घर भक्ती सिनेमातील 'विठ्ठल'….

सिनेमातील ‘विठ्ठल’….

Subscribe
मराठी चित्रपट कवींनी, संतांनी शब्दबद्ध केलेला हा विठ्ठल आणि त्या विठ्ठलावरची काव्यरचना ऐकताना सर्वसामान्य माणूस आजही स्वतःला हरवून जातो आहे. १९३२ पासून २०२३ च्या ‘विठ्ठल माझा सोबती’ चित्रपटापर्यंत असंख्यांनी विठ्ठलावर काव्यरचना केली,सिनेमे आले. विठ्ठलाकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यांचा वेगळा असेल; पण भाविकांच्या श्रद्धास्थानाला तडा जाऊ न देण्याचे महान कार्य या संतांनी, या कवींनी व दिग्दर्शकांनी  केले आहे, हे त्यांचे मोठेपण आहे.या सिनेमांवर टाकलेला दृष्टीक्षेप….
पंढरपुरात विटेवर अठ्ठावीस युगापासून उभा असलेला तो सावळा विठ्ठल नेमका आहे तरी कोण? त्याची दैवत परंपरा तरी कोणती तो शैव की वैष्णव परंपरेतला? सामान्य वारकऱ्याला हे प्रश्न पडायचे कारण नाही. कारण द्वैतवादाचा सिद्धांतच मुळी त्याच्या चरणी लीन झाले की संपुष्टात येतो. पण त्याचे गुणगान गाणाऱ्या संतांनी तरी त्याला कोणत्या रूपात पाहिलंय? संतांनी त्याला विविध रूपांत पाहिले असले तरी ज्ञानोबांपासून निळोबांपर्यंत सर्वांमध्ये तो कृष्णरूप आहे, यावर मात्र एकमत आहे.
“युगे अठ्‌ठावीस विटेवरी उभा,
वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा!’
           अशा शब्दांत ज्या मूर्तीचे वर्णन संत नामदेव यांनी केले आहे, ती पवित्र, सोज्वळ, सर्वांना भावणारी मूर्ती म्हणजे पंढरपूरचा पांडुरंग. भोळ्याभाबड्या जनतेचा विठ्ठल!
कासे पीतांबर, गळा तुळशीहार माळा ल्यालेली ही सावळी मूर्ती, पंढरीचा राणा, विष्णूचा अवतार, असा हा कानडा विठ्ठलू कर्नाटकातून आला. चंद्रभागेच्या तीरी विसावला आणि तिथेच तमाम भाविकांचे अध्यात्माचे भक्तिपीठ आकाराला आले.’पाऊले चालती पंढरीची वाट!’ असे म्हणत कपाळाला अबीर, गुलाल, बुक्का लावून गळ्यात तुळशीच्या माळा घालून आमचा दऱ्याडोंगरातला, खेड्यापाड्यातला भोळाभाबडा भाविक विठ्ठलनामाचा जयघोष करीत, खांद्यावर भावभक्तीची भगवी पताका घेऊन आषाढी-कार्तिकीला चालत पंढरीची वारी करू लागला. सर्वसामान्यांचा देव म्हणूनच पंढरपूरचा पांडुरंग ओळखला जाऊ लागला.
       माणूस आजच्या गतिमान युगात माणूस बदलला, भक्तीची माध्यमे बदलली; पण श्रद्धा अढळ राहिली. इतके सामर्थ्य या पंढरीच्या वाटेत आहे.त्यामुळेच मराठी चित्रपट निर्मात्यांनी पंढरीची वाट अनेकदा चित्रित केली आहे. मराठी चित्रपट आणि पंढरपूर यांचे नातेही अत्यंत जवळचे. सर्वसामान्यांचा देव म्हणून पांडुरंग चित्रपटसृष्टीचेही आकर्षण ठरला आहे. मराठी चित्रपटाच्या या आजवरच्या वाटचालीत संत चित्रपट भरपूर निघाले. ‘प्रभात’च्या “संत तुकाराम’ या चित्रपटाने तर उत्पन्नाचे रेकॉर्डच मोडले होतेच; पण तमाम महाराष्ट्रीयांच्याच नव्हे, तर भाविकांच्या काळजालाच हात घातला होता. पांडुरंगाची भक्ती मनोभावे करणारा आणि पांडुरंगाचे दर्शन होताच ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ म्हणणारा भक्तिरसात न्हाऊन गेलेला तुकाराम सदेह वैकुंठाला गेला, याचे आकर्षण मराठी मनाला पडले होते. लोकरंजनातून लोकशिक्षण देत रंजनाच्या माध्यमातून भक्ती, अध्यात्म परंपरेचा चालत आलेला वारसा निर्मात्यांना दाखवायचा होता. त्यामुळे ‘धर्मात्मा’, ‘संत चोखामेळा’, ‘संत सखू’, ‘भक्त पुंडलिक,’ ‘संत नामदेव,’ ‘सावता माळी’ अशा चित्रपटांची निर्मिती या काळात झाली.
         मराठी चित्रपटसृष्टीत १९३२ ते २०२३ या काळात आमूलाग्र बदल झाले. ब्लॅक-व्हाईटचा जमाना जाऊन रंगीत चित्रपटांचा जमाना आला. कथानक, संवाद, गीते, संगीत, फोटोग्राफी यातदेखील आमूलाग्र बदल झाले. काळाप्रमाणे चित्रपटसृष्टी बदलत गेली. तो बदल सर्वसामान्य प्रेक्षक स्वीकारत गेला. जागतिकीकरण, उदारीकरण, उदात्तीकरणाचा प्रभाव मानवी जीवनमूल्यांवर बदल घडवीत राहिला. माणसांच्याकडे बघण्याचा, नात्यागोत्यांकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोनच बदलून गेला. हा आंतर्बाह्य बदल जागतिकीकरणाच्या रेट्यातून झाला. ग्रामीण संस्कृती हरवू लागली. खेड्यांचे शहरीकरण झाले. शहरे तर मॉल संस्कृतीने पछाडली. खाण्यापिण्यात, वागण्या-बोलण्यात, रीत-भातीत सगळेच बदल होत गेले; पण बदलली नाही ती भक्ती. भक्तीचा हा अतूट धागा स्वतःचे अस्तित्व आजही टिकवून राहिला आहे. भक्तीचे, भाविकांच्या श्रद्धेचे अढळस्थान ध्रुवताऱ्यासारखे अजरामर राहिले आहे. हा बदल मराठी सिनेमाने देखील स्वीकारला. सिनेमात भक्ती करणारी आधुनिक नायिका आली, नायक आले. मानवी भावमूल्यांचे दर्शन घडविताना पोशाख, आचार-विचार बदलले तरी भक्ती तीच राहिली. वारीदेखील तशीच राहिली आहे. या भक्तीचा व्यावसायिक लाभ उठविण्यासाठी चित्रपटात गाणी आली; पण चित्रपटातील भक्तिगीते मात्र आजही तनामनाला डोलवीत आहेत. “देहाची तिजोरी, भक्तीचाच ठेवा, उघड दार देवा आता… उघड दार देवा…” असे म्हणत आपल्या अंतःकरणातील श्रद्धेचे दार खुले करून देवाच्या गाभाऱ्यात जाण्यासाठी माणूस धडपडतो आहे. त्यामुळे काळाप्रमाणे नवा आशय, विषय, मराठी चित्रपटांना स्वीकारावा लागला असला, तरी भक्ती मात्र अबाधितच राहिल्याचे दिसून येते.
या कालखंडावर नजर टाकताना काही चित्रपट हे पुरुष संतांवर निर्माण झाले आहेत. त्यांची नावेच सांगायची झाली तर ‘प्रभात’चा “संत तुकाराम’, ‘भक्त प्रल्हाद’, ‘धर्मात्मा’, ‘भक्त दामाजी’, ‘नामाचा महिमा’ म्हणजेच ‘संत नामदेव’, ‘चोखा मेळा’, ‘संत गोरा कुंभार’, ‘भक्त पुंडलिक’, ‘जोहार मायबाप ऊर्फ संत चोखा मेळा’, ‘महात्मा’, ‘संत भानुदास’, ‘संत चांगदेव’, ‘तुका झालासे कळस’, ‘महाभक्त तुकाराम’, ‘देवकीनंदन गोपाला’, ‘श्री जगद्‌गुरू संत तुकाराम’, ‘अशी ज्ञानेश्‍वरी’ इत्यादी. आजवर जवळजवळ अनेक चित्रपट संतांवर निघाले, तर स्त्री संतांचा विचार करता ‘संत सखूबाई’, ‘संत जनाबाई’, ‘संत सखू’, ‘संत कान्होपात्रा’, ‘विठ्ठल-रखुमाई’, ‘सखू आली पंढरपुरा’ इत्यादी चित्रपट प्रदर्शित झाले. पंढरपूर, पंढरपूरचा महिमा, भक्तीचा मळा, भाविकांचे श्रद्धास्थान दर्शविणारी ही पंढरीची वाट, त्या वाटेवरची निघणारी वारी याचे महत्त्व पटवून देणारे काही चित्रपट आले. त्यात प्रामुख्याने ‘भक्तीचा मळा, पंढरीचा पाटील’, ‘ही वाट पंढरीची’, ‘विठ्ठलपायी’, ‘विठू माझा लेकुरवाळा’, ‘आम्ही जातो आमुच्या गावा’, ‘झाला महार पंढरीनाथ’ व  ‘पंढरीची वारी’ अशा जवळजवळ काही चित्रपटांची निर्मिती झाली.
        चित्रपट संतांवर आधारित असोत किंवा कौटुंबिक, सामाजिक असोत, त्यांची श्रद्धास्थाने कोणतीही असोत; पण पंढरपूरच्या पांडुरंगाचे आकर्षण मात्र नेहमीच आबालवृद्धांना मोहवीत आले आहे. पंढरपूरच्या पांडुरंगाची गुणवर्णन करणारी असंख्य गीते संतांनी अभंगाच्या माध्यमातून लिहिली. शाहिरांनी डफ-तुणतुण्याच्या तालावर लिहून म्हटली. लोकगीतांतून मौखिक परंपरेतून आली. केवळ पंढरपूरच्या पांडुरंगावर निर्माण झालेली काव्यरचना, त्याचा वाङ्‌मयीन अभ्यास करायचा म्हटला तर हा संशोधनाचाच एक विषय होईल. केवळ पंढरपूरच्या पांडुरंगाचे महत्त्व पटवून देणारी जी गाणी आली, त्यांची संख्याच सांगायची झाली तर १८१ आहे आणि ती देखील ७९ चित्रपटांतून आलेली ही काव्यरचना आहे. मराठी चित्रपटासाठी कथा, पटकथा, संवाद, गीते लिहिणाऱ्या जवळजवळ ६७ कवींची ही काव्यरचना आहे. मानवी मनातील भावभावनांना हात घालून त्यांच्या मनातील श्रद्धेचे हे श्रद्धास्थान पंढरीचा पांडुरंग, अभंग, ओवी, भावगीत, भक्तिगीत, लोकगीतांच्या माध्यमातून शब्दबद्ध करण्यात हे कवी यशस्वी झाले आहेत.
‘गजर’ सिनेमाबद्दल…
         हरिनामाचा जप… आषाढी कार्तिकीच्या निमित्ताने पंढरपूरकडे वळणारी पावले… २८ युगे विटेवर उभा राहून आपल्या भक्तांना आशीर्वाद देणाऱया पंढरीरायापुढे नतमस्तक होण्यासाठी असलेली अगतिकता… याची यथार्थसुंदर चित्रण गजर प्रदर्शित झालेल्या चित्रपटात प्रेक्षकांनी अनुभवले. आता टाळ मृदुंगाचा गजर आणि विठ्ठलाची ही भक्तिमय वारी बॉलिवूडच्या दारीही अवतरणार आहे. `गजर’ या चित्रपटाचा हिंदी रिमेक मोक्ष लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.’गजर’ या मराठी चित्रपटाला  वेगवेगळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अजित भैरवकरने केले होते. आषाढी एकादशीच्या निमित्ताने १८ दिवसांच्या या यात्रेत वारकऱ्यांचा अनोखा संगम आपल्याला अनुभवण्यास मिळतो. भगवद्गीतेत ज्याप्रमाणे १८ अध्यायांमध्ये जीवनाचा गर्भितार्थ सांगितलेला आहे. त्याप्रमाणे `मोक्ष’ या चित्रपटातही १८ दिवसांच्या भक्तिमय वातावरणात या वारकऱ्यांचे कोणते गुणदोष समोर येतात यावर प्रकाश टाकण्यात आलेला आहे.’मोक्ष’ या चित्रपटाचे दिग्दर्शन पार्थने केलेले आहे. एक अहंकारी दिग्दर्शक वारकऱ्यांच्या
