सच्च्या शिवभक्ताची शिवशाहिरांना अनोखी आदरांजली

“म्यानातुन उसळे तलवारीची पात, वेडात मराठे वीर दौडले सात!” महाराष्ट्राचे लाडके ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विष्णू वामन शिरवाडकर तथा तात्यासाहेब कवी कुसुमाग्रज यांच्या या रक्त सळसळविणाऱ्या कवितेच्या ओळी आठवितात आणि मग वाटतं खरंच कोणतेही काम हाती घेऊन ते पूर्णत्वास न्यायचे असेल तर अक्षरशः ‘वेड’ लागणे महत्त्वाचे आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे खरेखुरे चरित्र जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा विडा उचलणारे किंबहुना हे ‘वेड’ अंगिकारलेले शतकवीर श्रीमंत शिवशाहीर बळवंत मोरेश्वर पुरंदरे म्हणजेच बाबासाहेब पुरंदरे यांनी बरोब्बर शंभराव्या वर्षी आपली जीवनयात्रा पूर्ण केली. बाबासाहेबांच्या महानिर्वाणानंतर अनेकांनी आपापल्या भावना आपापल्या परीने व्यक्त केल्या. बाबासाहेब पुरंदरे यांचा एक सच्चा शागीर्द/वारसदार शिवभक्त राजू देसाई यांनी बाबासाहेबांना अनोखी आदरांजली वाहिली असे म्हटले तर ते चुकीचे ठरु नये. अर्थात ही माझी भावना आहे.

 

समर्थ रामदास स्वामी यांनी आपल्या दासबोधाला जिथे जन्म दिला त्या शिवथरघळ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजधानी रायगडाचे दर्शन राजू देसाई यांनी घडविले. हा माझा व्यवसाय नाही. पेस्ट कंट्रोल हा माझा व्यवसाय आहे. पण छत्रपती शिवाजी महाराज यांचे खरेखुरे चरित्र शिवभक्तांना कळावे म्हणून मी चाहत्यांना रायगडावर घेऊन येतो, असे राजू देसाई परखडपणे सांगतात. तब्बल चारशेएक्क्याण्णव वेळा रायगडावर येण्याचा विक्रम राजू देसाई यांनी केला असून नजीकच्या काळात पाचशेव्वा टप्पा ते निःसंशय पूर्ण करतील. गढ चढून जात रायगडावरचे टकमक टोक एका रात्रीत गाठण्याचा विक्रम पूर्ण करणाऱ्या राजू देसाई यांना बाबासाहेब पुरंदरे यांनी अक्षरशः पाठीवर शाबासकीची थाप दिली तेव्हा, “याहून मोठा पुरस्कार तो काय?” असे राजू देसाई अभिमानाने सांगतात. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संपूर्ण चरित्राचे राजू देसाई हे चपखलपणे शिवभक्तांसमोर सादरीकरण करतात. ज्या दंतकथा पसरविण्यात येतात त्यांचे राजू देसाई हे स्पष्टपणे आवर्जून खंडन करतात. राज्याभिषेक या ऐवजी ‘राजाभिषेक’ हा शब्द रुढ करण्याचा त्यांचा आग्रह योग्यच म्हणावा लागेल. एखाद्या राज्याचा नव्हे तर हा एका छत्रपती राजाचा अभिषेक म्हणून ‘राजाभिषेक’ आहे, असे ते आवर्जून सांगतात.

‘रायगड सहल परिवार’ हा समूह समाज माध्यमावर सुरु करुन त्यायोगे या सहलीत सहभागी अशा सर्वांचा समावेश करण्यात आला. सर्वांना या संपूर्ण कार्यक्रमाची माहिती देण्यात आली. यासाठी नियमावली तयार करण्यात आली. योग्य त्या सूचना देण्यात आल्या. बोरीवली पूर्व येथे असलेल्या पश्चिम द्रूतगती महामार्गालगत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याजवळ येऊन महाराजांना मानाचा मुजरा करण्यात आला. वाहनाजवळ श्रीफळ वाढविण्यात येऊन दोन दिवसाच्या अभ्यास दौरा/सहलीला प्रारंभ झाला. या सहलीत सहभागी शिवभक्तांना एकेक करीत वाहनात घेत कूच करण्यात आली. आधी कुर्ला, मग बेलापूर, मग माणगांव मजल दरमजल करीत वाहन समर्थ रामदास स्वामी यांच्या शिवथरघळ येथे पोहोचले. समर्थ रामदास स्वामी आणि कल्याण स्वामी यांना प्रणाम करुन सामूहिकरीत्या ‘भीमरूपी महारुद्रा वज्रहनुमान मारुती’ या स्तोत्राचे तद्वतच ‘श्रीहनुमान चालीसा’चे पठण करण्यात आले. तेथील संपूर्ण माहिती दिल्यानंतर एका हॉटेलमध्ये ‘विसावा’ घेण्यात आला.

दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे रायगडाकडे कूच करण्यात आली. हॉटेल देशमुख हे गेल्या ५८ वर्षापासून शिवभक्तांची क्षुधा शांती करीत आले आहे तेथे उतरुन स्व. विष्णुपंत जोग यांच्या पुढाकाराने सुरु करण्यात आलेल्या रोप वे ने टप्प्या टप्प्याने रायगडावर पोहोचलो. राजू देसाई यांच्या कुशल मार्गदर्शन आणि नेतृत्वाखाली आमचा चमू माहिती घेता झाला. चारशे एक्क्याण्णव वेळा रायगडावर जाणाऱ्या राजू देसाई यांना रायगडावरच्या मातीचा कण अन कण परिचित असल्याने राजू देसाई यांच्या मुखातून साक्षात बाबासाहेबांचे शिवचरित्र आमच्या कानी पडत असल्याने आमची कर्णकुंडले पावन झाली नाही तरच नवल. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रायगड या राजधानीचे खडानखडा वर्णन आम्ही राजू देसाई यांच्या मुखातून ऐकत होतो. छत्रपती शिवाजी महाराज यांना आपला राजाभिषेक करवून घ्यायचा नव्हता पण छत्रपती शिवाजी महाराज यांनी गुरुंचा शब्द आणि मातोश्रींची आज्ञा यांची कधी अवज्ञा केली नव्हती, या दोन गोष्टी त्यांनी सदैव पाळल्या. आणि म्हणूनच त्यांनी गागाभट्टांकरवी सात नद्यांचे तीर्थ याचा अभिषेक मां जिजाऊ साहेबांच्या आज्ञेनुसार करवून घेण्यास मान्यता दिली. मुंज, विवाह, अभिषेक हे सारे सोपस्कार पार पाडले. इंग्रज अधिकारी या ठिकाणी आवर्जून उपस्थित होता आणि त्याने त्याच्या सवयी प्रमाणे दैनंदिनी लिहून ठेवली त्यावरुन ब्रिटिशांच्या राजवटीत ही घटना आपल्याला कळू शकली. आपल्याला आपली थोरवी माहितच नव्हती ती आपल्याला ब्रिटिशांमुळे मिळाली. महाराजांचा राज दरबार, रायगडावर असलेले जगदीश्वर मंदिर, या मंदिराच्या पायरीवर असलेली पाटी आणि त्या पाटीवर लिहिलेले ‘सेवेचेठाई सदा तत्पर, पिराजी इटळकर’ हे नांव, याचा इतिहास, छत्रपती शिवाजी महाराज यांचा फाल्गुन वद्य तृतिया, १९ एप्रिल १६३० रोजी झालेला जन्म ते ३ एप्रिल १६८० रोजी महाराजांनी घेतलेला ईहलोकाचा निरोप या संपूर्ण कालखंडातील सर्व बारीक सारीक घटना शिवभक्त राजू देसाई केवळ सांगून थांबत नाहीत. तर प्रत्यक्ष त्या ठिकाणी नेऊन त्याचे दर्शन घडवितात.

बाजारपेठ, त्याची महत्ता, त्याची पार्श्वभूमी, त्यातील एका ठिकाणी असलेले नागाचे शिल्प आणि साक्षात सिंहासनाधिष्ठित छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्य प्रतिमा (पुतळा) या संपूर्ण जागेचे पावित्र्य शिवभक्त राजू देसाई यांनी यथायोग्य उलगडून सांगितले. गडावर माहिती देणारे बरेच आहेत परंतु साद्यंत माहिती केवळ आणि केवळ शिवभक्त राजू देसाई यांच्या मुखातून ऐकण्यात जो यथार्थ आनंद मिळतो तो निश्चितच वाखाणण्याजोगा आहे. गजानन वावीकर या आपल्या बुजुर्ग मित्रांसमवेत या दौऱ्यावर राजू देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली नीलेश धुरी, प्रिया नीलेश धुरी, रिवांश नीलेश धुरी, अमर पोरे, कविता अमर पोरे, अधीश अमर पोरे, प्रीति कीर्दत, मनोज बांदिवडेकर, रवींद्र रिसबुड, पूर्वा रिसबुड, योगेश वसंत त्रिवेदी, माया योगेश त्रिवेदी, गिरीश वसंत त्रिवेदी, मनीषा गिरीश त्रिवेदी, आनंद जयंत लेले, स्नेहा आनंद लेले, संदीप बोरकर हे सहभागी झाले होते. परतीच्या प्रवासाला येत असतांना शिवभक्त राजू देसाई यांनी सांगितलेला छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवन चरित्रातील एक प्रसंग हा रक्त सळसळविणारा आणि अंगावर रोमांच उभे करणारा होता.

‘गणपती बाप्पा मोरया, हर हर महादेव, जय भवानी, जय शिवराय, जय जिजाऊ जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा बुलंद आणि आसमंत दुमदुमविणाऱ्या घोषणांनी सारा शिवथरघळ आणि रायगड दौरा ऊर्जेचा स्त्रोत ठरणाऱ्या होत्या. मुळात शिवभक्त राजू देसाई यांच्या या प्रकल्पाची माहिती आमचे परम आदरणीय मित्र भाई सुभाषचंद्र मयेकर यांनी माझ्या ‘पत्रकार व हितचिंतक’ या समाजमाध्यमावरील समूहात दिली होती. भ्राताश्री गिरीश यांनी भाईंकडे ती पाठवून खातरजमा करतांना भाईंनी डोळे झाकून, बिनधास्त सहभागी होण्याचा सल्ला दिला. मग गिरीश त्रिवेदी यांनी शिवभक्त राजू देसाई यांच्या समवेत संपर्क साधला आणि मग एकेक कड्या जोडल्या गेल्या. रेखा बोऱ्हाडे या राजा शिवछत्रपती परिवारच्या मुंबई संपर्क प्रमुख आणि माया व योगेश त्रिवेदी अशी तीन नांवे गिरीश त्रिवेदी यांनी राजूभाईंकडे दिली. गड किल्ले यांचा अभ्यास त्या त्या ठिकाणी जाऊन करणाऱ्या रेखा यांचा राजूभाईंशी परिचय होता. त्यामुळे आम्ही आणखी जवळ आलो. (काही अपरिहार्य कारणामुळे रेखाताई या दौऱ्यावर येऊ शकल्या नाहीत.) सुसंवाद वाढत गेला.

हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १५ डिसेंबर १९८८ रोजी ‘सामना’ साठी माझी केलेली निवड आणि सलग पंचवीस वर्षे सेवा करुन सामना मधून पहिला सेवानिवृत्त झालेला मी असा परिचय राजूभाई यांना झाला असल्याने आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या वैचारिक परिवाराचे सारे एकत्र आलो. राजूभाईंचा जन्म ६ जून आणि माझे चिरंजीव प्रशांत यांचाही जन्म ६ जून! रेवा आणि राजू देसाई यांचा शुभविवाह सुद्धा रायगडावर झाला. छत्रपती शिवाजी महाराज यांचा ‘राजाभिषेक’ हाही ६ जून! हाही योगायोग. उपरोल्लिखित सर्वच भगिनी बांधवांमध्ये जिव्हाळा निर्माण झाला आणि या शिवभक्तांच्या ओवलेल्या रेशमी धाग्याच्या माळेतील सर्वजण रायगड परिवाराचे घटक बनलो. आणि हां, आमचे वाहनचालक संतोष सिंह यांनाही मनःपूर्वक धन्यवाद! कारण त्यांच्यामुळेच रायगड सहल यशस्वीपणे पार पडली.

 

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या मांदियाळी मधील सदाशिव गोरक्षकर, सदाशिव साठे, हाडप गुरुजी, गिरीश लक्ष्मण जाधव आणि स्वतः बाबासाहेब पुरंदरे ही शिवरायांच्या भक्तांचे अनमोल मोती आम्ही नजीकच्या काळात गमावले. राजू देसाई या सच्च्या शिवभक्ताने शिवथरघळ आणि रायगड दर्शन घडवून बाबासाहेबांना खऱ्या अर्थाने या सहलीच्या माध्यमातून आदरांजली वाहिली, असे माझे स्पष्ट मत आहे. राजू देसाई हेच खरे बाबासाहेब पुरंदरे यांचे वैचारिक वारसदार आहेत. शिवचरित्राचे व्याख्याते आणि महाराष्ट्र शासनाच्या गडसंवर्धन समितीचे सदस्य अशा विविध अलंकाराने ल्यायलेल्या शिवभक्त राजू देसाई यांना बाबासाहेबांच्या संकल्पना पूर्ण करण्यासाठी उदंड आयुष्य आणि ठणठणीत आरोग्य प्राप्त होवो, ही शिवचरणी प्रार्थना. छत्रपती शिवाजी महाराज, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या बरोबरच शिवभक्त राजू देसाई यांच्या शिवकार्याला मानाचा मुजरा!

– ज्येष्ठ पत्रकार योगेश वसंत त्रिवेदी