तर मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात येथून कोकणात येणार्‍या पर्यटकांची संख्या लक्षणीय आहे. शिवाय परदेशातून येणार्‍या पर्यटकांची संख्याही खूप मोठी आहे. एक काळ असा होता की गोव्याला पर्यटकांची प्रथम पसंती असे. मात्र अलीकडे मुरुड, अलिबाग, दिवेआगर, श्री क्षेत्र हरिहरेश्वर, श्रीवर्धन, पुढे रत्नागिरी आणि त्याच्या पुढे मालवण, तारकर्ली येथे गोव्याचा आनंद घेतला जात आहे. सिंधुदुर्गातील समुद्र किनारी रमणारा पर्यटक गोवा विसरून जातो, इतके तेथे सुंदर वातावरण आहे.

अर्थात गोव्यातील पर्यटनाला कमी लेखता येणार नाही. या छोट्याशा राज्याची अर्थव्यवस्था मुख्यत्वे पर्यटनावर आधारित असल्याने तेथे दळणवळणापासून अन्य आवश्यक सोयी-सुविधांकडे जाणीपूर्वक लक्ष दिले गेले आहे. गोव्यात स्थानिक दारूचा महापूर आलेला असला तरी झिंगून सार्वजनिक ठिकाणी बाहेरून आलेल्या पर्यटकांना किंवा पर्यटकांनी स्थानिकांना त्रास देण्याचे प्रकार सहसा घडत नाहीत. कोकणात पर्यटकांच्या आततायीपणामुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. अनेकदा यातून पर्यटक आणि स्थानिक ग्रामस्थ यांच्यात हाणामारीपर्यंत प्रकरण जाते. यात कुटुंबवत्सल आणि शांतताप्रेमी पर्यटकांना नाहक त्रास होत असतो. बेताल वागणार्‍या पर्यटकांना वेळीच कठोरपणे आवरण्याची मागणी अनेकदा झाली आहे. परंतु मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार, तशी येथे परिस्थिती आहे. पर्यटनाला चालना देत असताना शिस्तीचेही पालन गरजेचे आहे. तसे झाले तर सर्वांनाच पर्यटनाचा आनंद घेता येईल.

कणाच्या सौंदर्याला रासायनिक कारखानदारीचे नख लागले असले तरी कोकणातील पर्यटनस्थळांचा डंका दूरपर्यंत वाजत आहे. निसर्गाने भरभरून सौंदर्य दिलेल्या कोकणात बाहेरून येणार्‍या, तसेच स्थानिक पर्यटकांना उत्तमोत्तम सुविधा निर्माण करून देण्याची कल्पकता पाहिजे तशी दाखविण्यात येत नाही. पर्यटन विकासाच्या नावाखाली अनेकदा कोटींची उड्डाणे झाली आहेत. आलेला निधी पायाभूत सुविधांसाठी किती वापरला गेला, याची आकडेवारी एकदा जाहीर होणे आवश्यक आहे. पर्यटनामुळे कोकणातील एरव्ही दुर्लक्षित असलेल्या भागांतील अर्थकारण बदलले आहे. आज तेथे बर्‍यापैकी पैसा येत आहेत. कायम समस्यांच्या गर्तेत असणारी तेथील समाजव्यवस्था पर्यटनामुळे कात टाकत असेल तर ते केव्हाही चांगले आहे. हे लक्षात घेऊन शासनाने रस्ते, पाणी, प्रसाधनगृह, इंटरनेट, आरोग्य, सार्वजनिक दूरध्वनी अशा वेगवगळ्या सुविधांचे जाळे वेगाने विणणे अपेक्षित होते. दुर्दैवाने तसे होत नाही.

शेजारच्या गोव्यात प्रत्येक पर्यटनस्थळाकडे जाण्यासाठी चांगल्यापैकी रस्ते आहेत. कोकणात त्याच्या उलट परिस्थिती आहे. अरूंद रस्ते, त्यापैकी अनेक रस्त्यांवर पसरलेले खड्ड्यांचे जाळे, यामुळे पर्यटकांचा दिवसभरातील वेळ प्रवासाताच खर्च होत आहे. आजूबाजूच्या शहरांतून एक दिवसांच्या पर्यटनासाठी येणार्‍यांना हा प्रवास नकोसा वाटतो. पावसाळ्यात तर हा प्रवास ‘जीवघेणा’ या प्रकारात मोडतो. पर्यटन स्थळांकडे जाण्यासाठी केलेले रस्ते दर्जाहिन आहेत. यावर अनेकदा ओरड होते. पण पर्यटनाला व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहण्याची शासनात बसलेल्यांची मानसिकता नसल्याने रस्त्यांचा दर्जा यथातथाच आहे. त्यामुळे पाणी, प्रसाधानगृह, इंटरनेट, दर्जेदार आणि स्वस्तातील भोजन व्यवस्था या गोष्टी खूपच दूरच्या राहिल्या! कोकणातील प्रवासाचा पर्यटकांना आलेला ‘अनुभव’ यावर एखादे हजार पानाचे पुस्तक काढता येईल! आणीबाणीच्या प्रसंगी पर्यटकांना मदतीची गरज लागली तर सक्षम इंटरनेटअभावी संबंधित यंत्रणांशी संपर्क साधता येत नाही, असे प्रसंग अनेकदा घडलेले आहेत. पावसाळ्यात याचा अनुभव प्रकर्षाने येत असतो.

हिवाळा, उन्हाळ्यातील कोकणातील पर्यटन सुसह्य असल्याने पर्यटक काहीसे बिनधास्त असतात. परंतु पावसाळ्यातील पर्यटन अनेकदा धोकादायक ठरते. माहिती नसताना पर्यटक नको तेथे जाण्याचे धाडस करतात. धो-धो पावसात डोंगरातून फेसाळत येणारे धबधबे पाहिल्यानंतर पर्यटकांची पावले तेथे वळतात. अनेकदा त्या परिसराची भौगोलिक परिस्थिती माहीत नसताना पर्यटक तेथपर्यंत पोहचतात. यातून कित्येकदा अनर्थ घडले आहेत. काही वर्षांपूर्वी रायगड जिल्ह्यातील एका धबधब्यावर गेलेल्या महाविद्यालयीन मुलींवर मोठी आफत ओढावली होती. पाण्याचा प्रवाह माहिती नसल्याने त्यात काही जणींच्या जीवावर बेतले. अनोळखी ठिकाणी असलेल्या धबधब्याकडे जाताना स्थानिकांना विश्वासात न घेण्याची किंमतही चुकवावी लागते, किंबहुना तशी अनेक उदाहरणे घडलेली आहेत. जे धबधबे सुरक्षित आहेत तेथे पावसाळी पर्यटनासाठी तात्पुरत्या का होईना, सुविधा निर्माण केल्या गेल्या पाहिजेत. मक्याची कणसे, पाण्याच्या बाटल्या, चहाची सुविधा मिळाली हे ठीक आहे. तेथे जाण्यासाठी योग्य रस्ता, स्थानिक वाटाडे यांची सुविधा असणे गरजेचे आहे. पावसाळ्यात येणार्‍या वर्षा सहलींसाठी आवश्यक त्या सुविधा निर्माण करा, ही मागणी जुनी आहे. पण ती दुर्लक्षित आहे.

समुद्र पर्यटनासाठी येणारे पर्यटक नको ते साहस करीत असल्याने दुर्घटना घडतात. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात हे प्रमाण अधिक आहे. गोवाही समुद्र पर्यटनासाठी जगप्रसिद्ध आहे. मात्र तेथे समुद्रात बुडालेल्या पर्यटकांची संख्या तुलनेत कमी आहे. बाहेरगावाहून येणारे पर्यटक सूचना फलकाकडे किंवा स्थानिकांच्या इशार्‍याकडे दुर्लक्ष करीत बेधडकणे समुद्रात पोहण्यासाठी उतरतात. ओहटी असेल तर समुद्र अधिक धोकादायक असतो हे माहिती असूनही समुद्रात डुंबण्याचा आनंद घेतला जातो. यातून कोकणात शेकडो दुर्घटना घडल्या आहेत. बरेचदा असे लक्षात येते की पर्यटकांच्या बेताल वागण्याकडे ते आपले पाहुणे आहेत या भावनेतून स्थानिक पोलीस दुर्लक्ष करतात. बेताल पर्यटक मात्र त्याचा भलताच अर्थ काढत अधिक उन्मत्त होतात. कोकणातील बरेचसे समुद्र किनारे सुरक्षित समजले जातात. तेथे आनंद घेण्याऐवजी धोकादायक किनार्‍यावर मौजमस्ती केली जाते. ही मस्ती अंगलट येते तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते.

समुद्राप्रमाणेच धरणांतून पोहण्याचा आनंद घेतला जातो. उन्हाळ्यापेक्षा पावसाळ्यात धरणांवर होणारी गर्दी अधिक आहे. काही धरणे अशी आहेत की त्यांच्या वळचणीला जाणेही धोक्याचे आहे. फाजील उत्साह असणारे पर्यटक, विशेषतः तरुण, या धोक्याकडे दुर्लक्ष करतात. गेल्या दशकात धरणात बुडून मरण पावलेल्या पर्यटकांची संख्या दुर्लक्षिण्यासारखी नाही. दोन-तीन वर्षांपासून धरण परिसर पावसाळ्यात सील केला जातो. पण हे नाटकच ठरते. अनेक पर्यटक आडमार्गाने धरणापर्यंत पोहचतात, तर काही वेळेला संबंधितांना चिरीमिरी देऊन धरणाकडे जाण्याचा रस्ता मोकळा करून घेतात. पावसाळ्यात धरणातील पाण्याची पातळी वाढलेली असते हे लक्षात येत असूनही तरुण पर्यटक पाण्यात उतरतात. यात मुलीही मागे नसतात हे दिसून आलेले आहे. गंभीर बाब म्हणजे तरुण दारूच्या नशेतही पोहण्याचा ‘आनंद’ घेत असतात. यामुळे दुर्घटनेला आयते निमंत्रण मिळते. काही वेळेला पोहण्याच्या पैजाही लागतात. त्याही जीवावर बेततात.

धबधब्यांप्रमाणे धरणातही सुरक्षितपणे पोहण्याचा आनंद घेण्यास हरकत नाही. स्थानिक प्रशासन यावर उपाय योजण्याऐवजी सरसकट बंदी घालून मोकळे होते. ही बंदी पर्यटक जुमानत नसतात. नको ती ब्याद अंगाशी ओढवून घ्यायला तयार नसणार्‍या प्रशासनाने खरे म्हणजे योग्य सुविधा निर्माण करून पर्यटकांना धरण पर्यटनाचा आनंद घेऊ द्यायला हवा. जी धरणे खरोखरच धोकादायक आहेत, तेथे मुंगीही शिरणार नाही, असा बंदोबस्त असला पाहिजे. बंदी असलेल्या ठिकाणी पर्यटक पोहचतातच कसे, असा सवाल कुणी विचारला तर त्याचे प्रशासनाकडे उत्तर नसेल. धबधब्यांच्या ठिकाणीही योग्य ती खबरदारी घेतली गेली तर दुर्घटनांना आळा बसेल. आडमार्गाला असलेल्या गावांच्या ठिकाणी विलोभनीय धबधबे असतात. तेथे जाण्यासाठी स्थानिक प्रशासनाने योग्य सुविधा तयार करून दिल्या तर स्थानिकांनाही छोटे व्यवसाय करून दोन पैसे मिळविता येणे शक्य आहे. काही ठिकाणी प्रशासन लक्ष देत नाही म्हणून स्थानिकच सुविधा पुरवून पर्यटकांना धबधब्यांचा आनंद घेण्यासाठी मदत करीत असतात. जे स्थानिकांना जमते ते प्रशासनाला का जमू नये, असा सवाल नक्कीच उपस्थित करता येईल.

पर्यटन, मग ते पावसाळी असो किंवा उन्हाळी, त्याचा यथेच्छ आनंद पर्यटकांना घेता यावा म्हणून मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निश्चित असे धोरण ठरवावे लागेल. कुठेतरी सभासमारंभात कोटीचे आकडे जाहीर करीत टाळ्या मिळविण्याने पर्यटन बहरणार नाही. पर्यटनामुळे अर्थव्यवस्थेला उभारी येते हे जसे गोव्याने दाखवून दिले, तसे केरळनेही दाखविले आहे. त्यांना जमते तर महाराष्ट्राला का जमत नाही, हा प्रश्नच आहे. पर्यटन क्षेत्रातील जाणकारांसह स्थानिकांना विश्वासात घेऊन पर्यटनाचा विकास करता येईल. मूलभूत सुविधांप्रमाणे सुरक्षिततेची हमी मिळाली की कोकणासह महाराष्ट्राचे पर्यटन पहा कसे सुसाट होते ते!