घरफिचर्समायमहानगर ब्लॉगप्रबोधन दूर, बालकांमध्ये भीतीचीच लाट!

प्रबोधन दूर, बालकांमध्ये भीतीचीच लाट!

Subscribe

कोरोनाची तिसरी लाट येत्या सप्टेंबरमध्ये येणार.. या लाटेत सर्वाधिक परिणाम होईल तो लहान मुलांवर.. जवळपास सर्वच वाहिन्यांवर वारंवार हे भाकीत वर्तवण्यात येतंय. खरे तर तिसरी लाट लहान मुलांसाठी घातक असेल असा ठोस निष्कर्ष आतापर्यंतच्या एकाही संशोधनातून पुढे आलेला नाही. परदेशातही अशा प्रकारची तिसरी लाट लहान मुलांवर बेतल्याचे ऐकिवात नाही. मुळात तिसर्‍या लाटेशी बालकांचा संबंध जोडण्याला कुठलाही शास्त्रीय आधार नाही. त्यामुळे पालकांनी मुलांशी संवाद साधून यांना मानसिकदृष्ठ्या सक्षम ठेवायला पाहिजे.

भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी ५ मे रोजी ट्विट करून दावा केला की, देशात जेव्हा तिसरी लाट येईल तेव्हा त्यात बालके मोठ्या प्रमाणावर बाधित होतील. स्वामी यांचे ट्विटरवर एक कोटींवर फॉलोअर आहेत. त्यांनी प्रसिद्ध हॉर्वर्ड युनिव्हर्सिटीमधून पीएचडी केली आहे. ते दिल्लीच्या आयआयटीमध्ये प्राध्यापकही होते. तसेच, योजना आयोगाचे सदस्यदेखील राहिले आहेत. एवढ्या महत्वाच्या आणि जबाबदार पदांवर राहिलेल्या स्वामी यांनी कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा मुलांवर होणार्‍या परिणामाला कोणत्याही अभ्यासाचा हवाला दिलेला नाही. कोणत्याही हवाल्याशिवाय स्वामींनी ही गोष्ट सांगणे म्हणजे देशात मोठ्या प्रमाणावर लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्यासारखे आहे. आधीच लोक दुसर्‍या लाटेच्या उद्रेकामुळे बेजार आहेत. त्यात तिसर्‍या लाटेविषयी असे अशास्त्रीय विधान करुन त्यांनी खळबळ उडवून दिली. पण हे विधान त्यांनी कोणत्या आधारावर केले याचा आजवर कुणी जाब विचारला नाही, ना कुणी शोध घेण्याचा प्रयत्न केला.

स्वामींनी असा दावा कशाच्या आधारावर केला असेल याविषयी काही वैद्यकीय तज्ज्ञांनी ढोबळ अंदाज वर्तवला आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत वयस्कर व्यक्ती, आजारी व्यक्ती आणि ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे अशांवर अधिक परिणाम झाला. दुसर्‍या लाटेत तरुणाईला कोरोनाचा फटका बसला. हे दोन महत्वाचे घटक दोन्ही लाटेत बाधित झाल्याने जो घटक लाटेपासून काहीसा अलिप्त होता, त्याला तिसर्‍या संभाव्य लाटेशी जोडले गेले. म्हणजे लहानपणी आपण इजा, बिजा, तिजा म्हणून ज्या पद्धतीने खेळ खेळायला सुरुवात करायचो, तसेच काहीसे या प्रकारात झाले. पहिल्या, दुसर्‍या लाटेनंतर तिजा म्हणणे या मंडळींना गरजेचेच वाटले. त्यामुळे तिजाचा संबंध लहान मुलांशी जोडण्यात आला. अर्थात, बालकांविषयी लावण्यात आलेल्या या अंदाजाला कोणताही शास्त्रीय आधार नाही. खरेतर, पहिली लाट केवळ वृध्दांवर आणि दुसरी केवळ तरुणांवर बेतली असेही ठोसपणे म्हणता येणार नाही. कोरोनाने देशात शिरकाव केला तेव्हा स्वाभाविकपणे ज्यांची रोगप्रतिकारकशक्ती कमी आहे त्यावर सर्वप्रथम या विषाणूने हल्ला केला. कोणत्याही नवीन विषाणूच्या बाबतीत हाच सार्वत्रिक अनुभव असतो.

- Advertisement -

विषाणूचा जेव्हा जम बसला तेव्हा त्याला दुसरी लाट संबोधले जाऊ लागले. आपल्या देशात वृद्धांपेक्षा तरुणांची संख्या अधिक आहे. पहिल्या लाटेत अनेक वृद्धांना बाधा झाली होती. त्यामुळे दुसर्‍या वेळी तरुणाईला या विषाणूने ग्रासले. याचे महत्वाचे कारण म्हणजे, घरातील वृद्ध व्यक्ती जेव्हा बाधित होत होत्या, तेव्हा तिची सुश्रूषा करण्यासाठी घरातील तरुण मंडळीच धावपळ करताना दिसत होती. रुग्णालयाचा शोध घेणे, ते मिळाल्यावर वारंवार तेथे जाणे, औषधे मिळवण्यासाठी बाहेर पडणे, ऑक्सिजन वा रेमडेसिवीर मिळवण्यासाठी ठिकठिकाणी खेटा मारणे हे आणि अशा असंख्य गोष्टींसाठी त्यांना घराबाहेर पडावे लागले. विषाणूचा कहर जेथे जास्त होता त्या भागांशी त्याचा संपर्क आला आणि त्यातून तोही बाधित झाला. त्यामुळे ‘पॉझिटिव्ह’ तरुणांची संख्या वाढत गेली. अर्थात, दुसर्‍या लाटेत वयोवृद्ध व्यक्ती सहीसलामत सुटले, असेही नाही. या लाटेत असंख्य वयोवृद्धांना प्राण गमवावे लागले. लहान मुलांच्या बाबतीत मात्र कोरोनाने काहीशी सबुरी घेतली. त्याचे श्रेय लहान मुलांनाच द्यावे लागेल. २४ तासांपैकी सुमारे १० ते १२ तास घराबाहेर राहणार्‍या बालकांनी समजुतीची भूमिका घेत गेल्या सव्वा वर्षात पूर्णवेळ घरात बसून राहणे पसंत केले. त्यामुळे त्यांना कोरोना विषाणूची बाधा कमी झालेली दिसते.

खरेतर, तिसर्‍या लाटेचा बालकांवर परिणाम होईल हे भाकीत जेव्हा १८ वर्षांपुढील व्यक्तींना लस देण्याचा निर्णय झाला तेव्हा वर्तवण्यात आले. लस हीच कोरोनावर नियंत्रण आणण्याचे एकमेव साधन आहे. ज्या वेळी १८ वर्षांपुढील अधिकाधिक व्यक्ती लस घेतील तेव्हा या वयोगटातील व्यक्तींना कोरोनाची बाधा होण्याचे प्रमाणही कमी होईल हे स्वाभाविकच होते. अशा परिस्थितीत जो लस घेणार नाही त्याला बाधा होण्याचा धोका अधिक असेल आणि त्यात बालकांचा सर्वाधिक समावेश असेल असा अंदाज बांधण्यात आला. मात्र, लसींचा साठाच अपुरा असल्याने १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींना लस देण्याचा निर्णय तूर्तास मागे घेण्यात आला. परिणामी या वयोगटातील व्यक्तींमध्ये कोरोना संसर्गाचा धोका अद्यापही टिकून आहे. त्यामुळे केवळ बालकांनाच तिसर्‍या लाटेचा धोका आहे असे म्हणणे संयुक्तिक ठरणार नाही. बालकांना असलेला धोका टाळण्यासाठी अमेरिकेच्या फायजरने लहान मुलांसाठी लस निर्मितीची तयारी सुरु केली आहे. १२ ते १४ वर्ष वयोगटासाठी ही लस घेण्यास तेथील अन्न व औषध प्रशासन परवानगी देण्याच्या तयारीत आहे. २ ते ११ वर्ष वयोगटासाठी आपत्कालीन परिस्थितीत मान्यता देण्याचा तेथे विचार सुरू आहे.

- Advertisement -

भारतात मात्र अजून १८ च्या पुढील वयोगटाचाच लसींच्या बाबतीत वांधा आहे. त्यामुळे बालकांना लस देण्याचा विचार तूर्तास तरी होऊ शकत नाही. त्यामुळे जे लस घेणार नाहीत, त्यांना तिसर्‍या लाटेचा फटका बसेल हे सर्वश्रुत आहे. मात्र, यात केवळ बालकांनाच फटका बसेल असा अंदाज बांधून पालकांना भयग्रस्त केले जात आहे. पालकांना आपल्या जीवापेक्षा आपल्या मुलांची अधिक चिंता असते. वारंवार बालकांना धोका वाढेल अशा बातम्या दाखवून बालकांसह पालकांचीही चिंता या काळात वाढवली जात आहे. तिसर्‍या लाटेचा परिणाम बालकांवर होणारच नाही असेही कुणी ठामपणे म्हणू शकत नाही. त्यामुळे या काळात बालकांच्या उपचारांसाठीच्या सुविधा निर्माण करण्याचे शासनाने उचललेले पाऊल योग्यच आहे. या निमित्ताने बालरोगांशी संबंधित सुविधांचे ऑडिट होत आहे.

बालरोग तज्ज्ञांचे टास्क फोर्स तयार होत आहेत. मुलांना लागणारे व्हेंटिलेटर्स, त्यांना लागणारे ऑक्सिजन, तसेच मुलांसाठीचे अतिदक्षता विभाग (आयसीयू) या सगळ्या सोयी आता तयार होत आहेत. जनजागृतीसाठी डॉक्टरांना प्रशिक्षण दिले जात आहे. थोडक्यात, व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न होत आहे हेही नसे थोडके. त्यामुळे प्रशासनाच्या प्रयत्नांना या काळात प्रोत्साहन देण्याची गरज आहे. हे करताना बालकांसह पालकांचा मानसिक त्रास वाढणार नाही याचीही दक्षता शासनासह संबंधित यंत्रणांनी घ्यावी. तिसरी लाट बालकांना अधिक त्रासदायक ठरेल असे सांगताना आजवर बाधित झालेल्या ९५ टक्के बालकांमध्ये सौम्य लक्षणे आढळल्याचेही वारंवार स्पष्ट करायला हवे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, १०० बाधित मुलांपैकी १० मुलांमध्ये नव्या मल्टी सिस्टम इन्फ्लेमेटरी सिंड्रोमची लक्षणे दिसतात. त्यापैकी एकाला अ‍ॅडमिट व्हावे लागते. त्यापैकी ३ ते ५ टक्के मुलांना व्हेंटिलेटर लागते. लहान मुलांना पॅरासिटेमॉल वा तत्सम औषधे दिली जाऊ शकतात.

खरेतर, कोरोनाची तिसरी लाट ही बालकांवर परिणाम करणारी असेल असे थेट विधान करण्याऐवजी ही लाट बालकांचे मानसिक प्रश्न वाढवणारी असेल असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. गेल्या सव्वा वर्षाच्या काळात बालकांची जीवनशैली पूर्णत: बदलून गेली आहे. विशेषत: किशोरावस्थेतील मुलांच्या बाबतीत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. कोरोनाकाळात मुलं आपल्या शाळेला आणि मित्र, मैत्रिणींना कमालीचे मिस करताहेत. ‘वर्क फ्रॉम होम’ने पालकांचीही जीवनशैली बदलली आहे. यापूर्वी विशिष्ट कालावधीतच कार्यालयात जाऊन काम करावे लागते. पण ‘वर्क फ्रॉम होम’मुळे वेळेची मर्यादा पुसट झालीय. पालक अधिकाधिक वेळ ऑफिसशी संबंधित काम करत असल्यामुळे मुलांकडे काहीसे दुर्लक्ष होते. अशा वेळी मुलं चिडचिड करतात. आईला सतत चिकटून राहणे हे नैराश्याचेच लक्षण मानावे.

मुलांची चिडचिड होऊ नये म्हणून त्यांचे लाड पुरवले जातात. टीव्ही, गॅझेट, मोबाईल, इंटरनेटची सुविधा देऊन आभासी दुनियेत त्यांना रममान करण्याचा प्रयत्न होतो. ‘स्क्रीन टाईम’ वाढल्याने डोळ्यांपासून मेंदूपर्यंतच्या क्रियांवर फरक पडतो. पिझ्झा, बर्गर यांसारखे जंक फूड ऑनलाईन डिलिव्हरीमुळे सहजपणे उपलब्ध होत असल्याने त्याचा मारा केला जातो. त्यातून बालकांची प्रतिकारशक्ती कमी होण्याचा धोका वाढतो. त्यांच्यात लठ्ठपणा वाढतो. या काळात बालकांच्या शारीरिक हालचाली कमी झाल्याने त्यांच्यात आळस वाढतोय. खरेतर या काळात बालकांना पालकांच्या मानसिक आधाराची गरज आहे. त्यांच्याशी भरपूर गप्पा करणं, त्यांना भरपूर वेळ देणे यावर आता भर द्यावा लागेल. केवळ तिसर्‍या लाटेची चिंता वाहत बसण्यापेक्षा बालकांबरोबर चांगला वेळ घालवावा लागेल. इतकेच!

प्रबोधन दूर, बालकांमध्ये भीतीचीच लाट!
Hemant Bhosalehttps://www.mymahanagar.com/author/bhemant/
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -