दादू की दुनिया…!

काम ना धंदा,
जेवण तीनदा,
बातम्यात ज्ञानदा
हाच लॉकडाऊनचा धंदा…

अशी सध्या स्थिती असल्याने भल्या दुपारीपण आम्ही पाय पसरुन उताणलो होतो…थोड्या थोड्या वेळाने कर्णपिशाच्च कोकलत होता. नेमका डोळा लागायला आला की पलीकडून कुणी तरी प्रश्न करायचा, काही कळलं का? झालं का? किती वेळ लागेल तरी? हे असले प्रश्न लाडावलेल्या, बहुप्रतिक्षेनंतर गरोदर राहिलेल्या आणि त्यानंतर प्रसुतीसाठी खोळंबलेल्या पोटुशीच्या आप्तांना पडतात इतकंच आम्हाला माहित होतं. पण त्यादिवशी तर भलतंच काही घडत होतं…

सकाळीच उठाभाऊ वांद्रेकर लगबगीने तयार झाले होते, गेले काही दिवस त्यांना नीटशी झोपही लागत नव्हती. राज्याची, सरकारची, कोरोनाची असल्या फालतू विषयांची त्यांना कधी चिंता वाटूच शकत नव्हती. कारण ते पडले पक्के कायस्थ. त्यामुळेच ते विचारांचे टेन्शन म्हणजे ‘काय आस्तं?’ असं ते म्हणतात… आणि उठाभाऊंच्या हिश्श्याची चिंता करायला बाकीचे आहेत ना!…त्यांना काय उगाचच पोसलंय का?

उठाभाऊंनी बामो विद्यालयात असताना दहावीला सलग बसून जी काय गणिताची आकडेमोड आणि इतिहासाच्या सनावळ्यांवर जेवढा एकटाकी बसून अभ्यास केला त्यानंतर काल-परवाकडे त्यांनी आकडेमोडी आणि हिशेबाच्या सनावळ्यांवर काम केलं. घाटकोपरचा ठक्कर बाप्पा, हिलरोडचा संघवी अश्या तीन-चार आकडेमोडीवाल्या मास्तरांची आणि त्यांच्या इंटर्नांची दिवसभरासाठी शिकवणी लावली होती. उठाभाऊंच्या पथ्यपाण्यासह सगळं गडावरच सुरु होतं…

या हिशेबाच्या परिक्षेत कुठे, कधी, काय, कोणी, कसं याप्रश्नी मदत लागली तर सगळे गाईड, अपेक्षित प्रश्नसंच समोर असावेत म्हणून घरीच शिकवणी लागली होती. काही लागलं सवरलं तर रेशीम वैनी, शिरीअण्णा सोबतीला होतेच. अभ्यासात व्यत्यय नको म्हणून कुणालाच गडावर प्रवेश नव्हता… नाही म्हणायला सर्वाधिक ये – जा करणारी हस्ती होती चाणक्य मालंडकर. हस्तीच अहो ती. उठाभाऊंना २५ वर्षात पक्कं कळून चुकलंय… चाणक्य किती कामाचाय तो. अगदी घरातल्यांना नकोसा अस्ला तरी…

कुशाभाऊ भगतचंदांनी आपल्या धोतराचा कासोटा इतका घट्ट बांधला होता की विचारु नका…तेव्हा चाणक्यानंच तर नाथाभाई ठाणावालाला घेऊन जाऊन तो उत्तराखंडी कासोटा हळुवार हलवून सैल केला ना… जेव्हा पास्नं हे घडलं तेव्हापास्नं ही अभ्यासाची आफत उठाभाऊंवर आली होती.

उठाभाऊंचं सगळं ठीक होतंय की नाही या चिंतेमुळेच ठक्कर आणि संघवी मास्तरांना फाफडा – जिलेबीपण गोड लागत नव्हती. खरं तरं कुशाभाऊ भगतचंद लॉकडाऊनचा फायदा उठवून उठाभाऊंना वरच्या वर्गात ढकलतील अशीच फिल्डिंग लावायची होती…तसं झालं असतं तर कुठल्या विषयांत किती मिळाले? प्रगतीपुस्तकात इतकेच कसे मांडले? अस्ल्या फिझूल ‘क्युरीज’ आल्या नस्त्या, पण ते काही जमेना… गो कोरोना…गो म्हणत ते जर झालं असतं तर उठाभाऊंना अभ्यासाला पण बसायला लागलंच नसतं की गुज्जू मास्तरांना डोक्यावरचे केस उपटायला लागले नसते. आणि हो कुशाभाऊ धोतरावर पण मॉडेलिंग करतात हे जरा मावळ्यांनी उशीराच शोधलं… नाहीतर तशी कामगिरी चोख बजावणारे राष्ट्रीय भाऊ तर घड्याळबाबांना सोडून आता आपल्याच आर्मीत आहेत. ते काय लगेच वरळीहून लगबगीनं जाऊन संकल्प सोडून आले असते, पण कस्सचं काय! शेवटी स्वत: मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही हे उठाभाऊंना एव्हाना कळून चुकलंय… म्हणूनच तर त्यांनी ही नस्ती शीएमपदाची डोकेदुखी पाठीशी लावून घेतलीय… त्यामुळेच तर गेल्या ४५ दिवसांत पाचवेळा मोटाशेटच्या लेक्चरला बसावं लागलं ते पण थोडं-थोडकं नाही तर सहा-सहा, आठ-आठ तासांचं पारायण. इतकं सलग कुणासमोर बसून कुणाच्या ‘मन की बाता’ ऐकत बसण्याचं पाप वांद्रेकरांच्या गेल्या १२ पिढ्यांत कुणी केलं नव्हतं. ते यांनी केलं…पण का कोण जाणे थोरल्या गादीला उठाभाऊं बदद्ल कमालीचा विश्र्वास म्हणूनच तर गडावर कुणी ज्योतिषी- पंडितजी आला की थोरली गादी शालीला जोरदार झोका देत, रुद्राक्षाची माळ जपत, त्यांना त्यांच्या भविष्यावाणीच्या आधी सांगून मोकळी व्हायची… “माझ्या गादीवर माझा दादूच बसणार” थोरली गादी प्रेमानं उठाभाऊंना ‘दादू’ म्हणायची. त्या प्रेमापोटीच तर त्यांनी आपली सनद १०० टक्के त्याला देऊन टाकली…७०टक्के गडाची वाटणी दिली…त्यात नंतर उठाभाऊंनी वाढच केली म्हणा… मागच्या काळात चौथ्या सीटवर बसलेल्या प्रवाश्यासारखी देवाभाऊ बरोबर सत्तेत भागी मिळाली तर टोलेजंग गड-२ उभा केला. रंग पण अगदी करडा राखाडी, काम पण चोख गुलाटी-पॅंटकीचं…गडाची उंची पण रेशीम वैनींना साजेशी… दहा मजली! कुठेही नोकरी-धंदा, व्यवसाय, कारोबार असं काहीच न करता जगातला बहुधा श्रीमंत फोटोग्राफर होण्याचं कौशल्य साधल्यामुळेच थोरल्या गादीनं जायदाद दादूमियाँकडे सोपवली असेल. तसंही थोरल्या गादीला माणसांची भारीच पारख होती. म्हणूनच तर त्यांनी मयताचं सामान विकणाऱ्याला ६ वेळा खासदार केला, रिक्षावाल्याला महापौर केला. फुलपूडी विकणाऱ्याला मंत्री केला…आता सगळ्यांना कळलं असेल आधी मालवणकरांना मग राजाभाऊंना दूर लोटून थोरल्या गादीनं दादूमियाॅंना का ढील दिली? अख्ख्या घराण्याचा इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, गणित-बीजगणित सगळंच बदलून टाकलं पठ्ठ्यानं…

आधी ठरवलं आमदारकीचा बार २७ तारखेआधी उडवायचा, लॉकडाऊन असो नाहीतर नसो, मग बिनविरोध, कुठलंच मांजर आडवं जायला नको…तरी सानियाबाईंचा नगरकर बोका तोंड वेडंवाकडं करत वर्षाच्या गेटवर ४४ ग्रॅमची शेपटी फुलवत आड येतोय असं वाटताच, पेडर रोडवरच्या रॉयल कोटवर चाणक्य धावला…त्यालाही आयता मौका होता, ‘अभी हम मरें नही सांगायला’…नाहीतरी पार्टीत काही पुडीबाज पीआर सांगतायतच, आता त्याचं काय चालत नाय. त्यानिमित्ताने चाणक्यानं पण घोडा दौडवून घेतला…स्वत:चा आणि मालकांचा भाव वाढवून घेतला. पण दुसऱ्या दिवशी एक फायनल राग उठाभाऊंनी देऊन टाकला… “बिनविरोध नसेल तर मला काहीच नको.” नगरकरांना आणि आदर्श नांदेडकरांना लक्षात आलं प्रकरण हाताबाहेर जाऊ शकतं आणि आपलाही देवाभाऊ होऊ शकतो, त्यांनी लागलीच गाडी तीनबत्तीवरुनच वळवली…आणि जमलं एकदाच!

रेशीम ताईंनी पंडितजींच्या कानी विषय टाकला, ठक्कर बाप्पा- संघवी मास्तरांना फायनल प्रगतीपुस्तकाच्या प्रिंटा काढायचे आदेश गेले… गुरुजींनी रेशीमवैनींना लगोलग फॉर्म भरायच्या दिवसाच्या साडीचा रंग कळवला.. पितांबरी पिवळा…त्यादिवसाठीच कवच म्हणून एक लालरंगी बंध उठाभाऊंच्या उजव्या मनगटावर बांधण्यात आला. त्यानं आधीचं असलेल्या गंड्यादोऱ्यात तेवढीच वाढ. सनिल घेसाईंना गडावरुन निघण्याआधी शेवटचा फोन गेला…त्यांनाही गेले काही दिवस बाजूलाच केलंय अश्या बातम्या दादरगडाच्या पहिल्या मजल्यावरुन पसरवल्या जातायत. असो.

थोरल्या गादीचं दर्शन घेऊन स्वारी निघाली! तोपर्यंत घेसाईंनी सगळ्या पेप्रांवरुन पुन्हा आपली इन्शुरन्शी नजर फिरवली. नाही म्हंजे काही राहिलं तर आपलाच विमा उतरायचा या भितीने. पहिल्या दिवशी साव्या माळ्यावर शीएमची खुर्ची बाहेर ओढून बसवायला दक्ष असलेले नाथाभाई थानावाला इथेही तय्यार होते. उठाभाऊ – रेशीमवहिनी एकाच गाडीतून सोशल डिस्टंसिंग ठेवून आले. आदिनाथ वरळीकर, तेजाभाऊ वांद्रेकरही होते. सगळी मॅच फिक्स असल्यानं लोड नव्हता. पेप्र जमा झाली, छाननी झाली. आणि अनेकांच्या छातीतले ब्लॉकेज वाढले, कुणाची फेफडं दुखायला लागली, कुणाचं टाळकं जड झालं… हो होईल नायतर काय…उठाभाऊंनी तब्बल १४३ कोटींच्या प्रॉपर्टीला कागदावर ‘आपली’ म्हटलं होतं…तसं ते आणि रेशीम वहिनी आपलं कुणालाच म्हणत नाहीत. हो हो अगदी दिवाळसणाला पन… म्हणजे बगा एका दिवाळसणाला सोनदिप डोंबिवलीकरांकडे भल्यामोठ्या शुभेच्छा पाठवल्या. रात्री गेल्यावर त्याच्या सौंनी सांगितलं, वांद्र्याहून काही आलंय, बाप्पानं दुसऱ्या दिवशी शुभेच्छा उघडल्या तर काय दुसऱ्याकडून आलेलं तिसऱ्याकडे पोचलं होतं…तसा पुरावाच आत होता…बायका पोरांसमोर ही भल्ती आफत बघून सोनदिपच्या पांढऱ्या शुभ्र टाळूवर घाम जमा झाला होता… तर अश्या उठाभाऊंनी हे सगळं करणं म्हणजे एका रात्रीत कोरोना पळवण्यासारखंच होतं. बरं त्यातही बघा तुमच्या- आमच्यासारखे फडतूस दोन-पाच लाख जमले की पहिली कुठलीतरी गाडी घेतात, मग ओळखीच्या गॅरेजवाल्याने दोन टक्के कमिशन घेऊन सेकंडहॅंड का घेऊन दिलेली असो! पण आपल्याला गाडी पाहिजे. तर १४३ कोटींची प्रॉपर्टी आपली म्हणणाऱ्यांकडे स्वत:ची गाडी नाही. वाह रे माझ्या मर्राठ्ठी राजा. आता हे सगळं त्यांनी काकासाहेब बारामतीकरांकडून शिकलं असणं शक्य आहे. ते नाही का ५० वर्ष राजकारणात आहेत, सगळ्यात जास्त महाराष्ट्र आणि देश फिरलेत, त्यांच्याकडे कुठे गाडी आहे? अस्सो, असते एकाद्याची गरिबी…मग काय सवयीप्रमाणे सोशल मिडिया वाल्यांनी उठाभाऊंचं ट्रोलिंग सुरु केलं…कुणी म्हणालं जगातला सर्वात महागडा फोटोग्राफर, कुणी म्हणालं, वडिलांची पुण्याई…सगळं आटपून बाहेर आल्यावर आपल्या ‘स्टीलवाल्या भावकी’ साठी त्यांनी एक पोझ दिली. त्यातही त्यांचाच कुटुंबकबिला… काही सरपटणाऱ्या दांडेकरांनी पोलीसांवर डाफरत, प्रोटोकॉल समजावत आपला ‘प्रेझेन्स’ दिला…बायटांचं काम प्रभादेवीच्या सद्गगुरु राउटर्स आणि सनिल घेसाईंना सुटलं होतं…ते कामाला लागले होते…दादूमियाँ मात्र आपली ‘दादू की दुनिया’ घेऊन निघाले होते… रात्री उशिरापर्यंत अनेकांचा ‘एफेडेव्हिट’ अभ्यास सुरुच होता…ज्यातून प्रत्यक्षात त्यांच्या आणि महाराष्ट्राच्या पदरात काहीच न पाडणारा असा तो अभ्यास होता…! अनाकलनीय!

– बातमीवाला!