घरफिचर्समायमहानगर ब्लॉगमरियमचं शिवबंधन आणि पांडुरंगाची अजान

मरियमचं शिवबंधन आणि पांडुरंगाची अजान

Subscribe

शिवसेनेने उर्मिला मातोंडकर उर्फ मरियम मीर हिला पक्षात घेऊन शिवबंधनात बांधून टाकले. बरोबर त्याच्या 24 तास आधी दक्षिण मुंबईचे शिवसेनेचे विभागप्रमुख आणि मागच्या विधानसभेला आधी कुलाबा नंतर मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातून पराभूत झालेले पांडुरंग सकपाळ यांनी अजानची स्पर्धा घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या आणि तशी घोषणाही माध्यमांच्या कॅमेरासमोर करून टाकली. त्यांच्या या घोषणेने सगळेच चक्रावून गेले. माध्यमांनी चारी बाजूंनी पांडुरंग सकपाळ आणि शिवसेनेवर जोरदार हल्ला केल्यानंतर संध्याकाळी त्यांनी एका साध्या कागदावर आपलं स्पष्टीकरण प्रसिध्द केलं. तेही अत्यंत खोटं आणि पक्षाची आणि जनतेची फसवणूक करणार होतं.

बॉलिवूडची ‘रंगीला’ गर्ल उर्मिला मातोंडकर उर्फ मरियम मीर शेख हिने मंगळवारी मातोश्रीवर जाऊन ‘सामना’च्या संपादिका रश्मी उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत आपल्या मनगटावर शिवबंधन बांधून घेतले. उर्मिला तशी नशीबवानच म्हणायला हवी. कारण पक्षाची सदस्य होण्याआधीच राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी तिचं नाव राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे धाडण्यात आलेलं आहे. चौदा महिन्यांपूर्वी राजकारणाच्या वाटेवर आलेल्या उर्मिला मातोंडकरने लोकसभेला भाजपचे दबंग उमेदवार गोपाळ शेट्टींविरुध्द उत्तर पश्चिममधून निवडणूक लढवली होती. त्यात तिचा पराभव झाला आणि गोपाळ शेट्टी यांचा सलग दुसर्‍यांदा विक्रमी मताधिक्क्याने लोकसभेवर जाण्याचा मार्ग सुकर झाला. या निवडणुकीनंतर मात्र तिने काँग्रेसचा राजीनामा दिला होता. तरी काँग्रेसला तिला काही द्यायचं होतं. कारण तिचा मुस्लीम उद्योजक पती. पण त्याचवेळी राज्यपाल नियुक्त 12 आमदारांना साहित्य, कला, क्रीडा आणि सामाजिक अशा क्षेत्रातून विधान परिषदेवर पाठवायचं आहे. हा धागा पकडून आणि त्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा अट्टाहास बघून शिवसेनेने उर्मिला मातोंडकर उर्फ मरियम मीर हिला पक्षात घेऊन शिवबंधनात बांधून टाकले.

बरोबर त्याच्या 24 तास आधी दक्षिण मुंबईचे शिवसेनेचे विभागप्रमुख आणि मागच्या विधानसभेला मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातून आणि त्याआधी कुलाब्यातून पराभूत झालेले पांडुरंग सकपाळ यांनी अजानची स्पर्धा घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या आणि तशी घोषणाही माध्यमांच्या कॅमेरासमोर करून टाकली. त्यांच्या या घोषणेने सगळेच चक्रावून गेले. माध्यमांनी चारी बाजूंनी पांडुरंग सकपाळ आणि शिवसेनेवर जोरदार हल्ला केल्यानंतर संध्याकाळी त्यांनी एका साध्या कागदावर आपलं स्पष्टीकरण प्रसिध्द केलं. तेही अत्यंत खोटं आणि पक्षाची आणि जनतेची फसवणूक करणार होतं. पांडुरंग सकपाळ यांनी ही घोषणा करताना आपल्या बैठकीच्या मागील भिंतीवर शिवसेना ठळक अक्षरात दिसेल याची काळजी घेण्याची हुशारी दाखवली होती. कारण पक्षातील दोन हुशार खासदार त्यांचे मार्गदर्शक आहेत.

- Advertisement -

या सगळ्यांनीच प्रकरण आपल्या अंगाशी येतंय बघून हात झटकले. आणि आपलं पद जातंय की काय अशी परिस्थिती निर्माण झाल्याबरोबर अधिकृत लेटरहेडवर माफी मागण्याऐवजी सकपाळांनी एका साध्या कागदावर दिलगिरी प्रकरण उरकून घेतलं. सध्या शिवसेना महाविकास आघाडीबरोबर सत्तेत आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. शिवसेनेवर त्यांनी हिंदुत्व सोडल्याचा आणि मुस्लिमांचे लांगुलचालन करणार्‍या काँग्रेसबरोबर गेल्याचा ठपका ठेवण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर पांडुरंग सकपाळ यांनी अजानची स्पर्धा घेऊन ती किती गोड असते, ते आपल्याला किती सुखावते आणि बरंच काही मीडियासमोर बोलून आपला प्रवास नेमका कुठे होणार आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. इथे एक गोष्ट समजून घेतली पाहिजे, पांडुरंग सकपाळ हे शिवसेनेचे विभाग प्रमुख असले तरी त्यांच्या यशाची टक्केवारी ही खूपच सुमार दर्जाची आहे. त्यामुळेच या भागातून विधानसभेत निवडून जाणं त्यांच्यासाठी अशक्यप्राय गोष्ट आहे.

एका बाजूला भाजपचे मंगल प्रभात लोढा आणि दुसर्‍या बाजूला काँग्रेसचे अमीन पटेल असे दोन पक्षांचे दिग्गज आपापले गड सांभाळून आहेत. या परिस्थितीमध्ये सकपाळ यांच्यासारख्या नेत्यांची अवस्था मिळेल ते घेऊ असं म्हणणार्‍या भूमिकेत आहे. पांडुरंग सकपाळ हे माझे गेल्या 25 वर्षांचे व्यक्तिगत मित्र आहेत. बोलायला मनमोकळा आणि सामाजिक कार्यातील मदतीसाठी पुढाकार घेऊ शकणारा असा हा नेता आहे. राजकीय बांधणी आणि त्यातून मिळवायचे संसदीय यश यामध्ये पांडुरंग सकपाळ अत्यंत तोकडे आहेत. आपला तोकडेपणा इतर सहकार्‍यांच्या मुळावर आला तरी चालेल; पण आपल्या तरुण मुलाला येणार्‍या महापालिकेत जर निवडून जायचं असेल तर भल्या पहाटे अशी एखादी अजान ऐकावीच लागेल आणि त्याच आधारे मिळणारी ऊर्जा घेऊन मुलाला महापालिकेत पोचवावं लागेल. याची नेमकी कल्पना दक्षिण मुंबईच्या शिवसेनेच्या या सुभेदाराला आलेली आहे. आणि त्यातूनच या स्पर्धेचा आचरटपणा करण्याचं त्यांनी ठरवलेलं असावं. त्यांनी काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे. फक्त त्यांनी कारण नसताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कोंडी आणि जनतेची नैतिक फसवणूक करू नये इतकीच माफक अपेक्षा आपण त्यांच्याकडून बाळगत आहोत.

- Advertisement -

अजानची स्पर्धा घेऊन आपण मुस्लिमांच्या किती जवळ आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न शिवसेना किंबहुना, पांडुरंग सकपाळ त्यांच्यासारखे ‘मिडीवॉकर’ नेते जर करत असतील तर ते एका वेगळ्याच भ्रमात आहेत, असं म्हणायला खूप मोठा वाव आहे. याचं कारण देण्यासाठी इथे आपल्याला राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचं उदाहरण समजून घ्यावं लागेल. आव्हाड ठाण्याच्या मध्यभागी राहतात. त्यांचे संसदीय कार्यक्षेत्र कळवा आणि मुंब्रा. यातही त्यांचा भर प्रामुख्याने मुंब्य्रावर. अर्थात मुस्लीम मतदारांवर. त्यांनी आपला मतदारसंघ जबरदस्त बांधलाय. चांगल्या आघाडीने तिथून ते निवडून येतात. त्यांच्या मतदारसंघाच्या बांधणीचे उदाहरण शरद पवार देशभरातल्या पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना देतात. मात्र तेच जितेंद्र आव्हाड ठाण्यात दोन नगरसेवक डंके की चोट पे निवडून आणताना मात्र हैराण परेशान होतात. किंबहुना, त्यांना तसं करणं शक्य होईल की नाही याच्याबद्दल ते स्वतःही साशंक असतात आणि उमेदवारही साशंक असतात.

आता झालंय काय आव्हाड आपल्या मतदारसंघासाठी ज्या पद्धतीत मुंब्य्रात समरस झालेत ते पाहिल्यानंतर हिंदू वोट बँकेवर ते विसंबून राहू शकत नाहीत. किंबहुना, त्यात ते यशस्वी होऊ शकत नाहीत. आणि त्यामुळेच नागरी सोयीसुविधा देवो किंवा न देवो ठाणेकर गेली पंचवीस वर्षे शिवसेनेला महापालिकेत भरभरून मतदान करत आहेत. निवडणुकीच्या बाबतीत लोकसभा, विधानसभा आणि महापालिका यांचे स्वतंत्र ठोकताळे आहेत ते समजून घेणं गरजेचं असतं. ते शिवसेनेच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी समजून घेतले आहेत. त्यामुळेच पक्षाची ध्येयधोरणे काही असली तरी तळाला आपण काय करायचं याचा निर्णय ही मंडळी घेत असतात आणि आपलं राजकीय उखळ पांढरं करून घेत असतात. त्याच प्रवर्गात शिरकाव करण्याचा प्रयत्न पांडुरंग सकपाळ यांनी केला आहे. त्यामुळे कदाचित सकपाळ किंवा त्यांचा मुलगा यांना राजकीय लाभ मिळू शकतो; पण राज्याच्या मुख्यमंत्रीपदी असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत आणि त्यांच्या पक्षात मात्र कटकटीचं वातावरण निर्माण होऊ शकतं.

उद्धव ठाकरेंनी विरोधकांचा सामना करत राज्याचं मुख्यमंत्रीपद एक वर्ष भुषवलं आहे. अनेक अडचणी आल्या त्याला ते सामोरे जातात. पक्षात जणूकाही उद्धव ठाकरे यांना अडचणीत आणण्याची जणू एक स्पर्धाच लागलेली आहे, मग ती स्पर्धा एखाद्या कॉन्ट्रॅक्टरकडून काम घेण्यासाठी धमकावणार्‍या महिला खासदाराची असू द्या किंवा स्थायी समितीवर बसून तिथला मलिदा खाऊन डोळ्यावर धुंदी चढलेल्या भायखळ्याच्या यशवंत जाधव यांचे असू द्या, अजानची स्पर्धा घेणार्‍या गिरगाव काळबादेवी भुलेश्वरसारख्या भागातल्या पांडुरंग सकपाळ यांचे असू द्या, आपण केलेला वाद, आपण दिलेल्या धमक्या आपल्या नेत्याला सर्वोच्चपदी असताना अडचणीच्या ठरू शकतात याचे साधे भानही ठेवायला ही मंडळी तयार नाहीत. याचे कारण प्रत्येकालाच आपल्या पदरात काहीतरी पाडून घ्यायचे आहे. एक गोष्ट नमूद करायला हवी, विदर्भातल्या भावना गवळी असू द्या, भायखळ्याचे यशवंत जाधव असू द्या किंवा दक्षिण मुंबईला पांडुरंग सकपाळ वर्षानुवर्षे या मंडळींनी खुर्च्यांवर बसून सत्तेचा मलिदा खालेला आहे. वाटेल ते करून आपलं भलं करून घेण्याची वृत्ती या नेत्यांमध्ये फोफावली आहे आणि त्यामुळेच उद्धव ठाकरे असो किंवा शिवसेना अडचणीत आली तरी हरकत नाही.

आपलं आणि आपल्या कुटुंबाचं भलं झालं पाहिजे इतकाच या मंडळींचा एककलमी कार्यक्रम आहे. यशवंत जाधव यांच्या कार्यशैलीने आणि त्यांच्या मनमानी अवगुणी वागण्याने पुरती शिवसेना हैराण झाली आहे. काही दिवसांपूर्वी प्रभाग समिती अध्यक्षांसाठी त्यांनी बनवलेली यादी दस्तुरखुद्द पक्षप्रमुखांनी फाडून टाकली. नवी यादी आणि नव्या मंडळींना वाव देण्यासाठी सुनील प्रभू, अनिल परब, राहुल शेवाळे यांची एक त्रिसदस्य समिती बनवण्यात आली आहे. या समितीची निर्मिती हीच मुळी यशवंत जाधव यांना चाप लावण्यासाठी करण्यात आलेली आहे. जेव्हा पक्षाचे प्रमुख सर्वोच्च पदावर बसून राज्याचा गाडा हाकत आहेत त्या वेळेला किमान पक्षी जाधव यांनी राजकीय परिस्थितीचे आणि सामाजिक अस्थिरतेचे भान ठेवून राजकारण करावं, इतकी माफक अपेक्षा बाळगणं जर चुकीचं असेल तर ती चूक करायला आपण तयार असलं पाहिजे, तूर्त इतकंच.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -