Wednesday, June 7, 2023
27 C
Mumbai
घर फिचर्स मायमहानगर ब्लॉग तो अंधार छेदतोय........!

तो अंधार छेदतोय……..!

Subscribe

2019 मध्ये महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आव्हाड यांना गृहनिर्माण मंत्रीपद अवघे अडीच वर्षांसाठी मिळाले पण या खात्यात त्यांनी आमूलाग्र बदल केले

– आनंद परांजपे

जब टूटने लगे होसले तो बस ये याद रखना,
बिना मेहनत के हासिल तख्तो ताज नहीं होते,
ढूंड लेना अंधेरों में मंजिल अपनी,
जुगनू कभी रौशनी के मोहताज नहीं होते….
या काव्यपंक्ती कोणाच्या आहेत, हे सांगणे थोडे अवघड आहे. पण या काव्यपंक्तीला आपल्या जीवनात उतरवून त्याद्वारे आपले जगणे हे कार्यकर्त्यांसाठी आदर्श निर्माण करणारे फारच कमी लोक राजकारणात आहे. सत्तेसाठी राजकारण करणार्‍यांची संख्या प्रचंड आहे. पण, आपल्यावर ज्यांनी विश्वास टाकून विधिमंडळात पाठविले आहे; त्या जनतेसाठी राजकारण करणार्‍यांमध्ये सर्वात अग्रक्रमाने नाव घ्यावे असे एकमेव व्यक्तीमत्व म्हणजे डॉ. जितेंद्र सतीश आव्हाड साहेब!!
रस्त्यावर ज्याची कारकिर्द घडते, असा माणूस कधीच रस्त्याला घाबरत नाही. अडथळ्यांची पर्वा त्याला कधीच नसते. डॉ. जितेंद्र आव्हाड नावाचा एक अवलिया असाच आहे. घरात अठराविश्व दारिद्र्य असलेल्या अन् सिन्नरमधून पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबईत आलेल्या एका हमालाचा नातू ते लाखोंचा पोशिंदा, हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. प्रचंड मेहनत, निष्ठा आणि जनतेप्रती असलेला प्रामाणिकपणा या जोरावर डॉ. आव्हाड यांनी हा प्रवास केला आहे. त्यांचा हा प्रवास नक्कीच अनेकांना प्रेरणादायी तर आहेच; पण, त्यांच्यातील प्रकाशमान कर्तृत्वाचा प्रत्यय आणून देणाराही आहे. असं म्हटलं जातं की, शिक्षण हे जेवायला नव्हे तर जगायला आणि जगवायला शिकतं!

- Advertisement -

डॉ. आव्हाड यांच्या मातापित्याला हे गमक समजले होते. म्हणूनच डॉ. आव्हाड हे उच्चशिक्षित झाले अन् त्यातूनच या ठाण्याला, या राज्याला अन् देशाला आभाळ छेदणारे अन् अंधाराच्या आरपार पाहणारे नेतृत्व लाभले. सामाजिक क्षेत्रात काम करणारा नेता सत्तेच्या राजकारणात किती संवेदनशीलतेने काम करू शकतो, हे डॉ. आव्हाडांनी सन 2009 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये विजयी झाल्यानंतर लागलीच दाखवून दिले होते. आपण ज्या भागाचे प्रतिनिधीत्व करतो, त्या भागाचा विकास केला तरच आपणाला लोकप्रतिनिधी म्हणवून घेण्याचा अधिकार आहे, अशी धारणा बाळगल्यामुळेच कधीकाळी ठाणे शहरावरुन ओवाळून टाकलेल्या कळवा-मुंब्रा भागाचा विकास त्यांनी केला आहे. डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्याकडे पाहिल्यानंतर साधारणपणे सर्वच जण त्यांना “रांगडा गडी, आक्रस्ताळी माणूस” असेच म्हणत असतील. पण, या रांगड्या मनाच्या आत एक संवेदनशील राजकारणी दडलेला असल्याचे कळवा-मुंब्रावासिय आजही मोठ्या मनाने कबूल करीत आहेत. ज्या कळवा- मुंब्य्राला स्वत:ची ओळखच नव्हती. त्या कळवा- मुंब्य्रात आज जो विकास दिसत आहे. त्यामागे डॉ. आव्हाड यांचा ‘आक्रस्ताळी’ स्वभावच महत्वाचा ठरला आहे. आपल्या भागाचा विकास करण्यासाठी त्यांनी आक्रस्ताळी भूमिका घेऊन पुकारलेला ‘संघर्ष’च या विकासकामांसाठी मैलाचा दगड ठरलेला आहे.

आज कितीजणांना आठवत असेल हे माहित नाही. पण, ज्यावेळी हरीत वसई या संघटनेच्या याचिकेवरुन कळव्यातील हजारो लोकांचा निवारा जमीनदोस्त करण्याचे आदेश कोर्टाने दिले. त्यावेळी डॉ. आव्हाड नावाचा मोठा अडथळा या आदेशाविरुद्ध उभा राहिला होता. हजारो लोकांना घेऊन या डॉ. आव्हाडांनी संघर्ष पुकारला अन् गरजेपोटी अनधिकृत घरांमध्ये राहणार्‍यांचे संसार वाचविले होते. सामान्य लोक आपल्या घरांमध्ये शांतपणे रहात असले तरी ही शांतता निर्माण करण्यासाठी डॉ. आव्हाडांनी अनेक गुन्हे आपल्या अंगावर घेतले आहेत.

- Advertisement -

आज आपण दिमाखात उभार राहिलेला कळवा पूर्व-पश्चिमेला जोडणारा उड्डाणपूल पहात आहोत. पण, या पुलाची जेव्हा पायाभरणी करायची वेळ होती. त्यावेळी परवानग्या घेण्यासाठी मी स्वत: दिल्लीत रेल्वे मंत्रालयाच्या पायर्‍या झिजवित होतो. त्याचवेळी डॉ. आव्हाडांनी मला आदरणीय शरदचंद्र पवारसाहेबांसमोर उभे केले अन् चुटकीसरशी समस्या मार्गी निघाली. त्यानंतर पालिकेच्या अधिकार्‍यांशी त्यांनी केलेला पाठपुरावा हा जगाच्या पाठिवर खचितच कुणी केला असेल असे माझे मत आहे. आज त्यांच्या या मेहनतीचे श्रेय घेण्याचा प्रयत्न अनेकजण करीत असतील; पण, डॉ. आव्हाडांनी पाठीवर ठेवलेल्या हातामुळेच आज हा पूल उभार राहिला आहे, हे सर्वच जाणकारांना माहित आहे.

आजमितीला घोलाई नगर, ठाकूरपाडा, वाघोबा नगर, घोलाई नगर, आतकोनेश्वर नगर, पौंडपाडा, न्यू शिवाजी महाराज नगर, आनंद नगर मनिषा नगर येथील पाण्याच्या टाक्या; कळवा- मुंब्रा येथील रस्ते; तिसरा खाडीपूल, कांचनश्वेता उड्डाणपूल, पटनी ते कोपरीचा प्रस्तावित उड्डाणपूल; रेतीबंदर चौपाटी;सर्वधर्मियांसाठीची अंत्यसंस्कार केंद्रे, वीजकेंद्रे; पोलीस ठाणे; अग्नीशमन केंद्रे, मुंब्रा स्टेडियम अशी शेकडो कामे या माणसाने करुन सबंध कळवा- मुंब्रा भागाचा कायापालट केला आहे.

मंत्रीपद हे लाल दिव्याच्या गाडीतून मिरवण्यासाठी नसते, तर या लाल दिव्याचा वापर करुन जनतेला समस्यामुक्त करायचे असते; ही शिकवण आदरणीय शरदचंद्र पवारसाहेबांनी दिलेली आहे. त्यांच्या शिकवणीचा खराखुरा अवलंब डॉ. आव्हाड यांनी आपल्या जीवनात केला आहे. त्यामुळेच जेव्हा ते वैद्यकीय शिक्षण मंत्री झाले त्यावेळी त्यांनी अवघ्या पाच-सहा महिन्याच्या काळात त्यांनी पोस्टमार्टेमच्या नियमांसह वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात केलेले बदल हे मैलाचा दगड ठरले आहेत. सन 2019 मध्ये महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये त्यांना गृहनिर्माण या मंत्रीपदाचा अवघा अडीच वर्षांचा कालावधी लाभला. पण, या आधी जे खाते लोकांना माहितच नव्हते; त्या खात्याकडून किती आणि कशी विकासकामे करता येतील, याचे मूर्तीमंत उदाहरण डॉ.आव्हाड यांनी समोर ठेवले आहे.

टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येणा-या रुग्णांच्या नातेवाईकांचे किती हाल होत असतात, याची कल्पना त्या अनुभवातून न गेलेल्यांना कळू शकणार नाही. डॉ. आव्हाड यांची मुलगी नताशा हिने जेव्हा ही बाब निदर्शनास आणून दिली. त्यानंतर डॉ. आव्हाड यांनी तातडीनं टाटामध्ये उपचारासाठी येणार्‍या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी म्हाडातर्फे शंभर फ्लॅट्सची देण्याची घोषणा केली. स्थानिकांच्या तक्रारीमुळे सुरुवातीला त्यासंदर्भात काही मतभेद झाले, परंतु तो प्रश्न मार्गी त्यांनी मार्गी लावलाच आहे.

अतिवृष्टीच्या काळात महाड तालुक्यातील तळिये गावावर दरड कोसळल्यामुळं अख्खं गावच नामशेष झाले. या गावाचे संपूर्ण पुनर्वसन करण्याची जबाबदारी म्हाडाच्यावतीने स्वीकारली. तळीयेवासीयांची घरे आता तयार झाली आहेत; लवकरच लोक त्यामध्ये वास्तव्यास जातील. पण, कधीकाळी केवळ मुंबईपुरत्याच मर्यादीत असलेल्या म्हाडाच्या कक्षा रुंदावता येऊ शकतात, हे डॉ. आव्हाडांनी दाखवून म्हाडाच्या कामाला संवेदनशीलतेची जोड दिली. आपल्याकडे असलेले अधिकार तुम्ही नीट समजून घेतले तर किती चांगल्या रितीने काम करता येते हेच त्यांनी यानिमित्ताने दाखवून दिले होते. मुंबईतील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा निर्णय केवळ आव्हाड यांच्याच नव्हे, तर महाविकास आघाडी सरकारच्या कारकीर्दीतला एक महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय ठरावा. गेली दोन-तीन दशकं बीडीची चाळींच्या पुनर्विकासाच्या चर्चा सुरु होत्या. अनेक घोषणा झाल्या होत्या, त्यामुळं इथले रहिवासी वर्षानुवर्षे फक्त पुनर्विकासाची स्वप्नं पाहात होते. त्यांची ही घालमेल समजून घेण्यासाठी तेवढीच संवेदनशीलता आवश्यक होती. ज्यांचं बालपण चाळीत गेलं आहे अशा जितेंद्र आव्हाडांनी ती समजून घेतली त्यातूनच हा ऐतिहासिक प्रकल्प मार्गी लागू शकला.

प्रकल्पग्रस्तांच्या सदनिकांसाठी विशेष कक्ष, एसआरएमधील घरांचा दर्जा सुमार असल्याचे ध्यानात आल्यानंतर डॉ. आव्हाडांनी चक्क गुणवत्ता तपासणीसाठीच नवीन कक्ष उभारला. पाच वर्षांपेक्षा अधिक काळ रखडलेल्या सुमारे 533 प्रकल्पांना नवसंजीवनी देणे; केवळ चुकीच्या कागदपत्रांमुळे अपात्र ठरलेल्या झोपडीधारकांना पात्र करुन घेणे;म्हाडात एक खिडकी योजना लागू करणे; कोळीवाड्यांचे सीमांकन करणे, 5625 चौ. मीटर क्षेत्रात लिलावती रुग्णालयाशेजारी अन् 8 हजार 859 चौ. मीटर क्षेत्रात जोगेश्वरी येथे रुग्णालय उभारणे, पुण्यातील 132 हेक्टर जमिनीवरील म्हाडाच्या इमारतींचा पुन:र्विकास, कामाठीपुराचा पुन:र्विकास, पत्राचाळीचा अडकलेला प्रश्न मार्गी लावणे, नोकरदार महिलांसाठी वसतिगृह, मुंबईतील जिजामात नगरात विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, परळ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे राष्ट्रीय स्मारक, एसआरएमधील झोपडीविक्रीची मुदत तीन वर्षांवर आणणे, अवघ्या अडीच लाखात एसआरएमधील घरे देणे, घाटकोपर येथे अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक उभारणे, गाव तेथे म्हाडा ही संकल्पना राबविणे, अवघ्या तीस महिन्यांच्या काळात सुमारे 8 हजार 205 जणांना म्हाडाची सोडतीद्वारे घरे देणे, पालघर येथे वृद्धाश्रमाची निर्मिती करणे अशी एक ना शेकडो कामे डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी फक्त 30 महिन्यात केली आहेत.

एकीकडे देशात विकासकामांच्या नावावर राष्ट्रीय मालमत्तांची विक्री होत असताना दुसरीकडे डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केलेली ही विकासकामे आता मैलाचा दगड ठरलेली आहेत. धर्माच्या नावाखाली तरुणांची माथी भडकाविली जात असतानाच दुसरीकडे मात्र जातपात- धर्म-पंथ असा कोणताही भेद आणि मनात किंतु-परंतु न ठेवता शिव,फुले,शाहू, आंबेडकरांचा आदर्श समोर ठेवून अन् सामान्यांच्या अडचणींमध्ये धावून जाण्याची माननीय शरदचंद्र पवारसाहेबांची शिकवण अंगीकारणार्‍या या दिलदार नेतृत्वाला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा!

(लेखक राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाण्याचे जिल्हाध्यक्ष आहेत)

- Advertisment -