आयुष्यावर लघुपट बनवत असताना स्वतःमध्ये कोणते बदल घडवून आणतो. त्याला असा कोणता ‘मोक्ष’ प्राप्त होतो याची अनोखी कहाणी या चित्रपटात सांगण्यात आलेली आहे.पार्थचा अमेरिकन मित्र एरिक या वारकऱ्यांवर एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा माहितीपट बनविण्यासाठी भारतात येतो.१८ दिवसांच्या २४० किलोमीटरच्या या वारीत हे दोघेजण मिळून मिसळून जातात. वारकऱ्यांचा स्वभाव, त्यांचे आदरातिथ्य आणि नम्रपणा पाहून हे दोघेजण भारावून जातात. यामुळे पार्थ आणि एरिक यांच्यात कोणते बदल होतात याची कहाणी या चित्रपटात रेखाटण्यात आली आहे.. ‘गजर’ या चित्रपटातही चिन्मय मांडलेकर प्रमुख भूमिकेत होता. तर एरिकच्या भूमिकेत उडवर्ड सानेनब्लिक असणार आहे. या चित्रपटाला संगीत शैलेंद्र बर्वे यांनी दिले आहे. छायाचित्रणाचा पुरेपूर वापर या चित्रपटासाठी करण्यात आला आहे. यासाठी हॉलिवूडच्या तंत्रज्ञांना पाचारण करण्यात आलेले आहे. टॉप अँगल, साईड अँगल आणि वारकऱ्यांचे चेहऱ्यावरील हावभाव अचूकपणे टिपण्यासाठी खास फ्रेम्सचा वापर करण्यात आलेला आहे. यासाठी हॉलिवूडच्या काही तंत्रज्ञांना बोलाविण्यात आले होते. या चित्रपटाचे शूटींग हे खऱ्याखुऱ्या वारीमध्येच करण्यात आलेले आहे.
“एक तारा” सिनेमाबद्दल….
         यश मिळाल्यानंतर बदलत जाणारा भोवताल अन् त्या सगळ्या गोष्टीमधला अर्थ शोधताना जीव नावाची गोष्ट सहज उधळून लावण्यासारखं सारे क्षण आपल्या वाट्याला येतात, तेव्हा ते समरसून जगतो का… प्रत्येक गोष्टीला आयुष्यात व्यावहारिक चौकटीच्या बंधनात बांधून जगण्याचा भाग हा सवयीचा होत गेला तर उत्स्फूर्ततेचं काय करायचं असा प्रश्न आपल्यासमोर येतो… अन् तो प्रश्न आपल्याला सतावतो का… आपल्या मनाचं पिसासारखं तरंगणं आपण अनुभवतो का, या सा-या प्रश्नांच उत्तरं शोधण्याचा प्रयत्न आपल्याला रॉकस्टारमध्ये दिसतो. पण “एक तारा’’ हा आपल्यासमोर ज्यावेळी येतो त्यावेळी त्यामधला गावातला कलाकार त्याला मिळालेलं यश त्याच्यासमोरची आव्हानं पेलताना त्याचं काय होतं… अन् त्यामध्ये तो वाहवत जातो की, त्याला आव्हान पेलताना यश मिळतं. याचा लेखाजोखा मांडण्याचा केलेला प्रयत्न म्हणून आपण या सिनेमाकडे पाहू शकतो.संतोष जुवेकरने साकारलेला माऊली हा आजपर्यंतच्या त्याच्या अनेक व्यक्तिरेखांपेक्षा निश्चितच वेगळा आहे. त्याच्यामधल्या कलाकाराला आव्हान देणारा असा हा माऊली त्याने साकारला आहे. कारण साधाभोळा वारकरी ते लखलखत्या रूपेरी चंदेरी दुनियेत आल्यानंतर त्याचे दिपलेले डोळे इथपर्यंतचा त्याचा हा प्रवास वेगळा आहे.
“लय भारी” सिनेमाबद्दल…
         माऊली त्याचा पंढरपूर आणि वारी कनेक्ट आणि एकूणच त्या माहौलामध्ये मराठमोळा रितेश देशमुख दणक्यात प्रेझेण्ट केला आहे. यामध्ये एका गोष्टीचं खरंच कौतुक करायला हवं ते, निर्मितीमूल्याचं. हिंदीमधल्या मराठमोळ्या चेह-यांना अगदी मराठी कलाकारच नाही तर बहुतांशी टेक्निशिअन्सना या सिनेमाच्या निमित्ताने एकत्र आणण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसतो. दाक्षिणात्य ऍक्शनपटाची झलक आणि प्रभाव या कलाकृतीमध्ये दिसतो. त्यासाठी मेहनत ही केलेली जाणवते. तेव्हा तो असा लय भारी असतो हा अंदाज आपल्यासाठी नवा असतो.विठ्ठलाच्या पायाखालच्या विटेचा आणि माऊलीच्या हातातील शस्त्र म्हणून असलेल्या विटेचा अन्वय ज्या कोणी सांधला आहे, त्याला सॅल्यूट. वारकरी आणि ‘वार’करी मधला फरक स्पष्टपणे अधोरेखित करणारा हा सिनेमा मराठी व्यावसायिक सिनेमाला नवं वळण देणारा आहे, हे मान्य करावं लागेल. मराठीत अशाप्रकारच्या स्टारडमने केलेला हा सिनेमा आहे. त्याच्या मराठमोळ्या बाण्याचं कौतुक आम्हाला आहे. त्यासाठी उचलेलं पाऊल, त्यासाठी वाढवलेला बजेटचा आकडा या गोष्टी कौतुकास्पद आहेत. सलमान खानला मराठीत आणणं, त्यानंही ते हसत हसत स्वीकारणं या सा-यागोष्टींसाठी खरचं कौतुक वाटतं.  तद्दन कमर्शिअल सिनेमा करण्यासाठीचा निशिकांतचा हा प्रयत्न हिंदीत वावरणाऱ्या मराठमोळ्या अभिनेत्यांना घेऊन केला हे तितकंच खरं आणि कौतुकास्पद आहे. मराठी सिनेमाला ग्लॅमर आणि स्टारडम देण्याचा केलेला प्रयत्न वाखाणण्याजोगा आहे. यासाठी सिनेमंत्राचे अमेय खोपकर, जीतेंद्र ठाकरे आणि जिनिलिया देशमुख यांचं कौतुक करावंच लागेल.
“एलिझाबेथ एकादशी” सिनेमाबद्दल…
          ‘एलिझाबेथ एकादशी’ म्हणजे नेमके काय? ‘एलिझाबेथ एकादशी’मधून पंढरपूरचा एक चिमुरडा न्यूटन म्हणजेच ज्ञानेश प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. पंढरीच्या विठू माऊलीवर त्याचा जेवढा जीव आहे तेवढंच प्रेम त्याच्या एलिझाबेथवरही आहे. ही एलिझाबेथ आहे त्याच्या वडिलांनी तयार केलेली अनोखी सायकल. आपल्या वडिलांची आठवण असलेली ही सायकल ज्ञानेश आणि त्याची बहिण झेंडूचा जीव की प्राण. या एलिझाबेथला वाचवण्यासाठी ही भावंडं आपल्या सहका-याच्या मदतीने एकादशीच्या उत्सवात एक खेळ मांडतात त्याचीच कथा म्हणजे ‘एलिझाबेथ एकादशी’ हा सिनेमा आहे.परेश मोकाशी दिग्दर्शित या सिनेमाची पूर्ण कथा पंढरपूरमध्ये आणि आषाढी एकादशीच्या वातावरणात घडते.
‘माऊली’ ते विठ्ठल माझा सोबती’
         त्यांनतर आलेल्या काही चित्रपटांमधून विठ्ठलाचा महिमा सांगण्याचा उत्तमरीत्या प्रयत्न केला आहे.रितेश देशमुखच्या ‘माऊली’ चित्रपटातील गाणे विशेष गाजले.हा सिनेमा तद्दन व्यवसायिक होता.तसेच नुकताच प्रदर्शित झालेला ‘विठ्ठल माझा सोबती’ हा चित्रपट सरळसाधी गोष्ट सांगणारा चित्रपट आहे.विठ्ठलाकडे बघण्याचा दृष्टिकोन प्रत्येकाचा वेगवेगळा असेल; पण भाविकांच्या श्रद्धास्थानाला तडा जाऊ न देण्याचे महान कार्य या संतांनी, या कवींनी व दिग्दर्शकांनी केले आहे, हे त्यांचे मोठेपण आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील विठ्ठलाचे दर्शन त्यामुळेच एक वेगळी प्रसन्नता देऊन जाते. त्यामुळे हे सिनेमे आपल्याला भावतात व मनात घर करून राहतात.
आशिष निनगुरकर
(लेखक चित्रपट अभ्यासक आहेत.)
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -