आदित्यनाथ के हसीन सपने!

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

मुंबईला रिकामी करण्याच्या कारस्थानाचे पुढचे फासे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी फेकले आहेत. उत्तर प्रदेशात जागतिक स्तरावरील फिल्म सिटी उभारण्याची योजना त्यांनी मुंबईत येऊन जाहीर केली. नोएडा येथे एक हजार हेक्टर जमीनवर ही फिल्म सिटी उभारण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांनी चित्रपटसृष्टीतील तज्ज्ञांसोबत चर्चाही केली. योगींनी अशी फिल्म सिटी उभारावी. त्यातून त्यांच्या राज्याचा विकास झाला तर हरकत नाही. पण मुंबईत येऊन त्यांनी फिल्म सिटी उभारण्याची घोषणा करावी यात त्यांचा अंतस्थ हेतू लक्षात येतो. योगींची भूमिका आणि भारतीय जनता पक्षाची भूमिका ही काही वेगळी नाही. त्यामुळे या भूमिकेमागे नक्की काय कारस्थान दडलंय हे आता स्पष्टपणे दिसू लागले आहे. सुशांतसिंग आत्महत्याप्रकरणी गेल्या चार महिन्यांपासून काही मंडळींनी जो थयथयाट मांडला आहे त्यामागचे सुप्त कारण योगी यांच्या घोषणेत असल्याचे आता स्पष्टपणे जाणवते. मुंबईतून बॉलीवूड पळवून नेण्यासाठी तर हा उपद्व्याप नाही ना, अशीही शंका या निमित्ताने उपस्थित होते.

कंगना रानौटने ‘क्लिन अप’ बॉलिवूडची केलेली भाषाही याच मालिकेतील एक भाग असल्याचे आता समजावे लागेल. सुशांतसिंग आत्महत्या प्रकरण हे दुर्दैवी होते आणि पोलीस यंत्रणांनी त्याच्या मुळाशी जावे ही प्रत्येकाचीच अपेक्षा आहे. पण या प्रकरणाआडून जर उत्तर प्रदेशची पोळी भाजण्याचा प्रयत्न कुणी करणार असेल तर ते मराठी माणूस कदापिही सहन करणार नाही. यापूर्वीदेखील बुलेट ट्रेन, समृद्धी मार्ग आणि तत्सम दळणवळणाच्या माध्यमातून मुंबईतील उद्योग गुजरातला पळवण्याचा प्रयत्न लपून राहिलेला नाही. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न २०१४ पासूनच होत आहे. आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र असेच षङ्यंत्र रचून गुजरातला नेले गेले. अशात आता शंभर वर्षाची परंपरा असलेल्या बॉलीवूडला पळवण्याचा डाव योगींच्या माध्यमातून रचला जात आहे, त्याला महाराष्ट्रातून विरोध होणे हे स्वाभाविकच आहे. उत्तर प्रदेशात आम्ही सुरक्षिततेच्या वातावरणात फिल्म सिटीचे काम करु असेही योगींनी पत्रकार परिषदेत म्हटले. मुळात ज्या उत्तर प्रदेशात नुकतीच हाथरससारखी घटना घडली तेथे सुरक्षिततेची हमी तेथील पोलीस यंत्रणा तरी घेणार का? गुंडापुंडांचा प्रदेश म्हणून ज्या उत्तर प्रदेशला ओळखले जाते तेथे चित्रपटसृष्टी उभारुन नक्की साध्य काय होणार? नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने जारी केलेल्या माहितीनुसार, देशात सर्वाधिक गुन्हेगारीच्या घटना उत्तर प्रदेशात होतात. या राज्यात प्रत्येक दोन तासांनी बलात्काराच्या घटनेची पोलिसांत नोंद होते.

प्रत्येक ९० मिनिटांनी एका बालकाच्या विरुद्ध गुन्हा घडल्याची सूचना दिली जाते. देशातील एकूण खूनांच्या घटनांपैकी तब्बल १३.८ टक्के घटना केवळ उत्तर प्रदेशात घडतात. तर महिलांवरील अत्याचाराच्या घटना १५.७ टक्के इतक्या एकट्या उत्तर प्रदेशात घडतात. याशिवाय प्रत्येक गुन्ह्यांच्या प्रकारात उत्तर प्रदेश अव्वल आहे. हे गुन्हे रोखण्यासाठी योगी सरकार प्रयत्न करतेय ही स्वागतार्ह बाब आहे. पण म्हणून आपल्या राज्यात गुन्हेगारीच नाही अशा अविर्भावात सुरक्षित वातावरणाच्या पोकळ गप्पा मारुन नेमके साध्य काय होणार? योगींच्या वक्तव्यावर क्षणभर विश्वास ठेवायचा जरी झाला तरीही ते मुस्लीम कलाकारांना बॉलिवूडप्रमाणे साथ देतील का? त्यांच्या मनातील मुस्लीम द्वेष फिल्म सिटीसाठी तरी किमान कमी होईल का, हे देखील बघणे महत्वाचे आहे. विशिष्ट लोकांना पुढे घेऊन जाताना काहींवर अन्याय करायचा असा जर या फिल्म सिटीत न्याय दिला जाणार असेल तर तेथे कोण जाणार? बॉलिवूडमध्ये एखादा चित्रपट तयार होताना सर्व धर्मियांना कामे मिळतात. मुळात माणसांचा धर्म बघून नाही तर त्यातील गुणवत्ता बघून येथे कामे दिले जातात. त्यामुळे सर्वधर्म समभाव असलेली ही एकमेव इंडस्ट्री आहे असे म्हटले तर वावगे ठरु नये. गेली शंभराहून अधिक वर्षे विकसित होत असलेली बॉलिवूड ही एक संकल्पना आहे. तिची स्वतंत्र अशी कार्यसंस्कृती आहे.

ब्रिटिशांच्या काळात मुंबईत या संकल्पनेची रुजवात करण्यात आली. त्यानंतर चित्रपटनिर्मात्यांसाठी मुंबई ही नेहमीच तांत्रिकदृष्ठ्या आधुनिक आणि सांस्कृतिकदृष्ठ्या सोयीची नगरी राहिली आहे. फाळणीच्या विदारक अनुभवातून आपला देश गेला, त्यातूनही या चित्रपटसृष्टीने तग धरला आणि ती बहरत गेली. अभिनेते, दिग्दर्शक, कॅमेरामन यांप्रमाणेच मेकअपमन, लाईटमन, स्पॉट बॉय, साऊंड आर्टिस्ट, डबिंगवाले, वादक, संगीतकार, डमी, एक्स्ट्रामधले कलाकार असे मिळून जवळपास पाच ते सहा लाख लोकांना थेट रोजगार देणारा हा उद्योग आहे. त्यामुळेच बॉलिवूडला मुंबईचा अविभाज्य भाग मानले जाते. भौगोलिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कारणेही बॉलिवूडच्या कार्यसंस्कृतीत रुजलेली आहेत. कुण्या मुख्यमंत्र्याला किंवा धनवंत उद्योजकाला वाटले म्हणून हलवता येण्यासारखी ती वस्तू नव्हे. अर्थात, यापूर्वीच्या अशा प्रयत्नांमुळे वा प्रयोगांमुळे बॉलिवूडची प्रतिष्ठा कमी झाली असेही म्हणता येणार नाही. हैद्राबादमध्ये रामोजी सिटी उभी राहिली. मॉरिशसच्या सरकारने भरघोस सवलती जाहीर करुन हिंदी चित्रकर्मींना आमंत्रण दिले.

पण तरीही बॉलिवूडने आपले अस्तित्व गमावले नाही. कारण बॉलीवूडची पाळेमुळे मुंबईत पसरलेली आहेत. शंभर वर्षांपेक्षा अधिक काळापासून ही पाळेमुळे मजबुतीने टिकून आहेत. ते टिकून राहण्यासाठी अनेकांनी घाम गाळला आहे. केवळ हिंदी चित्रपटसृष्टीच नव्हे तर मराठी, गुजराती, भोजपुरी, दाक्षिणात्य, बंगाली भाषेतील मनोरंजन क्षेत्रालाही कवेत घेण्याची ताकद बॉलिवूडमध्ये आहे. इतकेच नाही तर युपी, बिहारमधील अनेक कलावंतांना बॉलिवूडने प्रतिष्ठा प्राप्त करुन दिली आहे. या कलाकारांनीही बॉलिवूडप्रती कधी अपशब्द वापरले नाहीत. याउलट बॉलिवूडवर संकट आले तेव्हा ते झेलण्यासाठी हे कलाकार अग्रभागी होते. असंख्य मालिकांचे चित्रीकरणही याच बॉलिवूडच्या भरवशावर चालते. दादासाहेब फाळकेंसारख्या प्रतिभावंताने चित्रसृष्टीची मुहूर्तमेढ रचली. त्यानंतरही या चित्रपटसृष्टीचा समृद्ध इतिहास आहे. तो कुणा एका-दोघांच्या प्रयत्नाने पुसला जाणे कदापिही शक्य नाही. पण या निमित्ताने भाजपच्या मंडळींचा महाराष्ट्र द्वेष समोर येतोय, हेदेखील मान्य करावे लागेल.

कोरोनाच्या काळात बॉलिवूडमधील श्रमिकांसाठी महाराष्ट्र शासनाने काय केले असाही सवाल आता ‘भाजपेयी’ करत आहेत. वास्तविक, कोरोनाच्या काळात परिस्थितीचे चटके बसले नाहीत, असे एकही क्षेत्र सापडणार नाही. त्याला बॉलिवूड कसे अपवाद असणार? पण म्हणून बॉलिवूडमधील श्रमिकांना शासनाने वार्‍यावरही सोडलेले नाही. शिवाय अनेक अशा सामाजिक संस्था होत्या ज्या श्रमिकांसाठी धावून आल्या. गेल्या सात महिन्यांपासून बॉलिवूड प्रचंड मोठ्या आर्थिक संकटाशी लढत आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या या संकटाने मल्टिप्लेक्स आणि थिएटर्स बंद ठेवण्याची वेळ आली. त्यातून हजारोंना बेरोजगारीचा सामना करावा लागला. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमामुळे चित्रपटांचे चित्रीकरणही या काळात थांबले. परिणामी सध्या फारसे चित्रपट प्रदर्शित झाले नाहीत. त्याचा आर्थिक फटका या क्षेत्राशी संबंधित लोकांना बसतोय. त्यातून सावरण्यासाठी आता प्रयत्न सुरू झालेत. पण अशातच योगींच्या मुंबई दौर्‍याने बॉलिवूडकरांच्या चिंतेत वाढ केली. अर्थात, कुणी कितीही प्रयत्न केले तरीही मुंबादेवीच्या आशीर्वादाने विकसित झालेल्या या मायानगरीचे काही एक बिघडणार नाही. यासाठी समस्त मुंबईकर विशेषत: येथील मराठी माणूस व महाराष्ट्र पहारा ठेवून आहे. बॉलिवूडला पळवण्याचा प्रयत्न जर योगींचा असेल तर त्याला ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’च म्हणावे लागेल!