घरफिचर्समायमहानगर ब्लॉगमतदार पर्याय निर्माण करू शकतो

मतदार पर्याय निर्माण करू शकतो

Subscribe

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आपल्याला पराभूत करू शकत नसल्याने जणू आपल्या पराभवासाठी भाजपाच्या मुत्सद्दी नेतृत्वाने बंडखोर अपक्ष नावाचा आपलाच शत्रू उभा केला आणि पदरात अपयश पाडून घेतलेले आहे. वेळीच जागावाटप झाले असते तर सेना वा भाजपा यांच्या इच्छुक उमेदवारांची नाराजी शमवायला भरपूर वेळ मिळाला असता आणि उपलब्ध असलेले यश संपादन करता आले असते, पण ते करण्यापेक्षा भाजपा शरदनीतीकडे झुकत गेला आणि पवारांप्रमाणेच स्वत:च्या अपयशाची तजवीज करीत गेला.

राज्यात आता भारतीय जनता पक्षाचे सरकार येणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा दिला आहे. आता राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या महाविकासआघाडीचे सरकार येऊ घातले आहे. त्यामुळे आता निवडणुकीतील भाजपच्या पराभवाची कारणमीमांसा करायला हरकत नाही. लोकसभा सहजगत्या वा मोठ्या फरकाने जिंकली गेली असताना विधानसभेत भाजपला पोषक वातावरण असल्याचे भाकित करण्यासाठी कोणा ज्योतिषाची वा विश्लेषकाची गरज नव्हती, पण परिस्थिती अनुकूल असली म्हणून आपोआप चमत्कार घडत नाही. त्यासाठी करायचे प्रयत्न, कष्ट व सावधानता सोडून चालत नाही. ते अपयशाला वा हानीला आमंत्रण असते. ते आमंत्रण भाजपाने दिलेले होते, हे कोणी नाकारू शकणार नाही. लोकसभेनंतर चार महिने विधानसभा मतदानाला होते आणि आधीच्या यशावर स्वार होण्यासाठीची तयारी करायला तो भरपूर अवधी होता. युती लोकसभेतच झालेली होती, तर विधानसभेसाठीही जागावाटप उरकून घ्यायला ती उत्तम संधी होती. त्यातून पुढली तारांबळ टाळता आली असती. भले युती करायची नसेल तरी आधीच तसा निर्णय घ्यायचा होता. किंवा युती करायची असेल, तर जागा निश्चित करून इच्छुकांना उगाच टांगून ठेवण्याचे काहीही कारण नव्हते, पण शिवसेना किंवा इतरांना खेळवण्याच्या उत्साहात किंवा धुर्तपणाचे प्रदर्शन करताना भाजपाने उत्तम संधी मातीमोल करून टाकली. समोर कोणी लढायला नव्हता, हे सत्य असले तरी तो खराखुरा पहिलवान भाजपाच्या मस्तीतूनच निर्माण करण्यात आला, ही वस्तुस्थिती आहे. कारण निकाल सांगतात, दुसर्‍या क्रमांकाचा गट वा पक्ष ‘इतर’ म्हणजे अपक्ष बंडखोर आहेत. ज्यांनी प्रचंड मते खाल्ली आणि विरोधकांना कमी मतातही यशाचा पल्ला गाठणे सोपे करून दिले. त्याचा दोष बंडखोरांच्या माथी मारता येणार नाही. त्यांना बंडखोरीला प्रोत्साहित करणारे नेतृत्व त्यातला खरा गुन्हेगार आहे. कारण उशिरापर्यंत त्यांच्या अपेक्षा आकांक्षा टांगून ठेवण्यात आल्या आणि त्यातून अशा इच्छुकांना बंडखोरीला प्रवृत्त करण्यात आले. जणू डिवचण्यात आले. शिवसेना हा धाकटा भाऊ असेल तर थोरला म्हणून भाजपाने समजूतदार वागले पाहिजे. तो शहाणपणा वा परिपक्वता भाजपाला दाखवता आलेली नसेल, तर अपेक्षाभंगाचे खापर भाजपा नेतृत्वावरच फोडले पाहिजे.

जुन वा जुलै महिन्यात युतीपक्षांच्या जागा निश्चित करण्यात कुठली अडचण होती? बिहारमध्ये नितीश सोबत झालेल्या युतीनंतर लोकसभेच्या दोन महिने आधीच प्रत्येकी १७ जागा आणि इतर मित्रांना ६ जागा असा निर्णय होऊ शकला. मग महाराष्ट्रात जागावाटपाला विलंब लावण्यात कसलाही शहाणपणा असू शकत नाही. किंबहूना तो अतिरेकी मस्तवालपणा म्हणता येईल. आपल्याला कोणी पराभूत करू शकत नसल्याची मस्ती चढली, मग आपणच आपल्या अपयशाची तजवीज करू लागतो. आपला शत्रू आपणच निर्माण करतो. भाजपाने यशाची झिंग चढल्यामुळे ही गंभीर चूक केली. काँग्रेस व राष्ट्रवादी आपल्याला पराभूत करू शकत नसल्याने जणू आपल्या पराभवासाठी भाजपाच्या मुत्सद्दी नेतृत्वाने बंडखोर अपक्ष नावाचा आपलाच शत्रू उभा केला आणि पदरात अपयश पाडून घेतलेले आहे. वेळीच जागावाटप झाले असते तर सेना वा भाजपा यांच्या इच्छुक उमेदवारांची नाराजी शमवायला भरपूर वेळ मिळाला असता आणि उपलब्ध असलेले यश संपादन करता आले असते, पण ते करण्यापेक्षा भाजपा शरदनीतीकडे झुकत गेला अणि पवारांप्रमाणेच स्वत:च्या अपयशाची तजवीज करीत गेला. आपले काही उभे करण्यापेक्षा अन्य कुणाला घरी बसवणे वा त्याचे नुकसान करण्याच्या नादात पवारांनी आयुष्यभर अनेक सुवर्णसंधी मातीमोल करून टाकल्या. भाजपा विधानसभा लढवताना त्याच शरदनीतीचा अवलंब करीत गेला नाही का? अन्य पक्षातले नेते फ़ोडून आपल्याकडे आणणे, मित्रपक्षाला जागांच्या वाटपात ताटकळत ठेवणे आणि आपल्याविषयी सहानुभूती वा आपुलकी असलेल्या मतदाराच्याही मनात संभ्रम निर्माण करण्याला रणनीती म्हणत नाहीत. आत्मघातकी हट्टीपणा म्हणतात. निकालांच्या आकड्यावर नजर टाकली तरी भाजपा व शिवसेनेने आपल्याच पायावर धोंडा पाडून घेतल्याचेच निष्पन्न होते. प्रत्येक पक्षाला मिळालेली मते व बंडखोरीला गेलेली मते त्याचे साक्षीदार आहेत.

- Advertisement -

भाजपाला मिळालेली मते एक कोटी ४२ लाख इतकी आहेत आणि त्यानंतर क्रमांक लागला आहे तो कुठल्या मान्यताप्राप्त पक्षाचा नसून इतर अपक्षांचा आहे. त्या खात्यात एक कोटी २ लाख मते गेलेली आहेत. बाकी मित्र वा विरोधी पक्ष कोणी एक कोटीचा पल्लाही गाठू शकलेला नाही. राष्ट्रवादी (९२), शिवसेना (९०) आणि काँग्रेस (८७) अशी लाखातली मते आहेत. अपक्ष इतरांना इतकी भरघोस मते तेव्हाच मिळतात, ज्यावेळी असे अपक्ष बंडखोर हमखास लोकप्रिय पक्षातून आलेले असतात. म्हणजेच जी एक कोटी मते इतर अपक्ष खात्यात दिसतात, त्यातील ५०-७० लाख मते तरी भाजपा व शिवसेनेच्या बंडखोरांनी खाल्लेली आहेत. त्याला आळा घातला गेला असता आणि त्यातली निम्मी मते जरी भाजपा व शिवसेना आपल्या खात्यात राखू शकले असते, तरी आज दिसणारे जागांचे आकडे कुठल्या कुठे बदलून गेले असते. लोकसभेपासून विधानसभेपर्यंत तब्बल तीन महिन्यांचा अवधी त्यासाठी होता आणि आपापल्या इच्छुकांना विश्वासात घेऊन युतीपक्षांनी बंडखोरीला मोकाट रान मिळणार नाही अशी काळजी घेतली असती तर? ती घेतली नसेल तर तो आपल्याच इच्छुकांच्या भावनांशी खेळ केलेला असतो. त्याला नेतृत्वाचा माजोरीपणा म्हणावा लागतो. समर्थ शत्रू समोर नसेल तर आपला नवा शत्रू निर्माण करण्याचा तो मस्तवालपणा म्हणणे भाग आहे. बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या किंवा अन्य काही बेछूट आरोपांमुळे युतीला मतदाराने दणका दिला, हा भ्रम आहे. युतीला त्यांच्या मस्तवालपणाने दणका दिला आहे. त्यांच्यातल्याच दुखावलेल्या नाराजांनी युती पक्षांच्या पायात पाय घालून धडा शिकवला आहे. त्यात नवे काहीच नाही. पूर्वी हेच काँग्रेसच्या बाबतीत व्हायचे. हल्ली भाजपाच्या बाबतीत होऊ लागले आहे. मतदाराला काँग्रेसच्या मस्तवाल मानसिकतेचा दुसरा पक्ष हवा होता, म्हणून जनता भाजपाकडे वळलेली नाही, इतके जरी यातून त्या पक्षाच्या नेतृत्वाला उमजले तरी खूप आहे. अन्यथा त्यांच्या जागी नवा पर्याय उभा करायला मतदार समर्थ असतो, हे विसरता कामा नये. ज्याने सत्तर वर्षात काँग्रेसला पर्याय म्हणून भाजप उभारला, त्याने भाजपलाही पर्याय उभा केला. आज प्रत्येक राजकीय पक्षाने ही गोष्ट लक्षात ठेवायला हवी.

Santosh Malkarhttps://www.mymahanagar.com/author/msantosh/
आपलं महानगर मुंबई आवृत्ती निवासी संपादक. गेली २५ वर्षे पत्रकारितेत आहे. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -