घरफिचर्समायमहानगर ब्लॉगउर्फीचा नंगानाच आणि समाजभान

उर्फीचा नंगानाच आणि समाजभान

Subscribe

उर्फीला अधिकच बळच मिळालंय. ती अजूनच चेकाळली. एक महिला म्हणून जेव्हा या प्रकरणाकडे बघितलं तर सगळी धम्माल सुरू आहे

सध्या देशभरात मॉडेल आणि अभिनेत्री असलेल्या उर्फी जावेदची जोरदार चर्चा आहे. टीव्ही, वर्तमानपत्राबरोबरच सोशल मीडियावरही सध्या उर्फीच उर्फी आहे. यामुळे प्रसिद्धीसाठी कधी तोकडे तर कधी उगाच नावाला अंगावर चार पाच उभ्या आडव्या चिंध्या चिकटवून गावभर हुंदडणारी उर्फी राष्ट्रीय चर्चेचा विषय ठरली आहे. यामुळे उर्फीचा आनंद गगनात मावेनासा झालाय. कारण तिला अंगप्रदर्शन करूनही जेवढी प्रसिद्धी मिळाली नव्हती, ती या चर्चेमुळे मिळाली आहे. तिचे फॅन फॉलोईंगही वाढलेत. यामुळे उर्फी की तो चल पडी, अशीच सगळीकडे हवा आहे.

बरं या उर्फीने देशासाठी काही तीर मारला आहे का ? तर नाही. मग या बाईने कोणा अडल्या-नडल्याला मदत केली का? तर तसेही नाही. मग या उर्फीने असं काय केलं? की जे तिच्याकडे ढुंकूनही कधी पाहत नव्हते, ज्यांना या नावाची कोणी अभिनेत्रीही आहे हे आतापर्यंत ठाऊक नव्हते ते तिला सोशल मीडियावर अचानक फॉलो करायला लागलेत. तर त्याचे कारण आहे म्हणजे उर्फीचे अतरंगी कपडे. जे शरीर झाकण्यापेक्षा ते अधिक ठळकपणे कसे दिसतील, यासाठी ती घालते. तर या उर्फीविरोधात भाजपच्या ज्येष्ठ नेत्या चित्रा वाघ थेट मैदानात उतरल्या आहेत. नंगानाच करणाऱ्या उर्फीला जेलमध्ये टाका, अशी मागणीच वाघ यांनी केली आहे. पण वाघांना घाबरेल ती उर्फी कसली. वाघांविरोधात उर्फीनेही आक्रमक पवित्रा घेतलाय. वाघांना ती रोज काही ना काही पोस्ट करत चॅलेंज करतेय. तुम्ही राजकारणी आहात, देशात सुरू असलेल्या महिला अत्याचारांवर बोला, असा टोलाच तिने वाघांना लगावलाय. त्यामुळे वाघ अधिकच चवताळल्या असून, त्यांनी उर्फीविरोधात महिला आयोग काहीच का करत नाही, असा सवाल करत महिला आयोगावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आता यावरून महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि चित्रा वाघ यांच्यात वाकयुद्ध सुरू आहे. चाकणकर यांनी कोणी काय घालायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न असल्याचं वाघांनाच सुनावलं. तसेच वाघांना नोटीसही पाठवली आहे.

- Advertisement -

यामुळे उर्फीला अधिकच बळच मिळालंय. ती अजूनच चेकाळली. एक महिला म्हणून जेव्हा या प्रकरणाकडे बघितलं तर सगळी धम्माल सुरू आहे. उर्फी काही आज उठून असे बोल्ड कपडे घालत नाहीये, तर गेले अनेक वर्ष ती हाच उद्योग करतेय. अंगावर नाममात्र कपडे घालून ती अंगप्रदर्शन करते. यात तीळमात्र शंका नाही. पण उर्फी तेवढी हुशारही आहे. कारण भारतात महिलेने कोणते कपडे घातल्यास तिच्यावर कारवाई होऊ शकत नाही आणि तसेच कोणते पार्ट दाखवल्यावर कारवाई होऊ शकते, याचे तिला चांगलेच कायदेशीर ज्ञान असावे. ते तिनेच तिच्या एका पोस्टमध्ये सांगितलं आहे. यामुळे या उर्फीला किती महत्त्व द्यायचं हे आता सगळ्यांनाच कळायला हवं. माझा नंगानाच सुरूच राहणार हे जेव्हा एखादी स्त्री म्हणते तेव्हाच तिचा हेतू स्पष्ट होतो.

तिने कंबरेचे सोडून केव्हाच डोक्याला बांधलंय. ती एक बोल्ड विचारांची तरुणी आहे. जिला अंगभर कपडे घालण्यापेक्षा कमी कपडे घालून आपल्या स्त्री देहाचं चालत फिरत प्रदर्शन करून प्रसिद्धीबरोबर पैसा कमवायचा आहे. तिला तुम्ही साडीचोळी घालायला सांगणे म्हणजे निरर्थक वेळ घालवणं आहे. त्यासाठी तुम्ही साम, दाम, दंड, भेद अशी जरी राजकीय अस्त्र वापरलीत तरी त्यातून फारसे काही सिद्ध होणार नाहीये. कारण उर्फीला जर एवढी जनाची, इभ्रतीची पडली असती तर तिने कधीही असे उद्योग केले नसते. ती स्वतंत्र विचारांची स्वतंत्र वातावरणात वाढलेली तरुणी आहे, अभिनेत्री आहे. फॅन्सला कसे आकर्षित करायचे याचे गणित तिला माहीत आहे. ती नवीन पिढी आहे. निगेटिव्ह पब्लिसिटीमधून पॉझिटिव्ह रिस्पॉन्स कसा मिळवायचा हे तिला सांगण्याची गरज नाही. यामुळेच एकीकडे उर्फीविरोधात चित्रा वाघ यांनी रान उठवले आहे, तर दुसरीकडे मात्र उर्फीची पाठराखण करणारा तिच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बोलणारा दुसरा वर्गही तिच्या बाजूने उभा राहिलाय. यातून फारस काही साध्य होणार नाही, याची उर्फीला जाण आहे. यामुळेच आता तिने थेट हातात बेड्या घातलेला व्हिडीओ पोस्ट केला आहे. जो चित्रा वाघच नाही तर समाजाला आरसा दाखवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी आहे. हिंदुस्थानी भाऊनेही उर्फीला सुधारण्याचा सल्ला दिला. पण तिने त्यालाही हिसका दाखवला. तसा तोही गप्प झाला. तिच्यावर देशमुख नामक वकिलाने पोलिसात तक्रार केली. पण त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. यामुळे चित्रा वाघ ज्या भाजपचे प्रतिनिधित्व करतात, त्यांनी खरं तर राज्यात ज्या महिला अत्याचारांना बळी पडल्या आहेत, त्यांच्या पाठीशी घट्ट पाय रोवून उभे राहणं अपेक्षित आहे ना की उर्फीबरोबर वाद घालून स्वत:चे महत्त्व कमी करून घेणे. कारण चित्रा वाघ यांच्याकडून महिलांना अपेक्षा आहेत, उर्फीकडून नाहीत. हे त्यांच्यासारख्या राजकीय नेत्यांना सांगण्याची गरज नाही.

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -